-- आम्ही व आमची वाळवणं --
१९६९-७० च्या सुमाराची आमची कॉलनी ... मे महिन्याची सुट्टी लागलीय ... थोडास्सा हट्ट केल्यावर बाबांनी, एरव्ही आमच्या माळ्यावर असलेला, आमचा कॅरम काढून दिलाय ... आम्हा मजल्यावरच्या मुलामुलींचा पत्ते किंवा कॅरमचा डाव रंगात आलाय ... त्याचा कालवा जिन्यामधल्या चौकात सुरु आहे ... एवढ्यात चितळेआजी आणि ओगलेकाकू तरातरा चौकात हजर ... आम्ही सारे गप्प होऊन त्या दोघींच्या "अरे कार्ट्यांनो, केवढा हा आवाज !" या संतप्त ओरड्याच्या प्रतीक्षेत ... मात्र आजींची "बरं का मुलांनो," अशी एकदम प्रेमळ आवाजात सुरुवात ...
"उद्यापासून चार दिवस आमची बेगमीची वाळवणं आहेत गच्चीत ! ... तेव्हा तुम्ही साऱ्यांनी आम्हाला मदत करायची हं ! ... मग तुम्हा सर्वांना खाऊ मिळेल" ...
म्हटलं तर आमच्या खेळामध्ये व्यत्यय येणार म्हणून नाराजी आणि म्हटलं तर निरनिराळ्या प्रकारचा खाऊ आणि गच्चीतला टाईमपास मिळणार म्हणून काहीशी हुरहूर, असले व्हरायटी विचार आमच्या डोक्यात ... या सार्वजनिक कामांमध्ये प्रत्येकाच्या आईचा सहभाग असायचाच त्यामुळे नकार द्यायची काही सोयच नव्हती आणि आमच्या दृष्टीने त्याची काही गरजही नव्हती ...
दुसऱ्या दिवशी सकाळीच कोणा एका काकूच्या घरातली बाहेरची खोली; पोळपाट लाटणी घेऊन साताठ काकवांचा (काकूचं अनेकवचन काकवा) ऐवज बसू शकेल अशा रीतीने, रिकामी केली जायची ... बहुदा बेगमीच्या वाळवणात पहिला मान असायचा उडदाच्या पापडांचा ... उडदाच्या पिठात, काय असतील ते मसाले टाकून एक तरबेज काकू डांगराचं पीठ मळायच्या ... इतर काकवा त्या वेळी या तरबेज काकूंच्या पुढाकारात आवश्यक ती मदत करायच्या ... पीठ मळता मळता या तरबेज काकूच्या तोंडून इतर काकवांच्या साठी काही सूचना येत असत ... त्यातून या तरबेज काकूचे नेतृत्वगुण आमच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांच्याही नजरेत भरायचे ... मग सगळ्यांचा लंच टाईम ... हा लंच टाईम शक्य तितका शॉर्ट असे ... मग जेवून आणि झाकपाक करून त्या कोणा एकीच्या घरात साताठ काकवा
आपापली पोळपाट लाटणी घेऊन हजर ... आमचीही फास्ट पोटभरी करून झाल्यावर आम्ही खिडकीतून बघतो तर, त्या कॅप्टन काकूंच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला ट्वाईनचा दोरा कौशल्यपूर्ण तऱ्हेने गुंडाळलेला ... शेजारीच व्हाइस कॅप्टन काकू मळलेले पीठ पाट्यावरवंट्याच्या मदतीने आपटून धोपटून घेत असे व त्याची
विशिष्ट सुरळी करून कॅप्टनच्या हातात देत असे ... ट्वाईनचा दोरा गर्र्कन फिरवून कॅप्टन स्विफ्ट ऍक्शननी अशा काही लाट्या पाडत असे की नजरबंदी व्हावी ... खिडकीतून बघता बघता त्या लाट्यांवर डल्ला मारायचा आम्हाला विलक्षण मोह होत असे ... पण कॅप्टन काकू ही अनुभवसमृद्ध असल्यामुळे आम्हाला त्यावेळी आत जायला सक्त बंदी असे ... मग इतर खेळाडू असलेल्या काकवा या लाट्या घेऊन आपापल्या पोळपाटावर सुंदरसे पापड लाटत असत ... सर्व संबंधितांच्या गरजेचा अंदाज घेऊन पुरेसे पापड लाटून झाले की मग उरलेल्या, किंवा मुद्दाम उरवलेल्या, डांगराच्या लाट्या या वाटण्यासाठी असत ... अर्थातच या लाट्या, लाट्या म्हणूनच खायच्या असत ... थोड्याच वेळात आम्हा पोरांची गरज लागणार असल्यामुळे की काय कोण जाणे, पण आता आम्हाला अम्मळ प्रेमाने आत बोलावून दोन-तीन लाट्यांची ट्रीट दिली जात असे ... पटकन तिथल्यातिथे लाटीची दिवली करून, त्यात तिथल्याच गोडेतेलाची धार ओतून, तोंडात सोडलेल्या त्या लाटीची चव आज पन्नासच्या आसपास वर्ष लोटली तरी तोंडात दरवळतेय ... तसं तर आज उडदाच्या रेडिमेड लाट्या अनेक ठिकाणी मिळतात; पर वो बात जो गुजर गयी वो गुजर गयी ... बहुदा आज बहुसंख्य ठिकाणी लाल तिखटाऐवजी मिरी वापरत असल्यामुळे रंगरूपापासूनच ती मुळी उडदाची लाटी वाटतच नाही ...
तोवर उन्हानी तप्त होत असलेली गच्ची, आम्ही सकाळीच गोळा करून ठेवलेल्या दगडांनिशी, तय्यार होऊन बसलेली असे ... काकवा पटापटा कॉटनच्या साड्यांचा अर्धा भाग गच्चीत अंथरून त्यावर वजन म्हणून दगड ठेवायच्या कामाला लागत असत ... साडीचा उरलेला अर्धा भाग अर्थातच वाळत घातलेल्या पापडाच्या वरचं कव्हर म्हणून असे ... आवश्यक तेवढ्या साड्या पसरून झाल्या की त्यावर ओले पापड वाळण्यासाठी पसरत असत ... नक्षी काढल्यासारखं ते दृश्य आजही नजरेसमोर आहे ... कव्हर घालून पुन्हा दगड ठेवले की संध्याकाळी उन्हं उतरेस्तोवर ही वाळवणं आणि गच्ची आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांच्या ताब्यात असे ... वाळवणांची राखण करणं, ती कावळ्या, चिमण्या, कबुतरांपासून सुरक्षित ठेवणं हे आमचं काम असे ... मधनंच आम्ही मजल्यावर टेहळणी करून थोडे बहुत कच्चे पापड लांबवत असू; पण बहुदा 'राखणकर' म्हणून आमच्याकडून तेवढी चोरी गृहीत धरली जात असावी ...
नमुना म्हणून उडदाच्या पापडांचं तुम्हाला सांगितलं खरं; पण पुढचे काही दिवस याच पद्धतीनं पोह्याचे पापड, चिकवड्या, कुरडया आणि बटाट्याचा कीस या गोष्टींचे रखवालदार आम्ही असायचो ... आता अगदी पूर्ण शेत नाही तरी, कुंपण शेताचा काही भाग तरी खातंच; या न्यायानी आमच्या पोटाला चार दिवस डांगर, लाट्या, चीक, ओल्या चिकवड्या, ओल्या कुरडया, बटाट्याचा ओला कीस, असल्या नामांकित पदार्थांची आहुती मिळायची ... मात्र एवढा ऐवज आम्हाला मिळाला की त्या बदल्यात फी म्हणून डाळी, कडवे वाल, असल्या 'आणि कंपनी,' छापाच्या
'अखाणीय' पदार्थांच्या वाळवणांची ने-आण करणं आमच्या नशिबी यायचं हेही खरं ...
काळाचं चक्र आज असं काही फिरलंय की मुंबईत तरी बहुदा 'वाळवण' हा शब्दच नष्ट व्हायच्या मार्गावर तरी आहे किंवा नष्ट झालेलाच आहे ... माझ्या सौ.नी व तिच्या बहिणीनी कोकणातल्या आमच्या मूळ गावच्या घरी, कुठल्यातरी एका मे महिन्यात वाळवणांसाठी जायचा निश्चय फार पूर्वीच गर्जना करून बोलून दाखवलेला आहे ... पण 'गरजेल तो पडेल काय,' या न्यायानी अजुनपर्यंततरी काही तो योग आलेला नाही व बहुतेक यायचा नाहीच ... असो ... कालाय तस्मै नमः ...
@प्रसन्न सोमण.
२४/०५/२०२०.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (फेब्रुवारी २०२४)
No comments:
Post a Comment