---
माझं गाव - जिव्हाळ्याचा निबंधविषय
---
"समजा तुला कोणी आपल्या गावाचं नाव विचारलं तर काय सांगशील ? ... सांगायचं - गावाचं नाव मिठबांव देवगडजवळ" ...बालमंदिरात जात असलेल्या मला बाबांनी हे सांगितलं; एवढंच नव्हे तर 'मिठबांव देवगडजवळ,' हे दोन शब्द माझ्याकडून पाठच करून घेण्यात आले ... त्या बालवयात मुळात माझ्या मनात 'मिठबांव देवगडजवळ' हे एकच विशेषनाम आहे की 'मिठबांव' आणि 'देवगड' ही दोन विशेषनामं आहेत हाच संभ्रम निर्माण झाला होता ... तरीही हे अज्ञान शिताफीनं लपवून ठेवत मी विचारलं होतं - "तिथे काय आहे बाबा !" ... एक सुस्कारा सोडून बाबा म्हणाले होते, "काही नाही ... फक्त आपलं, म्हणजे तुझ्या आजोबांचं पडकं घर आहे" ... या पलीकडे जाऊन अजून काही चौकशा करून पुढे कदाचित बाबांचा संताप वाढण्याची रिस्क घेण्याची माझीही हिम्मत नव्हतीच ...
तशी बाबांना फिरण्याची, प्रवासाची, ट्रिप्सची आवड होती. त्यामुळे मी बालमंदिरात असतांना, कुठल्याशा निमित्ताने माझे चिमुकले पाय लागण्याचं भाग्य प्रथम दापोली, पालगडच्या तांबड्या रस्त्यांना लाभलं; पण मिठबांव, देवगडच्या रस्त्यांच्या नशिबी तेव्हा तरी ते भाग्य नव्हतं ... पण पुढे लवकरच १९६७ साली मी पहिलीत गेल्यावर त्यांना ते भाग्य लाभलं. मला आठवतंय, बाबांनी रजा घेऊन मिठबांव, गोवा, कोल्हापूर, पुणे, अशी फॅमिली ट्रिप ठरवली व भाऊच्या धक्क्यावर सारे देवगडला जाणाऱ्या बोटीत बसलो - 'देवगड' हे वेगळं गाव आणि 'मिठबांव' हे वेगळं गाव याची तेव्हाच माझ्या कुशाग्र मेंदूने नोंद घेतली ... अर्थात तेव्हाच्या माझ्या मिठबांवच्या आठवणीतही; माजलेल्या वेड्यावाकड्या वाळक्या गवताने भरलेला ओसाड जमिनीचा तुकडा; खांब, तीनचार पायऱ्या आणि ओटला असलेलं पडक्या घराचं स्ट्रक्चर आणि त्यासमोर स्वतःला विहीर म्हणवणारा जमिनीतला साधारण आयताकृती भोसका; एवढंच चित्र आहे ... आणि त्याचवेळी कानांमध्ये "हे आपलं, म्हणजे तुझ्या आजोबांचं, घर ... हात जोडून नमस्कार कर !" ... असा भावनेने काहीसा घोगरा झालेला बाबांचा आवाज आहे ... त्यावेळची मनातली बाकी सगळीच चित्र काळाच्या चपेट्यानी नष्ट झालेली आहेत ... माझ्या कॉलनीतल्या एकदोन सवंगड्यांची कोकणात कुठे कुठे घरं होती आणि त्यांच्या नशिबात आजी-आजोबांची माया होती, त्यामुळे ते गावाला जायचे तेव्हा मला एक सल जाणवायचा खरा, पण तो तेवढ्यापुरताच ...
त्यानंतर थेट एकदम १९९५ साली म्हणजे डायरेक्ट मी नोकरीत असतांना, माझ्या नोकरीच्या ठिकाणच्या एका घनिष्ट कोकणप्रेमी मित्रानी स्वतःच्या नव्याकोऱ्या, कौतुकाच्या सुमो गाडीनी राजापूर (त्याचं गाव), गोवा ट्रीप ठरवली; तेव्हा मिठबांवच्या द्वितीय दर्शनाचा योग यायचा होता ... खरंतर तेव्हा माझ्या ध्यानीमनीही नव्हतं; पण बाबांनीच सुचवलं की - "गाडी घेऊन सहकुटुंब जाताच आहात तर मिठबांवलाही जा ... ग्रामदैवत म्हणून नारळ ठेवून रामेश्वराच्या पाया पडा, कुणकेश्वराचंही दर्शन घ्या" ... अर्थात तेव्हाही मी सावधपणाने "मित्राला सुचवून बघतो; पण कसं जमेल याची खात्री नाही," असाच पवित्रा घेतला ... प्रत्यक्षात बाबांना असं सांगितल्याबद्दल कोकणप्रेमी असलेल्या त्या गाडीवान, घनिष्ट मित्राने मला शिव्याच घातल्या - "मेल्या, एवढं तुझ्या बाबांनी तुला सुचवलं तर तू मला हक्कानी सांगितलं का नाहीस ... हायवेपासून आत तर आत ... आपल्याजवळ गाडी आहे ना, मग तुझ्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण मिठबांव-कुणकेश्वरला जायचं म्हणजे जायचंच" ... एवढंच नव्हे, तर त्यानी माझ्या घरी येऊन माझ्या बाबांना शब्दही दिला ...
जाणतेपणी हाच माझा मिठबांवशी घनिष्ट परिचय ... त्यावेळी आम्ही व आमची मुलंबाळं धरून दहा जणं, एका सकाळी आमच्या भावकीतल्या माझ्या लांबच्या सोमणकाकांकडे गेलो ... माझा अर्थातच पहिलाच परिचय ... बाबांनी त्यांच्यासाठी दिलेली चिठ्ठी त्यांना द्यायची व आवश्यक तेवढं बोलून निरोप घेऊन रामेश्वर मंदिरात व कुणकेश्वरला आणि मग मालवण-सिंधुदुर्गात जायचं हा आमचा बेत ... पण काका-काकूंनी जेमतेम अर्ध्या मिनिटात अक्षरशः जन्मजन्मांतरीचं नातं जोडलं ... मी तबला वाजवतो म्हटल्यावर क्षणात संगीतप्रेमी काकांनी तबला माझ्यासमोर ठेवून वाजवायला सांगितलं आणि मग मी पाचसात मिनिटं त्यांच्यासाठी तबला वाजवला ... काकूंनी, 'जेवल्याशिवाय जायचं नाही,' ही तंबी दिली ... मग काकांबरोबर जाऊन समोरच्याच आमच्या जमिनीचं; गावच्या रामेश्वराचं आणि जवळच असलेल्या कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही जेवण्यासाठी परत आलो ... काकूंनी मोजक्या वेळातच पोळ्या, बटाट्याची भाजी, लोणचं, घरचा मुरंबा, काकडीची कोशिंबीर आणि घरच्या म्हशीच्या दुधाचं अफलातून चवीचं लोणी, असले नामांकित पदार्थ आम्हाला केळीच्या पानांत वाढले ... जेवून काका-काकूंचा निरोप घेऊन मगच आम्ही पुढच्या मार्गाला लागलो ... जातांना सुद्धा मित्र गंमतीने मला चावत होता की - "चहा सुद्धा न पाजणारा तू एक कंजूष सोमण कुठे आणि ते मिठबांवचे सोमणकाका कुठे !" ... ही मिठबांवची काळजाजवळची आठवण ... यानंतरही ट्रीप्सच्या निमित्ताने वेळोवेळी मिठबांवच्या धावत्या भेटी झाल्याच ...
नंतर हा कोकणप्रेमी मित्र माझ्या विलक्षण मागे लागला की - 'एवढी तुमची वडिलार्जित जमीन आहे ... हक्क सांगणारंही आणखी कोणी नाहीये, तर तुम्ही दोघं भाऊ मिळून मिठबांवला छोटं का असेना पण घर बांधा' ... माझ्या मोठ्या भावानीही हिम्मत बांधली ... 'रिटायरमेंटनंतर मी मिठबांवला राहीन, वेळेनुसार मिठबांव-मुंबई जा-ये करीन; पण आपण दोघं मिळून घर बांधुया.' असा विचार त्यानीही बोलून दाखवला ... माझ्या बाबांचीही ती इच्छा होतीच ... हा सगळा विचार करून शेवटी सोमणकाकांच्या आणि त्यांच्या मुलाच्या मदतीने तो विचार दहा वर्षांपूर्वी प्रत्यक्षात उतरवला ... जमली तेवढी झाडं-माडं लावली आणि खरोखरच हे सर्व खूप आपुलकीनी, मायेनी दादा संभाळतोच ... माझीही मिठबांवला दोनतीन महिन्यांनी फेरी होतेच ... आता गावचे अनेक लोकही परिचयाचे झालेत ...
रामेश्वर हे मिठबांवचं ग्रामदैवत आणि तांबळडेग समुद्रकिनाऱ्याच्या टेकडीवर असलेली गजबादेवी ही मिठबांवची ग्रामदेवता ... मुख्य गावापासून चार किमी अंतरावरचा 'तांबळडेग' किनारा आणि 'गजबादेवी मंदिर' हा मिठबांवच्या सौंदर्याचा एक नंबरचा अफलातून नजारा ... मिठबांवच्या खाडीपुलावरून दिसणारं सुंदर दृश्य सुद्धा उल्लेखनीय आहे ... पाचेक वर्षांपूर्वी रामेश्वर मंदिराचं नूतनीकरण झालं आणि मंदिराचा परिसर अधिकच सुंदर झाला ... आमच्या मिठबांवपासून जवळ असलेली बघण्यासारखी ठळक ठिकाणं म्हणजे कुणकेश्वर मंदिर, तारामुंबरी-मीठमुंबरीचा नवीन नितांत सुंदर रस्ता, देवगडच्या पवनचक्क्या व किनारा, विजयदुर्ग किल्ला, मालवण-तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, आंबोली हिल स्टेशन, रेडी गणपती मंदिर, इत्यादी ... बाकी इतर मंदिरं, खाड्या, बीचेस तर असंख्य ... बाकी सगळ्या कोकणातच या गोष्टी अगणितच म्हणा ...
माझ्या एका कोकणप्रेमी मित्राच्या सिद्धांतानुसार भौगोलिकदृष्ट्या कोकणात जसजसं तुम्ही दक्षिण दिशेला जाता तसातसा निसर्ग जास्तजास्त खुलत जातो ... म्हणजे रायगड पेक्षा रत्नागिरी जिल्हा सुंदर, त्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा सुंदर, पुढे गोवा, कर्नाटकची समुद्रपट्टी, इत्यादी ... मी असल्या काही मोजपट्ट्या न लावता ‘कोकण खूप सुंदर आणि माझ्या खूप जिव्हाळ्याचं आहे,’ एवढंच म्हणतो ... उगाच प्रांतीय अस्मितांचा कालवा नको ... मात्र याच मित्राचं, नुसतं गावावर किंवा कोकणावर नव्हे तर गोवा रोडवरही विलक्षण प्रेम आहे; त्यामुळे बाय रोड जातायेतांना तो कोल्हापूर रोड वा दुसरा कुठलाही रस्ता प्रिफर करत नाही ... असो ...
मी रोजचा लोकलनी प्रवास करणारा मुंबईकर असल्यामुळे मुंबई ते मिठबांव अंतर भरपूर आहे, असंच मी म्हणतो ... पण तरीही माणसाला आपल्या गावची, घराची ओढ इतकी तीव्र असते की तेवढ्या किंवा त्याहीपेक्षा जास्त अंतरावर गाव असलेले अनेक कोकणी चाकरमानी शुक्रवारी रात्री मुंबईतून गावाला जाऊन धावतपळत रविवारी रात्री ऑफीसकरता परत येतात, हे मी पाहिलेलं आहे ... त्याहीपेक्षा घाईनी गावचे लोक एखाद-दुसऱ्या कामाकरिता मुंबईत येतात आणि तासा-दोनतासात मुंबईतून परत निघून गाव गाठतात, हेही खरं ... कारण गावोगावी ड्रायव्हिंग करण्यात तरबेज असणारे गावचे लोक इतके आहेत की ते कोणाची तरी गाडी वापरून सहज नॉनस्टॉप जा-ये करतात ...
माझ्या अनुभवानुसार तरी मुंबईच्या तुलनेत गावच्या लोकांमध्ये देवधर्माबद्दल आणि कुलाचारांबद्दल श्रद्धा बरीच जास्त प्रमाणात आढळते ... त्यामुळे कोणाच्या तरी घरच्या बारशाचं, पूजेचं, देवाच्या पालखीचं, किंवा पाचपरतावणाचं, वगैरे निमित्त सांगून कामाला नकार देणाऱ्या गावच्या सुतार, इलेक्ट्रिशियन, प्लम्बरवर धावतपळत गावी आलेला चाकरमानी मुंबईकर भारी वैतागतो ... पण मग हळूहळू तोही मनःशांती शिकतो ...
माझ्या लहानपणी आमच्या गावी आमचं काहीच नसल्यामुळे माझे दोन तोटे झाले ... एकतर लहानपणी गावचं सुख मला अनुभवायला अजिबात मिळालं नाही आणि दुसरं म्हणजे शाळेत 'माझं गाव' या हक्काच्या निबंधविषयावर निबंध लिहायची वेळ आली की नाईलाजाने मला त्रिकोणी डोंगर, खोल खोल दऱ्या, हिरवीगार वृक्षराजी, दारची गुरंढोरं, मोती-मनी नावाची कुत्री-मांजरं, इत्यादी ऐकीव, वाचीव गोष्टींना वेठीला धरून जेमतेम पोटापुरते मार्क मिळतील, एवढ्या जागेचा मजकूर भरावा लागत असे ... ती उणीव आता उत्तरायुष्यात भरून निघाली खरी ...
@प्रसन्न सोमण
२५/०५/२०२०.
No comments:
Post a Comment