#सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला
--- तीन--गंधार --- सतारीमागचा माझा देव ---
माझ्या पोरवयामध्ये आमच्या पार्ल्याच्या 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'मध्ये एक अभूतपूर्व सांस्कृतिक घटना घडली होती. कार्यक्रमाच्या स्वरूपात शनिवारी रात्री ठेवलेली रविशंकर-अलीअकबर यांची सतार व सरोदची जुगलबंदी व अल्लारखां यांची तबलासाथ; ही मैफिल इतर मैफिलींप्रमाणे साडेतीन चार तासांत संपलीच नाही. ती मैफिल रविवारच्या सकाळच्या पहिल्या प्रहरापर्यंत चालूच राहिली. या तिन्ही कलाकारांना आमच्या पार्ल्यालाच असलेल्या एअरपोर्टवरून सकाळी कुठे परदेशात जायचं होतं; त्यामुळे सकाळपर्यंत ते वाजवतच बसले. माझ्या आईबाबांकडे म्युझिक सर्कलची कपल मेम्बरशिप असल्यामुळे ही घटना त्यांना अनुभवायला मिळाली. यानंतर पुढचे कितीतरी दिवस आईबाबा या मैफिलीच्या नशेतच होते. माझी आई संगीतशिक्षिका तर होतीच; मात्र बाबांना संगीत शास्त्र समजत नसलं तरी ते शास्त्रीय संगीत खूप आवडीनी ऐकत असत. आईबाबांना सतार हे वाद्य आणि रवीजी यांचा भारी लोभ जडला होता. मध्येच कधी लाडात आले की बाबा भारावून मला म्हणायचे, "प्रसन्न, तू रवीजींसारखी सतार शिक रे ! ... मोठं यश नाही मिळालं तरीही आयुष्यभर मी तुला पोशीन." अर्थात एकूणच माझ्या चंचल आणि आळशी स्वभावामुळे हे प्रत्यक्षात येणं अशक्यच आहे, याची जाणीव त्यांना असणारच ... याच दरम्यान मी तबला वादनात थोडी गती दाखवू लागलो होतो आणि एकूणच घरच्या रेडियोवरून सतत शास्त्रीय संगीत ऐकायलाही मिळत होतं ... रेडियोवरून रवीजींच्या सतारीच्या कितीतरी रेकॉर्डस् वाजवल्या जात असत ... राग अहिर-ललत, नटभैरव, भटियार अशा कित्येक, तीनचार मिनिटांच्याच पण तरीही, अप्रतिम असलेल्या रेकॉर्डस् मला पाठही झाल्या होत्या. शिवाय तबलजी असल्यामुळे आपोआपच मुख्यतः ताल-लयीकडे ओढा नैसर्गिकरित्या वाढू लागला आणि नकळतच माझ्या मनात कंठसंगीतापेक्षा वाद्यसंगीताला किंचितसं जास्त झुकतं माप दिलं जाऊ लागलं. या वयातच रवीजींबद्दल प्रचंड आदरयुक्त आकर्षण वाढीला लागलं.
प्रत्यक्षात मला पंडित रविशंकरजींची माझी पहिली लाईव्ह मैफिल अनुभवण्यासाठी मध्ये बराच मोठा काळ जावा लागला. साधारण १९७९ पासून कॉलेज जीवनात असतांना माझं संगीत श्रवणाचं वेड खूपच वृद्धिंगत झालं आणि मी मुंबईभर मैफिली ऐकायला फिरायला लागलो. पण या काळापूर्वीच भारतातील बऱ्याचशा मैफिली गाजवून रविशंकर हे खूपच मोठठं नांव झालं होतं. रवीजींबद्दल वाचून किंवा
त्यांच्या रेकॉर्डस् ऐकूनच मी एवढा प्रभावित झालो होतो की त्या पौगंडावस्थेत रवीजींचा,
कायम त्यांच्याजवळ असणारा, नोकर किंवा बॉय व्हायचंय; अशीच माझी महत्वाकांक्षा झाली
होती. तेव्हा माझी शैक्षणिक प्रगती (?), नव्हे वाटचाल सुद्धा त्याच दिशेने चालू असल्यामुळेच
बहुदा तेव्हा मला कोणी, "बाळा, मोठं होऊन तुला कोण व्हायचंय ?," असले प्रश्न
विचारायच्या फंदातच पडलं नसावं ... या काळात रवीजी बहुतांशी परदेशातच असत ... अगदीच मोजके कार्यक्रम मोठठं तिकीट लावून भारतात करीत असत. पण तरीही माझा योग इतका बलवत्तर होता की बहुदा १९८० सालीच 'षण्मुखानंद हॉल'मध्ये रवीजींची मैफिल जाहीर झाली. मला आठवतंय, तिकीटविक्रीच्या वेळेच्या बऱ्यापैकी आधीच मी हॉलवर तिकिटासाठी बारीत गुमान उभा होतो. मला मैफिलींच्या बाबतीत नेहमीच कमीत कमी दराचं तिकीट हवं असल्यामुळे सहसा तिकीट मिळालंच नाही, असं फारसं घडत नसे; पण तरीही आगाऊ तिकीटविक्री सुरु होण्याच्या दिवशी हॉलवर जाऊन तिकीट हस्तगत करणं मला नेहमीच सुरक्षित वाटायचं … त्यात ही तर रवीजींची मैफिल होती त्यामुळे हे प्लेयिंग द सेफेस्ट ... यावरून आठवलं; पुढे एकदा बिर्ला मातुश्रीला किशोरीताई व निखिल बॅनर्जी यांचा कार्यक्रम असतांना मी व मामेभाऊ आयत्यावेळी जाऊन हाऊसफुल म्हणून तिकीट न मिळून परत आलेलो आहोत ... दुर्दैवाने पुढे निखिलजी लगेच वारल्यामुळे त्यांची जिवंत मैफिल मी कधीच अनुभवू शकलो नाही, ही एक माझ्यासाठी मोठीच खंत आहे ... पण हे झालं थोडं पुढचं ... ज्याबद्दल सांगतोय त्या, रवीजींच्या या मैफिलीचा तिकीटदर अर्थात जास्त होताच; पण रवीजींना ऐकायचं तर तो कधीही असाच किंवा यापेक्षाही जास्त असणार होता, हे उघडच होतं.
यथावकाश ती वेळ, तो क्षण आलाच ... अर्थातच 'षण्मुखानंद'सारखा मोठ्ठा हॉलही पॅक होता. गर्दी इतकी अमर्याद असूनही, सतारीच्या तारा छेडल्या गेल्याचा पहिला आवाज येताक्षणी पिनड्रॉप सायलेन्स म्हणजे काय, हे क्षणात अनुभवलं. याआधी आणि यानंतरही मैफिली मी अनुभवलेल्या असल्या तरीही एवढ्या प्रमाणात मुख्य कलाकाराची ऍथॉरिटी, दबदबा मला नवीन होता. संगीतशास्त्र कळत असो नसो; श्रोत्यांनी जणू त्यांच्या कानांत प्राण आणले होते. कलाकाराला आणि सादर होत असलेल्या कलेला श्रोते पूर्णपणे सोल्ड आऊट होते. हा अनुभव घेऊन मीही खरंच पूर्ण थरारलो. त्या दिवशी तबला साथीला कुमार बोस होते. प्रथम मोठ्या लांबीच्या आलाप, जोड, झाल्यासहित 'राग यमन' मधल्या धमार आणि द्रुत एकतालातल्या दोन गतीही झाल्या. त्यानंतर इंटरव्हल झाला. इंटरव्हलनंतर 'राग किरवाणी'मध्ये आलाप आणि त्रितालातल्या विलंबित आणि द्रुत गती होऊन नंतर भैरवीनी मैफिल समाप्त झाली. या मैफिलीच्या अनुभवानी मी किती काळ आणि किती भारावलो हे शब्दबद्ध करणं मला खरंच अशक्य आहे ... 'किती काळ,' हे तर आणखीनच अशक्य; कारण अजूनही तो काळ संपलेलाच नाहीये आणि तो काळ माझ्याबरोबरच संपेल हे नक्की ...
या नंतर रवीजींच्या ज्या दोन मैफिली मी ऐकल्यायत त्यांच्या नुसत्या आठवणींनीही आजसुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात ... खरंच काहीतरी अद्भुत जादू होऊन ते तास पुन्हा अनुभवायला मिळावेत असं वाटतं ... १९८० च्या सुमारास आणि त्यानंतरही सेंट कॉलेजच्या मैदानात; सेंट झेव्हिअर्स कॉलेज म्युझिक ग्रुप, उस्ताद अल्लारखा आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज, यांच्या संयुक्त पुढाकाराने तेव्हा दरवर्षी २३,२४ व २५ जानेवारीला संगीत समारोह आयोजित होत असे. २३ व २४ ला संध्याकाळ/रात्री रोज तीन कलाकार असायचे व शेवटची लोकल गाडी बहुदा मिळायची. २५ ची संध्याकाळ/रात्र मात्र फुल नाईट असायची (ही प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या). तेव्हा चार कलाकार असायचे व सांगता करणारा कोणीतरी बडा कलाकार असायचा ... बहुदा रवीजी किंवा क्वचित उस्ताद विलायत खांसाहेब ... याच समारोहामध्ये मी बहुदा १९८१ व १९८३ ला रवीजींना ऐकलं होतं ... त्यातही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये १९८१ साली रवीजी पद्मविभूषण झाल्याची बातमी, माझ्या आठवणीप्रमाणे, तेव्हाच कानांवर पडली होती. या १९८१ सालच्या मैफिलीत रवीजींनी पहिला राग गुंजी कानडा झाकीर भाईंना घेऊन सादर केला होता ... त्यात पहिल्या पन्नासेक मिनिटांच्या आलाप जोड झाल्यानंतर तीस्त्र जाती रूपक तालातली अप्रतिम गत रवीजींनी चालू केली ... म्हणजे सात मात्रांचा संथ गतीतला रूपक ठेका चालू होता त्याचवेळी सतारीवर त्याच्या दिडीतली साडेदहा मात्रांची गत वाजत होती ... पहिल्या दोनेक मिनिटात गतीचं चलन समजल्यानंतर झाकीर भाईंनीही फार सुंदर साथ केली ... मला मात्र, मी तबला वाजवत असूनही, गतीच्या चलनाचं सौंदर्य समजून घ्यायला कमालीचं लक्षपूर्वक ऐकावं लागत होतं ... त्यानंतर गुंजी कानड्यातलीच आडाचौतालातली द्रुत गत झाली ... शेवटी शेवटी हा आडाचौताल इतका कमालीच्या द्रुत लयीत गेला की तरुण झाकीरभाईंची सुद्धा परीक्षा पाहिली जावी. अर्थात झाकीरभाई पास झालेच … दुसरा त्रितालातली गत असलेला राग भाटियार उस्ताद अल्लारखांना साथीला घेऊन सादर झाला ... तिसरी सूर्योदयाच्या आसपास सादर झालेली भैरवी अल्लारखां व झाकीरभाई दोघांनाही उजवी-डावीकडे घेऊन सादर झाली ... २६ जानेवारीच्या सकाळी कोवळी सूर्यकिरणं अंगावर झेलत एकाचवेळी तृप्तता व अतृप्तता अनुभवत घर गाठलं गेलं ... साधारण अगदी अस्साच अनुभव १९८३ सालच्या मैफिलीतही आला; फक्त यावेळची पूर्ण मैफिलीची साथ झाकीरभाईंची होती ... या मैफिलीत प्रथम राग परमेश्वरी, राग नटभैरव व शेवटची भैरवी या क्रमाने राग सादर झाले.
रवीजींची जी शेवटची मैफिल मी ऐकली ती मात्र दुर्दैवाने लक्षात न ठेवावी अशीच होती ... बहुदा षण्मुखानंदमध्येच ही मैफिल होती. तबला साथीला अनिंदो चॅटर्जी होते व बरोबरीने सतार साथीसाठी कन्या अनुष्का शंकरही होती ... याही वेळेला रवीजींनी राग परमेश्वरी चालू केला ... मात्र कधी नव्हे तो तारांच्या खेचकामात चांगलाच कणसूरपणा जाणवत होता; एवढंच नव्हे तर सतार अनेकदा चक्क बेसूरच वाजत होती ... बहुदा मेंदूतला सुरेल अंदाज हातांमध्ये उतरू शकत नव्हता ... पहिला राग परमेश्वरी चांगलाच असमाधान देऊन संपला, नव्हे अनुष्कानेच तो बऱ्यापैकी ओढून नेला ... त्यानंतर रवीजींनी रागाचं नाव 'रंगीला पिलू' असं अनाऊन्स करून पिलू गत व त्यामध्ये रागमाला अशा पद्धतीने सादरीकरण केलं तोवर त्यांना सतारीवर थोडाफार ताबा मिळवता आला होता खरा, पण एकूणच मनाला खिन्नता देऊनच ही मैफिल संपली ...
रवीजींचं सतारीचं सादरीकरण तितकंसं पसंत न पडणारे काही संगीतप्रेमी सुद्धा होतेच ... रवीजींच्यातला अस्सल सतारवादक कधीच मागे पडलाय ... आता ते फक्त 'प्लेयिंग फॉर द गॅलरी' अशा पद्धतीनं वादन करतायत; असा आक्षेप काही संगीतप्रेमी घेतच असत ... मात्र माझ्या अनुभवानुसार थोडेफार रसिकानुनयी गिमिक्स प्रत्येक प्रसिद्ध कलाकार करतच असतो ... याला अगदीच मोजके अपवाद असले तरच ... मात्र हे गिमिक्स मोजक्या वेळेपुरतेच असावेत व बाकीची पूर्ण मैफिल अभिजात कलेच्या सादरीकरणानेच युक्त असावी, हे महत्वाचं आणि मी अनुभवलेल्या रवीजींच्या मैफिली, शेवटच्या मैफिलीचा अपवाद वगळता, अजोडच होत्या. विशेषतः रवीजींचा मागच्या पूरक तारांचा, तरफांचा; स्वरांना कमालीचा भिडणारा वापर, हे मला नक्कीच एक वैशिष्ट्य वाटतं. कारण इतर वेळा ऐकता, त्या तारांचा कमी उपयोग होत असेल तर वादन भरीव वाटत नाही किंवा जास्त उपयोग होत असेल तर वादनात काहीसा गोंगाट जाणवतो ... अर्थात हे माझं मत आहे; कदाचित ते जास्त भक्तिभावयुक्त वाटत असेलही; कारण तो आहेच ...
पाश्चात्य देशांत रवीजींनी केलेला भारतीय संगीताचा प्रसार, संगीत रचनाकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, रवीजींना मिळालेले मानसन्मान, या गोष्टी तर उल्लेखनीय होत्याच; परंतु या सर्वाच्याही अगोदर त्यांनी केलेली निष्ठापूर्वक मेहेनत आणि त्यांनी नावारूपाला आणलेलं त्यांचं सतार वादन असं काही अद्वितीय होतं की रवीशंकर या नामोच्चाराबरोबरच माझ्या मनामध्ये येणारा आदरभाव कधीही नष्ट झाला नाही.
वरच्या त्या अद्भुत शक्तीकडून यदाकदाचित मला पूर्वायुष्यातला काही वेळ परत जसाच्या तस्सा मिळणार असेल तर मी क्षणाचाही विचार न करता फक्त गुंजी कानड्याचा दीडेक तास परत अनुभवायला मागेन हे नक्की.
ता. क. -- फोटो गुगलच्या सौजन्याने.
@प्रसन्न सोमण.
२०/०१/२०२१.
No comments:
Post a Comment