Tuesday, 23 August 2016

- नको ती श्रीमंती -

- नको ती श्रीमंती -


          परवाच माझा पुतण्या माझ्या घरी आला होता. हा पुतण्या तरूण आणि खूप हुशार (सी..) आहे आणि सध्या तो खूप मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरीला आहे. बोलता बोलता तो वैतागाच्या स्वरूपात सांगत होता,

          "काय सांगू काका ! अहो, पगार खूप चांगलाच आहे आणि वाढताही असतो पण कंपनीत काम एवढं असतं की दिवसाचे बारा-बारा तास अक्षरशः राबावं लागतं. घरी आल्यावर खरंच खूप थकून जायला होतं. इच्छा असली तरी अवांतर वाचन, टी.व्ही. पहाणं वगैरेसाठी दिवसा अजिबात वेळ मिळत नाही आणि रात्री एनर्जीच रहात नाही. अहो, पूर्वी मी एवढ्या क्रिकेटच्या मॅचेस् बघायचो पण आता कित्येक वर्षात मी क्रिकेटची मॅच टी.व्ही.वर बघू शकलेलो नाही."

          त्याचं अगदी खरं होतं. मात्र सुदैवानं ते मला स्वतःला लागू पडत नव्हतं. माझ्या सुदैवानं मी खूप हुशार विद्यार्थी म्हणून जन्माला आलो नाही. मी अगदी अॅव्हरेज मार्कस् मिळवणाराच विद्यार्थी होतो. त्यामुळे आणि बहुदा पिढीच्या अंतरामुळे मी आपला सामान्य कारकून म्हणूनच मुंबई महानगरपालिकेत चिकटलो. पुढे इन्स्पेक्टर म्हणून आऊटडोअरला गेलो आजही तिथेच आहे. त्यामुळे नोकरीतली जबाबदारी अगदीच कमी, पगार बेताचा आणि वेळ त्यामानाने भरपूर. त्यामुळे व्यक्तिशः मी माझे सगळे छंद अगदी यथासांग पुरवू शकतो. अगदी टी.व्ही.बघणं, संगीत ऐकणं, अवांतर वाचनं करणं हे सगळे. एवढंच नव्हे तर वेळप्रसंगी दांड्या मारून वा आऊटडोअरच्या निमित्ताने लवकर सटकूनसुद्धा मी क्रिकेट मॅचेस्, टेनिस मॅचेस्, इत्यादी बघू शकतो.

          पण बाकी बाहेर बघितलं तर हल्लीच्या मुलांचा आणि विशेषतः हुशार मुलांचा माझ्या पुतण्यासारखाच वैताग दिसतो. म्हणजे हुशार म्हणून डाॅक्टर, इंजिनियर, सी.. यासारख्या डिग्य्रांसाठी अहोरात्र खपून अभ्यास करायचा आणि पर्यायाने त्या (उमलत्या, इत्यादीवयात  आपले  छंद सॅक्रिफाय करायचे. मग अभिमानास्पद डिग्री घेतल्यावर नोकरी अर्थातच त्याला साजेशा मोठ्या  खूप जबाबदारीच्या पदावर बहुतांशी प्रायव्हेट सेक्टरमधेच. म्हणजेच दिवसाचे कामाचे तास किमान दहा तरी नक्कीच. शिवाय हक्काच्या रजा अत्यंत कमी त्या साठल्या तरीही खूप जबाबदारीच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता त्या रजा स्वतःच्या विश्रांतीसाठी किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे उपभोगता येण्याची शक्यताच नाही. मग रजा घेतल्याच नाहीत म्हणून त्या साठतच रहातात हे चक्र चालूच रहातं.

          बरं, तरूण वयात प्रायव्हेट नोकरीत स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी भरपूर काम हे करावंच लागतं त्याशिवाय तुमचा निभाव लागूच शकत नाही. शिवाय रहात्या घरापासून आॅफिसला जाण्यायेण्याची दगदगही मुंबईसारख्या शहरात भयानकच आहे. म्हणजे दिनक्रमच एवढा दगदगीचा आहे की अगदी वय तरूण असलं तरीही संध्याकाळी (किंवा खरंतर रात्री) घरी आल्यानंतर छंदा-बिंदांसाठी माणसाकडे एनर्जी रहाणं अगदी स्वाभाविक आहे. शिवाय नाही म्हटलं तरी या वयात प्रत्येकाचं श्रीमंत व्हायचं, भरपूर सेव्हिंग करायचं स्वप्न असतंच. ‘आहे त्या आर्थिक परिस्थितीत आणखी सुधारणा करणं ही गोष्ट कुणाला नको असते? आणि भरपूर कमवायची इच्छा बाळगायची नसेल, तर मग चांगलं शिक्षण घ्यायचंच कशासाठी?,’ असे हे सगळे मुद्दे असतात; आणि ते तसे योग्यही आहेतच. पण मग ही थिअरी मान्य केल्यानंतर त्याप्रमाणे पैसा मिळवूनही तो पैसा उपभोगण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही एनर्जीच रहात नाही; ही तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही कारण ही गोष्ट ओघानंच येते आणि भरपूर पैसा मिळवण्यासाठी मोजलेली ती किंमत आहे. भरपूर पैसा मिळवण्यासाठी अपार कष्ट केल्यानंतर तो उपभोगण्यासाठी माणसाकडे वेळ आणि बळ शिल्लक राहू नये, ही दैवाचीच विचित्र irony आहे; त्याला कोण काय करणार? त्यामुळे खूप महागडी आणि उत्कृष्ट म्युझिक सिस्टीम सहजगत्या घेतली पण संगीत ऐकायला वेळच नाही; उत्कृष्ट मोठा (54 इंची वगैरे) टी.व्ही.घेतला पण तो पहायला वेळच नाही; खूप मोठ्ठा आणि वेल-फर्निश्ड फ्लॅट घेतला पण (जागेपणी) त्यात रहायला वेळच नाही, अशी परिस्थिती  आज  अनेक घरात दिसते मग उपभोग घेता येण्यासारखा  नसूनही  केवळ  परवडतंय म्हणून किंवा स्टेटस सिंबाॅल म्हणून अनेक वस्तू विकत घेऊन निव्वळ वस्तूसंचय करत रहाणं, हेच शिल्लक रहातं.

          या पार्श्वभूमीवर मग माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाचं खरंच बरं असतं. मी नुसता आर्थिक दृष्टीनंच मध्यमवर्गीय नाही, तर आचार-विचारानेसुद्धा जातिवंत मध्यमवर्गीय आहे. यात खास अभिमान बाळगण्यासारखं काहीही नसलं तरी लाज वाटण्यासारखंसुद्धा नक्कीच काही नाही. मुळातल्या आणि स्वकर्तृत्वाने सुद्धा मध्यमवर्गीयच असलेल्या माझ्यासारख्या माणसाला फार श्रीमंत व्हायची स्वप्न बाळगायचीच नसतात (आणि ते शक्यही नसतं). ‘Not failure but low aim is crime,’ यासारख्या वचनांची पत्रास आम्ही बाळगतच नसतो. आणि क्राईम असलाच तरी जोपर्यंत तो ‘Indian Penal Code’ मधे अंतर्भूत होत नाही किंवाCognizableहोत नाही तोपर्यंत भीती कशाला बाळगायची? योग्य तेवढा पैसा मिळवण्याची आणि आवश्यक तेवढीच मजा करण्याची स्वप्न बघितली की तेवढीच स्वप्न चिक्कार झाली की ! आणि विशेषतः नवरा-बायको मिळवती असण्याच्या आजच्या जमान्यात सामान्यतः इतपत मजा परवडू शकतेच.

          सारांश, आपल्याला मरेमरेस्तो कष्ट करून प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि छंद, मानसिक समाधान, इत्यादींच्या बाबतीत उपासमार सोसायची आहे की मध्यम स्वरूपाचा आणि आवश्यक तेवढाच (म्हणजे नक्की किती ते ज्याचं त्यानं ठरवावं) पैसा मिळवून छंद वगैरे पुरवण्यासाठी वेळेचा अवसर ठेवायचा आहे; याचा निर्णय योग्य त्या वयातच माणसानं करायला हवा. अर्थात जरी हा दुसरा पर्याय निवडायचा असं ठरवलं तरी दिवसेंदिवस असा पर्याय निवडणं हे आपल्या हातातच उरलेलं नाही, अशीच सामाजिक परिस्थिती दिसतेय. कारण, "माझा पगार हवं तर कमी करा पण कामाची वेळ दिवसाचे सातच तास ठेवा, कामाची जबाबदारी नाॅमिनल ठेवा भरपूर रजा द्या," असं काही आपण नोकरीत म्हणू शकत नाही. तेव्हा यासाठी मुख्य आवश्यकता आहे ती दिवसाला सात-आठ तासांच्या, खूप सिक्युरिटी असलेल्या आणि बऱया पगाराच्या नोकरीची म्हणजेच पर्यायाने सरकारी नोकरीची आणि आज तरी सरकारी पातळीवर नोकरभरती जवळजवळ पूर्णपणे थांबवल्याचंच चित्र आहे. व्यक्तिशः मला मात्र (योगायोगाने) हा पर्याय निवडता आल्यामुळे आज फारच समाधान वाटतंय, हे खरं.
                 
(लिखाणाचा दिनांक - २०.०१.२००५)


------ xxx -------

No comments:

Post a Comment