Wednesday, 10 February 2021

--- 'सप्तक'बद्दल एक मनोगत ---

#सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला

 

 

--- 'सप्तक'बद्दल एक मनोगत ---

 

 

संगीतवेड्या मित्रांनो,

 

 

शास्त्रीय संगीताच्या मनापासूनच्या आवडीमुळे मी आजवर खूप संगीत संमेलनांमध्ये, खूप संगीत मैफिलींमध्ये अनेक कलाकारांचे कलाविष्कार अनुभवले. साधारणपणे मी कॉलेजकुमार झाल्यापासूनच्या आणि मुंबईभर एकट्याने फिरण्याएवढा मोठा झाल्यापासूनच्या काळात एखाद्या व्यसनी माणसाच्या ओढीनें या सगळ्या मैफिलींना मी हजर राहिलो. काही प्रौढ वयाच्या कलाकारांच्या मुरलेल्या कलेबरोबरच त्यांचा उतारवयातला काळही अनुभवला. काही कलाकारांच्या ऐन उमेदीतल्या बहरलेल्या काळापासून तो वृद्धावस्थेतल्या स्थित्यंतराचा काळ अनुभवला. तर काही 'उभरते हुवे' कलाकार परिपक्व होत असलेलेही अनुभवायला मिळाले. माझ्या सुदैवाने यातल्या बऱ्याच उभारीच्या काळात तरी; 'रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक बंद,' सारखे कायदे अस्तित्वात नव्हते. हे कायदे एकूण समाजासाठी भले योग्य असतील, नव्हे आहेतच; पण त्यानंतर कलासंसाराला अनेक बदल करावे लागले थोडी उतरती कळा आली, हे खरंच.

 

 

आज मी स्वतः वयाने बराच प्रौढ झालो आणि त्यामुळे आता दगदग करण्यातली पहिली 'आग' आता बरीचशी विझली, हे खरंच; पण  एकूण परिस्थितीतही बऱ्याच वेगाने बराच बदल घडलाय ... संगीतच काय, सर्वच कलाकृतींची 'सहज उपलब्धता;' या तंत्रज्ञान विषयक प्रगतीमुळे बेफाट वाढलीय; त्यामुळे कलानंद घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची तशी गरज बरीच कमी झालीय ... साहजिकच जिवंत संगीत मैफिलीची संख्याही लक्षणीयरीत्या रोडावलीय ... वेळेबाबतच्या नियमांमुळे ओपन एअरमध्ये होणाऱ्या पुण्याच्या 'सवाई गंधर्व महोत्सव' किंवा आमच्या पार्ल्याच्या 'हृदयेश संगीत समारोह,' यासारख्या नावाजलेल्या संमेलनांवरसुद्धा खूप बंधनं आलीयत. आता हळूहळू संगीत मैफिली उपभोगण्याचा आनंद सुद्धा ऑन लाईन होत चालल्यामुळे त्यातला जिवंत रसरशीतपणा खुली दाद नष्ट होत चाललीय. एका दृष्टीने हे रडगाणं आहे खरं; पण बदलत्या स्वरूपाला सामोरं जायला हवंच ...

 

 

काळाचं चक्र उलटं फिरवणं अशक्य हे तर नक्कीच; पण बहुदा त्यामुळेच आजवर अनुभवलेल्या अनेक कलाकारांपैकी काही दिग्गज कलाकारांबद्दल, त्यांच्या मी अनुभवलेल्या मैफिलींबद्दल, काही थोडं व्यक्त व्हावं, असं वाटल्यामुळे ही सात छोटेखानी लेखांची लेखमालिका मी, 'सप्तक' या शीर्षकाखाली शेअर करतोय. ही अर्थातच माझी मतं आणि माझ्या भावना आहेत. या लेखांमध्ये मी इंटरनेटच्या रेडिमेड माहितीची मदत नगण्य ठेवायचा प्रयत्न केलाय. सप्तकातल्या सात सुरांप्रमाणे सात थोर कलाकांबद्दलचे हे छोटेखानी लेख आहेत. माझ्या बऱ्यावाईट लेखन कौशल्यानुसार आणि रसिकांच्या जुळणाऱ्या जुळणाऱ्या आवडीनिवडीनुसार हे लेख अगदी खूप 'वाचनीय' नाही वाटले तरीही; 'थोडेफार बरे' वाटतील, अशी मी उमेद बाळगून आहे.

 

 

ता. . -- वेळ मिळेल त्यानुसार, साधारण दोन-तीन दिवसांच्या अंतराने एक एक लेख पोस्ट करीन.

              

 

@प्रसन्न सोमण.

०८/०२/२०२१.

No comments:

Post a Comment