- मानवी प्रगती विरुद्ध निसर्ग -
2004 या सरत्या वर्षात दिनांक 26.12.2004 रोजी सुमात्रा जवळच्या समुद्रात भूकंप होऊन सुनामी लाटांनी अक्षरशः प्रलय
माजवला. या प्रलयाने इंडोनेशिया, अंदमान, निकोबार, भारताची पूर्व-दक्षिण किनारपट्टी, श्रीलंका, काही प्रमाणात केरळ एवढेच
नव्हे तर आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीचा सोमालिया; या प्रदेशात हाहाःकार उडाला.
या मुळे जवळजवळ सर्व संवेदनशील मानवजात होरपळली. हा निसर्गप्रकोप भयंकरच व अखिल मानवजातीच्या दृष्टीने दुर्दैवी होता हे निर्विवाद.
या निमित्ताने विशेषकरून समुद्रात भराव घालणे अयोग्यच आहे; मानवाने निसर्गामधे ढवळाढवळ करू नये,
निसर्गाशी लढाई मांडण्याचा, निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू नये;
हे व असे मुद्दे तज्ञांनी, विचारवंतांनी, पर्यावरणवाद्यांनी व (म्हणून) सर्वसामान्य माणसांनीही हिरिरीने मांडले.
या संदर्भात मला असं वाटतं की ही भूमिका फक्त
आदर्श, वैचारिक व सैद्धांतिक भूमिका म्हणूनच योग्य आहे. मला मात्र "मानवाला निसर्गावर मात करता येणार नाही,"
"मानवाला निसर्गावर विजय मिळवता येणार नाही,"
या वाक्यात एक महत्वाचा शब्द add करावा
असं वाटतं व तो म्हणजे "कायमस्वरूपी." कारण अन्यथा ही भूमिका जशीच्या तशी स्वीकारणं हे practically मानवी प्रगतीलाच मारक आहे.
मुळातच पृथ्वीवर तीन-चतुर्थांश पाणी आहे व फक्त एक-चतुर्थांशच जमीन आहे.
हा फक्त पाण्याचा हिशोब झाला; शिवाय
महाकाय पर्वत, डोंगर,
घनदाट जंगले, दऱ्याखोरी, ज्वालामुखी, सामान्यतः न वापरता येण्यासारखी टोकाच्या उत्तर
व दक्षिण गोलार्धातली जमीन, या सर्वाचा विचार केला तर वापरण्याजोगी जमीन तशी कमी आहे; आणि एकूण जगाच्याच लोकसंख्यावाढीचा विचार
केला तर ही जमीन उत्तरोत्तर कमीच पडणार आहे. यावर
कोणी असाही मुद्दा मांडेल की, तरीही
जगात विरळ लोकसंख्या असलेली व म्हणून कमी वापरली गेलेली मोकळी जमीन आहेच.
मुद्दा तसा ठीक असला तरीही ज्या
ठिकाणी मानवाने जास्त
प्रगती केली आहे अशा शहरांच्या, नगरांच्या जवळ लोकसंख्या दाट वा घनदाटही होणं practically अपरिहार्यच आहे.
कारण; "दाट वस्ती असलेल्या शहरातील लोकांनी विरळ
वस्ती असलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं," अथवा "विरळ वस्ती असलेल्या ठिकाणच्या जनतेनं आधीच दाट वस्ती
असलेल्या शहरांकडे धावत सुटू नये," हा विचार (बहुसंख्यवेळा ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ या धर्तीवर) मांडला तरीही
तो impractical आहे व म्हणून तो आचरणात येणे
जवळजवळ अशक्यच आहे,
हे आपण अनुभवतो आहोतच.
या सर्वाचा विचार
केला तर मानवाने निसर्गात ढवळाढवळ करू नये, निसर्ग आहे तसा स्वीकारावा, निसर्गाशी लढाई
मांडू नये; हा विचार अमलात आणणं
असंभव व अयोग्यही आहे. अन्यथा मानवाला आदिमानवाच्या काळातच जावं
लागेल. कारण डोंगर
फोडता येणार नाही
म्हणजे रस्ते, रेल्वे, घाट, इत्यादी आम्हाला नकोतच असं म्हणावं लागेल. तसंच पाणी
अडवणं अयोग्य म्हटलं तर धरणंही बांधताच येणार नाहीत, खाडीवरील-नदीवरील पूल, इत्यादीही निकालातच निघाले. फार कशाला, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह पाहिजे तसे वळवलेच नाहीत तर साधी
वीजनिर्मितीही करता येणार
नाही. म्हणजेच मानवी
प्रगतीचे कंबरडेच मोडेल
व एकूण अनावस्था प्रसंग येईल.
या उलट मी जरूर असंच म्हणेन की मानवाने निसर्गाशी लढाई मांडावीच व निसर्गाला वाकवावंच. मात्र ही लढाई लढण्यासाठी शत्रुपक्षाची बित्तमबातमी काढल्याप्रमाणे निसर्गाच्या तत्वांची माहितीही करून घ्यावी. निसर्ग ही असीम, अपार, अनंत
अशी शक्ती आहे हे संपूर्णपणे मान्य. पण म्हणून त्यावर विजय मिळवणे शक्यच
नाही ही भीती
बाळगून मानवाला चालणारच नाही. मानवजातही अनंतच आहे व मानवी
बुद्धीही अद्वितीयच आहे हाच विश्वास व अभिमानही प्रत्येक मानवाने बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
शक्यता अशीच वाटते
की ही निसर्गाविरूद्धची लढाई
शतकानुशतके चालेल. कधी मानव कुरघोडी करेल
(जे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झालंच
आहे) तर कधी निसर्ग बाजी उलटवेल (हा ही अनुभव
पूर्वी आलाच आहे व आत्ताचा तर ताजाच आहे.) विचारवंत, पर्यावरणवादी तज्ञ मंडळी
अनेक इशारे देतील
व अनेक उपायही सुचवतील. (ते त्यांचे कामच
आहे.) या उपायांतील योग्य
व practical असणारे उपाय अमलातही जरूर आणावेत परंतु
या मंडळींचे सर्वच विचार ब्रम्हवाक्यांप्रमाणे शिरोधार्य मानून हार मानणे, सतत निसर्गाबद्दल भीती बाळगून रहाणे वा प्रगती थांबवणे मानवाला मुळीच
परवडण्यासारखे नाही. निसर्गाचे अनेकानेक फटके पूर्वीही बसलेच आहेत व पुढेही बसणारच. पण त्याचा सामनाही धीरोदात्तपणे, निधड्या छातीने करावाच लागणार व तो आपण करतोही आहोतच. उदाहरणच द्यायचे तर याच विचारांची कास धरून
जपानने आपली निसर्गाविरूद्धची लढाई
व प्रगती अविरत
चालू ठेवली आहे.
जपान हा अत्यंत भूकंपप्रवण देश असून
भरीला तिथे टायफून्सची प्रचंड वादळेही वारंवार होत असतात. मात्र
तरीही या परिस्थितीचा अनेक शतके उत्तम
रितीने सामना करून
जपानी लोकांनी अत्यंत आश्चर्यकारक प्रगती करून
दाखवली आहेच. आत्ताच्या सुनामी प्रलयानंतरही सर्वच मानवजातीचे कोट्यावधी हात कर्तव्याच्याच भावनेने मदतीसाठी पुढे झालेलेच आहेत. मनुष्यहानीला तर अर्थातच कोणाचाही इलाजच नाही; पण प्राॅपर्टी, इत्यादीची हानी भरून
काढण्याएवढा मानव निःसंशय सक्षम आहे. वेळप्रसंगी नैसर्गिक प्रकोपाला, आपत्तीला (माझ्यासकट) सर्वांनी तयार असायला हवं असं मी मानतो कारण व्यक्ति म्हणून मी (एरवीही) मरणारच आहे परंतु
मानवजात मात्र अमर आहे आणि तिची
प्रगती होतच राहिली पाहिजे. म्हणूनच मी असंच म्हणेन की,
येवोत कितीही सुनामी
मानवी बुद्धी अतिशय नामी
प्रगतीसाठी मानवाच्या
शेवटी तीच येईल कामी
।।
(लिखाणाचा दिनांक - ०८.०१.२००५ )
------ xxx -------
No comments:
Post a Comment