--- कोरोनोत्तरी प्रेमकथा ---
आपल्या प्रतिस्पर्धी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला पाहून सुद्धा लेखकांची झोप उडत नसेल, पण सध्याच्या परिस्थितीनी प्रेमकथा लिहिणाऱ्या लेखकांची पुरतीपुरती झोप उडवलेली आहे ... आजवर मराठी कथेची चिरफाड करतांना टीकाकारांनी प्राचीन कथा, नवकथा, साठोत्तरी कथा, इत्यादी शब्दप्रयोगांचा वापर करून कथासाहित्याचे खंड पाडले होते ... आता यांत 'कोरोनोत्तरी कथा' असा एक नवीनच खंड पडल्याचे चाणाक्ष कथाकारांच्या लक्षात आलेले आहे ... आता या कथा कशा लिहाव्या या प्रश्नानी प्रेमकथा लिहिणाऱ्या लेखकांच्या मनात वादळ उठवलेलं आहे ... बरं पूर्वीची पारंपरिक, हात बसलेली प्रेमकथा लिहावी तर ती आऊटडेटेड वाटणार ... त्यामुळे तशी कथा लिहिली तर एक्स्पायरी डेटच्या कितीतरी आधीच - कदाचित प्रसिद्धीपूर्व सुद्धा - आपल्या कथेचं डेथ सर्टिफिकेट आपल्यालाच आणावं लागेल की काय; ही चिंता ... सध्याच्या नवीन काळाला अनुसरून कथा लिहावी तर कल्पनाशक्ती ताणूनताणून सुद्धा कथानिर्मितीसाठी योग्य अशी कलात्मक वातावरणनिर्मिती व कलामूल्यांची निर्मिती कशी करावी, ते सुचता सुचत नाही अशी परिस्थिती ... असल्या काहीतरी विलक्षण शृंगापत्तीत आज ही जमात अशी अडकलीय की ज्याचं नाव ते .... अगदी अडकित्त्यात सुपारी अडकावी त्यातली गत ... त्यामुळे सध्या; मानव जात राहील की नाही, मानवाची वंशवृद्धी आता कशा प्रकारे होऊ शकते, वगैरे प्रश्नांपेक्षाही काही अतिगंभीर प्रश्न प्रेमकथा लिहिणाऱ्या कथालेखकांपुढे व्यापक आव्हान म्हणून उभे राहिलेले आहेत ... या आव्हानांना कसं सामोरं जायचं, आपल्या कथालेखनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आणून या आव्हानांना कसं भिडायचं, असले प्रश्नच प्रश्न ... काही लेखकांपुढे तर, आव्हानाला तरी सरळ भिडायचंय की त्यापासून दोन मीटर अंतर राखायचंय, असाही प्रश्न पडलेला आहे ...
आजवर आपल्या वाचनात आलेल्या नवनवीन जर्म्सची देवाणघेवाण करणाऱ्या काही लेखक मित्रांनी (आईशप्पथ हा विरोधाभास नाहीये ... अपवादात्मक काही व्यक्तिमत्व खरंच अशी आहेत की जी स्वतः लेखक असूनही दुसऱ्या लेखकांचे मित्रही आहेत) या प्रश्नांवर तोडगा मिळाला तर पाहावा, असा विचार केला ... आमच्या माहितीत कालच या मंडळींनी कुठल्याशा मोबाईल ऍप वर ऑनलाईन सल्लामसलत केली ... त्यानुसार एका लेखकानी त्याची कोरोनोत्तर लघुकथा अशी लिहिल्याचं आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे ... त्या कथेची ही प्रसिद्धीपूर्व प्रसिद्धी ...
-- अंतरमय निःसीम प्रेम --
खाजगी गाडीनी ऑफिसमध्ये आलो खरा पण बघतो तर सेक्शन मध्ये उपस्थिती अगदी कमी होती ... ठरलेली प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशी नजर तिच्या टेबलाकडे (अंतर - दोन मीटरपेक्षा बरंच जास्त) गेली ... थँक गॉड ... ती उपस्थित होती ... तिच्या कपाळाचा आणि गालाचा जेवढा भाग दिसत होता त्यावर या दिवसात सुद्धा सुंदरसा मेकअप केलेला दिसत होता ... तिची आणि माझी नजरानजर होताच तिचा मला दिसणारा गालाचा भाग, आरक्त होऊन उठल्यासारखा मला जाणवला ... माझ्याही नकळत माझी नाठाळ नजर तिच्या चेहेऱ्यावरच्या झिरझिरीत सी थ्रू मास्कमधून आरपार वेध घेत होती ...
'तिच्या पोवळ्यासारख्या ओष्ठ द्वयांवर आज कुठल्या शेडची भाग्यवान लिपस्टिक फिरली असेल बरं,' हा विचार मनात रुंजी घालत होता ...
साहेब अजून आलेले नव्हते ... आजूबाजूलाही फारसं कोणी नव्हतं ... तेव्हा तिच्या टेबलाशी जाऊन तिच्याशी चार सुखदुःखाच्या गप्पा माराव्या, असा विचार माझ्या मनात बळावला ... नुसता विचार करून सुद्धा चित्तवृत्ती उल्हसित झाल्यामुळे माझ्या मास्कच्या आत नाकपुड्या आणि ओठांच्या मध्ये घर्मबिंदु जमा झाल्याची मला जाणीव झाली ... तिच्याशी गप्पा मारायला तिच्या टेबलाकडे जाताजाता घर्मबिंदु पुसावेत, असा विचार करून मी माझा मास्क खाली केला ... मात्र अचानक तिचा चेहरा भयव्याकूळ झाल्याचे मला दिसले ... जिवाच्या आकांतानी ती हातांनी मला 'दूर व्हा, दूर व्हा' असा इशारा करत होती ... एक काळ होता जेव्हा सिनेमामध्ये; बांधून ठेवलेल्या नायिकेवर बलात्कार करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या खलनायकाला पाहून नायिकेच्या चेहऱ्यावर अगदी अस्सेच भाव उमटत असत ... आजकाल त्या काळाच्या स्मृती तेवढ्या शिल्लक आहेत ... तिचा ‘तो’ चेहरा पाहून माझी चूक माझ्या लक्षात आली आणि माझ्या पावलांना ब्रेक लागले ...
अचानक कुठून कसा कोण जाणे पण 'प्लॅटोनिक लव्ह' नावाचा कुठेतरी वाचलेला शब्दप्रयोग मला आठवला ... त्यापाठोपाठ ओढाळ वयात वाचलेला असाच आणखी एक शब्दही मला आठवला ... नेत्रमैथुन ... मनातल्या या स्थित्यंतरांनंतर गप्पा मारण्याची मनात आलेली कृती मी कशी करणार ? ... मी माघार घेण्याचा सुज्ञ निर्णय घेतला ...
वैधानिक इशारा - ही कथा कागदावर, पुस्तकात, मोबाईलमध्ये, किंडलमध्ये, कुठेही वाचा पण डोळ्यांपासून दोन मीटर अंतर ठेवणे अनिवार्य आहे ...
----- xxx -----
मीही माझ्यापुरता या असल्या साहित्यापासून लांबवर अंतरावरच राहण्याचा सुज्ञ निर्णय घेतलाय ...
@प्रसन्न सोमण
१६/०५/२०२०.
No comments:
Post a Comment