Monday, 17 August 2020

--- ते दोघं आणि मी ---

 

--- ते दोघं आणि मी ---

 

 

हल्ली रिटायरमेंट नंतर निवांतपणे अंघोळ करतांना मनाला एक छंद जडलाय ... आधीच्या काळातला कुठला तरी एक संदर्भाचा विचार मनात येतो आणि त्या अनुषंगाने जुन्या आठवणी जुने संदर्भ मनात घोंगावत राहतात ... त्याचवेळी कुठेतरी हे लिहून काढून इतरांशी शेअर करावं असंही वाटत राहतं ... पण मग अंघोळ आटोपल्यावर शरीरावरच्या निथळत्या पाण्याबरोबरच हे संदर्भ आणि विचारही पुसले जातात आणि प्रत्यक्षात लिहिणं कधीच घडत नाही ... फक्त आजच अपवाद घडलाय आणि म्हणून अंघोळ झाल्याबरोबर लिहायला लागलोय ... मध्ये फक्त एकच काम नाईलाजास्तव केलंय ते म्हणजे अंगावर कोरडे कपडे घालणं ...

 

 

मॅट्रिक झाल्यानंतर मी कॉलेजात जायला लागलो होतो, (असं अंधुक स्मरतंय) त्या काळातली गोष्ट असावी ... तबलजी तर मी होतोच, शिवाय मला शास्त्रीय संगीत ऐकण्याचं व्यसनही लागलं होतं ... नुकताच बाबांनी घेतलेला टेपरेकॉर्डर हातात आल्यामुळे या संगीतवेडाला एक तांत्रिक टॉनिक सुद्धा मिळालेलं होतं ... त्याच दरम्यान आमच्या कॉलनीच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, माझ्या अशाच एका संगीतवेड्या मित्राकडून मला संगीत ऐकण्याचं आमंत्रण आलं ... त्याच्या ओळखीचे त्यांच्या बिल्डिंगमधले एक प्रौढ काका होते ... त्यांच्याकडे म्हणे शास्त्रीय संगीताचा अमाप खजिना होता, त्या घरी आम्ही जाणार होतो ... गेलो ... ‘तबला वाजवतो, संगीतप्रेमी आहे,’ अशी माझी ओळख करून दिली गेली ... ते मोघे काका मला म्हणाले ...

"मला शास्त्रीय संगीत अजिबातच कळत नाही; पण कानाला खूप गोड लागतं ... म्हणून मी जाऊन मैफिली ऐकत आलोय ... गेली आठदहा वर्ष टेपरेकॉर्डर आल्यापासून रेकॉर्ड सुद्धा करतो" ...

 

 

त्याचवेळी आतल्या खोलीतून काकू काहीशा नापसंतीदर्शक चेहऱ्यानी चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या मोघेकाकांकडे एक खतरनाक कटाक्ष टाकून चहाचा ट्रे ठेवून गेल्या ... मात्र मोघेंकाकांनी चेहरा एकदम प्लेन, निर्विकार केला ... त्याच क्षणी मीही काकांच्या चेहऱ्याची पटकन प्रॅक्टिस केली आणि ही प्रॅक्टिस मला सुद्धा आजतागायत उपयोगी पडलेली आहे ... कुठलेही वेडे छंद बाळगणाऱ्या आणि जिद्दीनी पुरे करणाऱ्या पुरुषांना या चेहऱ्याची सवय करून घ्यावीच लागते ... हल्ली हल्ली मात्र, माझी मुलं मोठी झाल्यावर मोबाईल किंवा ब्लु टुथ स्पीकरवर त्यांचं म्युझिक लावतात आणि ते जेव्हा जबरदस्तीनं ऐकावं लागतं तेव्हा, मला त्या काकूंचा तो चेहरा आठवून त्यांची हटकून कणव येते ...

 

     

"काय ऐकुया ?" ... मोघेंकाकांनी खणातून सोनीचा आडवा छोटा टेपरेकॉर्डर काढत विचारणा केली ... तबलजी असल्यामुळे माझा व्होकलच्या तुलनेत वाद्यसंगीताकडे जरा जास्त ओढा होता त्यामुळे मी माझ्या दैवताची आठवण काढून विचारलं,

"काका ! रविशंकरचं काही लाईव्ह रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे ?"

"बघतो हं !" ... म्हणत त्यांनी गोदरेजचं कपाट उघडलं ... अर्ध कपाटभर तरी कॅसेट्सचा ढीग दिसत होता ... क्षणभर विचार करून त्यांनी हात टाकत एक कॅसेट काढली ... त्यातलं चिटोरं वाचत म्हणाले,

"दोनतीन वर्षांपूर्वी रंगभवनला वाजवलेला वसंतपंचम आहे. साथीला अल्लारखां आहे" ...

 

 

आम्ही कॅसेट ऐकायला लागलो. दीडेक तासाच्या वसंतपंचमनी तृप्त झालो. तोवर उशीर झाला होताच, त्यामुळे आम्ही निघालो ... निघतांना राहवून त्यांना विचारलं, "काका ! कॅसेट मला ऐकायला द्याल का ?" ...

"सॉरी ! कॅसेट मी तुझ्या हातात देणार नाही; पण उद्या तुझा टेपरेकॉर्डर, तुझी ब्लँक कॅसेट आणि ऑक्स कॉर्ड घेऊन ये. तुला ट्रान्स्फर करून देईन ... मात्र तुही, खास शौकीन संगीतवेडे सोडल्यास, कोणाला द्यायची नाही ... कारण या रेकॉर्डिंग्जचा धंदा होतो आणि तो कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा आहे ... म्हणूनच रेकॉर्डिंगसुद्धा चोरून करावं लागतं" ... 

 

 

अशाच पद्धतीने, पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्यांच्या संग्रहातल्या २०/२५ कॅसेट्स तरी कॉपी करून घेतल्या ... त्याच दरम्यान कधीतरी काकू १०/१५ दिवस माहेरी गावी गेल्याचा मुहूर्त गाठून काकांनी - रजा घेऊन - आम्हा दोन्ही निरुद्योगी मित्रांना गाठलं त्यांच्या कॅसेट्सच्या इंडेक्सिंग साठी मदत करण्याचा न्योता दिला ... हा सुनेहरा मौका आम्ही उचलला घरच्यांचा ओरडा सोसून, कसलीही शुद्ध नसल्यासारखे, / दिवस संगीतात न्हाऊन निघालो ...  या काळात रविशंकर, शिवकुमार, हरीप्रसाद, अमजदपासून एन.राजम पर्यंतचे वाद्यसंगीत कलाकार आणि भीमसेन, जसराज, कुमार, किशोरी, मल्लिकार्जुन, रामभाऊंपासून श्रुती सडोलीकर पर्यंतचे व्होकलचे कलाकार सुद्धा ऐकले ...

 

 

त्या भेटींनंतर घनिष्टपणाही वाढला; मित्राच्या मध्यस्थीची गरजही उरली नाही ... हळुहळु मीही त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी मैफिलींना जायला लागलो ... त्यांच्या सोबतीत मीही चोरी छुपे रेकॉर्डिंग्ज करायला शिकलो ... माझा संग्रह सुद्धा वाढवू लागलो ... तेवढा काळ माझं आयुष्यही रोशन होऊन गेलं ... मोघेकाकांशी  माझा जेमतेम तीनेक वर्षांचा घनिष्ट संबंध ... पुढे त्यांनी रिटायरमेंटनंतर ठाण्यात कुठेतरी ब्लॉक घेऊन घर बदललं वयानुरूप त्यांचं मैफिलींना येणंही कमी झालं ... अशाच कमी होत होत भेटी थांबल्याच ...

 

 

असाच संगीत मैफिलींना जाऊन जाऊन परिचयाचा झालेला दुसरा एक मित्र ... खरंतर माझ्यापेक्षा साताठ वर्षांनी मोठ्या असलेल्या संगीतवेड्या मामेभावाचा मित्र ... पण माझाही  बुजुर्ग मित्र झाला ... तोही संगीत मैफिलींच्या ठिकाणी हुकमी भेटत असे ... तेव्हा तो वसईमध्ये रहात असे ... त्यालाही शास्त्र म्हणून संगीत फारसं समजत नसे पण कानसेन मात्र होता ... त्याचा खाक्या जरासा वेगळा होता ... तो संगीताशी संबंधित संस्थात्मक कार्य खूपच करायचा ... त्यामुळे सर्व लहानमोठ्या कलाकारांची तो पुढे घुसून ओळख काढतही असे ती ओळख पत्रापत्रीने जरा नंतर घरी फोन आल्यावर (अर्थात तेव्हा मोबाईल फोन्सची साधी चाहूलही नव्हती ...) फोनच्या मदतीने जागतीही ठेवत असे ... मोठ्या लोकांच्या बाबतीत मुलखाचा भिडस्तपणा करणाऱ्या माझ्यासारख्याला त्याचा हा आगंतुक आगावूपणा जरा विचित्रच वाटायचा ... मी त्याला जरा चांगल्या शब्दांत बोलूनही दाखवलं होतं ...

 

"अरे काशीनाथ ! तू एवढ्या आपुलकीने या मोठ्यामोठ्या कलाकारांशी ओळखी ठेवतोस खरा ... पण हे मोठे कलाकार सौजन्यानी बोलतात तरी का ?" ...

"म्हणजे काय ? ... प्रश्नच नाही ... तुझ्यासारख्यांचा हा खूप मोठा गैरसमज आहे, असा माझा अनुभव आहे ... सगळे कलाकार खूप आवर्जून बोलतात; एवढंच नव्हे तर पक्की ओळख आणि चांगल्यापैकी जवळीकही ठेवतात" ... 

 

मोजक्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतः खूपच कष्ट घेऊन त्यानी वसईत एक, फक्त संगीताला वाहिलेली, छोटी संस्थाही उभी केली ... या संस्थेतर्फे तो खूप वेळा नवनवीन कलाकार मधूनच कधीतरी नाणावलेल्या, मोठ्या कलाकारांच्या मैफिली वसईत करत असे ... संस्थेसाठी चांगले चांगले स्पॉन्सरर्स सुद्धा त्यानी जमवले होते ... माझा पोस्टल ऍड्रेस त्यानी घेतलेला होताच; त्यामुळे मला त्या संस्थेची आवर्जून निमंत्रणं येत असत ... या संस्थेबद्दल तेव्हा तो खूप उत्साहाने फसफसून सांगत असे -

 

"अरे, तुझा विश्वास बसणार नाही, पण खूप मोठेमोठे कलाकार मेफिलींसाठी माझ्या संस्थेत येऊन गेलेत ... तुला ऐकायला बोलावतो तर तू कधी आला नाहीस !" ...

"आता मी नक्की जमवीन काशिनाथ  ... पण काय रे; हे कलाकार ठणकावून मोठ्ठी बिदागी मागत नाहीत ? ... संस्थेचे कार्यक्रम तर विनामूल्य असतात" ...

"मुळीच मागत नाहीत ... उलट कित्येक वेळा मी जी छोटी पाकिटं देतो तीही ते नाकारतात आणि मग नंतर आग्रहापोटी घेतात ... हे सर्व आपल्या संबंधांवर आणि बोलण्यावर असतं" ...

 

 

काशिनाथकडेही लाईव्ह रेकॉर्डिंग्जच्या कॅसेट्सचा खूप मोठ्ठा संग्रह होताच ... शिवाय तो कायम लटपटी खटपटी करून, कलाकारांची परमिशन मागून डायरेक्ट रेकॉर्डिंग करायचा ... त्यामुळे समोर बसून केलेल्या रेकॉर्डिंगपेक्षा त्याच्या रेकॉर्डिंग्जची क्वालिटी उत्तम असे ... माझ्यावर त्याचा खरंच लोभही होता ... असंच एकदा त्यानी मला सरप्राईझ देत; रेकॉर्ड केलेल्या पाच कॅसेट्स भेट म्हणून दिल्या होत्या ... घरी येऊन ऐकून बघतो तर, त्यावर भीमसेन-झाकीर, शिवकुमार-झाकीर आणि जसराज किशोरीचे काही राग, असं अफलातून रेकॉर्डिंग होतं ...   

 

 

"काशिनाथ, तुझ्याकडे जुन्या मैफिली आहेत तर; अमीर खानचं लाइव्ह रेकॉर्डिंग आहे का रे ?"  ... माझं दैवत असूनही अमीरखानची लाईव्ह मैफिल ऐकू शकल्यामुळे, मी विचारणा केली. 

"हो ! तीनचार मैफिली तरी आहेतच ... तू भरपूर ब्लँक कॅसेट घेऊन दोनतीन दिवस वसईत मुक्कामाला माझ्या घरी ये रे ... माझ्याजवळ डबल कॅसेट रेकॉर्डर आहे ... तुला मी भरपूर रेकॉर्डिंग देतो" ...

"खरंच, नक्की येईन" ...

 

 

मी माझे दोन मोठे भाऊ असे तिघं, जाण्याचे प्लॅन्सही करत असू ... पण खरंतर आम्ही सगळे मैफिली ऐकून रात्री शेवटची लोकल पकडून घर गाठणारे ... त्यामुळे नोकऱ्या आटपून, संसारातली नाराजी पत्करून, वसईत मुक्कामाला वगैरे जाणं कधीही घडलं नाही ते नाहीच ... 

 

 

फार जुन्या संस्थानिकांच्या काळात रसिकांना अभिजात संगीत ऐकायला मिळणं शक्य नसे ... अगदीच चुकून कधी मिळालंच तर संस्थानिकानी दरबारात ठेवलेलं गाणं ... पुढच्या काळात ही भूक, हळूहळू जीव धरू लागलेल्या, संगीत नाटकांनी त्याही नंतर रेकॉर्ड कंपन्या रेडियो केंद्रांनी काहीशी भागवायला सुरुवात केली ... मात्र त्या संगीताची वेळ मर्यादित असल्यामुळे संगीत विस्तार संकुचित होता ... तासभर पिसलेला राग तिथे ऐकायला मिळणं अशक्य होतं ... फक्त मैफिलींमध्येच हे शक्य असे ... सुदैवानी माझ्या बाबतीत, आधी मोघेकाका मग काशिनाथ हे दोघं मला अशा जिव्हाळ्यानं भेटले; की मला आधी ही मैफिलींना जाण्याची पाठोपाठ टेंपरेकॉर्डरच्या साहाय्याने शाश्वत ठेवा जपण्याची गोडी लागली ... मोठ्यामोठ्या कलाकारांची नावं रसिक भक्तिभावाने प्रेमादराने आठवतोच; पण मोघेकाका, काशिनाथ सारखे हज्जारो वेडे कुणाच्या खिजगणतीतही नसतात ... आज इंटरनेटच्या कृपेने लाखो-करोडो तासांचं संगीत सहज उपलब्ध आहे; ते ह्या असल्या हज्जारो वेड्यांनी जीवमोलानी जपलेले आपापले खजिने जागतिक कॉम्प्युटरवर अपलोड करून रिते केल्यामुळेच ...

 

 

मात्र या सहज उपलब्धतेचा एक साईडइफेक्ट सुद्धा झालाय की काय, असं हल्ली वाटतंय ... कारण आजही मी संगीत बरंच ऐकतो; पण पूर्वीची बेहोशी बरीच कमी झाल्यासारखी वाटतेय ... नकळत, अत्यंत दुष्प्राप्यतेपासून अगदीच सहजप्राप्यतेपर्यंतचा प्रवास घडलाय ... त्यामुळे पूर्वी अंगणात किंवा व्हरांड्यात असतांना दुरून कुठूनतरी भीमसेन, कुमारचे चारदोन सूर कानावर पडल्यापडल्या, तीरासारखं धावत घरात शिरून पटकन रेडियोवर मुंबई लावण्यासाठी धडपडण्यातली असोशी पूर्णपणे नष्ट झालीय ... या सगळ्या सहजसाध्यतेमुळे रसिक मनामध्ये फकिरीऐवजी एक अगम्य बेफिकिरी आलीय ... हे सगळं मी माझ्या मर्जीने, माझं मन चाहेल तेव्हा ऐकू शकतो, या आढ्यताखोर विचारामुळे जणू काही कलेला कलाकाराला विकत घेतलेल्या गुलामासारखी ट्रीटमेंट, अनिच्छेने आणि अभावितपणे दिली जात्येय की काय; असा एक डिस्टर्बिंग विचार मनाला मध्येच कधीतरी चाटून जातो ... ठीक आहे; कालाय तस्मै नमः ...

 

 

पण असं असलं तरीही मोघेकाका, काशिनाथ सारख्यांच्या कामाचं मोल जराही कमी होत नाही ... जुन्या हिंदी गाण्यांच्या रेकॉर्ड संग्राहकांच्या बाबतीत श्री.इसाक मुजावर, श्री.शिरीष कणेकर, सारख्यांनी खूप गौरवानी लिहिलंय ... आजही मधून मधून हे संग्राहक, त्यांच्या एका संस्थेतर्फे, खूप सुंदर, विनामूल्य कार्यक्रम करत असतात ... मात्र अभिजात संगीताच्या संग्राहकांचा आवर्जून गौरव केलेला फारसा आढळून येत नाही ...    

     

 

असो ... आता बरीच वर्ष गेलीयत ... मोघेकाका काशिनाथ हे दोघंही आज आहेत की नाहीत, असले तर कुठे आहेत, याबद्दल खरंच काहीही माहित नाहीये ... दोन ओंडक्यांच्या ताटातुटीची, वापरून वापरून झिजलेली, उपमा देण्यापलीकडे माझ्या हातात काहीही नाहीये ... मात्र दोघांच्याही आठवणीने आज डोळे पाणावलेत ... केसांच्या पांढऱ्या रंगाबरोबरच हे डोळ्यांचं पाणावणं थोपवता येतच नाही की काय कोण जाणे ...

 

 

@प्रसन्न सोमण

१५/०८/२०२०.