Friday, 12 February 2021

--- एक--षड्ज --- गोष्ट सुरेल शहनाईची ---

 #सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला

 

 

--- एक--षड्ज --- गोष्ट सुरेल शहनाईची --- 

 

 

"प्रसन्न, तुला आमच्याबरोबर यायचंय ... ही संधी सोडूच नकोस ... उस्ताद बिस्मिल्ला खांसाहेब आणि पार्टीचा कार्यक्रम वारंवार होत नसतो," बाबांनी मला बजावलं.

बाबांना विरोध करण्याची टाप नव्हतीच, पण मी जरा साशंकच होतो; कारण पहिल्यापासून आजतागायत माझ्यापाशी बुद्धीचा तुटवडाच ...

 

 

प्रसंग असा होता की 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'ने टिळक मंदिरात 'गोखले सभागृहा'त बिस्मिल्ला आणि पार्टीचा शहनाई वादनाचा कार्यक्रम ठेवलेला होता ... मी शालेय वयाचाच होतो ... असेन साधारण आठवी - नववीत ... आई-बाबांकडे म्युझिक सर्कलची कपल मेम्बरशिप होतीच; पण दडपून नेलं तर मुलांना तसंच, तिकिटाशिवाय, आतमध्ये सोडत असत (हाफ पॅण्ट घातली की भागत असे ... अर्थात आमच्यापुरता पॅण्टचा अर्थ हाफ पॅण्ट हाच असे ) शिवाय या ठिकाणी भारतीय बैठक असल्यामुळे आसन क्रमांक वगैरे भानगड नव्हतीच ... मी तबला वाजवत असल्यामुळे मधून मधून आईबाबा या कार्यक्रमांना मला नेत असत. माझी समजून संगीत ऐकण्याची बुद्धी तोवर फारशी विकसित झालेली नसल्यामुळे, काही वेळा मी कंटाळत असे; मात्र तरीही चांगलं संगीत मुलाच्या कानी पडावं ही आईबाबांची नेहमीच इच्छा होती.

 

 

मैफिल संध्याकाळची होती ... एरव्ही 'म्युझिक सर्कल' पाहुणे प्रवेश शुल्क दहा रुपये ठेवीत असे पण बिस्मिल्लांच्या लोकप्रियतेमुळे त्यात घसघशीत वाढ होऊन त्या दिवशी प्रवेश शुल्क वीस रुपये केलं होतं. तरीही शेवटी गर्दी अमर्याद वाढल्यामुळे मैफिल ‘गोखले सभागृहा’ऐवजी जास्त कपॅसिटी असलेल्या 'पु.ल.देशपांडे सभागृहा'त शिफ्ट करावी लागली होती, असं अंधुकसं आठवतंय. बहुदा या मैफिलीत बिस्मिल्लांनी पहिला राग 'भीमपलास' वाजवला असावा; पण वय लहान असल्यामुळे या मैफिलीच्या तपशीलवार आठवणी माझ्यापाशी नाहीत ... मात्र मैफिल जवळजवळ साडेतीन तास खूपच रंगली … खिडक्या उघड्या असलेल्या त्या ओपन हॉलमध्येच काय; पण आजूबाजूच्या परिसरात सुद्धा  बिस्मिल्लांचे शहनाईचे जादूभरे स्वर पूर्णपणे भरून राहिले होते आणि आणि श्रोतेही गारुड झाल्यासारखे भारून जाऊन उसळून उसळून दाद देत होते, हे नक्कीच आठवतंय ... त्यावेळी रेडियोच्या कृपेने बिस्मिल्लांचे मध्यलय त्रितालातल्या रचना असणारे बरेच राग ऐकायला मिळायचे ... काहीकाही रागांमधल्या रचना तर पाठही झाल्या होत्या ... मात्र या मैफिलीत बिस्मिल्लांचा ख्याल ऐकण्याचा योग आला होता. अर्थात संथ लयीतल्या एकतालातला ख्याल मला व्यवस्थित समजत होता, असं म्हणण्याचं धार्ष्ट्य मी नक्कीच करणार नाही. तरीही काहीतरी अनोखं आणि गोड वाटत होतं आणि सम शोधण्यात आणि समेपर्यंत येण्याची प्रक्रिया समजायचा प्रयत्न करण्यात जीव रमत होता, हे अगदी खरं. एकतर संमेलनांमधला, एका कलाकाराला फक्त दीड तासाचा अवधी असल्याचा, काळ फारसा सुरु झालेला नव्हता. त्यातही हा प्रकार 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'मध्ये तर नव्हताच नव्हता ... उलट रविशंकर, अलीअकबर, अल्लारखा या त्रयीला दुसऱ्या दिवशी एअरपोर्ट वरून कुठेसं जायचं असल्यामुळे आदल्या रात्री सुरु झालेली सतार-सरोद जुगलबंदीची मैफिल पहाटेपर्यंत तुफान रंगली होती; हा किस्सा मी दहा वेळेला तरी आईच्या तोंडून भारावलेल्या स्वरात ऐकला होता. - एअरपोर्ट आमच्या पार्ल्यालाच होता, याचा जास्तीत जास्त अभिमान त्या रात्रीच्या श्रोत्यांना नक्कीच वाटला असणार.  

 

 

यानंतर बिस्मिल्लांची लाईव्ह मैफिल ऐकण्याचा योग आला तो डायरेक्ट १९९२ किंवा १९९३ साली बिर्ला मातुश्री सभागृहात ... या वेळपर्यंत मला संगीत श्रवणाचं वेड पूर्णपणे लागलेलं होतं ... पण ही बहुतांशी संमेलनं होती; एकाच कलाकाराच्या पूर्ण लांबीच्या मैफिलीचा काळ मागे पडत होता ... साधारण दीड तास एका कलाकाराला मिळे ... या काळापर्यन्त बिस्मिल्ला सुद्धा थोडे उताराला लागलेले होते ... पण तरीही लोकप्रियता तशीच्या तशी होती ... या मैफिलीत 'राग मधुवंती,' 'चैती' आणि शेवटी खूप लोकप्रिय 'पूर्वी धून' ऐकली ... खासाहेबांना वयानुरूप "आणि पार्टी"ची मदत जास्त घ्यावी लागत होती ... पण तरीही सुरातली गोलाई तश्शीच होती ... सनईमधली फुंक सुद्धा आवश्यक तिथे योग्य फोकससहित आणि आवश्यक तिथे अति हळुवार होत होती. क्वचित कधी सनईचा पिचलेला आवाज येऊन रसभंग होत असला तरीही मिंडेतली ताकद शाबूत होती ... खासाहेबांचं श्रोत्यांवर प्रेम आणि श्रोत्यांचं खासाहेबांवर प्रेम, हा उभयपक्षी खुशीचा मामला तोपर्यंत अगदी नक्कीच होता. स्वातंत्र्य / प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर खासाहेबांचं वादन ही अंगवळणी पडलेली नित्य गोष्ट होती. त्या पूर्वीही राजेंद्रकुमार सारख्या 'ऑल्सो रॅन' हिरोला घेऊन मुख्यतः खासाहेबांच्या शहनाईला डेडिकेट केलेला 'गुंज उठी शहनाई' सारखा चित्रपट निघत होता व गाजवताही येत होता.

 

 

दुर्दैवाने अल्पवयी ठरणारे कलाकार वगळले तर वार्धक्य, हा कलाकाराला शाप असतोच ... भले भरपूर मानसन्मान मिळाले तरीही, वयापायी आपल्याला पूर्ण ताकदीने आपली कला व्यक्त करता येत नाहीये, ही खिन्नता कलाकाराला असणारच. त्यातच संगीत रसिकांमध्ये खासाहेबांविषयी काही काही प्रवाद ऐकू यायला लागले ... लोकप्रियतेचा अवास्तव फायदा घेऊन खांसाहेब अति जास्त बिदागी घेऊन प्रत्यक्ष वादनात मात्र "आणि पार्टीची" नको एवढी मदत घेऊन अंगचोरपणा करतायत; हा प्रमुख प्रवाद होता. कुठेकुठे इतर काही संगीतबाह्य अनावश्यक गोष्टींची चीड आणणारी बकवास ऐकायला-वाचायला मिळत होती. हळूहळू खासाहेबांच्या सांपत्तिक दुरावस्थेबद्दल काही कानी यायला लागलं ... नातेवाईकांनी त्यांना अति लुबाडलं आणि जवळजवळ भिकेला लावलं, अशी बातमी कुठूनकुठून कानी येत होती. असलं काहीबाही ऐकून अंतःकरणाला पीळ पडत होता. या सगळ्याचा अटळ शेवट २००६ मध्ये खासाहेबांनी देह ठेवला तेव्हाच झाला.          

 

 

असो. शेवटी काळ कुणासाठी थांबत नाही, हे खरंच ... मात्र जन्माला येऊन मी केलं काय, असं जर मला उद्या कुणी विचारलं तर शहनाईनवाज बिस्मिल्ला खासाहेबांच्या दोन अप्रतिम मैफिली ऐकायचं पुण्यकर्म मी केलंय; ही गोष्ट मी जमेची बाजू म्हणून नक्कीच सांगू शकतो. 

 

 

ता. क. -- फोटो गुगलच्या सौजन्याने.

 

 

@प्रसन्न सोमण.

११/०१/२०२१.




No comments:

Post a Comment