Monday, 17 August 2020

--- सद्वर्तनी वाल्या ---

 

--- सद्वर्तनी वाल्या ---

 

 

 

गोष्ट आहे बरीच जुनी ...

 

 

तसा म्हणायला चाळीशीच्या जवळ आला असला तरी मनात तारुण्य जपणारा हौशी अरुण आणि त्याच स्वभावाशी मिळतीजुळती अशी अवंतिका ... मोठी तनुश्री आणि धाकटा तन्मय ... चौकोन पूर्ण ... अरुण, अवंती टिपिकल मध्यमवर्गी आणि मध्यममार्गी नोकरदार ... अशीच एकदा सहकुटुंब अरुणच्या, जरा बड्या मित्राच्या गाडीतून महाबळेश्वर ट्रिप करून आली; आणि अचानक अरुणला स्वतः गाडी घेऊन त्यातून फिरण्याचे आणि ट्रिपा काढण्याचे वेध लागले ... सल्ल्यासाठी मित्र होताच ... नवी कोरी गाडी घेण्याचा विचार सुद्धा करणं अरुणच्या 'पहुँच'च्या बाहेर होतंच ... शेवटी सेकंड हॅन्ड, पण बऱ्याच चांगल्या कंडिशनमधली फियाट दारात झुलली ... गम्मत म्हणजे अरुणला ड्रायव्हिंग येत नव्हतंच ... गाडी घेतल्यानंतर शिकला ... पण तरीही जराशी जुनी गाडी तासनतास ड्राईव्ह करून फॅमिली पिकनिक्सना नेण्याएवढं धैर्य नव्हतं आणि मुंबईतल्या मुंबईत गाडी चालवायची इच्छाच नव्हती ... बाहेरगावी मस्त फॅमिली पिकनिक्स काढणं हाच तर गाडी घेण्यामागचा हेतू होता ... अगदी तरुण वयाचा हौशी ड्रायव्हर साहिल त्याला मिळाला आणि अगदी पहिल्या ट्रीपपासून तो घरच्यासारखाच झाला ...

 

 

उरलेल्या दोन कॅज्युअल्स वापरून नाताळला जोडून अरुण, अवंतीनी शिवथरघळीचा आणि पुण्याचा बेत आखला. मुलांना नाताळच्या सुट्ट्या होत्या ... साहिलही तयार होताच ... अवंतीची आईसुद्धा 'येते' म्हणाली ... त्याकाळात तशा लहानच असणाऱ्या मुलांना मांडीवर घेऊन प्रवास करण्यात विशेष काहीच अडचण नव्हती, त्यामुळे सासूबाई ऍडजस्ट होण्याजोग्या होत्याच ... गोवारोडनी शिवथरघळ करून घाट चढून पुण्याच्या - सिंहगड रोडच्या आणि अरुणचं सेकंड होम असलेल्याब्लॉकमध्ये दोनतीन दिवस मुक्काम मुक्काम आणि तिथून मूडनुसार आजूबाजूचं पुणं फिरून मुंबईला परत इतका साधा बेत होता ... म्हणजे ठरवलेला कार्यक्रम तरी एवढाच होता.

 

 

पण ट्रीपमधल्या गप्पांमध्ये अवंतीच्या आईनी कुलदेवता अंबेजोगाईचा विषय काढला ... खूप पूर्वी त्या पुण्याहूनच अंबेजोगाईला गेल्या होत्या आणि पुण्याहून सोलापूर रोडवरून गाडीनी साधारण पाचेक तास लागतात असा त्यांचा अंदाज होता ... अरुणचीही कुलदेवता अंबेजोगाईच होती ... त्यामुळे त्यानी तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर दुसऱ्या दिवशी अंबेजोगाईला जाऊनच येऊ, असा प्रस्ताव मांडला .... घरच्यासारख्या असलेल्या तरुण साहिलला - अगदी अपरात्र होणार असली तरीही - ड्रायव्हिंगच्या दृष्टीने काहीच प्रॉब्लेम नव्हता; त्यामुळे बेत पक्का झाला ...

 

 

लवकर लवकर म्हणता म्हणता सगळ्यांचं आवरून निघायला सकाळचे आठ वाजलेच ... सोलापूर रोडला एके ठिकाणी चहानाष्ट्याला थांबल्यानंतर अरुणनी अंबेजोगाईचा रस्ता नीट विचारून घेतला ... दुपारच्या जेवणाला आणि चहाला असंच कुठेतरी थांबून प्रवास चालू ठेवला ... आत्ता येईल ... येईलच ... असं वाटता वाटता अंबेजोगाईला पोहोचेस्तोवर साडेचार-पाच वाजले ... डिसेम्बरचा महिना असल्यामुळे एकतर दिवस लहान होते ... शिवाय प्रवासात नेमकी तनुश्रीही तापानी फणफणली होती ... या परिस्थितीत कितीही लवकर दर्शन घेतलं तरीही परत पुणं गाठणं फारच कठीण वाटलं ... त्यामुळे ती रात्र काढण्यासाठी अंबेजोगाईत एखाद्या लॉजची चौकशी केली तर त्याकाळी तरी आयत्यावेळी तिथे लॉजची सोय होण्यासारखी नाहीये, असं समजलं ... सगळेच जरासे भांबावले ... पण मग शेवटी पटकन दर्शन घ्यावं परत रात्रीचा प्रवास करून अपरात्री का होईना पण पुणं गाठावं असं ठरवलं ...

 

 

दर्शनाला मात्र गर्दी नव्हती ... दर्शन घेऊन फियाट परतीच्या प्रवासाला निघाली तोवर सहा-सव्वासहा वाजून गेले होते ... संध्याकाळी सव्वासात साडेसातच्या सुमारास गाडी केजच्या पुढे कुठल्याशा गावाजवळ आली असतांना गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला ... बोंबला ... तशी गाडीत स्टेपनी होती पण जॅक दुर्दैवानी नव्हता ... साडेसातच झाले असले तरी रस्त्यातला काळोख जाम भयावह वाटत होता ... नाइलाजानी खाली उतरून अरुण आणि साहिल येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून जॅकची उसनवारी करता येत्येय का, याचा प्रयत्न करू लागले ... छोटी मुलं पेंगुळली होती आणि दोन्ही बायका गाडीतच चिंतेत बसून होत्या ...

 

 

पंधरावीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर एक उघडी जीप हात दाखवून थांबली ... जीपमधून चारपाच तरुण खाली उतरले ... एक दाढीवाला पुढे येऊन विचारू लागला - "काय झालं ?" ... अरुणनी प्रॉब्लेम सांगितला ... दाढीवाल्यानं सांगितलं, "आहे ना साहेब ! आमच्या गाडीत जॅक आहे ... काही काळजी करू नका ... तुमच्या गाडीचा टायर बदलून द्यायला आम्ही मदत करतो" ... अरुण आणि साहिलच्या जिवात जीव आला ... गाडीच्या खिडकीतून बघत त्या दाढीवाल्यानं पुढे विचारलं, "कोण कोण आहे गाडीत ? त्या मंडळींना उतरावं लागेल" ...

"गाडीत माझी बायको दोन मुलं आणि माझ्या सासूबाई आहेत ... तुमचे खूप खूप आभार आहेत ... ठीक आहे, आम्ही सगळे उतरून एका साईडला थांबतो ... हा आमचा ड्रायव्हर साहिल तुमच्या मदतीने टायर बदलेल ... मग आम्ही पुढे निघू" ...

"काय वेडे आहात का साहेब ? बच्चे कंपनीला, वहिनीसाहेबांना आणि फॅमिलीला आम्ही असा त्रास थोडीच देणार आहोत ... काळजी करू नका ! तुम्ही सर्व फॅमिली माझ्या जीपमधून गावात माझ्या घरी चला ... फक्त ड्रायव्हरला इथं थांबू द्या ! माझ्या मित्रांच्या मदतीनी टायर बदलून तुमची गाडी रेडी झाली की मग काय ते बघू !"

या सूचना वजा आग्रहानंतर अरुण चांगलाच भंजाळला ... काय करावं काही कळेना ... पण फार विचार करायला संधी नव्हतीच ... शेवटी 'थँक्यू व्हेरी मच' म्हणत सगळे त्या जीपमधून त्या तरुणाच्या घरी गेले ...

 

 

मध्यम आकाराचं कौलारू घर ... अंगणातून आत शिरून बाहेरच्या हॉलमध्ये सर्वांना "बसा जरा ! ... मी आलोच" ... असं म्हणून "वहिनी" अशी हाक मारत तो दाढीवाला आत गेला ... घरात त्यानी एकूण परिस्थितीची कल्पना दिली असावी ... दोन मिनिटात बाहेर येऊन "मी आलोच साहेब तुमच्या गाडीचं बघून," असं सांगून तो परत बाहेर पडला ... थोड्याच वेळात एका छोट्या, दोनेक वर्षांच्या, मुलाबरोबर एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि म्हणाली -

"सदानी - माझ्या दिरानी - मला सगळं सांगितलंय ... तुम्ही काही काळजी करू नका ... थोडं पातळ पिठलं, भाकऱ्या नि भात तयार आहे ... दोनदोन घास जेवून घ्या" ...

"छे छे वहिनी ! प्लिज नको ... टायर बदलून झाला की आम्ही निघू ... पुण्याला आमच्या घरीच तर जायचंय ... थँक्यू व्हेरी मच, पण खरंच जेवण वगैरे नको" ...

"अहो काय दादा ! काय बोलताय ... पुणं काय जवळ आहे होय ? ... चार घास जेवा ... इथंच आडवं व्हा, रात्र काढा नि पहाटे उठून निघा पुण्याला" ...

"नको हो वहिनी ... ते सदाभाऊ आणि आमचा ड्रायव्हर अगोदर टायर बदलून येऊ द्या ... मग आम्ही निघू" ... अरुण बोलायला लागला; पण बोलता बोलता त्याची नजर अवंतीकडे गेली आणि तिच्या नजरेत संभ्रम दिसला ... कदाचित तापानी मलूल झालेल्या तनुश्रीची काळजी तिला भेडसावत असावी ... त्यामुळे पुढे अरुण म्हणाला, "बरं ठीक आहे वहिनी ... अगदी थोडा थोडा पिठलं भात आम्ही जेवू ... यापेक्षा प्लिज फार काही आग्रह करू नका" ...

 

 

तेवढ्यात तनुश्रीनी थोडी कुरकुर केली आणि ती आईकडून आजीच्या मांडीवर आडवी झाली ... त्या वहिनींनी तत्परतेनी तीनचार सतरंज्या वजा दुलया आणून अंथरल्या ... त्यांच्याबरोबरच अवंती त्यांच्या मदतीसाठी आतमध्ये गेली ... थोड्याच वेळात बाहेरून सदाभाऊ आणि साहिल आत आले ... सदाभाऊनी टायर बदलून झाल्याचं सांगितलं तेवढ्यात वहिनी आतून ओरडल्या ... "सदा, अगोदर त्यांचं जेवण होऊ दे. मग पुढे बघू !" ... सदा "ठीक आहे" म्हणाला आणि अरुणला "साहेब जरा बाहेर येता का ?" असं विचारत तो अंगणात गेला.

"साहेब तुमच्या गाडीचं काम झालंय ... पण प्लिज ऐका माझं ... आत्ताच रात्रीचं तुम्ही इथून पुण्याकडे निघू नका."

"अहो सदाभाऊ, साहिल घरच्यासारखाच आहे ... त्याला नाईट ड्रायव्हिंगचाही काहीच प्रॉब्लेम नाहीये ... पुण्यात पोहोचू आम्ही पहाटे तीनसाडेतीन पर्यंत ... कोकणात वगैरे रात्रीच्या प्रवासाची खूप सवय आहे आम्हाला."

"तो प्रश्न नाहीये साहेब ! ... खरं सांगू का तुम्हाला ? ... या भागातले रस्ते खूप डेंजर आहेत ... त्यात तुमच्याबरोबर फॅमिली, मुलं आहेत ... पहाटे उठून निघा ना !"

"काही नाही होणार हो ! जाऊ आम्ही सावकाश ... ... नका तुम्ही काळजी करू !"

"अहो साहेब, काय सांगू तुम्हाला ? ... रात्रीच्या वेळेला या भागात रस्त्यांवर उलटे खिळे मारलेल्या फळ्या टाकून गाड्या पंक्चर करतात आणि संधी बघून लूटमार सुद्धा होते साहेब !"

"अरे सदाभाऊ, थँक्यू तुम्ही आम्हाला एवढी मदत केलीत; पण तुम्ही काळजी सुद्धा फारच करता हो ... अहो देवाच्या कृपेने काहीसुद्धा होणार नाही ... जाऊ ना आम्ही सावकाश !"

"माझं प्लिज ऐका तुम्ही साहेब ! ... आता तुम्ही ऐकतच नाही आहात तर माझीच गोष्ट सांगतो तुम्हाला" ...  असं म्हणत सदानी घराकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात तो पुढे बोलायला लागला - "घरात प्लिज काही बोलू नका तुम्ही; पण मी आणि माझे ते दोस्त हाच उद्योग करतो ... खरंच ! आम्ही स्वतः लूटमार करतो" ...

"काय सांगता काय सदाभाऊ तुम्ही ... छे शक्यच नाही हे !"

"साहेब विश्वास नसेल तर आत्ता माझ्या बरोबर येऊन तुम्ही बाहेरची जीप चेक करा ... आत्ताही जीपमध्ये तुम्हाला उलटे खिळे ठोकलेल्या दोनचार फळ्या, हॉकी स्टिक्स, लोखंडी कांबी, वगैरे हत्यारं मिळतील ... अहो तुम्ही जंटलमन, फॅमिलीवाले, बरोबर दोन छोटी मुलं, हे बघून तुम्हाला मदत करावीशी वाटली ... पण सगळेच असा विचार करतील असं नाही हो !" सदाभाऊच्या स्वरात खूप कळकळ होती ...   

हे ऐकून अरुणच्या हातापायांना मात्र अक्षरशः कापरं भरलं ... अवंतीच्या आणि सासूबाईंच्या अंगावर थोडे का होईना दागिने आहेत ... लहान मुलं आहेत ... ट्रीपसाठी म्हणून सामानात लपवलेली तशी थोडीफार रक्कम आहे ... या सदूभाऊची आणि त्याच्या घरच्यांची ओळख ना देख ... वगैरे विचार त्याच्या डोक्यात आधीपेक्षा चौपट काळजीने थैमान घालायला लागले ... साहिलही आतच होता ... सर्वांना कसलीही जाणीव करून देणं तर अशक्य होतं ... काहीतरी करून दोन घास खाऊन पटकन इथून सटकावं की रात्र कशीतरी ढकलून पहाटे निघावं ? ... विचारांनी अरुणच्या डोक्याला खरंच मुंग्या आल्या ... शेवटी पहाटे निघण्यावाचून गत्यंतर नाही, हे अरुणच्या लक्षात आलं ... नाहीतरी वहिनींचं वागणं-बोलणं खूप आपुलकीचं दिसत होतंच ... आणि खुद्द सदा सुद्धा निदान आपल्याशी तरी खूपच चांगला वागलाय ना; एवढाच विचार अरुण करू शकत होता ... 

वरकरणी मात्र आपण बिनधास, नॉर्मल असल्याचं भासवीत अरुण म्हणाला ...

"अहो सदाभाऊ ! हे असले उद्योग खरंच बरे नाहीयेत हो ! सोडा हे सगळं आता" ...

"जरा थोडा सेटल झालो की सोडणारच आहे हो आपण हे सगळं ... पण हात जोडतो ... तुम्ही पहाटे सहा वाजल्याशिवाय निघायचं नाही ... मी तर मित्रांबरोबर रात्री बाहेरच आहे ... शेतात झोपायला जातोय असं घरी सांगितलंय ... पहाटे साडेपाच सहापर्यंत मी येतोच तुम्हाला भेटायला" ...

तेवढ्यात आतून जेवणासाठी बोलावणं आलं ... हळूच सर्वांना अरुणनी 'एवढ्या रात्री जाता आपण पहाटेच लवकर उठून जाऊया,' अशी थोडक्यात कल्पना तेवढी देऊन ठेवली ... सदा जेवून बाहेर सटकलाच ... दोन घास जेवून उपचाराचं बोलून सगळे दुलयांवर आडवे झाले ... प्रवासाच्या श्रमांनी झोपही लागली ... अरुणची सगळी रात्र मात्र प्रचंड काळजीमुळे विचित्र अवस्थेत गेली ... अगदी थोडी आणि खूप विस्कळीत झोप लागली तरी दचकून जाग येऊन सगळ्यांकडे आणि सामानाकडे नजर जात होती ...

 

 

साडेपाचलाच सगळे उठले ... चुळा भरून होईस्तोवर वहिनींनी चहा सुद्धा आणला ... पाठोपाठ सदा सुद्धा आलाच ... दोघांच्याही चांगुलपणाचं सर्वांनाच जरासं ओझं झालं होतं ... शेवटी चुळबुळत अरुण सदाला म्हणाला ...

"सदाभाऊ, आमच्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही खरंच देवासारखे धावून आलात आम्हाला चहा, जेवण एवढंच नव्हे तर रात्रीचा आसरा दिलात ... आता तुम्हाला पैसे विचारतांना मला खरंच खूप ऑकवर्ड होतंय; पण तरीही प्लिज सांगा तुम्हाला काय, किती पैसे देऊ ?"

"अहो काय बोलताय दादा ! वहिनी म्हणाल्या ... अहो एवढ्याशा गोष्टीचे कसले पैसे ? ... तुम्ही सुखरूप पुण्याला पोहोचा, बस्स !"

सदाभाऊ सुद्धा म्हणाला, "अहो साहेब तुमच्या अडचणीत उपयोगी पडायची त्या पांडुरंगानं आम्हाला संधी दिली ... बस्स झालं हो ! याचे कसले पैसे ?"

अरुणच्या सुदैवानं तेवढ्यात वहिनींचा छोटा मुलगा "आई आई" करत बाहेर आला ... त्याच्या हातात नोटा कोंबत अरुण म्हणाला, "छोट्याला त्याच्या काका-काकूकडनं खाऊला म्हणून देतोय ... आता याला तरी प्लिज नाही म्हणू नका ... निघतो आम्ही ... परत एकदा थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग" ...

 

 

आता जवळजवळ सत्तरीला आलेल्या अरुणला अजूनही खंत वाटते तेव्हा त्या सदुभाऊचं पूर्ण नांव आणि पत्ता घ्यायला आपण कसे विसरलो ?

 

 

 

@प्रसन्न सोमण

१४/०२/२०२०.

No comments:

Post a Comment