Tuesday, 16 February 2021

--- दोन--रिषभ --- महागायक ---

 #सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला

 

 

--- दोन--रिषभ --- महागायक ---

 

 

आपण आयुष्यात प्रथम श्रीखंड कधी खाल्लं ? ... सांगता येईल ? ... नाही ना ! ... अगदी तस्संच प्रथम भीमण्णांचं गाणं ऐकण्याबद्दल आहे. भीमण्णा म्हणजे पंडित भीमसेन जोशी ... मी कोण, काय, वगैरे कसली जाणीवसुद्धा झाली नसेल तेव्हापासून रेडियोवरून; 'लंगर का करिया' नाहीतर 'भैरी भोरी झान्जरवा बाजे' कानांवर पडतच आलेलं होतं ... आमच्या 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'मध्ये भीमण्णांचं गाणं एवढ्या वेळा ठेवलं गेलं असेल की त्याची मोजदाद करणं, संस्थेचा लिखित अहवाल सोडल्यास इतर कोणाला, शक्य झालं नसेल ... जसराजजींनी भीमण्णांच्या बाबतीत, 'तानसेनानंतर इतका महान आणि इतकी महाप्रचंड लोकप्रियता मिळवणारा गायक कोणीही नसेल.' अशी कॉमेंट फार पूर्वीच करून ठेवली आहे. त्यामुळे त्याकाळी माझ्या मनात तरी भीमण्णांची एकही मैफिल ज्यानी ऐकली नाही तो 'संगीत औरंगजेब' अशी एक माझ्यापुरती व्याख्या तयार झालेली होती. आता काळ बराच पुढे गेलाय ... भीमण्णा कैलासवासी होऊनही बराच काळ लोटलाय.

 

 

आज तंत्रज्ञानानी अफाट प्रगती केलीय. त्यामुळे अगदी उमेदीतल्या ताज्यातवान्या भीमण्णांचं गाणंसुद्धा, ऐकायलाच नव्हे तर व्हिडियोमुळे थोडंफार बघायला मिळणं सुद्धा शक्य झालेलं आहे. पण तरीही मैफिलीत समोरच्या स्टेजवर प्रत्यक्षपणे गात असलेले भीमण्णा आणि त्या माहोलमध्ये मनावर पडणारा त्या गाण्याचा प्रभाव, या गोष्टी काही खासच होत्या. मीच नव्हे तर कोण्याही संगीतप्रेमींनी जास्तीत जास्त कुठल्या कलाकाराच्या मैफिली अनुभवल्या असतील, याचं निर्विवाद उत्तर एकच असू शकतं, ते म्हणजे भीमण्णांच्या ... अर्थात हे माझ्या किंवा माझ्या अगोदरच्या पिढीतील संगीतप्रेमींबद्दल ...

 

 

भीमण्णांच्या गाण्याबद्दल मी बोलायचं म्हणजे; फक्त त्यांच्या गाण्यामुळे माझ्या कस्पटासमान आयुष्यात केवढी मोठ्ठी बहार आली एवढ्यापुरतंच ... त्यांच्या गाण्यातला आनंद उपभोगून लाखो रसिक तृप्त झाले असतील, त्यातलाच एक ठिपका म्हणजे मी ... एकंदरीत मला वाटतं हा मनस्वी माणूस काही वेगळ्याच जाणिवा, प्रेरणा घेऊन अवतरला असावा ... बालपणी घरातून केलेलं पलायन काय, आगगाडीपासूनच सुरुवात होऊन उत्तरेत खाल्लेल्या खस्ता काय, शेवटी आपल्याच मुलखात कुंदगोळला फोडलेले मेहनतीचे पहाड काय, सगळ्याच कथा डोळे विस्फारायला लावणाऱ्या ... बरं चला, संगीत कलेसाठी घेतलेले कष्ट सोडून देऊ ... कारण हे कष्ट कुठल्याही कलाकाराला घ्यावेच लागतात ... पण मनस्वीपणे वसंतरावांसारख्या दोस्तांसाठी तबलजी नाना मुळे सारख्यांना घेऊन कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी केलेलं ड्रायव्हिंग काय, मेकॅनिकगिरी काय, खाण्याच्या बाबतीत बिनधास्तपणे केलेली कुपथ्य काय, प्रसंगी पिण्याच्याही बाबतीत केलेला मनस्वीपणा काय; सगळंच अफाट ... मात्र मैफिलीसाठी मंचावर बसल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळेच भीमण्णा संचारत असत, ज्यांच्या मनामध्ये त्या क्षणी फक्त तो राग, ती मैफिल असेल आणि ज्यावर फक्त त्यांचा आणि त्यांचाच हुकमी ताबा असेल.

 

 

वागण्याइतकेच भीमण्णा बोलण्यातही अफाट होते ... एकदोन जुन्या मुलाखती बघण्यात आल्या होत्या त्यात, मला वाटतं, डॉ.अशोक रानडे यांनी भीमण्णांना असा प्रश्न विचारला होता की 'नवोदित शास्त्रीय गायकांना गाण्याच्या मेहेनतीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल ?' एका क्षणात भीमण्णा म्हणाले होते, "गाण्याची मेहेनत सोडून देऊ; पण प्रथम तरुणांनी / तास कशालाही टेकता मांडी घालून ताठ बसण्याची मेहेनत करणं महत्वाचं आहे." माझ्या तोंडून गाण्याला काय द्यावी अशी, दण्णकन दाद निघाली होती ... अशाच कुठल्यातरी मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं होतं, "रागगायनासाठी शास्त्रांत वेगवेगळ्या वेळा, वेगवेगळे प्रहर निश्चित केलेत; पण रविशंकरजींनी मागे सांगितलं होतं की कलाकाराला वेळेची, प्रहरांची मर्यादा पाळण्याची काही गरज नाही. याबाबतीतलं तुमचं मत काय ?" त्यावेळी पटकन भीमण्णा म्हणाले होते, "रविशंकरांचं जाऊ द्या हो ! ते पट्टीचे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत; तर मी परंपरा पाळणारा नॅशनल आर्टिस्ट आहे. त्यामुळे मी सर्व मर्यादा पाळतो."

 

 

मैफिल सादर करतांना भीमण्णांची एकाग्रता अफाटच असायची. अलीकडच्या मोठमोठ्या संगीत संमेलनांतून एक गोष्ट मी सहजच अनुभवलीय. संगीत ऐकायला येणाऱ्या रसिक श्रोत्यांची संख्या खूपच वाढलीय. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे यात काही अडचण नाहीच आहे ... यामध्ये काही खास फॅशनेबल रसिकही असतातच आणि ते सराईत नजरांना ओळखू येतात हेही खरं ... फक्त अडचण एवढीच आहे की, काही श्रोते, आपल्या हातातल्या पेपरडिशमधला सामोसा कुरतडत किंवा कुरकुर वाजणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधले वेफर्स कुरतडत, समोर स्टेजवर चाललेला रागविस्तार आपण मनापासून ऐकत असल्याचं आजूबाजूच्यांना आणि विशेषतः आपल्या शेजाऱ्यांना भासवत असतात; मात्र त्याचवेळी बरोबर असलेल्या शेजाऱ्यांशी जरा जोरातच बोलून कसलीशी चर्चाही करत असतात. त्यांनी ठणठणीतपणे पैसे मोजून संमेलनाचं तिकीट काढलेलं असल्यामुळे त्यांना सारेच हक्क आपोआपच प्राप्त होत असतात ... कदाचित खूप ओळखी-पाळखी असल्यामुळे त्यांनी फुकट पास मिळवलेला असेल तर मग ते जणू काही 'रसिकांचे राजे' झालेले असतात ... दुर्दैवाने असले रसिक माझ्या आसनाच्या आजूबाजूला आले तर, मला जोरदार तालीम मिळालेला आणि मला येत असलेला एकमेव राग आविष्कारासाठी निव्वळ तडफडत असतो ... पण अशावेळी मैफिलीत येणाऱ्या विक्षेपाबद्दल बऱ्याचदा कलाकार सुस्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत असतात ... गानसरस्वती ताईंना तर, "तुम्हाला मैफिल ऐकण्यात रस नसेल तर बाहेरचा दरवाजा उघडा आहे," इतक्या स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करतांना ऐकलेलं आहे ... दोनतीन वेळा मी तबल्यावर बसलेल्या झाकीर भाईंना सुद्धा नाराजी व्यक्त करतांना बघितलेलं आहे. मात्र असल्या कुठल्याही व्यत्ययाचा काहीही परिणाम होऊ न देता, निष्ठेनं आपली मैफिल आपण मारायचीच आहे, हाच विचार करून आपली कला सादर करणारे तीन कलाकार पटकन आठवतायत ... त्यातले तिसरे आहेत शिवकुमार शर्माजी, दुसरे आहेत ज्यांचं वर्णन पु.लं.नी 'गाण्यातच राहणारा माणूस' असं केलंय ते मल्लिकार्जुन मन्सूरजी आणि पहिले आहेत अर्थातच भीमण्णा.   

 

 

तथाकथित शालेय शिक्षण वगैरे अजिबातच घेता आपल्याला फक्त संगीतालाच वाहून घ्यायचंय, ही गोष्ट भीमण्णाच नव्हे तर एकूण सगळी कलाकार मंडळी कसं ठरवत असतील ? ... हे लोक यशापयशाचा जरासुद्धा विचार करता स्वतःला कसे झोकून देत असतील ? कुठल्या वेडाचा हा प्रभाव असेल ? आपल्यासारख्यांना याची गणितं मांडता येणं फारच कठीण ... स्वतः भीमण्णा अचाट यशस्वी झाले; पण अशाच स्वरूपाचा निर्णय घेऊन दुर्दैवाने अयशस्वी ठरलेले कैक कलाकार असतीलच का ? ... जाऊ दे ! माझ्या तरी बुद्धीच्या कवेत मावणाऱ्याच या गोष्टी आहेत.  

 

 

भीमण्णांच्या मैफिली मी खूपच ऐकल्या ... ऐकल्यानंतर किंवा ऐकता ऐकता अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी येणं, या अगदीच नित्याच्या गोष्टी होत्या ... अलिकडे अशा प्रकारचा अनुभव खूप दुर्मिळ होत चाललाय, हे अगदी खरंय ...

 

 

पण शेवटी कुठेतरी अंत असतो, हा सृष्टिक्रमच आहे ... अगदी म्हातारपणातल्या भीमण्णांच्या काही मैफिली अगदी विसरून जाव्यात अशा होत्या, हेही खरं आहे. मजबुरी म्हणून आणि निष्ठेपायी मैफिल जरी सोडली नाही तरी, त्या मैफिली सामान्यच होत्या ... कालाय तस्मै नमः ...

 

 

भीमण्णांसारखा असाधारण प्रतिभेचा गायक आपली कला पेश करत असतांना ते याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मला जन्माला घातलंस या तुझ्या योजनेबद्दल, हे परमेश्वरा तुला माझे कोटीकोटी प्रणाम.

 

 

ता. . -- फोटो गुगलच्या सौजन्याने.

 

 

@प्रसन्न सोमण.

११/०१/२०२१



No comments:

Post a Comment