Tuesday, 23 August 2016

- संस्कार वर्ग ? -

- संस्कार वर्ग ? -


     "अहो ! उठा लगेच. महेशभावोजी आणि सीमा आपल्याकडे येतायत" - सुमा बाल्कनीतून आत येता येता ओरडली.

     "काय गं ! आत्ता कुठे जागा झालो होतो," मी पटकन गादी उचलता उचलता जरासा वैतागलोच.

     "हुं ! रविवार म्हटल्यावर लगेच नऊ-साडेनऊ पर्यंत झोपा काढायच्या ! मग असं होणारच. त्या दोघांचं शिका जरा. सगळं आटोपून साडेनवाला आपल्या घरात हजर." ती दोघं तीन जिने चढून वर येईपर्यंत किमान एवढं तरी मला ऐकून घ्यावं लागणारच होतं.

     गादी आवरून मी पटकन आत बेसीनकडे पळेपर्यंत बेल वाजलीच. महेश म्हणजे माझा काॅलनीतला मित्र. आमचा अतिशय घरोबा. शिवाय दोघांचीही पाचवीतली मुलं हुशार आणि एकाच वर्गात असल्यामुळे अभ्यासाच्या देवाणीघेवाणीनिमित्त सुमीची आणि सीमाचीही चांगली मैत्री जमली होती.

     "या या. अलभ्य लाभ" सुमीनं हसऱया चेहऱयानं, पण अगदी क्लासात शिकवल्यासारखं स्वागत केलं. "आज काय विशेष ?"

     "काय रे गृहस्था" मी बाहेर येतायेता ओरडलो. "अरे रविवाारी सकाळी साडेनऊ, ही काय दुसऱ्यांच्या घरी यायची वेळ झाली?"

     "साॅरी साॅरी ! तुला आम्ही अगदी अंथरूणातून बाहेर काढलेलं दिसतंय. मग आता जाऊ का आम्ही परत?" महेश हसतहसत म्हणाला.

     "नको. आता आलाच आहेस तर बस. माझा पहिला आणि तुमचा दुसरा-तिसरा काय असेल तो, चहा घेऊ, मिळालाच तर नाष्टाही करू." - मी सुमाकडे पहात खवचटपणे म्हटलं.

     "म्हणजे ! खरंच एवढ्या उशीरा उठता तुम्ही मुकुंदभावोजी?" सीमा एवढ्या मोठ्ठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात ओरडली.
     
     "ते  काही  विचारू  नकोजरा शिस्त म्हणून नाही. फार लवकर नाही; तरी जरा साडेसहापर्यंत उठावं स्वतःवर नाही तर नाही; निदान मुलावर तरी जरा चांगले संस्कार करावेत, हे काही नाहीच." एवढी उत्कृष्ट संधी सोडण्याचं सुमाला काही कारणच नव्हतं.

     "अगं हो बरी आठवण केलीस. तु सुमेधला संस्कार वर्गात घालणारेस का? आमचा अभि जायला लागला दोन महिन्यांपूर्वी."

     "अगं हो. अभि सांगत होता. पण काय गं किती फी आहे?"

     "महिना पाचशे. तसं महागच आहे; पण आपण सगळे नोकरीत बिझी. आपल्याला तरी कुठे वेळ आहे सगळं करून घ्यायला? आणि खरंच मीनाताई खूप छान शिकवतात. तु का नाही घालत सुमेधला?"

     "अगं यांचा विरोध आहे. त्यांना सुसंस्कार मुळी पटतच नाहीत" - सुमा करवादली.

     "काय काय शिकवतात?" मी विचारलं

     "अहो खरंच छान शिकवतात आणि आठवीपर्यंतच्या मुलांसाठीच संस्कारवर्ग आहे. म्हणजे पुढच्यापुढच्या इयत्तेत अभ्यास वाढेल तेव्हा तो एक क्लास नसणार." सीमा म्हणाली.

     "म्हणजे आठवीनंतरच्या मुलांना सुसंस्कारांची गरज नाही असंच ना?"

     "तु त्यांना काऽऽही सांगु नको गं. सऽऽगळ्या चांगल्या गोष्टींची टर उडवणं हा खास यांचा सुसंस्कार आहे." सुमानं तोफ डागली.

     "पण एक्झॅक्टली काय काय शिकवतात, ते तरी सांग ना." - मी सुमाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं.

     "अहो शुभंकरोति, अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र, मारूतीस्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, अशा  सगळ्या गोष्टी मीनाताईकव्हरकरतात" - सीमा म्हणाली. "आमच्या लहानपणी ह्या सगळ्याा गोष्टी बाबांनी आमच्याकडून पाठ करून घेतल्या होत्या. पण आता मला काही येत नाही; आणि करून घ्यायचं म्हटलं तरी आपल्याजवळ वेळ तर हवा ना !"

     "अगं पण ही स्तोत्र, देवाची कर्मकांडं या गोष्टी मुळात मुलांना यायलाच कशाला हव्यात? अशानं देवावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवण्याची वृत्ती होणार नाही का?" - मी विचारलं.

     "मुळीच नाही" सुमा फणकारली. "आणि आम्ही काही शाळा, अभ्यास सोडून मुलांनी देवाच्या भजनी लागावं असं म्हणत नाही; पण आयुष्यात चांगलं यश मिळवायचं तर अभ्यासाबरोबरच देवावरच्या विश्वासाचाही नक्कीच उपयोग होतो, म्हणून या सवयी लहानपणापासूनच लागायला हव्यात. तुम्हाला पटत कसं नाही हे?"

     "छान ! म्हणजे यशस्वी होण्यासाठी पूजा-अर्चा, स्तोत्रं, श्लोक वगैरे म्हणून देवाला वश करून घ्यायचं हेच की नाही?"

     "काय रे, अलिकडे तू अंनिसबरोबर सामाजिक कार्य वगैरे करायला लागलास की काय?" महेश एकदम ओरडला.

     "म्हणजे काय हो?" - सुमा सीमानी विचारलंमी आणि महेश एकमेकांकडे पाहून हसलो.

     "नाही रे बाबा. धोंडोपंत कर्वे, महात्मा फुले यांच्यासारखी महान माणसं सामाजिक कार्य वगैरे करतात. आपण लहान माणसं. आॅफिसात नेमून दिलेलं कार्य आणि संसाराचं गळ्यात अडकवून घेतलेलं कार्य करतानांच आपले डोळे पांढरे होतात. पण मी सांगत होतो ते कर्मकांडाबद्दल. ही अशी जबरदस्तीने, अर्थ आणि प्रयोजन कळता मुलांना स्तोत्रं म्हणायला लावून नक्की काय भलं होणार? आपणही लहानपणी ती म्हटली; पण पुढे विसरलोच ना?"

     "मुकुंदभावोजी, तुम्ही नास्तिक आहात?" सीमानं एकदम विचारलं.

     मी क्षणभर विचारात पडलो. - "खरं सांगू का सीमा, ते माझं मलाच सांगता येत नाही."

     "अरे, पण तू हेदवी, गणपतीपुळं, महालक्ष्मी, नरसोबाच्या वाडीपासून ते अगदी गोव्यातल्या किंवा कर्नाटकातल्या देवस्थानापर्यंतची सगळी देवस्थानं केलीयस ना?" - महेशनं विचारलं

     "बरोबर आहे. पण गावातल्या गावात मी कधीच देवळात जात नाही. फक्त मला ट्रीप्सची, निसर्गात फिरण्याची आवड आहे, म्हणून मी प्रसिद्ध देवस्थानंही करतो, पण त्यामागे देवावरच्या विश्वासापेक्षा बहुदा पिढ्या पिढ्यांचा  रक्तातून आलेला संस्कारच असावा."

     "म्हणजे संस्कार तुही मानतोसच."

     "मानतोच. मी संस्कारही मानतो. श्रद्धाही मानतो. फक्त निव्वळ देवभोळेपणाला, देवाच्या कर्मकांडांना मी श्रद्धा म्हणत नाही.
कारण त्यामुळे माणसाचं नक्की भलंच होतं, असं मला तरी वाटत नाही. तुझ्या दादांचं आठवतंय ना गं सुमे?"

     "हे मात्र खरं हं सीमा" - सुमाचे डोळे पाणावले होते. "माझा चुलतभाऊ आणि त्याची बायको दोघंही खूप श्रद्धाळू. मनोभावे देवदर्शनाला म्हणून आॅफिसच्या मित्रांबरोबर गणपतीपुळ्यालाच जात होते, तर जीपला मोठा अपघात झाला; आणि नेमकी ती दोघंही गेली. मागे दोन शालेय वयातली मुलं आणि माझी विधवा काकू. आता काकूला बिचारीला या वयात नव्या उमेदीनं मुलाचा पुरा संसार करायला लागतोय."

     "महेश, हे काही एकच उदाहरण नाही. अशी शेकडो, हजारो, उदाहरणं ऐकायला मिळतात. देवाच्या श्रद्धेनं आणि देवदर्शनालाच जात असतांना हे असं का घडावं, सांगता येईल?"

     "मुकुंदभावोजी, हे ज्याचंत्याचं प्राक्तन, कमनशीब, दुर्दैव असतं." सीमा म्हणाली.

     "व्वा ! म्हणजे पूजाअर्चा देवाची, चांगल्या घटनांचं श्रेय देवाच्या कृपादृष्टीला आणि वाईट घटना घडली तर तर मात्र ज्याचंत्याचं प्राक्तन, दुर्दैव आणि कमनशीब, हे अजब लाॅजिक झालं"

     "मुक्या तू फक्त बौद्धिक कसोटी लावून आग्र्युमेंटस् करतोयस; पण एक लक्षात ठेव - देव, धर्म आणि श्रद्धाच काय, पण या सारख्या आणखीही गोष्टी अशा आहेत की त्यांना निश्चित क्रायटेरिया लावणं, किंवा सायंटिफिकली प्रूव्ह करणं अशक्य आहे; पण तरीही अशा गोष्टी आहेतच." महेश ठामपणे म्हणाला.

     "शंभर टक्के मान्य. म्हणूनच माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याने त्याने आपली बुद्धी, आपली श्रद्धा आणि आपले संस्कार यांची कसोटी लावूनच आपली वर्तणूक ठेवावी. त्यात इतर कुणाचीही जबरदस्ती नसावी. जबरदस्ती करून उपयोगही नसतोच."

     "मग तुझ्या दृष्टीने श्रद्धा, संस्कार, यांचा रोल काय? मुलांवर सुसंस्कार करूच नयेत असं तुला म्हणायचंय का?"

     "माझी श्रद्धा माझ्या सांसारिक कर्तव्यांवर आणि चांगल्या वर्तणुकीवर आहे. हीच माझी श्रद्धा आणि हेच माझ्या दृष्टीने सुसंस्कार. संसारातली कर्तव्य उत्तमरितीनं पार पाडणं, समोरच्या माणसाशी अत्यंत चांगलं वागणं आणि स्वार्थ बाळगुनही, निदान जमेल तेवढा दुसऱ्याचा  विचार करणं, हा माझा प्रयत्न आहे." सुमानं माझ्या दिशेनं हात ओवाळल्याचं मी लगेच पाहिलं. - "तू हात ओवाळ सुमा, खरं म्हणजे हे सगळं मला जमतं असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण तुला पटत नसलं तरी ह्याच दृष्टीने माझा प्रयत्न असतो, हे नक्की. आणि महेश सुसंस्कार करण्याबद्दल म्हणशील तर, मुळात सुसंस्कारकरणंहेच मला मान्य नाही. संस्कार हे आपोआप होतच असतात. ‘मी आता मुलावर चांगले संस्कार करायला बसतो,’ असा विचार करून कुणी संस्कार करायला बसत नसतं. फक्त आपल्या आणि समाजातल्याही चांगुलपणाचं अनुकरण करूनच मुलांवर चांगले संस्कार होतील, असं मला तरी वाटतं; आणि म्हणून मुलांवर चांगले संस्कार करण्यापेक्षा, मुलांवर चांगले संस्कार होतीलच एवढी चांगली वर्तणूक आपण ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. संस्कारवर्गातखोटं कधी बोलू नयेहे वचन पाठ करून घरी आलेल्या मुलाला, ‘साहेबाला डोकं दुखतंय अशी थाप मारून मी आॅफिसातून लवकर सटकलोअसं बापाचं वाक्य ऐकायला मिळालं, तर त्यालाखोटं कधी बोलू नयेखोटंच वाटणार."

     "तुमचं सगळं बोलणं जगावेगळंच असतं. आता जरा माझ्या श्रमांचा विचार करून आंघोळ उरकून घेण्याची आणि सुमेधचा अभ्यास घेण्याची चांगली वर्तणूक दाखवाल तर उपकार होतील," सुमानं सरावानं मुरल्यासारखा टोमणा मारला.

     "अय्या"- सीमा किंचाळली. "अभ्यासावरून आठवलं. अगं आम्ही सुमेधची इतिहासाची वही न्यायला म्हणून आलो होतो. इतिहासाचा केवढा तरी अभ्यास घ्यायचाय. आणि संस्कारवर्गाचा अभ्यास म्हणून आजच्याआज पहिले दहा मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचेत. येतो गं आम्ही." सीमा-महेश वही घेऊन निघून गेले आणि स्वतःशीच हसत मी बाथरूमकडे पावलं वळवली.    

(लिखाणाचा दिनांक - ०८.१२.२००५)


------ xxx -------

No comments:

Post a Comment