Saturday, 27 August 2016

- निरोपाची धमाल -

- निरोपाची धमाल -


- एक अंकी रूपांतरित लोकनाट्य 'निरोपाची धमाल'/मूळ कथा 'निरोप'/ लेखक  .मा.मिरासदार/नाट्य रूपांतर प्रसन्न सोमण. -


थोडंसं माझं


     लहानपणापासूनच मला साहित्याविषयी अपार प्रेम आहे. हे साहित्यप्रेम फक्त वाचनापुरतंच मर्यादित नाही, तर कधीकधी मला साहित्यिक व्हावं असे झटकेही येत असतात. साहित्याप्रमाणेच मला नाटकाविषयीही जिव्हाळा आहे. (फक्त खास छबिलदासी वनाट्य  -नाट्य याला अपवाद.) नाटकातही लोकनाट्य हा माझा फार आवडता प्रकार आहे. कदाचित अनेक वर्षात चांगलं लोकनाट्य रंगभूमीवर आल्यामुळे त्या प्रकाराबद्दल मला साॅफ्ट् काॅर्नर वाटत असेल. त्यामुळे जेव्हा मी दूरदर्शनवरचल नाना चल’; हे श्री..मा.मिरासदार यांच्या मूळ कथेवर आधारित नाटक पाहिले तेव्हा माझ्याही मनात .मां.च्याच एखाद्या कथेचं लोकनाट्यात रूपांतर करावं असा विचार आला; कारण स्वतंत्रपणे काही चांगलं लिहावं एवढी प्रतिभा माझ्याकडे नाही. एकदा लोकनाट्य या फाॅर्ममधेच रूपांतर करायचं असं ठरवल्यावर मूळ कथा .मां.चीच असणार हे उघड होतं; कारण .मा.हे खरोखरच ग्रामीण कथा लेखकांचे किंगच आहेत. पण तरीही कोणत्या कथेेचं नाट्य रूपांतर करावं हे ठरवणं तसं सोपं नव्हतं. कारण जी कथा संपूर्णपणे ग्रामीण असेल; ज्या कथेत सहज सुंदर विनोद (इनोद?) असेल; ज्या कथेत वर्णनपर भाग कमीत कमी असेल संवाद जास्त असतील ज्या कथेत पात्र शक्यतो कमी असतील अशाच कथेचं नाट्य रूपांतर करणं योग्य होतं. .मां.चीनिरोपही कथा या सर्व अटींमधे चपखल बसली. त्यामुळे मीनिरोपचेच नाट्य रूपांतर करायचे नक्की केले. शिवाय या कथेत तमाशातली बाई असल्यामुळे लावणीही टाकता आली; कारण लावणीशिवाय लोकनाट्य ही कल्पना करणं सुद्धा कठीणच जातं.

     तेव्हा मला जसं जमलं तसंनिरोपचं नाट्य रूपांतर मी 'निरोपाची धमाल' या नावानं केलं. कथेचा मूळ सांगाडा जसाच्या तसा ठेवला. बहुतेक सर्व संवादही जसेच्या तसे ठेवले. काही जास्तीचे संवाद मी लिहिले. वर्णनात्मक भागाचा कथानकाशी सांधा जुळवण्यासाठी वग लिहिले. यातील बतावणी सर्व प्रकारची पद्यरचना मात्र संपूर्णपणे माझी आहे. अर्थात रूपांतर हे केव्हाही मूळ रचनेपेक्षा डावंच रहातं ते तसंच रहावं हेच इष्ट. हे नाट्य रूपांतर मी कोणी प्रयोगरूपाने करावं ह्या उद्देशाने केलेलं नसून निव्वळ माझा लेखनकंडू शमवण्यासाठी एका कैफानं केलेलं आहे. तरीही पुढेमागे कोणी जर 'निरोपाची धमाल'चा प्रयोग केला आणि जर तो चांगला झाला तर त्याचे बरेचसे श्रेय .मां.चेच आहे आणि वाईट झाला तर त्या पापाचा धनी मी आहे; पण मूळ लिखाणच एवढे सुंदर आहे की प्रयोग वाईट होणारच नाही याची मला खात्री आहे.

     असो. शेवटी माझं हे बरंच लांबलेलं थोडंसं आवरतं घेतो.


आपला
                                          
प्र. . सोमण. - दिनांक २५/०७/१९८५.


------xxx------


- गण -


प्रथम वंदुनी तुज गणराया

गुणिजनांची करू सेवा

या शुभसमयी तव शुभहस्ते

आम्हा मिळावा तुझा दुवा ।।

तू सकळांचा बुद्धिदाता

तू सुखकर्ता विघ्नहर्ता

आरती गाऊन भक्तिभावे

करितो वंदन आता तुवा ।।

खेळ आमुचा खूप रंगू दे

प्रेक्षकही हा दंग होऊ दे

सुंदर कामासाठी आमुच्या

पाठीवर तव हात हवा. ।।


- बतावणी -


(शिवा एका विंगेतून स्टेजवर येतो दुसऱया विंगेकडे जात हाका मारतो.)

शिवा - बाबू रं - हे गड्या बाबू. आरं पडदा उघडल्याला है. म्होरं जन्ताजनार्दन बसल्यालं है. जरा लौकर भाईर ये.
बाबू - (आतूनच) आलू आलू. (बाहेर येत) काय म्हंतो रं शिवा?
शिवा - आरं नारोळ फुटला; गणबी झाला; आता वग सुरू करायचा न्हवं?
बाबू - आहाहाहा. बोलला माजा राघू. आरं ल्येका इक्ती वर्स तमाशा करतुयास, आनि गनाम्होरं गवळन येते हे बी ठावं न्हाई म्हन की.
शिवा - आरं तसं न्हवं. मला समदं पद्धतशीर ठावं है. पर त्या गौळनीना कोन सांगनार ह्ये समदं ? आरं त्या म्हंत्यात की इक्त्या लौकर गौळन चालनार न्हाई.
बाबू - गौळन चालनार न्हाई? मग ती कवा चालतेगड्या योक गोस्ट धेनात ठेव. गौळन कंदीबी चालत नसते. गौळन न्हेमी ठुमकते; लचकते आनि मुरडते.
शिवा - आरं व्हय. पर ह्ये सम्दं करायला अजून गौळनींना टाईम लागनार.
बाबू - का म्हनं?
शिवा - आरं, आजून किस्ना, पेंद्या आनि सुदामा यांची थोबाडं रंगवून व्हायची हैत. ते जाल्याबिगर गौळनी बाजाराला कशा निगत्याल ?
बाबू - आॅ? आसं झालं व्हय? आरं मग त्या किस्ना;पेंद्याला म्हनावं  आताच कशाला थोबाडं रंगवताय? बोर्डावर गौळनी रंगवत्यालच की.
शिवा - काय म्हनला तू ?
बाबू - न्हायी म्हनलं रंगरंगोटी बराबर व्हायलाच पायजेल.
शिवा - बराब्बर. तवा ही रंगरंगोटी हुस्तवर आपुन टाईम काडायला पायजे.
बाबू - व्हय रं व्हय,   पर आता या वक्ताला वाईन काडायची तरी कुटून?
शिवा - आरं बाबा वाईन न्हवं. टाईम टाईम. येळ काडायचा.
बाबू - हा मग? आसं सरळ म्हराटीत बोल की. आरं येळ काय वखुत काय आनि तुला वाईन सुसते व्हय रं ?
शिवा - बोल ! बोल माज्या राघू ! तू असाच निस्ता बोलत रहा. आपुआप टाईम निघंल.
बाबू - काई नगं टाईम निगायला. गौळनी तयार न्हाईत न्हवं ? तर मग आज गौळन कँसल.
शिवा - गौळन कँसल ? छा ! आसं कसं हुईल ?
बाबू - आसंच आसतय बाबा ! आरं मागचे दीस ऱ्हायले न्हाईत आता. आज काल पब्लिकला काय काय छान बाया बगायला मिळत्यात. शिनेमातून, गरमागरम नाटकातून, टीवीतून, यवडंच काय, पन रस्त्यावरून जातानासुद्धा सुदिक. आपली तमाशातली गौळन आता कंट्री जाली राव. तवा आता आपुन डायरेक वगालाच सुरवात करू.                                  
शिवा - आसं म्हन्तोस ? बरं मग कंचा वग लावायचा है आज ?
बाबू - आरं मर्दा आज काय फसिस्क्लास वग निवडलाय म्हनून सांगू तुला? आरं आपलं .मा.मिरासदार म्हनून एक लिवनारं पावनं हैत. लै नाव है त्यांचं गड्या. आनि आपल्या खेडयातल्या गोष्टी तर अशा झाकुबाज लिवत्यात म्हंतोस! म्हंजी ग्रामीन गोष्टी लिवन्यात ते एकदम सुपरस्टार हैती बग. तेंच्याच गोष्टीवरचा वग लावनार है मी आज.
शिवा - झक्कास ! बाकी वग कुनाचा का आसंना म्हना, तू फक्स्त पब्लिक हसत्याल की न्हाई तेवडं सांग.
बाबू - ती काळजीच नको. आरं वग तर फर्मास हैच आनि शिवाय आपुन करनार म्हनल्यावर मग काय प्रश्न है ? आरं पब्लिक हसायला पायजे तितं तर हसंलच पर हसायला न्हाई पायजे तितं बी हसंल.(हशा झालाच तर) बग! म्हनलो हुतो की न्हाई मी ?
शिवा - मग काय काळजी न्हाई म्हना. पन हिरो कोन हाय आजच्या वगाला ?
बाबू - आरं बाबा ह्यो वग म्हंजे काई एकाच हवालदारावर किंवा शिपायावर लिवलेला वग न्हाई न्हेमीसारखा. या वगामधे सम्देच आपआपल्या येळेला हिरो हैत.
शिवा - आरं पर वगाचं नाव तर सांगशील का न्हाई ?
बाबू - वगाचं नाव है 'निरोपाची धमाल.'
शिवा - आरं मग कर की आता सुरू. का उगा पाघुळ लावत बसला हैस ?
बाबू - आसं म्हंतोस ? ठीक है. बगा तर मग मंडळी. श्री. . मा. मिरासदार यांच्या मूळ कथेवरून श्री. प्रसन्न सोमण यांनी नाट्य रूपांतर केलेले एकअंकी भन्नाट विनोदी लोकनाटय 'निरोपाची धमाल.'


- वग -               


ओढयाकाठी वसलं होतं एक गाव
गाव होतं नामी भोकरवाडी त्याचं नाव
भोकरवाडीचा होता एक तात्या इनामदार
त्याचीच कथा आता ऐका तुम्ही सारं ऐका तुम्ही सारं हा ।।
भोकरवाडीचा इनामदार
त्यो हुता लई तालेवार
म्हणे नोकराला तालुक्याला जा रं
एक निरोप माझा सांगा रं ।।
(चाल बदलून)    त्याच निरोपाची - झाली कथा एक
                       पुढे त्या कथेचे - झाले नाटक
                       बोला पुंडलीक वरदे हा री विट्ठल
                       श्री ज्ञानदेव तुका राम ।।


तात्या - (फेऱ्या मारत विचार करत असतो.) आता काय बरं करावं ? आयला या  माज्या बायकोचं मला तर काई कळतंच न्हायी बाबा. दर वर्साला आपली पोटुशीच रहाते तिच्यामारी. द्येवानं तिला कसं घडवलंय तेच माज्या धेनात येत न्हायी. जरा कवा लाडाला यायचा अवकाश की लगी आपली पोटुशीच रहाते. आज पुन्यांदा तिला नववा मैना लागल्याला है. सकाळधरनं पोटात कळा सुरू झाल्याल्या हैत. आमचं मायबाप सरकार म्हंतं की दो या तीन बस्स. पन मी माज्या बायकुला म्हंतो एका टायमाला दो या तीन बस्स. आज पुन्हा सकाळधरनं तिच्या पोटात दुकाया लागलंय. तवा आपुन काय उपाय करावा बरं ? न्येमकी गावातली एकुलती एक सुईण बी याच येळेला बाळंतीन है. आमच्यासारख्यानी काय करावं मग ? हां.आसंच करावं. महादा ... म्हाद्या, भाड्या ....
महादा - (येत) जी मालक ?
तात्या - तुला कायभाड्याआशी हाक मारल्याबिगर देता येत न्हाई वाटतं ?... काय रे भाड्या?
महादा - आॅ ? मला हाका मारल्या जनू ?
तात्या - मग काय माज्या बापाला मारल्या काय ?
महादा - न्हाई न्हाई. मलाच.
तात्या - ह्ये बग. आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या गावाला जा आन् एक झक्कपैकी बाई-डागदर घिऊन ये.
महादा - आत्ताच्या आत्ता ?
तात्या - मग काय महिनाभरानं जायाचं म्हंतोस काय ? मूर्ख मानूस!
महादा - तसं न्हवं. ह्यो निगालोच बगा.
तात्या - हांगाश्शी. आरजंट सूट. आन् ह्ये बग; तेनला म्हनावं असाल तशा चला. काय?
महादा - तेनला म्हनावं असाल तशा चला.
तात्या - आनि ह्ये बग; तेनला सम्दं डीटेलवार समजाऊन सांग. तेनला म्हनावं भोकरवाडीचा तात्या इनामदार है. त्येची बायको पोटुशी है. आज दोपारपास्नं तिच्या पोटात दुकाया लागल्यालं है. बाकी तशी काळजी करायचं कारन न्हाई म्हनावं; कारन रोगी लई अनुभवी है. आजपातुर तिची बारा बाळंतपनं झाल्याली हैत आन् ह्ये तेरावं है. पन हया टायमाला मातुर तिच्या पोटात जास्तं दुकतंय म्हनावं. म्हनून तुमाला पेशल सांगावा धाडलाय. तवा तुमची काय ती सम्दी शस्त्रं घिउन लवकर या म्हनावं तोवर मी हितली फुडची येवस्था बगतो.
महादा - फुडची येवस्था ?
तात्या - म्हंजे हीच आपली तेराव्याची.
महादा - अगं बाबौ ! कुनाचं तेरावं ?
तात्या - आरं कुनाचं तेरावं न्हाई.
महादा - मग वो ?
तात्या - आरं ल्येका माज्या बायकोच्या तेराव्या बाळंतपनाची येवस्था मी बगतो.
महादा - मग ह्ये आसं सपाष्ट बोला की. न्हाईतर मी असा काहीच्या बाही सांगावा डागदराच्या बाईला सांगितला तर तेनला काय वाटंल ?
तात्या - आन् ह्ये बग; पैक्यासाटी काई कुरबुर कराया लागली तर तिला म्हनावं काई काळजी करायचं कारन न्हाई. तू म्हनशील ते देऊ.
महादा - मी काय म्हननार ?
तात्या - आरं लेका तू म्हंजे तू न्हवं. ती बाई म्हनेल ते देऊ.
महादा - आसं व्हय. बरं बरं.
तात्या - असा सम्दा येवस्थिशीर निरोप सांग. मिस्टिक करू नगंस.
महादा - अगदी कायम येवस्थिशीर निरोप सांगतो. तुमी बिनघोरपनानं फुडच्या येवस्थेला लागा.          
तात्या - बरं मग मी आता आतमधे जातो आन् तू भायेर सूट.(जातो.)
महादा - बघिटलं का कशी जात है ?‘आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या गावाला जाआसं सांगायला याच्या बापाचं काय जातंय तिच्या मारी ? आता ह्ये असे पावसापान्याचं दीस. ह्या हवेत मसपैकी अंगावर कांबरून घिऊन गपगार पडून ऱ्हायाचं की पाचसात मैल चिखल आन् राड तुडवित आंधाऱ्या वाटंनं चालत जायाचं ? आन् हा रस्ता तरी काय रस्ता म्हनायचा ? ह्या रस्त्यापरीस त्या हाप्रिकेतल्या जंगलातली वाट तरी बरी आसंल. जांभूळवाडीपर्यंंत वाटेवर निस्ते आपले दगड; धोंडे; खड्डे; माती; झाडं; झुडुपं; चिखल आनि राड. जांभुळवाडी नंतरचा रस्ता त्येवडा जरा बरा है. तरी पन हया रस्त्यावरून मानसं दिवसाढवळ्या बी जायाला तयार होत न्हाईत; आन् ह्यो गडी आता राच्च्याला मला तिकडं पाठवतोय. ह्या इनामदाराची बायकुबी उठवळंच दिसतेय मला. तिला बाळंतीन होन्याशिवाय दुसरा उद्योगच न्हाई. आता ह्यो काय बाळंतीन व्हायाचा सीजन है ? भर पावसाळयात आपलं खुशाल बाळंतीन होयाचं म्हंजे काय ? आता चांगली उन्हाळयात बाळंतीन होनार आसती तर आपुन काय चांगलं एकदा सोडून दोनदा तालुक्याला गेलो आसतो की. ते काही नाही. वाटंतच आपलं घर है तवा आदुगर आपुन घरीच जावं. जरा टेकावं आनि जेवणंखावणं उरकून मगच तालुक्याला जायाला निघावं. तोवर बायकोशी चार गोष्टी करता येतील. हा... माजी बायकु म्हंजे काय गोष्ट है तुमाला ठावं न्हाई राव. अशी फर्डी बोलते, अशी फर्डी बोलते, मी तर तिलाबालिष्टरअशीच हाक मारतो. हा मग? तिचं कामंच तसलं है. (फेऱ्या मारतो.) हा.... ह्ये बगा आलंच आमचं घर. आता मी बायकोलाच हाक मारतो. बालिष्टर .... बालिष्टर.
बालिष्टर - कोन कारभारी का ?
महादा - व्हय की. कारभारीच. तुला काय वाटलं, कोर्टातला पट्टेवाला तुला बालिष्टर अशी हाक मारतोय ?
बालिष्टर - तसं न्हवं. या बिगर टायमाला तुमी कसं काय आला म्हनलं ? ह्यो तुमचा चाकरीचा टाईम.
महादा - मग मी चाकरीवरच है. इनामदारानीच मला पेशल भायेर पाठवल्यालं है. सारखा आपला माज्या पाठीमागंच लागलाय तरास द्यायला.
बालिष्टर - का ? काय झालं ?
महादा - अगं काय हुयाचंय? त्या इनामदाराच्या बायकुच्या पोटात लागलंय दुकायला.  
बालिष्टर - तात्या इनामदाराची बायको व्हय ? काई सांगू नका तुमी मला तिचं कवतिक. लई छपरी बाई है. गावामधे जरा कुनाचं काई चांगलं जालं की लगी तिच्या पोटात दुकाया लागतं.
महादा - तसं न्हवं गं. जरा माजं ऐकून तर घे. ऐकून घेतल्याबिगरच आपली धाड्धाड्धाड् गाडी सोडली डेक्कनक्वीनवानी. आगं तू म्हंतेस तसं तिच्या पोटात दुकत न्हाई, खरोखरंच तिचं दीस भरल्यात, नववा म्हैना लागून गेल्याला है. ती समदी गडबड चालल्याली है वाडयात. तुला काई ठावं न्हाई जनू ?
बालिष्टर - आसं म्हंता व्हय ? पर मग त्यात नवीन काय है ? अवो दरसाल एकदा तरी तिचं दीस भरत्यातच.
महादा - आहाहाहा ! काय पन तू तरी बोलतीयस !
बालिष्टर - अवो व्हय. खरंच है. दर भादे्रपदात इनामदाराची बायकु बाळंतीन हुतीय. ठावं है ना मला. अं ऽऽऽ सध्याच्याला म्हैना कंचा चालू है ?
महादा - अगं परवाच गनेशचतुर्ती झाली की. म्हंजी हा भादे्रपदच.
बालिष्टर - मग ? बघा या वर्षीचं बाळंतपनबी भादे्रपदातच आलं का न्हाई? आता बोला.
महादा - आगं तिचंच दोपारपासनं पोट दुकतया. मी म्हनलं दुकंना का ? दुकलं तर त्या माऊलीचं दुकतं, आपल्याला काय तरास व्हतो ?
बालिष्टर - मग ?
महादा - पर ह्या टैमाला इनामदारानं नवीनच खूळ काडलंय. मला म्हंतोय कसा - आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा -
बालिष्टर - ह्या वक्ताला ? या बया. काय येड-बिड लागलं का काय त्या इनामदाराला ? आता दिवेलागनी जाली नि ह्या येळेला तालुक्याला ? आन् त्ये कशापाई ?
महादा - आता काय सांगायचं ? मला म्हंतोयतालुक्याला जा आन् एक डागदर आन् एक बाई घिऊन ये
बालिष्टर - डागदर आनि बाई हो कशाला ?
महादा - आगं व्हय ! त्ये बरूबरच है. डागदर म्हनला की त्याच्याबरूबर बाई ही येतीच. निस्ता सिंगल डागदर कधीच येत न्हाई.
बालिष्टर - आन् डागदराला आनायला तुमाला तालुक्याला जायाला सांगतोय ? आन् ते बी या सांच्च्या आन् पावसापान्याच्या येळंला ?
महादा - मग ? सांगतोय काय मी ? ‘जमलं तर या लगीअसा निरोप करायचाय तेनला. पैका लागंल तेवडा सोडीन म्हनालाय.
बालिष्टर - हात् दोडा. पेटला त्यो पैका. आमास्नी काय घरदार है का न्हाई? सारखं आपलं कामाला जुपायचं घाण्याच्या बैलागत. हिकडनं आला, तिकड जा. तिकडनं आला, तिकडं जा. ह्ये काय ? आमास्नी काई पोरंबाळं हुं देता की न्हाई दोडांनो ? इक्त्या राच्च्याला मी तुमाला काई जाऊ द्यायाची न्हाइ सांगून ठिवत्ये.
महादा - आगं पर आपली नोकरी है ना. मग कसं करतेस.
बालिष्टर - मातीत बशिवली ती नोकरी. या टायमाला कुठल्याकुठं जायाचं म्हंजे काय? आमास्नी बी काई जीव है का न्हाई. अजाबात हलायचं न्हाई सांगून ठिवते.
महादा - आता मी तरी काय तुज्या मर्जी भायेर है का ? तरीपन ---
बालिष्टर - आता पन् न्हाई आन् काई न्हाई. अजाबात जायाचं न्हाई. आनखी तुमची तब्बेत पन न्हाई बरी - इसरला का ? सारखं खोकताय न्हवं का राच्च्याला ?
महादा - व्हय गं व्हय. माजी तब्बेत अजाबात बरी न्हाई. टकुरंबी सारखं दुकतंय. ह्यो एक पाइंट इसरलोच व्हतो मी.
बालिष्टर - मग ? सांगते काय मी. काई जायाचं न्हाई.
महादा - आॅ ! आगं पर मग निरोपाचं कसं करायचं गं ?
बालिष्टर - त्यो काय तुमी सोत्ता जाऊनच सांगितला पायजे असं थोडंच है ? कुनीबी सांगितला तरी चालंल. हाय की तुमचा एवडा लाडका मेव्हना. तेला काय उद्योग है ? दीसभर निस्ता आपला घरात बसून खातोय. आठाठ भाकऱ्या मुरगाळतोय बकासुरासारखा. आनि दीस न्हाई रात न्हाई निस्ता गावात गटाळ्या घालत हिंडतोय मुडदा ! कुठं कुनासंगं गप्पा हान्, कुठं रमी खेळत बस ! रिकामपनाचे पालथे धंदे निस्ते! तेला द्या की धाडून तालुक्याला.
महादा - व्हय गं व्हय ! ही बरी ऐड्या सांगितलीस तू. पर ह्ये समदं तुच सांग हा त्याला. माजं काई ऐकत न्हाई त्यो. तुजाच त्याला लई धाक है.
बालिष्टर - व्हय व्हय. तुमी काईबी काळजी करू नका. त्यो आला म्हंजे सांगते मी त्याला समदं आनि देते लाऊन तालुक्याला.
महादा - बरं है ! मग आता रात झाल्याली है आनि माजी तब्बेतबी न्हाई बरी. तवा आता मी झोपतो. पर तू जागी ऱ्हा आनि त्या रंग्याला निरूप डिटेलवार सांग. सपाष्ट सांग. आनि तेला म्हनावं सांगन्यात मिस्टेक करू नको.
बालिष्टर - व्हय व्हय. सांगंन मी सम्दं. तुमी निवांत पडा आतमधे. (महादा जातो. मधे थोडा वेळ गेलेला आहे. लाईट्स आॅफ आॅन्. ) इक्ती रात उलाटली तरी अजून मुडदा घरला आला न्हाई. कुठं दरोडा घालतोय कुनाला दक्कल ? ( रंगा येतो.) कोन रंगराव का ? आज तुमी मारूतीच्या देवळात झोपायला जाऊ नका बरं का.
रंगा - का म्हनं ?
बालिष्टर - एक आरजंट काम है इनामदाराचं तालुक्याला. म्हनून इनामदारानं ह्येनला सांगिटलंवतं तालुक्याला जायाला. पर ह्यांना तर दोनारपास्नं बरं न्हाई. सारखं टकुरं दुकतय आन् थाड्थाड्थाड् उडतंय. अजाबात बरं न्हाई तेनला. आत्ता कुटं जरा निवांत पडलेत. तवा तुमीच तेंचं काम करा. आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा. आनि डागदराच्या बायकुला आरजंट घिऊन या. आलं का धेनात तुमच्या ? आन् तिला म्हनावं पैक्याची काळजी करायचं कारन न्हाई. लागंल तेवडा पैका सोडीन. पाचसं तितं हजार सोडीन म्हनावं, पन तुमी तेवडं आर्जेंट निगा म्हनावं.
रंगा - बरं बरं.
बालिष्टर - आनि येवस्थिशीर निरोप सांगून लगी उद्याच्याला घरला या. (आत जाते.)
रंगा - बघितलं का कशी आर्डर सोडतीया ती ? म्हनं आत्तच्या आत्ता तालुक्याला जा. ह्या बयेचं काय जातंय आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा म्हनून सांगायला ? ह्या पावसाच्या दिसात भर दिवसासुदिक मानसं तालुक्याला जात न्हाईत, आन् ही मला राच्चं जा म्हंतेय. आनि येवडी गडबड करायचं तरी काय कारान है ? ते काई न्हाई. आपुन न्हेमीपरमानं मारूतीच्या देवळाच्या भायेर झोपावं आनि पहाट जाली की मग तितनंच तालुक्याला जायाला निगावं. अवो, काम सांगनारा मानूस न्हेमी गडबड करूनच सांगत असतो. पर आपुन ते जरा सवडीनंच केलं  पायजे. न्हाईतर समद्याच कामाचा इस्कोट व्हायाचा. ( फेऱ्या मारून मग झोपतो.- लाईट इफेक्ट्स.- पहाट झालेली आहे. रंगा जागा होतो आळस देत ) व्वा ! काय झक्कास झोप लागलीवती! (एकदम आठवण होऊनआॅ ! आरं तिच्या ! पहाट होऊन गेली की ! आनि मला तालुक्याला जायाचं है. इसरूनच जात हुतो तिच्या मारी. ( डोकं खाजवत ) पन म्हेवन्याच्या बायकुनं निरूप काय सांगितला व्हता बरं ? हां.....  तालुक्याला जायाचं आनि एका बाईला इनामदारानं आरजंट बोलावलय म्हनून सांगायचं. पर ही बाई कोन आसंल? जाऊ द्या. आसंल कोनतरी इनामदाराची सोयरी. काकी किंवा मावशी. दुसरी कोन असायचीय ? हा...... पर एकाद्या बारीला मामी सुदिक आसंल. हा..... त्येचा काई नेम न्हाई. जाऊ द्या मरू द्या. आपल्याला चालता चालता आटंवलं तर बगू. न्हाईतर वाटंवर जांभुळवाडीला हैच की आपला दोस्त, ‘शिवा‘ ! त्येलाच इचारू की बाबा तात्या इनामदाराचं कोन है तालुक्याला ? जाभुळवाडीला काईतरी पत्त्या लागंलच. अदुगर आपुन चालायला तर लागावं. ( फेऱ्या मारतो. फेऱ्या मारता मारता मधेच पडल्याचा, अंगावर चिखल उडाल्याचा, पाय मुरगळल्याचा आणि एकूणच चालताना त्रास होत असल्याचा अभिनय. मागे फेऱ्या चालू असतात - पुढे येऊन शाहीर वग म्हणतो.)


- वग -


रंगा निघाला तालुक्याच्या गावाला
काटयाकुटयांनी आणि खड्डयांनी रस्ता भरलेला
चालता चालता खड्डयात पडला - त्याचा पाय लचकला
हाल कसे झाले त्याचे म्होरं ऐका तुम्ही सारं, ऐका तुम्ही सारं हा हा ।।
होता पाऊस आनि होतं वारं
चालताना झाला बेजार
म्हणे त्रास भोगतो आमी सारं
मजा मारतो ह्यो इनामदार ।।


अयायायाया ! काय ह्यो काय रस्ता म्हनायचा का खूळ ? अंगावर सम्दी राड उडाली,पाय मुरगळला आनि राडीत पाय रूतुन चपला पायातनं कधी निगाल्या याचा पत्त्यासुदिक लागला न्हाई. -- ह्ये बगा जांभुळवाडी आलंच. (शिवा, बाबू, भीमू अजून गावचे एक दोघे गप्पा ठोकत बसलेले आहेत ... त्यांच्याकडे बघून) आरं वा ! सम्दी आपली दोस्त कंपनी भायेरंच बसल्याली हैत जनू.
शिवा - कोन रंगा का ? आरं वा वा वा ! लई दिसांनी आलास गड्या तू.... पर काय रं आत्ता ह्या एवड्या पावसाच्या टाईमाला बरा हिकडं आलास ?
रंगा - आरं हिकडं न्हवं; तालुक्याला चाललोय मी.
शिवा - का रं बाबा ? यवडं काय पेशल काम काडलस ?
रंगा - काय करनार बाबा ! आपुन सध्या बेकार है ना. निस्ता मेव्हन्याच्या घरात बसून तुकडं खातो. मग त्येनी सांगितल्यालं काम करायला पायजे. बरं मग, निगतो मी लगी. तालुक्याला एक आरजंट काम है जरा
शिवा - आगदी बसायासुदिक येळ न्हाई इक्तं आरजंट है का ?
रंगा - न्हाई. तसं इक्तं काई न्हाई म्हना... तरीपन लौकर गेल्यालं बरं.
शिवा - मग मर्दा ये की जरा. थोडा येळ बूड टेक. तमाकू खा. आनि मग जा म्हनं.
रंगा - बरं बाबा ! आता इक्ता तुमचा आग्रेवच आसंल तर टेकतो थोडा येळ. मग काड तमाकू काड. ( तमाकू खातो.) हा ... बरी आठवन झाली. इनामदाराचं कोन पावनं हैती रं तालुक्याला ?
शिवा - कोन रं ? तात्या इनामदार काय ?
रंगा - व्हय.
शिवा - त्यो भोकरवाडीचा इनामदार न्हवं ?
रंगा - आरं व्हय की.
शिवा - न्हाई बा. त्याचं कुनी न्हाई तालुक्याला. का रं बाबा इचारतोस कशापाई ?
रंगा - न्हाई. इनामदाराचाच एक आरजंट निरूप है तालुक्याला. कुठलीशी एक बाई है. तिच्याकडं जायाचं आनि सांगायचंय की तुला आरजंट बोलावलंय. पर ती बाई कुठली हेच मला आठवंना झालंय बग.
शिवा - आॅ ! आरर्र तिच्या बायली ह्या इनामदाराच्या ! आजून ह्यो ख्योळ चालूच है का त्याचा ?
रंगा - कसला ख्योळ ?
शिवा - वा ! तुमाला म्हाईतच न्हाई का राव ? आरं ह्यो इनामदार म्हंजे लई तमाशाबाज गडी. त्यानं मागं लई बाया नाचवल्या व्हत्या.              
रंगा - काय सांगतुयास काय ?
शिवा - तर ? लई चावटपना केला हुता.
बाबू - कसला चावटपना ? आमाला सांगा तर खरं.
शिवा - मागं एका तमाशातल्या बाईच्या मागं लागलावता ह्यो इनामदारसारखा आपला तिच्या मागं मागं. तिचा एकबी तमाशा चुकवायचा न्हाई गडी.
बाबू - आरर्र ल्येका !
शिवाएकदा त्या विठाची नाचगान्याची बैठक व्हती तवा कधी न्हवं तो गडी दारूबी पेला. मग काय लई मज्जा केली म्हनं त्यानं.
बाबू - म्हंजे कसंकसं जालं ? जरा डीटेलवार सांगा की राव.
शिवा - अरे सांगण्यापरीस ह्ये सम्दं फ्लॅशबॅकमधे बघन्यातच मजा है. बघा तर खरं (लाईट्स फेड आऊट फेड इन् - फ्लॅशबॅक - स्टेजवर विठा, ढोलकीवाला, पेटीवाला  इतर दोन साथीदार मुली आहेत)
विठा - रामराम इनामदार. आज इक्त्या दिसांनी आमची याद आली म्हनायची.
इनामदार - तसं न्हवं इठा. अगं याद तर हमेशा सगळ्यांची येतेच गं, पर नाचगाणं, तमाशा जिवाला किती ग्वाड वाटत असला तरी पैका कुठं हाय गं बोंबलायला !
विठा - मग आज काय लाॅट्री लागली म्हनायची की काय ?
इनामदार - लाॅट्री बिट्री काइ न्हाई म्हना ! पर या वर्साला पीकपानी जरा बरं है अन्  ऊसबी जरा ताठच झालाया. दोन पैसंबी आल्यात हातामंधी ! तवा म्हनलं जरा जिवाची करमनूक करून घ्यावी. हं ! तर मग काय म्हंताय इठाबाई, तुमचा काय रेट चालू है सध्याच्याला ?
विठा - आॅ ! माजा रेट ? काय म्हनायचंय काय तुमाला ?
इमानदार - रेट म्हंजे तसला रेट न्हंवं हो. जरा काई नाचगाणं आनि येक जोरदार लावनी हूं द्या की वो ! त्याकरता किती पैसं घ्याल ह्योच इचारतोय न्हवं का मी !
विठा - सम्दं मिळून दोनसं रूपयं द्यावं लागत्याल.
इनामदार - दोनसं ! यकदम येका टाईमाला ! काई कमी जास्त ?
विठा - येक पैसा बी कमी घेनार न्हाई. हं ! जास्त द्यायचे तर द्येवा.
इनामदार - हॅ ! जास्त कसले घिऊन बसलीस ! शंबर रूपयात जमव की !
विठा - न्हाई म्हंजे न्हाई.
इनामदार - अगं, लावनीतल्या चार वोळी कमी म्हन न्हाईतर या मागच्या पोरीतली एकांदी पोरगी कमी कर, पर शंबर रूपयात जमव की.
विठा - तसलं काई एक चालायचं न्हाई. सम्दं मिळून दोन्सं म्हंजे दोन्सं रूपयं हुत्यालच.
इनामदार - ठीक है ! हूं जाऊ द्या येक जोरदार लावनी.
ढोलकीवाला - (दारूची बाटली दाखवीत) पैक्यामधे ह्यो मोसंबी-नारिंगी पन आलंच हो इनामदार (ग्लास भरीत) घ्यावा की ! फर्मास है. एकदम पयल्या धारंची है.
इनामदार - छा छा ! ह्ये काय भलतंच ! आपुन तर बापजल्मात कंदीबी घेतल्याली न्हाई.
ढोलकीवाला - म्हंजे फकस्त इलायतीच घेता म्हना की !
इनामदार - न्हाई वो ! आपुन कंदी दारूच प्यालेलो न्हाई.
ढोलकीवाला - आॅ ! जिवाची करमनूक आन् नाचगान्याची बैठक ह्येच्याबिगर कशी व्हायाची हो ? मराठी पिक्चरं बगत न्हाई जनू ! घ्या हो एकच गल्लास तर घ्यायची.
इनामदार - नगो हो ! एकतर सवे न्हाई, कायतरी भलतंच व्हायाचं मला.
ढोलकीवाला - कायी होत न्हाई हो. आन् काई झालंच तर आमी हावोच की तुमाला पोचवायला.
इनामदार - पोचवायला ?
ढोलकीवाला - म्हंजे घरी पोचवायला हो ! घेवा बिनधास. (ग्लास देतो)
इनामदार - बरं द्यावा तर मग ! (दारू पीत) हा ! तर मग इठाबाई हूं जाऊ द्या येक जोरदार लावनी. (ढोलकीचा तोडा सुरू होतो. इनामदाराला दारू चढत चालली आहे. त्यात तो नाना प्रकार करतो, लाऊड हावभाव करतो, दोनशे रूपयांच्या नोटा विठाभोवती ओवाळतो, इत्यादी. यामधेच लावणी नृत्य सुरू होते.)


- लावणी -


पावसाळी कुंद हवा ही
अतिदमट आणखीन गार
अशामधे कवेत मी तुमच्या
पहिल्या पीरतीची नार ।।
ल्यायले मी हिरवी साडी हिरवा चुडा
रंगलाय तुमच्या ओठी माझा विडा
ओठास ओठ लागुनी
झाला स्पर्श तुमचा उबदार
अशामधे कवेत मी तुमच्या
पहिल्या पीरतीची नार ।।
हाती तुमच्या मादक पेयाचा प्याला
लाविला तुम्ही बेगुमान तो ओठाला
मधुकुंभ सावरूनी हाती
केला नजरेचा वार
अशामधे कवेत मी तुमच्या
पहिल्या पीरतीची नार ।।


इनामदार - (इनामदाराला लावणी संपेपर्यंत फारच चढली आहे. बेहोषीत ढोलकीवाल्याला कुरवाळीत) वा वा वा माझी विठाराणी ! माझी विठुमाऊली! (ढोलकीवाल्याचा फार लाऊड मुका घेतो.)
विठा - भले इनामदार ! तुमी तर कडीच केलीत. आता पुन्यांदा एकदा घ्यावा. (पुन्हा ढोलकीवाल्याचा मुका.) (लाईट्स फेड् आऊट फेड् इन - फ्लॅशबॅक संपला)
बाबू  - (अत्यंत आश्चर्याने) आर्र तिच्या बायलीला ह्या इनामदाराच्या मी !
शिवा - हाय का न्हाई एकदम फ्लॅशबॅकमधली गंमत ! अरे एवड्यानं काय हुतंय. आजूनबी एक गंमत है या इनामदाराची.
बाबू - आॅ ! अजून एक गंमत ! म्हंजे अजून एका फ्लॅशबॅकमधे सांगनार म्हना की !
शिवा - न्हाई. आरं सारखंसारखं फ्लॅशबॅकमधे सांगितलं तर गुलजारच्या पिक्चरवानी हुतंय आन् स्टोरीतली गंमत बी निघून जातीय. ही गंमत म्या स्वोताचा सांगनार है. आरं मागं एकदा, इठा सातारकरनी बरूबर कायमचं रहाता यावं म्हनून, ढोलकी शिकायचं खूळ काडलंवतं त्यानं. पर त्येला कुठली ढोलकी वाजवता यायला ? ती ढोलकीबी त्याच्या पोटावर रहायचीच न्हाई. घसारगुंडीवरून घसरावं तशी आपली सारखी त्येच्या पोटावरून खालीच घसरायची. ढोलकीवर मारून मारून त्याचे हात दुकले पर ढोलकी काई नीट वाजंना. मग कुनीतरी त्येला सांगितल की जर ढोलकी नीट वाजवायची आसंल तर अदुगर चांगली ठोकावी लागती.म्हनून मग ह्यो गडी पुन्ना गेला इठाकडं आन् अशी ठोकली, अशी ठोकली - काय राव इचारू नगा. नंतर इठानं त्येला कायमचं हाकलून दिलं. असला ह्यो तमाशाबाज आन् रंगेल गडी. पन अलिकडं पाच- सात वर्सं त्याला कडकी लागलीवती आनि गडी चौ अंगानी खाली आला हुता. पर आता काय ऊसबीस भरपूर पीकलाय, कारखान्यात निऊन घालतोय आनि दाबमधे पैका मिळवतोय, तवाच पान्याची लेवल परत वर चडल्याली दिसतेय.
रंगा - ती कशावरून ?
शिवा - आता तालुक्याहून बाई आनायला तुला पेशल धाडून दिलंय न्हवं का ? ती दुसरी कंची बाई असनार ? तमाशातलीच असनार. न्हाईतर काय मावशी, मामी का असायचीय ?
बाबू - पर कंची बाई बोलावलीय म्हनायची ? तिला काई नाव-गाव ?
शिवा - आरं येडया तसल्या बाईला काई नाव-गाव लागत न्हाई. कुनीकडनं खेळ करनारी आसली म्हंजे झालं. तालुक्याला जी तमाशातली बाई आसंल ती घिऊन जायची.
रंगा - थुत् तिच्या मारी ! ह्ये आसं हाय व्हंय ? आनि मी हिकडं उगीच त्या बाईचं नाव आठवंत हुतो.
शिवा - बरं, पैक्याचं काई बोललाय का ?
रंगा - तर ! रूप्पयं हज्जार दीन म्हनून सांगितलंय.
शिवा - आर्र तिच्या ! लई जंक्शन काम दिसतंय. रूप्पयं हज्जार देनार है, म्हंजे मग ही काई एकली बाई बोलावल्याली दिसंत न्हाई. समदा फुल ताफाच बोलावल्याला आसनार. म्हंजे जोरदार बैठक व्हनार म्हनायची ही.
बाबू - ही बैठक म्हंजे काय आसतं आमाला सांगा की राव. आमी कंदी बघितल्याली न्हाई.
शिवा - हात् ल्येका ! निस्ता शेरीरानी पैलवान आनि डोक्यानी अडानी गोळाच हैस. तुला काय बैठक ठावं असनार है ? तू बैठक म्हनलं म्हंजे तालमीतलीच बैठक हानशील. आरं येड्या, नाचगान्याची बैठक म्हंजे आपुन बसायचंच आसतं, पर बाई उभी आसतीय आन् नाचगानं करतीय.
बाबू - ये बाबौ ! आसं आसतं व्हय ? मग राव जायाला पायजे आपुन बी.
रंगा - या की राव खुश्शाल. इनामदाराचा हाल बक्कळ दांडगा हैमी झाडला हुता ना मागं. पाच-पन्नास बैलंबी एका टायमाला मावत्याल, तवा तुमी यायला हरकत न्हाई.
शिवा - येऊ की. आता तूच एवडा आग्रेव केल्यावर येयला काय जालं ?
रंगा - आन् मानसं न्हाई मावली, तर आपुन भायेर आंगनात कार्येक्रम करायला लावू की. त्यात काई आवगड न्हाई.
शिवा - त्ये एक बरंच हुईल.
रंगा - मग याच तुमी. बिनघोर या. आत फर्मीसन देयाचं काम माज्याकडं लागलं. आमचा मेव्हनाच है ना तितं चाकरीला.
शिवा - त्ये बी एक बरंच है. बरं मग आता रंगा, तू जेऊनच जा शेवट तालुक्याला.
रंगा - जेवन .... बरं तसं का हुईना शेवट. पन् ....
शिवा - आता आनि काय काडलास पन् ?
रंगा - जेवल्यावर माजं काम मर्दा बादच हुतंय चार-दोन घंटे. मग जायाला नगंच वाटंल बग मला.
शिवा - मग त्यात काय आवगड है ? रहा हितंच तू. आरं ल्येका जेवनयेळ है ही. म्होरं येनाऱ्या आन्नाला डावलू ने. जेऊबिऊ. मागनं रमी टाकू दाबमंधी.
रंगा - आॅ ! आन् निरोपाचं रं मर्दा ?
शिवा - हॅ ! ते काय तिच्या मारी ह्यो घिसाडी नेवून पोचता करील की. जायाचंच है त्येला तालुक्याला, काय रं भिमू ?
भिमू - बाबौ ! नगं बाबा नगं. ते बाई-बिईचं काम करायचं लफडं नगा सांगू. बाकी एक सोडून धा कामं सांगा.
शिवा - हॅट् तुज्यामारी ! घाबरंटच हैस की रं. आरं बाईकडं जायाला तुला कोन सांगंल? समद्या कामाचा इस्कोट न्हाई का हुनार ? आरं एवडा तुजा मेव्हना तिकडं है की,- शंकर घिसाडी ! त्येला जाऊन समदी येवस्था करायला सांग. निस्तं सांगकाम्याचं काम तरी करशील का न्हाई ?
भिमू - हा. त्येवडं करीन.
शिवा - झालं तर मग ! तालुक्याला जाऊन निस्तं तुज्या मेव्हन्याला सांग. त्यो बराब्बर ही सम्दी येवस्था करील. त्यो गडी म्हंजे यातला अगदी यक्का है यक्का. एकदम जंक्शन मानूस.
भिमू - बरं मग त्येला सांगतो मी सम्दं. पर मी सांजच्या टायमाला जानार है हा.
शिवा - चालंल की मग. त्याला काय जालं ? तेतल्यात्यात आर्जेंट काम करा म्हनून सांग तुज्या मेव्हन्याला. समजलं का न्हाई ? बरं है मग ... निगतो आमी .... चल रं रंगा.
भिमू - बरं है. बिनघोर जावा. ( शिवा रंगा जातात. नंतर लाईट इफेक्ट्स. संध्याकाळ झालेली आहे. भिमू तालुक्याला निघाला आहे. तो फेेऱ्या मारतो. पुढे येऊन शाहीर वग म्हणतो. )     


- वग -


भिमू घिसाडी, भिमू घिसाडी
तालुक्याला चालला... जी ।।
मेव्हन्याला भेटला, मेव्हन्याला भेटला
निरोप सांगितला जी, निरोप सांगितला जी
निरोप सांगितला .... हाहाहाहा..... हा ।।


आलो बाबा एकदाचा तालुक्याला. पर हितं पोचंस्तंवर रात होऊन गेली की. (शंकर घिसाडी एका बाजूला बसलेला दिसतो) आॅ ! अरे बापरेह्यो शंकर घिसाडी तर जेवणं-खावणं आटपून भायेर एअर-कंडीशन मधे बसल्याला दिसतोय........ ओ भावजी !
शंकर - कोन भिमू का ? आरं ये ये ये.... का रं आज इक्ता लेट केला यायला?
भिमू - हा. जरा काम निगालं म्हनून लेट जाला.
शंकर - एवडं कसलं काम काडलंय ?
भिमू - एक निरूप पोचता करायचा है, भोकरवाडीच्या इनामदाराचा. आरजंट निरूप है जरा, म्हनून घाईघाईनं, गडबड करून, लौकरच निगालो जरा.
शंकर - आरं, पर घाईघाईनं, गडबड करून लौकरच जर तू निगालास, तर तुला हिकडं यायला    लेट कसा काय जाला ?
भिमू - अवो, लई आरजंट निरूप हुता, नाजुक काम हुतं, त्ये आपल्याला कसं काय जमनार, याचा इचार करत करत सावकाशीनं चालल्यामुळं लेट जाला.
शंकर - नाजुक काम है ? आरं मग मला सांग की.
भिमू - भावजी, हितं बाई मिळंल का हो कुठं ?
शंकर - आॅ ! बाई ?
भिमू - व्हय.
शंकर - भले ! म्हंजे तुमीबी आमच्याच कॅम्पातले निगालात की.
भिमू - ( लाजत ) छया छया ! अवो ह्ये काय भलतंच बोलताय ?
शंकर - मग तुला रं कशाला बाई पायजे ?
भिमू - मला न्हवं. भोकरवाडीच्या इनामदाराला पायजे.
शंकर - त्ये आनि कशापाई ?
भिमू - त्ये आता कुनाला ठावं ? ..... हा.....  इनामदाराला मुका घ्यायचा है म्हनं तिचा.
शंकर - आॅ !
भिमू - व्हय. आता मला तरी काय म्हाईत ? पन आमच्या गावातली मानसं आसं म्हनत हुती की इनामदार नाचगान्याचा कार्येक्रम करतो आनि त्या वक्ताला ह्ये आसलं काईतरी करतो.
शंकर - म्हंजे इनामदाराला नाचगान्याची बैठक करायचीय म्हन की.
भिमू - व्हय.
शंकर - आनि पैक्याचं ?
भिमू - त्ये काई आवगड न्हाई. इनामदार म्हनलाय काय मागंल त्ये दीन. हज्जार रूप्पयं बी दीन. पर बाई आरजंट पायजेल.
शंकर - बरं मग अॅडव्हान्स वगैरे काई आनलाय का ?
भिमू - अॅडव्हान्स ? त्ये काय आसतं ?
शंकर - हात् ल्येका ! अडानीच हैस अगदी. काई वेव्हार कळत न्हाई तुला. बरं मी बगतो काय ते समदं. आजच्या आज तर काई गडबड न्हाई ना?
भिमू - छ्या ! गडबड कसली आलीय ?
शंकर - मग आपली आंबुजान है. तिच्याकडं जाईन मी उद्याच्याला आनि तुमचं काम करून टाकीन.
भिमू - ही कोन आंबुजान ?
शंकर - हाय एक बेस्ट बाई. एकदम चालू है.
भिमू - चालू ?
शंकर - म्हंजे सध्याच्याला तिचे खेळ हिकडं चालू हैत.
भिमू - मग ह्ये एवडं आमचं काम ?
शंकर - कायम उद्याच्याला करतो. तुमी बिनघोर रहावा आगदी.
भिमू - बरं. ( लाईट इफेक्ट्स. - दुसरा दिवस - लाईट्सच्या प्रकाशात आंबुजानची एक बैठक दिसते. लावणीच्या सुरवातीलाच शंकर घिसाडी येतो ऐकत बसतो.)


- लावणी -


माझ्यासाठी अवतीभवती
झुरणी लागले मजनू किती
लावली आहे त्यांनी बारी
प्रेमरोगाने मी आजारी ....   ।।
आज गावात एक पाव्हना आला
माझ्या डोळयांची झोप उडवूनी गेला
खुळया नजरेनं पाहिलं मी त्याला
त्यानं हळूच मला डोळा मारला
त्याला पाहून मी लाजले
येडीपिशी होऊन गेले
इश्काची दुनिया ही न्यारी                       
प्रेमरोगाने मी आजारी  ।।
आज इष्काची जत्रा भरली
माझ्या गालावर लाली चढली
माझी नजर खाली झुकली
आम्हा पीरतीची खुणगाठ पटली
माझा हात घेतला हाती
जन्माची ही जुळली नाती
विसरून दुनिया ही सारी
प्रेमरोगाने मी आजारी  ।।


शंकर - वा वा वा ! आंबुजान ! तुज्यावर माजी जान कुर्बान. काय नाचतेस, काय गातेस ... वा वा वा !
आंबुजान - काय हो शंकरराव ? आज हिकडं कुनीकडे वाट वाकडी केली ?
शंकर - वाकडी कसली ? सरळ तुज्याच वाटंला आलो म्हन. आंबुजान, तुज्यासाठी मी आज एक चांगलं गिऱहाइक आनलंय हा बैठकीचं. पैका अगदी भरपूर मिळंल. पर मलाबी थोडं खमीसन देयाला पायजे हा.
आंबुजान - दीन की ! त्यात काय आवगड है ? मला जर चांगला पैका मिळाला तर तुमालाबी थोडं खमीसन दीन. पन एवडं गिऱहाइक तरी कुठलं काडलंत मालदार ?
शंकर - अगं भोकरवाडीच्या तात्या इनामदाराला तुजी खास बैठक करायची है. आरजंट बोलावलंय त्यानी तुला.
आंबुजान - आॅ ! त्यो भोकरवाडीचा इनामदार व्हय ? हाय मला ठावं. लई चिक्कू मारवाडी जात है. मागं पाच वर्साखाली मी त्याच्याकडं गेल्ते. चांगली    दोन-अडीच घंटे  नाचले तरी संबर रूपडं बी हातावर टेकवले न्हाईत त्यानं. तवा त्या इनामदाराची बैठक बिईठक काई नगं आपल्याला.
शंकर - अगं काय येडी हैस का तू ? अगं ते त्याचे दीस गेले आता. तवा त्यो लई कडकीत व्हता. पर आता ऊसबीस मस्तं पीकलाय, तवा दाबमधे पैका मिळवतोय त्यो. रूप्पयं दीड हज्जार दीन म्हनून निरूप धाडलाय की त्येनं मला.
आंबुजान - आसं म्हंता ?
शंकर - मग ? काय खोटं सांगतो का काय तुला ? अगं रूप्पयं दीड हज्जार त्येनी येगळे काडूनच ठिवल्यात. समक्ष मी बघिटलं आनि यक्सप्रेस सांगायलाच निगालो मी तुला.
आंबुजान - बरं मग अॅडव्हान्स-बिडव्हान्स काई आनलाय का ?
शंकर - अॅडव्हान्सचं ते काय जालं आंबुजान - अॅडव्हान्स रूप्पयं पाचसं त्येनी माज्या हातावर असे टेकवले,तेवडयात कुनीतरी सांगितलं की आज आमुषा है, आमुषेेला काई कुनाला पैसं द्यायचे नसत्यात. तवा मग इनामदार मला म्हनाला की आज आमुषा है, तवा आज काई मी तुला अॅडव्हान्सचं पैसं द्येत न्हाई. तवा आंबुजानला म्हनावं तू ये, मस्तपैकी बैठक-बिईठक कर आनि मग मी रूप्पयं दीड हज्जार यकदमच दिऊन टाकीन.
आंबुजान - आसं जालं व्हय ? बरं मग काई हरकत न्हाई. पर मग आता आजची माजी बारी ठरल्याली है, ती मी करंन; उद्याचीबी माजी बारी ठरल्याली है, तीबी मला करावीच लागंल, आनि परवा मी भोकरवाडीला जायला गाडी जोडंन, चालंल न्हवं ?
शंकर - चालंल की. त्याला काई हरकत न्हाई. फकस्तं त्यातल्या त्यात आरजंट जा म्हंजे झालं. बरं मग ह्ये कायम नक्की जालं ना ?
आंबुजान - व्हय व्हय. तुमी बिनघोर रहावा.
शंकर - बरं, येतो मी आता. (लाईट इफेक्ट्स. दोन दिवस झालेले आहेत. आंबुजान भोकरवाडीला निघालेली आहे. झांजवाला, ढोलकीवाला इतर असा ताफा चालला आहे. रस्त्यातल्या चिखलामुळे, खड्डयांमुळे चालताना अतिशय त्रास होत असल्याचा अभिनय ... नंतर शाहीर पुढे येतो आणि वग म्हणतो. )           

                       
- वग -

        
( ‘दोस्त दोस्त ना रहाया चालीवर )
आंबुजान चालली, भोकरवाडीला चालली
वाटेत खूप होते खड्डे, मोकळी झाली तिची हाडे
मोकळी झाली तिची हाडे ।।
( वगाची पारंपारीक चाल )
भोकरवाडीला गाडी निघाली
रस्त्यामधे हादरू लागली
आंबुजान किंचाळू लागली
दाणादाण तिची सम्दी उडली ।।
                

( लाईट्स आॅफ आॅन. इनामदाराच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूचे दृष्य. महादा विडी ओढत पहारा करीत बसलेला आहे. आंबुजानचा ताफा येतो. )

ढोलकीवाला - (महादाला ) गाववाले !
महादा - ( लगबगीने पुढे येत ) काय हो पावनं ? कोन पायजे तुमाला ?
ढोलकीवाला - तात्या इनामदाराचा वाडा ह्योच हाय न्हवं ?
महादा - व्हय व्हय ! भायेरगावचं पावनं दिसताय जनू ?
ढोेलकीवाला - व्हय व्हय. तात्या इनामदारांकडंच आलोय न्हवं का. तेस्नी म्हनावं तुमच्या निरूपापरमानं आबुजान आरजंट आल्याली है.
महादा - बरं बरं ! सांगतो. ( आत जातो. )
तात्या - ( गडबडीने बाहेर येत ) आरं वा वा वा ! कोन आंबुजान का ? यावं यावं यावं .... बऱ्याच वर्सानी गरीबाकडं वाट वाकडी केली. पन आंबुजान खरंच खुशीच्या मोक्याला आली हैस तू. पोरगा झालाय मला. तवा आता आलीच हैस तर एक फसिस्क्लास नाचगान्याची बैठक झाली पायजेल बरं का.
आंबुजान - ( बारीक आवाजात कण्हते. पोटात खूप दुखत असल्यामुळे पोटावर हात दाबत बोलते. ) अगं आई गं ! आता ह्यातनं जगले वाचले तर नाचगानं.
तात्या - का गं ? तब्बेत बरी न्हाई व्हय ?
आंबुजान - अवो पोटात भयंकर दुकाया लागलंय माज्या.
तात्या - महादा -- म्हाद्या भाड्या !
महादा - जी मालक.
तात्या - जरा मूठभर ववा घिऊन ये बगू आतनं. ( महादा जातो. ) थोडा ववा खा आंबुजान. आत्ता थांबतंय बग पोट दुकनं.
आंबुजान - ( जास्तं जास्तं विव्हळायला लागते. शेवटी तिथेच खाली बसते आणि जवळ जवळ गडबडा लोळायला लागते. )  अगं बया बया बया. कुठनं हिकडे आले असं झालंय मला. कधी न्हवं ते इक्त्या वर्सांनी पोटुशी रहायले आनि ह्यो परसंग आला.
तात्या - ( तिच्याकडं निरखून पाहुन ) आॅ ! आरं तिच्या बायलीला ! आसं पोट दुखनं हाय व्हय तुजं ? -- मग आता काय बरं करावं ? ( चुटकी वाजवत ) महादा -- म्हाद्या भाड्या -
महादा - जी मालक ?
तात्या - हे बग, आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा आनि एक झकासपैकी बाई डागदर घिऊन ये. (फ्रीज्ड अॅक्शन)


(-- पडदा --)


( लेखन काळ - जुलै १९८५ )


------xxx------
                             

No comments:

Post a Comment