- जगावेगळी शिकवणी -
(‘श्री.द.मा.मिरासदार’ यांच्या कथेचे नाट्यरूपांतर)
(लाईट्स फेड इन् - गावातल्या एका ब्रह्मचारी मास्तराचे घर. तरूण मास्तर भिंतीवरच्या मारूतीच्या फोटोपुढे हात जोडून उभा आहे व ‘कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे’ असं मोठ्या आवाजात मारूती स्तोत्र म्हणतो आहे. घरातील एका कोपऱ्यात डंबेल्स, करेल, वगैरे व्यायामाची आवड दर्शवणारे साहित्य आहे. तसे गावातलेच घर; परंतु श्रद्धाळू वृत्तीच्या, व्यायामाची व नीटनेटकेपणाची आवड असलेल्या, निर्व्यसनी, सज्जन व तरूण ब्रह्मचारी मास्तराचे घर आहे व त्या दृष्टीनेच रंगमंचाचे नेपथ्य हवे. मास्तराचे मारूती स्तोत्र चालू असतांनाच बाहेरून मास्तरांना हाका मारत यदू वडार नामक मध्यमवयीन गावकऱ्याचा प्रवेश -)
यदू - मास्तर ... ओ मास्तर.... मास्तर हायती का घरात?
मास्तर- कोण आहे?
यदू - (दरवाजातून येऊन खिडकीतून पानाची पिचकारी खाली सोडत) राम राम मास्तर.
मास्तर- राम राम ! कोण आपण?
यदू- मी यदू वडार. कंत्राटदार हाय न्हवं का?
मास्तर- बरं ! पण माझ्याकडे काय काम काढलं?
यदू- माजा प्वारगा तुमच्या साळंतच है बगा. तुमाला ठावं आसंलच की !
मास्तर- असं आहे की शाळा नुकतीच सुरू झालीय् तेव्हा तसं नेमकं काही लक्षात येत नाहीये. काय नाव म्हणालात आपल्या मुलाचं?
यदू- व्यंकू. आला का ध्येनात?
मास्तर- तसं काही लक्षात येत नाहीये. पण कामाचं काय म्हणालात?
यदू - आवं त्यो सातवीला है यंदाच्याला. पाचवीपास्नं दर यत्तेला दोन साल घेतोय. पर आवंदा मातुर लगी सुटला पायजे सातवीतनं. तवा तुमी त्येची शिकवनी घेता का? इचारायला आलुया मी.
मास्तर- का बरं? शिकवणी कशासाठी लावताय?
यदू- (एकदम भडकून) आवं कार्ट लई उनाड तिच्यामारी. अब्यासाकडं काइसुदिक बगत न्हाई. पुन्ना घरात बी काई काम न्हाई धाम न्हाई आनि दिवसरात्र निस्ता गावात गटाळ्या घालत नि उकिरडे फुकत हिंडतोय सुक्काळीचा. सुधराल तर तुमीच सुधराल बगा तेला. (मास्तर जरा विचारात पडतो. ते पाहून क्षणभराने) मास्तर तुमी पैक्याची काळजी अजाबात करू नगा. देवदयेनं कंत्राटीत बरा पैका मिळतुया. तवा यवडं प्वारगं सुधराच माजं. त्येला जरा अब्यासाबरूबरच तुमावानी व्यायाम करनं आनि चांगलं वागनं शिकवा. अगदी मैन्याला थैलीभर रुपयं तुमच्या वटीत घालीन मी. मग तर जालं?
मास्तर- ठीक आहे. लवकर जेवणं उरकून घेऊन रोज रात्री पाठवत जा त्याला माझ्याकडे.
यदू- लई उपकार जाले मास्तर. (उठत) बरं निगतो म्या आजपास्नंच राच्चं पाटवत जाईन त्येला हिकडं. राम राम.
मास्तर- राम राम. (लाईट्स फेड आऊट .... क्षणात फेड इन. त्याच दिवसाची रात्र. मास्तरांच्या घराचे दार लोटलेले आहे व मास्तर मनाचे श्लोक वाचत बसले आहेत. एवढ्यात दारावर थाप व लगेच दार ढकलून एक साधारण अठरा वर्षांचा निब्बर असा मुलगा आत येतो. हाच तो व्यंकू. त्याला पाहताच मास्तर हातातले मनाच्या श्लोकांचे पुस्तक बाजुला ठेवतो. व) कोण रे तू?
व्यंकू- (याच्या तोंडात मस्तपैकी पान जमलेले आहे, त्यामुळे तो मुखरस सांभाळीत बोलतो पण मास्तरांच्या ते लक्षात येत नाही.) मी व्यंकू.
मास्तर- हं हं ! तुझे वडिल सकाळी तुझ्या शिकवणीबद्दल
बोलून गेले होते खरे ! तू व्यंकू होय? (तो मानेनेच हो म्हणतो) ठीक. आज तुझा शिकवणीचा पहिलाच दिवस आहे तेव्हा आज काही मी तुझा अभ्यास घेत नाही; त्याऐवजी आज मी, माणसानं चांगलं कसं वागावं, सद्गुणी, सद्वर्तनी कसं व्हावं, याबाबतीत तुला काही विचार सांगतो. ते सगळं नीट लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे रोज वागायचं (व्यंकू मानेनेच होय म्हणतो. यापुढचे सगळे बोलणे एकटा मास्तरच वर्गात लेक्चर दिल्याच्या थाटात करतो व व्यंकू मानेनेच हो हो करत रहातो.) रोज पहाटे लवकर उठावे. स्वच्छ दात घासावेत. साबण लावून स्वच्छ आंघोळ करावी. देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करावा. नियमितपणे व्यायाम, योगासने करावीत. मग तासभर तरी अभ्यास करावा. आदल्या दिवशी शाळेत शिकवलेल्या भागाचे मनन करावे. मग पानावर बसून व्यवस्थित चौरस जेवावे व शाळेत जावे. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ करून टाकावा. थोडे मैदानी खेळ खेळावे. दिवेलागणीला नियमितपणे शुभंकरोती म्हणून देवाच्या व मोठ्या माणसांच्या पाया पडावे व रात्री लवकर जेवून शिकवणीला यावे. शिकवणी झाल्याबरोबर घरी जाऊन लवकर झोपावे. शिवाय लांड्या-लबाड्या, चोऱ्या-माऱ्या, व्यसनं कधीही करू नयेत. नखे, केस योग्य वेळी कापावेत. स्वच्छ कपडे घालावेत. लक्षात राहील हे सगळं? (व्यंकूचा मानेने होकार.) ठीक आहे. जा आता. उद्या आजच्यासारखाच लवकर जेवून ये. उद्यापासून अभ्यास घेऊ. (व्यंकू उड्या मारत निघून जातो. लगेच लाईट्स फेड आऊट .... क्षणात फेड इन् ..... दुसऱ्या दिवसाची रात्र. कालच्याप्रमाणेच व्यंकू आत येतो. कालच्याप्रमाणेच तोंडात पानाचा तोबराही आहे.)
मास्तर- हं. आलास? आता आजपासून आपण अभ्यासाला सुरूवात करणार आहोत. पण त्या आधी तुला काल जे सद्वर्तनाचे पाठ दिले ते तुझ्या लक्षात आहेत का? (व्यंकूचा मानेने होकार) मग सांग बघू मला सगळे ओळीनं. (तो काहीच बोलत नाही) अरे सांग ना. का विसरलास सगळं? (मानेने नकार) मग सांग ना!
व्यंकू- (तोंड बंद ठेवून) हूं हूं !
मास्तर- गाढवा ! तुला तोंड आहे की नाही? (व्यंकू मानेनेच होय म्हणतो आणि तोंडावर बोट ठेवून आपल्याला तोंड आहे, असं दाखवतो) मग गाढवाच्या लेका तोंडाने बोल की घडाघडा. .. (क्षणभरात त्याने काहीतरी खाल्लेले आहे असं मास्तरांच्या लक्षात येतं) काय खाल्लंयस रे?
व्यंकू- (हाताने थोडं थांबा असा इशारा करतो. मग उठून खिडकीशी जातो. जोरदार पिंक टाकतो व मग मागे येत - ) केलं तोंड मोकळं मास्तर तुमी? चांगली तमाकूची मस्त गुळणी धरून बसलो हुतो मघाधरनं; असं पान जमलं हुतं म्हून सांगू ! काई इचारू नगा.
मास्तर- (विस्मयाने) म्हणजे? पान-तंबाखू खातोस की काय तू?
व्यंकू- (थंडपणे) व्हय मास्तर
मास्तर- दिवसातनं किती वेळा खातोस?
व्यंकू- धा-ईस येळा खातो की.
मास्तर- अरे खाऊ नये लेका ते ! अतिशय वाईट असतं.
व्यंकू- काय वाईट आसतं मास्तर?
मास्तर- (मास्तराने कधीच पान-तंबाखू खाल्लेला नसल्यामुळे त्याला ”काय वाईट असतं” या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. - तरीही मोठ्या आवाजात - ) हे बघ ! मोठ्या माणसांचं ऐकावं. खाऊ नये म्हणजे खाऊ नये.
व्यंकू- मी सांगू का मास्तर. उलट मानसानं तमाकू हमेशा खावा. लई चांगलं आसतंय.
मास्तर- आँ ! ते कसं काय?
व्यंकू -
आवं तमाकू हमेशा खावा आसा परत्येक्ष देवाचाच हुकुम है. आवं इठोबा खायम कमरेवर हात ठिऊन दुनवेला काय सांगतोय मग?
मास्तर- काय सांगतोय?
व्यंकू- इठोबा सांगतोय की तमाकूची वनस्पती कमरभर उंचीची आसतीय पर ती वनस्पती कशी आसतीय व किती खावी ही माहिती गनपतीबाप्पा देतोय.
मास्तर- ती कशी?
व्यंकू- आवं गनपतीबाप्पाने डावा हात पसरल्याला है आनि उजव्या हाताने दोन बोटांची चिमूट खायम धरल्याली है ती कशासाठी आसल?
मास्तर- कशासाठी?
व्यंकू- आवं तो सांगतोय की तमाखूचे पान हातभर रूंदीचं आसतंय पर मानसानं मात्र ती चिमूटभर तोंडात टाकावी. हा देवाचा हुकूम जर मानला न्हाई तर मग झालाच परत्यक्ष मारूतीरायाचा महाकोप.
मास्तर- तो कसा काय?
व्यंकू- आवं तमाकू न खानाऱ्या मर्दाच्या मुस्कुटात भडकावण्यासाठी मारूतीरायानं खायम एक हात उगारल्याला है की.
मास्तर- (भिंतीवरच्या हात उगारलेल्या मारूतीच्या फोटोकडे नजर टाकत व स्वतःचा हात कानशीलाकडे नेत -) काय सांगतोस?
व्यंकू- मग काय लबाड सांगतु का काय मी? आवं वाडवडिलांपास्नं ही कानी मी ऐकत आलेलो है ती काय खोटी आसल? माजं ऐका तुमी मास्तर तुमीबी ही दिव्य वनस्पती एकदा खावाच. आवो लई फायदा हुतो त्यानं. परत परत माज्याकडे मागाल बगा. (बोलत बोलत मास्तरांसाठी थोडासा तंबाखू हातावर मळतो)
मास्तर- सुरूवातीला उगीच थोडासाच दे रे बाबा.
व्यंकू -
(थोडा तंबाखू मास्तराला देतो. उरलेला स्वतः तोंडात टाकतो) काई काळजी नको मास्तर. पर तमाकू थुकून थुकून खायाचा आसतो हं; म्हंजे मग मस्तपैकी तोंडात जमतुया. ही बगा, कुटंबी थुकी न उडता अशी लांब पिचकारी मारता यायला हवी. (असं म्हणून बसल्या जागेवरूनच खिडकीबाहेर पिचकारी मारतो.)
मास्तर- (भरल्या तोंडाने) अरे थांब थांब ! मला पण शिकव की जरा.
(लाईटस् फेड आऊट. थोड्या वेळातच फेड इन्. मास्तर तंबाखूची गुळणी धरून एकटाच घरात बसलेला आहे. अशातच नेहमीप्रमाणे दार ठोठाऊन व्यंकू आत येतो. त्याचेही तोंड भरलेले आहेच.)
मास्तर- (खिडकीतून पिचकारी मारत) काय रे व्यंक्या, आज लेट आलास.
व्यंकू- (पिचकारी मारत) मास्तर आज काई शिकवनी बिकवनी घिऊ नगा. आज मला जायाचं है लगी.
मास्तर- का रे का?
व्यंकू- आवं आज नवाच्या ठोक्याला तमाशाचा फड हुबा ऱ्हायाचा है जत्रंत. तकडंच जायाचं है मला.
मास्तर- शी शी ! व्यंक्या गाढवा, तू तमाशाला जाणार?
व्यंकू- व्हय की.
मास्तर- तमाशा पूर्वी पाहिला आहेस कधी?
व्यंकू- न्हेमीच. येक बारीबी चुकिवली न्हाई अजून मी.
मास्तर- (धक्का बसून) काय सांगतोस?
व्यंकू- (अभिमानाने) आज आट वर्स झाली मास्तर. एक फडबी कदी चुकला न्हाई आजपावतर.(असं म्हणून मांडीवर हाताने ढोलकी वाजवत तोंडाने - ”काटेवाडी घोड्यावरती पुड्यात घ्या हो मला,“ अशी लावणीची ओळ ‘बोलतो’.)
मास्तर- अरेरे ! व्यंकू काय हा तुझा अधःपात !
व्यंकू- म्हंजे काय मास्तर?
मास्तर- म्हणजे आपलं ते हे ! बरं ते जाऊ दे. आजपासून तमाशाला जाणं एकदम बंद. समजलं?
व्यंकू-
का बुवा?
मास्तर- अरे तमाशा अतिशय वाईट असतो. चांगल्या माणसानं कधी बघु नये तो.
व्यंकू- का बरं बगु नये? काय वाईट आसतं त्यात? (ह्या ही प्रश्नाचे उत्तर मास्तराला देता येत नाही, तशी व्यंकूच पुढे म्हणतो-) मी तुमाला सांगू का मास्तर; आवं तमाशा-लावणीसारखी फसिक्लास गोष्टच न्हाई समद्या दुनवेत. आवं बगितल्यावर मानूस नुस्तं उलथंपालथं हुतंय
मास्तर-
उलथंपालथं? म्हणजे?
व्यंकू- म्हंजे उलथ्याचं पालथं न् पालथ्याचं उलथं हुतंय.
मास्तर- ते कसं काय?
व्यंकू- आवं तीच तर खरी गंमत है. दिवसा समदीच मानसं तुमच्यावानी सांगत्यात की तमाशा वाईट आसतो, तो बगू ने. पर रातीला तमाशाची येळ जाली की मेंढरासारकी मान्सं पळत्यात तिकडं, ती सम्दी काय बिनटाळक्याची असत्यात व्हय? तिकटी लगी संपत्यात, बसाया जागा मिळत न्हाई, तरीबी हुब्यानं बगत्यात. सम्दीकडे निसती मान्सं, मान्सं न् मान्सं ! उगी पेटल्यावानी दिसतं जकडं तकडं.
मास्तर- काय सांगतोस काय? अरे तमाशा वाईट, चावट असतो म्हणतात, म्हणून माणसं तिकडे फिरकतसुद्धा नसतील; अशी माझी कल्पना होती. पण तू तर उलटंच सांगतोयस.
व्यंकू- तुमचा इश्वास न्हाई न्हवं? मग तुमी येक काम करा. तुमी स्वताच बगा एकडाव. उगी आपली गंमत म्हणून एकदा बगा. आवं आज तर चोरंगी सामना है. आजच हून जाऊ द्या. स्वता बगा आन् मगच मला सांगा चांगला की वाईट ते. आवं स्वता बगितल्याबिगर कंदीबी काई बोलू ने मानसानं. इक्ती मानसं बेधडक तिकडं जात्यात ती काय गाडव म्हणून?
मास्तर- बरं चल ! बघुया तरी आता तू एवढं म्हणतोच आहेस तर ! तुझं तरी समाधान होऊ दे. (बोलता बोलता खुंटीवरची कोट टोपी घालतो.)
व्यंकू- भले भाद्दर मास्तर ! अशी इरेसरी पायजे. धा पैकी धा मार्क तुमाला.
मास्तर- आँ ! अरे गाढवा मास्तराला तू मार्क देतोस होय रे? (क्षणभराने) अरे पण मला समजेल ना रे सगळं? पहिल्यांदाच बघतो आहे म्हणून विचारतो.
व्यंकू- तुमी आदी चला लवकर. न्हाईतर जागाच मिळनार न्हायी आनि मी हायेच की तुमच्याबरूबर. तुमी काळजी कशाला करता? सगळं समजाऊन सांगतो मी तुमाला. (असं म्हणून मास्तराला चावटपणाने एक मस्तपैकी डोळा मारतो. मास्तर त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही डोळे मिटून दाखवतो. व्यंकू मास्तराच्या पाठीमागे ”काय अडाणी माणूस आहे“ अशा अर्थाने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतो.)
(लाईट्स फेड-आऊट. थोड्या वेळातच फेड इन्. स्टेजच्या अर्ध्या डाव्या भागात गवळण चाललीय. पेंद्या, मावशी व तीनचार गवळणी आहेत. आणि एकिकडे पेंद्याचे गवळणींकडे बघत ”मावशे या येळेला माल एकदम फस्क्लास आनि ताजा दिसतोय“ अशासारखे दोनतीन द्वर्थी संवाद चाललेले आहेत. स्टेजच्या उजवीकडच्या अर्ध्या भागात प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि शिट्ट्यांचा ऊत. त्यातच मास्तर व व्यंकू बसलेले. व्यंकू मास्तराच्या कानाशी लागून त्याला द्वर्थी वाक्यांचा असली अर्थ समजाऊन देतो आहे. मधेच दोन बोटे तोंडात घालून कर्णकर्कश्य शिट्टीही वाजवतो. हा प्रसंग साधारण दोनतीन मिनिटे चालूच रहातो. मग लाईट्स फेड आऊट)
(लाईट्स फेड इन - मास्तराचे घर. व्यंकू व मास्तर नुकतेच तमाशाहून घरी आलेले आहेत. दोघांच्याही तोंडात तंबाकूची गुळणी आहेच.)
व्यंकू- (तोंड मोकळं करून) काय मास्तर? कसा काय वाटला तमाशा? अन् गर्दी बघितली का न्हाई? आता म्हना बगू तमाशा लई वाईट आसतो म्हनून.
मास्तर- (तोंड मोकळं करून) नाही रे व्यंकू. खरच चांगलाच होता. न बघताच मी उगाचच तमाशाला ‘वाईट’ म्हणत होतो. ती माझी चूकच होत होती. पण ती दोन नंबरची दणकट गौळण कोण होती रे?
व्यंकू- हा ती व्हय? ती जुन्नरकरीण. आलिकडं तिची बाडी लय् स्ट्रांग झालीया. पयल्यांदा अशी नव्हती. उगी चवळीच्या शेंगेवानी हुती. तिच्या अलिकडची ती शामा कोपरगावकरीन. ती बी नंबरी है. आन् ती तीन नंबरची गौळन म्हंजे पुनेकरीन. ती लई फर्मास गाते.
मास्तर- आणि तो गडी कोण रे? चांगले चांगले विनोद करून लोकांना हसवत होता तो?
व्यंकू- त्यो तासगावचा सोंगाड्या यशवंता. त्यो म्हंजे समद्या सोंगाड्यांचा इस्टार है. ब्येनं है ब्येनं. बरं है मास्तर! लई रात जाली. मी निगतो आता. पंदरा दीस माळावर रोज तमाशा हैच की आता. तुमी येनार का माज्यासंगट रोज? लई मज्जा येईल बगा.
मास्तर- येणार तर! पण तू मला त्यातलं सगळं काय ते व्यवस्थित शिकवत जा. बरं आहे. ये आता. (व्यंकू निघून जातो. मास्तर क्षणभर विचारात गढलेला आहे. मग थोडंसं स्वगत, थोडंसं प्रेक्षकांकडे बघत -) हा व्यंकू म्हणजे चांगलाच तज्ञ दिसतो. आता त्याच्याबरोबर रोज तमाशाला जायलाच पाहिजे. हा ! आता त्यामुळे आपलं मारूतीस्तोत्र-पठण आणि व्यायाम जरा बाजुला राहील खरा; पण या दोन गोष्टी पंधरावीस दिवस बुडाल्या म्हणून तसं काही बिघडत नाही. तमाशा हा उत्तम लोककला प्रकार व्यंकूकडून नीट शिकून-समजाऊन घेतलाच पाहिजे. नाहीतरी समर्थांनी म्हटलेलंच आहे - ”सावधपणे निवडावे बरेवाईट.“ (लाईट्स फेडआऊट - लगेच फेड इन् - मधे पंधरावीस दिवस गेलेले आहेत. रात्रीची वेळ. मास्तरचीच खोली. मास्तर रंगेलपणाने ”पावसाळी कुंद हवा ही अती दमट आणखीन गार ! अशामध्ये कवेत मी तुमच्या पहिल्या पीरतीची नार !“ ही लावणी गुणगुणत पलंगावर पडलेला आहे. अशातच दार वाजते.)
मास्तर- कोण आहे? (तेवढ्यात दार ढकलून तमासगीरिणीसारखा वेश केलेली तरणीबांड, धिप्पाड, इंद्रा नावाची बाई आत येते.)
इंद्रा- म्या हाय जी, इंद्रा.
मास्तर- (एवढ्या तरूण बाईला रात्रीची बघून थोडीशी गाळणच उडाली आहे.) कोण पाहिजे?
इंद्रा- मालक हायती का आमचं आतमंदी?
मास्तर- कोण मालक?
इंद्रा- (लाजत) म्हंजी? आमचं मालक तुमच्याचकडे येत्यात न्हवं?
मास्तर- नाही बुवा ! इथे कुणी मालक-बिलक येत नाही.
इंद्रा- आँ ! त्ये तर म्हनत हुतं की राच्च्याला तुमच्याकडंच शिकवनीला जात असतो म्हनून !
मास्तर- (विस्मयाने) कोण? व्यंकू तर नव्हे?
इंद्रा- (मुरका मारून) व्हय व्हय. त्येच. (मास्तराला आश्चर्याचा धक्का) आवं रोज या टायमाला माज्याकडं येत्यात आन् भल्या फाटंला उठून निगून जात्यात. पर कालपास्नं आलंच न्हाईत म्हून पुसाया आले मी.
मास्तर- (सावरलेला) असं असं !
इंद्रा- मग? ग्येलं काय त्ये?
मास्तर- मघाशीच शिकवणी आटपून गेला तो ! पुष्कळ वेळ झाला.
इंद्रा- आँ ! मग कुनीकडे मधेच जाऊन बसलेत कुनाला दक्कल. जाते वो ! (निघून जाते) (लाईट्स फेड आऊट - लगेच फेड इन् - दुसऱ्या दिवसाची रात्र, तीच खोली. व्यंकू शिकवणीसाठी नुकताच आलेला आहे. मास्तर समोरच आहे. दोघांचाही तंबाकू चालूच आहे.)
मास्तर- (तोंड मोकळं करीत) व्यंकू काल कुठली बाई आली होती रे तुझी चौकशी करायला?
व्यंकू- (दचकतो - अंमळशाने तोंड मोकळं करून सावधपणाने) बाई? कुटली बाई? आन् कदी?
मास्तर- (कडकपणाने) फाजीलपणा करू नकोस. काल रात्री उशिरा इथे आली होती ती.
व्यंकू- (कोरडेपणाने) काय म्हनत हुती?
मास्तर- तुझी चौकशी करत होती. तू कुठे गेलायस ते विचारीत होती.
व्यंकू- च्या बायलीला ! हितं कशाला येऊन कडमडली कुनाला दक्कल ! (एवढं बोलतो आणि जीभ बाहेर काढून मान खाली घालतो.)
मास्तर- (कडकपणाने) कोण होती रे ती? (व्यंकू मान खाली घालून गप्पच आहे.) तुझी बायको होती का ती?
व्यंकू- छा छा ! आवं माजं लगीनच आजून झाल्यालं न्हाई मास्तर. आसं इचारतायच कसं तुमी तरी?
मास्तर- मग? कोण होती कोण ती?
व्यंकू- (लाजत) ती बाई म्हंजे बगा मास्तर ....
मास्तर- हं !
व्यंकू- (लाजत) ती म्हंजे बगा मास्तर --
मास्तर- (कडाडत) मास्तरानं बघितली कालच. पुढचं बोल.
व्यंकू- ती बाई म्हंजे - मी - (क्षणभराने हळुच) ठेवल्याली है मास्तर. (थोडा वेळ अगदी बोचक शांतता ! अंमळशाने मास्तरचा चेहरा अनपेक्षितपणे खुलतो)
मास्तर- व्यंकू? गड्या ! तू हे जमवलंस तरी कसं?
व्यंकू- (मास्तरच्या भल्यामोठ्ठ्या लेक्चरची आणि कदाचित मारही खाण्याची तयारी करून असतो. पण मास्तरचा चेहरा खुललेला बघून आणि मास्तरचा प्रश्न ऐकून त्याचीही कळी खुलते) मास्तर ही बाई माज्या बापाकडं दुष्काळाच्या कंत्राटी कामासाटी यायची. तिलाबी कुनी न्हायी आन् मलाबी कुनी न्हायी. तिचं लचकनं मुराडनं पायलं आन् तेवाच बराब्बर पटवली मी तिला. मागल्या दीड वर्सापास्नं माजं तिच्याकडं खातं है. आगदी स्वतंत्र. लई गॅरंटीचा माल.
मास्तर- (विचार करीत) व्यंक्या याचे तोडगे तरी काय असतात?
व्यंकू- कशाचे?
मास्तर- हेच ! या गोष्टी जमवण्याचे.
व्यंकू -
(चाट पडून) तुमास्नी ते कशापाई पायजेत?
मास्तर- उगीच आपलं ! सहज ! ज्ञान म्हणून.
व्यंकू- सांगतो की.
मास्तर- सांग.
व्यंकू- आगदी कम्प्लेट, डीटेलवार सांगतो. मास्तर पयली गोस्टं म्हंजे या लायनीला जानारा मानूस येकदम घट काळजाचा आन् ब्येरकी असाया पायजेल. येळेला मार खायाची आन् पचवायचीबी ताकद पायजेल. पयल्यांदा या आसल्या बाया हेरून सारखी गस्त घालावी लागतेय्. घाई गडबड करून उपेग न्हाई. या आसल्या बाया ठुमकत चालत्यात, तिरप्या नजरेनं बगत्यात, मदीच येकदम खुदकन हसत्यात. तर आशी बाई शोधावी लागती. तिचं घर पाहून ठिवावं लागतं, तितं पहारा करावा लागतो आनि मग बेताबेताने अंदाज घ्यावा लागतो. येळेला चार पैसे खर्चावे लागत्यात. मगच हळुहळु तुमचं काम हुतंय. पर ह्यो काम लई कष्टाचं आसतं. शिकाऱ्यावानी ऱ्हावं लागतं. भलत्या येळंला घाबरटपना चालत न्हायी. आन् इक्तं करूनबी जमलं न्हाईच तर दुसरीकडं याच पद्दतीनं मोहोरा फिरवावा लागतोय. आसलं ह्यो लई डेंजरफुल काम आपल्याला जमलं बा !
मास्तर- गड्या हे तु मला उगीच सांगितलंस.
व्यंकू- का बरं?
मास्तर- मला या माहितीचा काय उपयोग?
व्यंकू- का न्हायी?
मास्तर- मला तरी हे सगळं जमेलसं वाटत नाही.
व्यंकू -
(उत्साहाने) मास्तर ह्यो लई आवगड शास्त्र है, हे खरं; पर तुमी कच खायाचं काम न्हायी. पायजे तर मी तुमाला समदं डिटेलवार शिकिवतो. पर तुमी टैट ऱ्हा, मग तुमालाबी जमंल. संत तुकारामम्हाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटल्यालंच है की ” केळ्याणे होत आहे रे आदी केळेच पाहिजे“
मास्तर- (प्रचंड खवळून) मूर्खा ! अक्कल पाजळू नकोस.
व्यंकू- (आश्चर्याने) म्हंजे?
मास्तर- ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आणि ”केल्याने होत आहे रे,“ असं समर्थ रामदासस्वामींनी म्हटलंय.
व्यंकू- जाऊ द्या मास्तर ! कुनीतरी म्हटलया न्हवं? मग तुमालाबी जमायलाच पायजे.
मास्तर- असं म्हणतोस?
व्यंकू- मग? आन् आसल्या बायाबी आर्जंट वळकू येत्यात.
मास्तर- ते एक बरंच आहे म्हणायचं.
व्यंकू- आता तुमी पयल्यांदा आसं करा मास्तर.
मास्तर- कसं?
व्यंकू- अं ! तुमाला शिट्टी ठोकता येते का न्हाई? (तोंडात बोटं घालून वाजवून दाखवतो) - अशी?
मास्तर- (शरमेनं) नाही बुवा.
व्यंकू- नाही? आरारारारा !
मास्तर- म्हणजे? शिट्टी वाजवता आलीच पाहिजे म्हणतोस?
व्यंकू- तर वो? शिट्टीची दर ठिकानी जरूर पडनार. घराकडे, देवळाकडे, ओढ्याकडे ....
मास्तर- खरी गोष्ट ! पण आता त्यावाचून अडून कसं चालेल? (क्षणभर विचार करतो व मग चुटकी वाजवून) थांब जरा (उत्साहाने आत जाऊन स्काऊटची शिट्टी घेऊन येतो) ही चालेल? माझी स्काऊटची शिट्टी आहे. (वाजवून दाखवतो - तीही कवायतीच्या ढंगात-)
व्यंकू -
छा छा ! यानं काय ढेकळं हुनार? ती काय बायांची कवायत करायची है? (मास्तर शरमतो. व्यंकू थोडासा विचार करतो व मग ....) हं ! ठरलं. मास्तर उद्यापास्नं पयलं शिट्टी शिकायचं काम. (जातो)
(लाईट्स फेड आऊट व फेड इन .... व्यंकू मास्तराला शिट्टी शिकवतोय व मास्तर वाजवायचा प्रयत्न करतोय .... हे फार्सिकल पद्धतीने बसवायचं दृश्य. एकदोन मिनिटांनंतर मास्तराची शिट्टी वाजायला लागते.)
व्यंकू- शाबास मास्तर ! आता झोकात शिट्टी यायला लागली तुमाला. आता मी मागं सांगितल्यापरमानं उद्यापासून फुडचे धडे. (जातो)
(लाईट्स फेड आऊट व जरा जास्त वेळाने फेड इन. मध्यंतरी दोन महिन्यांचा काळ गेलेला आहे. मास्तराचीच खोली.)
मास्तर- (थोडं स्वगत व थोडं प्रेक्षकांशी) दोन महिने झाले. मला शिट्टी शिकवून झाल्यापासून व्यंकू कुठे बाहेरगावी गेलाय त्याचा पत्ताच नाही. आता या गुणी बाळाची मी किती बरं वाट पहायची. (तेवढ्यात दार ढकलून व्यंकू येतो.)
व्यंकू- (एकदम वैतागलेला आहे) येऊ का मास्तर?
मास्तर- (अत्यानंदाने) ये गड्या ये. अरे लेका किती वाट बघायची तुझी. दोन महिने होतास कुठे रे?
व्यंकू- मामाच्या गावी गेलो हुतो.
मास्तर- कशाला?
व्यंकू- मामा लई आजारी हुता.
मास्तर- मग? मेला की काय?
व्यंकू- त्यो कसला मरतोय? हाय आता बरा. पन मला सोडीचना. (व्यंकूच्या चेहऱ्यावर वैताग तसाच आहे.)
मास्तर- मग तुझा चेहेरा का असा सुतकी?
व्यंकू- (एकदम भडकून) तिच्या बायलीला मी !
मास्तर- अरे मला काय शिवी देतोयस भाड्या?
व्यंकू -
(वैतागून) तुमाला न्हाई वो मास्तर.
मास्तर- मग?
व्यंकू - च्या बायली. त्या बाईला हो आमच्या.
मास्तर- का बरं? तिनं काय केलंय?
व्यंकू- (वैतागत) मास्तर काल दोन म्हैन्यांनी मी तिच्याकडं गेलो, बसलो, पर येक अक्षरबी बोलली न्हाई. मी भडकलो तर मलाच गुरकाऊन बोलली. शेवट तर मला घराभाएर काडलं तिनं. कशी बायलीची जात है बगा की !
मास्तर- मग? हा नादच वाईट ! आता पटलं का तुला?
व्यंकू- (थोडं थांबून) पन मास्तर येवडं दीड वर्स आमी बरूबर आहोत, माजं तिच्याकडं स्वतंत्र खातं है, मग आसं अचानक कशापाई केलं आसंल तिनं?
मास्तर- (मंद हसत) व्यंकू ! गड्या हा एकतरी प्रश्न तू मला असा विचारलायस की ज्याचं उत्तर मला देता येण्यासारखं आहे. (थोडं थांबून) ती इंद्रा हल्ली माझ्याकडे असते. (व्यंकू आडवाच झालाय.)
(लाईट्स फेड आऊट)
- पडदा -