--- माझी घरगुती खाबुगिरी ---
(घराची स्वयंपाकखोली म्हणजे ज्या खोलीत स्वयंपाक केला जातो ती खोली, या पलीकडे त्या खोलीबद्दल मला कसलीही माहिती नसल्यामुळे माझ्या वर्णनात बहुदा चुका आढळतीलच ... त्यामुळे नमनालाच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ठेवतो ... शिवाय जशा पोळ्या रोज केल्या जातात तशा चुकाही रोज केल्या जातातच; त्यामुळे हीच दिलगिरी माझ्या संपूर्ण उर्वरित आयुष्यासाठी ग्राह्य धरण्यात यावी, हेही स्पष्ट करतो ...)
अलीकडची छोटी मुलं पाहिली की, आता उतारवयात असलेल्या आमच्या पिढीने एकंदरीत वडिलांचं प्रेम खूपच कमी अनुभवलंय, हे जाणवतं ... तशी आईसुद्धा अगदी आंजारून गोंजारून पोटाशी धरत नसली तरीही बारीक बारीक प्रसंगांतून आईचं प्रेम किंवा लाड अगदीच लक्षात यायचे ... पण बाबांचा मात्र धाक जाणवायचा ... एकूणच पुरुषांनी प्रेम अव्यक्त ठेवण्याचाच तो काळ असावा ... फक्त कधीमधी आजारी पडलो की तेव्हा मात्र बाबांचं प्रेम जाणवत असे ... अशावेळी संध्याकाळी, कधी रात्री उशिरा सुद्धा हातपाय-पाठ चेप, खोकला असेल तर छातीवरून मायेने हात फिरव, असल्या कृतींमधून बाबांचं प्रेम नक्कीच जाणवायचं ... मात्र असा प्रेम जाणवण्याचा योग; गुरूपुष्य, कपिलाषष्ठी, माणिकांचन, अमृतसिद्धी, (अजून असले काय असतील ते) असल्या योगांपेक्षाही अधिक दुर्मिळ असायचा ... त्यामुळे शाळेतून येतांना दिसणाऱ्या चिंचा, बोरं, जिरागोळ्या, वगैरे असलेल्या दुकानाशी काहीसा घुटमळलो तरी त्यासाठी पाचदहा पैसे बाबांकडे मागण्याची हिम्मतच नव्हती ... किंबहुना बाबा स्वतः 'शाळेसी जातांना मुलांनी वाटेत तमाशा पाहत राहु नये,' ही कवितेतली ओळ शिकलेले असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा ती त्यांच्या लक्षात असल्यामुळे जवळच्याच शाळेत जायला मला एकट्यानी सोडलं तरी 'सरळ जायचं आणि सरळ घरी यायचं,' अशी तंबी दिलेली होती. त्यामुळे चिंचा-बोरं, जिरागोळ्या, पाच पैशात मिळणारी आईसप्रुटं, असल्या ठिकाणी मी नुसता घुटमळलो तरीही मला क्रांतीकारक असल्याचा फील येई ... बरं, खूप धाडस करून या गोष्टी चोरून खायची क्रांती करायची तरी त्यासाठी पाचदहा पैसे कमवायचे कसे या यक्षप्रश्नच होता ... नवऱ्याच्या अपरोक्ष मुलाचे, काही पैसे वगैरे देऊन फाजील लाड करावे यासाठी मुळी बायकोची प्राज्ञाच होत नसे, असला काहीतरी विचित्र तो काळ होता ... त्यामुळे 'ह्यां'च्या मूडनुसार पूर्वपरवानगी घेऊन कधीमधी आईकडून गोट्या, ढप, भोवरा, असल्या खेळांसाठी सटीसामाशी पाचदहा पैसे मिळायचे ... पण तरीही चिंचा-बोरं, जिरागोळ्या, आईसप्रुटं, असल्या ‘बाजारू’ खाण्यासाठी आईकडून पैसे मिळणंही अशक्यच होतं. त्यामुळे असल्या गोष्टी कधीच खाल्ल्याचं मला मुळी आठवतच नाही.
बाहरेच्या खाण्याच्या दोनच वस्तू घरात आलेल्या पटकन आठवतायत ... एक म्हणजे मुलाचे माफक लाड म्हणून अगदी थोड्याशा लिमलेटच्या गोळ्या आणि रावळगावची चॉकलेटं आणून आईच्या हातात द्यायची; आणि मला आणि पर्यायानी आईलाही, ' हा खाऊ महिनाभर पुरलाच पाहिजेत,' अशी समज दिली जायची ... दुसरी गोष्ट म्हणजे गोल ऑरेंज क्रीमच्या बिस्किटांचा मध्यम आकाराचा पुडा ... त्यातली दोन बिस्किटं कधीमधी वाटणीला आली की स्वर्गसुख असे ... जास्त वेळ पुरवण्यासाठी म्हणून आधी दोन बिस्किटांच्या मधलं क्रीम हळूहळू खायचं आणि मगच ती दोन बिस्किटं चवीचवीनी खायची ही माझी ठरीव पद्धत होती ... अजूनही एक गोष्ट होती - मे महिन्याच्या सुट्टीत वर्षाकाठी एकदा व्हॅनिला क्वालिटी का जॉय आईस्क्रीमचा एक बॉल मिळत असे ... त्यामुळे वर्षातून एकदा आईस्क्रीम आणि खेळणं म्हणून बॉल असा तो 'कॉम्बो' मामला होता.
माझे खाण्यापिण्याचे लाड झाले ... नाही असं नाही ... पण ते घरगुती खाणंपिणं होतं ... अशा अनेक गोष्टी असाव्यात की कालपरत्वे माझ्या संसारात मला अभावानेच मिळाल्या; पण माझ्या पोरवयात आईबाबांच्या संसारात मला त्या मिळत होत्या (संसार समरांगणात प्राणाहुती द्यावी लागण्याचा धोका पत्करूनच मी हे लिहितोय) ... मुळात दूध ... माझ्या लहानपणी सरकारी केंद्रातल्या बाटल्यांमधून होल आणि टोन्ड अशा दोनच प्रकारचं दूध मिळायचं ... आमच्या घरी कुठलं असायचं कोण जाणे, बहुदा जे स्वस्त असेल तेच असणार ... मात्र तरीही दही, लोणी, साजूक तूप, कमालीच्या सुंदर चवीचं असायचं ... पण अगदी मी ताक घुसळलं तरीही, चमच्यात रवीखालचं ताजं लोणी घेऊन खायला मिळायची संधी अगदी दुर्मिळ असायची व मिळालीच तरी तीही आईचा ओरडा खाऊन मिळायची ... जेवतांना तूप जास्त मागितलं की लगेच 'तूप हे तुपासारखं खायचं असतं भाजीसारखं नाही' हे ऐकावं लागायचं ... शेवटी 'जाऊ द्या हो' म्हणत आई थेंबभर जास्त तूप वाढायचीच, हे खरं ... तरीही तुपा-लोण्याबरोबर खाण्यासारखे पदार्थ केलेत आणि तूप, लोणी कमी पडलंय; असं कधी होत नसे ... बाहेरचे फरसाण, वेफर्ससारखे पदार्थ फारसे कधी मिळाले नाहीत तरी जराशी उन्हं उतरल्यावर काहीतरी तरी खायला केलं जायचं आणि त्याला 'मधली वेळ' किंवा 'मधली' असा शब्द होता ... यात फोडणीचे पोहे, उपमा, सांजा, गोडाचा शिरा, दडपे पोहे अशांसारखे पदार्थ असायचे.
रेडिमेड खाऊ फार नाही मिळाला तरी, काहीकाही खाऊ अजिबात विसरता येत नाहीत ... आमच्या घरी गुरुवारची दत्ताची आरती होत असे व नंतर अर्थातच एक प्रसादाचा पेढा मिळत असे ... आता पूर्ण वार्षिक कॅलेंडर आठवायचं तर - पाडव्याला घरगुती श्रीखंडपुरी किंवा दुसरं काहीतरी पक्वान्न ठरलेलं असायचं ... रामनवमीला कॉलनीमध्ये दुपारी रामाची आरती होऊन सुंठवडा असायचाच ... एक मेला संयुक्त महाराष्ट्राची आठवण म्हणून आणि सुट्टी म्हणूनही, काहीतरी खास गोडाधोडाचं होत असे ... पुढे पावसाळ्यात तर चंगळच होती ... आषाढी एकादशी हा आईच्या निमित्ताने जबरदस्तीने सर्वांच्या उपासाचा दिवस असायचा खरा; पण उपासाचे पदार्थ म्हणून पानात जे पदार्थ वाढले जायचे त्यात खूपच व्हरायटी होती ... कॅप्टन्स इनिंग्ज असल्यासारखी साबुदाण्याची खिचडी आणि लापशी तर असायचीच; पण संघात इतरही गुणी खेळाडूंची वर्णी लागायची ... त्यात हिरवागार मिरचीचा ठेचा, बटाट्याचा कीस, बटाट्याची उपासाची भाजी, वरी तांदूळ विथ दाण्याची आमटी, सुंठीचे छोटे छोटे तुपाळ लाडू, आणि बहुदा रात्रीला साबुदाण्याची थालिपीठं, कधी साबुदाणे वडे; हे पदार्थ तर सरळच आठवतायत ... शिवाय कुस्करलेल्या केळ्यांचा खमंग, मधुर-गोड असा काहीतरी एक प्रकार केला जायचा ... त्यात (बहुदा) थोडास्सा सुक्या खोबऱ्याचा कीसही असायचा ... साखरही बरीच असायची ... माझी आठवण बरोबर असेल तर बहुदा त्याला 'भरली केळी' म्हणत असावेत ... त्यामुळे मिरचीच्या तिख्खट ठेच्याने तोंड पोळलंच तर; पुढचा घास या भरल्या केळ्याचा, हे कॉम्बिनेशन अफाट असायचं ... त्यामुळे हे उपासाचं जेवण वेगळ्याच ठसक्यात लक्षात राहायचं ... पुढे पुन्हा श्रावण म्हणजे जिभेसाठी आनंदाची पर्वणीच .. दर श्रावणी शुक्रवारी जेवणात वरून तूप सोडलेलं पुरण आणि दुपारनंतर दारी येणाऱ्या भैय्याकडून घेतलेले चणे, त्यात मधूनच कधीतरी मसाला-चणे सुद्धा; कधीमधी मंगळवारी मंगळागौरीच्या निमित्ताने कुणाकडून तरी आपुलकीने पाठवलं गेलेलं गोडधोड, नागपंचमीची खांडवी, गोकुळाष्टमीचे - कॉलनीतून कालवून घरपोच आलेले - दहीपोहे, घरी सवाशीण घातली जायचीच म्हणून त्यानिमित्ताने पुरणपोळ्यांसह केलेला साग्रसंगीत स्वयंपाक - त्यावेळी कांदा वर्ज्य असल्यामुळे केलेली बटाट्याची व विशेषतः घोसाळ्याची भजी ही मला अतिप्रिय - ही सगळी श्रावण स्पेशॅलिटीच ... पुढे गणपतीत घरच्या अथर्वशीर्ष व आरत्यांनंतर प्रसाद तर झालाच, पण इतरांच्या घरी आरतीला गेल्यानंतर मिळत असलेला व्हरायटी प्रसादही होताच ... गणपतीत शास्त्रीहॉलच्या मामांकडे गेल्यावर सार्वजनिकरित्या सुंदर चवीची खिरापत मिळायची व घरच्या गणपतीला मामी उल्लेखनीय लाजवाब 'मसाला दाणे' प्रसाद म्हणून करायची ... नातेवाईकांचाच उल्लेख करायचा तर माझी पुण्याची आत्या कडबू खूप सुंदर करायची; तर मावशी तोंडामध्ये अगदी विरघळणारा साबुदाणा चिवडा करायची ... मामीचे मसाला दाणे, मावशीचा साबुदाण्याचा चिवडा आणि आत्याचे कडबू हे तिन्ही पदार्थ त्या तिघींबरोबर गेले ते गेलेच ... पुढे दसऱ्याला कॉलनीभर सोनं वाटायला गेलो की आम्ही बच्चेकंपनी, गोदामात सामान भरावं तसं, पोटात खाऊ भरणार हे ठरलेलं असायचं ... यात अलीकडे त्यामानाने फार दुर्मिळ झालेले बत्तासे, साखरफुटाणे, यांचं प्रमाण मोठं असायचं ... त्या पाठोपाठ दिवाळी व फराळ - या आनंदाबद्दल काय सांगावं ? ... आजच्या तुलनेने त्याकाळी सुक्या मेव्याची, बर्फी, मिठाईची, आवक जरा कमी असली तरीही; जिकडेतिकडे चोहीकडे घरगुती पदार्थांची खूपच मोठी जत्रा भरलेली असे ... त्यातही प्रत्येक हाताची चव न्यारी असल्यामुळे पदार्थ तेच असले तरीही चवींची व्हरायटी असे ... नंतर थंडीत पहिल्यांदा संक्रांतीच्या गुळाच्या पोळ्या विथ साजूक तूप व नंतर
तिळगुळांची व साखरफुटाण्यांची चव चाखल्यावर होळीची पुरणपोळी; मग रात्री होळी पेटल्यानंतरची सुकी भेळ, मग कोणीतरी होळीत भाजलेले कांदे-बटाटे मिळाले तर ती चव ... हे सर्व आठवत वर्ष संपवायचं की नवीन वर्षाचं रहाटगाडगं पुन्हा सुरु. यामध्ये पुन्हा पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण असल्यामुळे त्या दिवसांचा गोडधोडाचा स्वयंपाक वेगळाच ...
या सर्व घरगुती खाबुगिरीच्या चविष्ट आठवणींमध्ये अर्थातच अपरिहार्यपणे आघाडीवर आहेत ते माझ्या आईच्या हातचे पदार्थ ... नुसता खोकला झाला तरी आई साखर घातलेल्या कोमट लोण्याचा एक लोणीविरघळ नामक प्रकार औषध म्हणून द्यायची ... ही लोणीविरघळ अशी काही लागायची की ती एरव्ही सुद्धा मिळायला काय हरकत असावी, असा प्रश्न मला नेहमीच पडत असे ... तसे पदार्थच आठवायचे तर नक्कीच शेकडो घरांतून हजारो पदार्थ आठवले जाऊ शकतात; पण तरीही वानगीदाखल मला आईचे नेहमीचे यशस्वी असणारे किती पदार्थ पटकन आठवावेत ? ... पाकातल्या पुऱ्या, मुरांबा-सुधारस, पोळीचा गोड लाडू, कणकेचा लाडू, नाना प्रकारच्या वड्या, वांग्याचे काप, अळूवड्या, नाना कॉम्बिनेशनच्या पिठांची धपाटणी, वेगवेगळी धिरडी, अडगळीची आमटी, इत्यादी ... हे झालं घरगुती खाण्याचं ... उन्हाळ्यात घरगुती पिण्याचं म्हणाल तर पन्हं, कोकम सरबत, मँगो मिल्कशेक, लस्सी, कोल्डकॉफी, असली पेयं आई देत असे ... अर्थात आईबद्दलचा हा काही एकट्या माझाच अनुभव आहे, असं नाही ... हा बराचसा सार्वत्रिक अनुभव असावा ... त्यामुळे 'सुंदर स्वयंपाक कोण करतं ?' या प्रश्नाचं प्रामाणिक सामायिक उत्तर - काही मोजके अपवाद वगळता - बहुदा 'माझी आई' असंच असावं ... एखाद्या गायकाची गातांना समाधी लागावी तशी, काहीतरी गुणगुणत स्वयंपाकामध्ये रमून गेलेली माझी आई आजही डोळ्यांसमोर उभी राहते ...
या खाबुगिरीच्या आठवणींच्या निमित्ताने आई ही गौरवमूर्ती असली तरीही माझी सौ.सुद्धा, नोकरी करत असूनही, नक्कीच उत्तम स्वयंपाक करते, हे अगदीच खरं ! त्यामुळे तिलाही अगदी मनःपूर्वक मानाचा मुजरा ...
(ही शेवटची ओळ लिहिल्यावर; दुर्धर रोगावर रामबाण औषध सापडल्यावर आनंद होणाऱ्या शास्त्रज्ञासारखी एक्साईटमेन्ट माझ्या मनात आहे ... कारण ही ओळ बहुदा मला आणखी काही वर्ष जगू देण्यासाठी लागू पडेल, अशी उमेद मी बाळगून आहे.)
@प्रसन्न सोमण
२७/०५/२०२०.
No comments:
Post a Comment