#सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला
--- चार--मध्यम --- रसीला गायक ---
साधारण १९७४-७५ साल असावं ... एअर इंडियामध्ये नोकरीला असणारा माझा मामेभाऊ एअरपोर्ट वरून रात्री उशीरा पार्ल्याला आमच्या घरी आला होता ... सकाळी त्याने सिंगापूरला केलेली खरेदी दाखवली. टेपरेकॉर्डर दाखवतांना पटकन एका छोट्या लाल रंगाच्या कॅसेट प्लेअरमध्ये एक प्री रेकॉर्डेड कॅसेट टाकून त्यानी ती वाजवली तेव्हा एका गायकाच्या तरुण आणि रसील्या आवाजात ख्याल ऐकू येऊ लागला ... मामेभाऊ माझ्या संगीतप्रेमी व संगीतशिक्षिका असलेल्या आईला म्हणाला, "बघ आत्या किती अप्रतिम गातोय हा ... ओळख बघू कोण आहे ते !" ... पार्श्वभूमीवर सुरील्या आवाजात 'श्री कामेश्वरी करुणा' हा बिलासखानी तोडीतला सुंदर ख्याल चालूच होता ... अर्थात तेव्हा हळूहळू मोठं नांव होत असलेल्या जसराजजींचा आवाज आईला ओळखता आला नाही; पण ते गाणं तिला अत्यंत आवडलं ...
पुढे अगदी लवकरच आमच्या विलेपार्ले म्युझिक सर्कलमध्ये पंडित जसराजजींचं गाणं आयोजित केलं गेलं आणि रिवाजानुसार ते गाणं आई-बाबा ऐकूनही आले आणि पुढचे काही दिवस त्याच गाण्याच्या धुंदीमध्ये आई जसराजजींच्या गाण्याचा उल्लेख 'अतिशय रसीलं गाणं ऐकायला मिळालं,' असाच करत होती ... खरंतर महाराष्ट्रातल्या रसिकांच्या दृष्टीने तो काळ मुख्यतः भीमसेनजी, कुमारजी, वसंतरावजी, अभिषेकीबुवा
आणि राम मराठेजी या गायकांनी चांगलाच झपाटलेला होता ... पण तरीही जसराजजी हळूहळू पण निश्चितपणे या लोकप्रिय, प्रसिद्ध गायकांच्या मांदियाळीत प्रवेश करत होते; नाहीतरी महाराष्ट्राचे 'जमाई राजा' तर ते होतेच (जसराजजी हे चित्रपती व्ही.शांताराम यांचे जावई होते) ... याच काळानंतर मलाही हळूहळू समरसून संगीत ऐकण्याची समज येत होती आणि याच काळात रेडियोच्या माध्यमातून जसराजजींच्या विलंबित गतीतल्या ख्याल गायनाची धुंदी माझ्याही मनावर गारुड करत होती.
अगदी खरं सांगायचं तर जसराजजींची लाईव्ह मैफिल ऐकायचा मला प्रथम कधी योग आला हे काही आठवत नाही. मात्र आईबाबांबरोबर म्युझिक सर्कलच्या मैफिलींमध्ये हा योग आलेला नव्हता ... पुढे काही वर्षांनी १९८०/८१ या दरम्यान मी संगीत संमेलनं ऐकण्यासाठी मुंबईभर फिरू लागलो तेव्हा मला जसराजजींचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली ... या काळापर्यंत जसराजजींची प्रथितयश गायकांमध्ये गिनती होऊ लागली होती. हळूहळू मैफिलीच्या सुरुवातीच्या निवेदनात त्यांचा उल्लेख संगीतमार्तंड, मेवाती घराण्याचे अर्ध्वयु, असा होऊ लागलेला होता व जवळजवळ सर्व संगीत संमेलनांमध्ये त्यांची संगीतसेवा घडत होती ... त्यानंतर मी जसराजजींच्या खूपच मैफिली ऐकल्या आहेत.
जसराजजींच्या गाण्यात सहजच लक्षात येत असे तो त्यांचा प्रसन्न आणि थोडासा अध्यात्मिक भाव. दोन तानपुऱ्यांचं दमदार गुंजन, मांडीवरच्या स्वरमंडळाचं मुलायम छेडणं, प्रसन्न मुद्रेनं समोरच्या कुण्या परिचिताला 'जय हो' म्हणून केलेलं अभिवादन आणि मैफिलीला सुरुवात करतांना त्यांचा लागलेला षड्जाचा, आकार नव्हे तर, ओमकार ... 'ओम श्री अनंत हरी नारायण,' या शब्दांनी त्यांचा पहिला षड्ज लागत असे. त्या सुरानी वातावरण निर्मिती वेगळ्याच पातळीवर होत असे आणि संथ आलापीनंतर रागस्वरूप उलगडत जात असे ... बहुसंख्य वेळा तर 'मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज,' या श्लोकानेच रागस्वरूप उलगडत असे ... आणि नंतर सुरु होत असे संथ एकतालातला ख्याल, त्यातला रसीला स्वरलगाव व अप्रतिम भरण्यानंतर पुन्हा लयीच्या अंगाने हळुवारपणे समेची मंजिल गाठणं ... त्यांच्या गाण्यात ख्यालात तर नाहीच, पण द्रुत बंदिशीतसुद्धा आक्रमक तानबाजी बऱ्यापैकी मर्यादितच होती; मात्र गोड स्वरलगावातल्या हुकमी भरण्यानी व प्रसन्न गाण्यानी होणारी वातावरणनिर्मिती जणू त्यांची गुलाम होती. त्यांचे तीनही सप्तकांमध्ये लीलया निकोप लागणारे स्वर आणि विशेषतः एकाचवेळी स्वरांचा, मध्य व मंद्र सप्तकांमध्ये वापर करतांना त्यांचा असणारा ठाम कंट्रोल लक्षात राहण्यासारखाच होता. त्यांचा दमसासही अतिशय लक्षणीय होता. विशेषतः तारसप्तकातल्या षड्जाला भिडल्यानंतर ख्यालाच्या अंतऱ्याचं त्यांचं सादरीकरण हे खास त्यांचंच होतं. अशावेळी त्यांचा टिकणारा दमसास ऐकून ऐकणाऱ्याचीच छाती दडपून गेल्यास नवल नव्हतं. या दमसासासाठी त्यांनी अनेकवेळा टाळ्याही घेतलेल्या आहेत
जसराजजींच्या ऐकलेल्या अनेक मैफिलींपैकी काही मुख्य रागांनी मनावर कायमचा ठसा उमटवून ठेवलेला आहे ... बिर्ला मातुश्रीमध्ये ऐकलेला 'जय जय सिद्धेश,' हा ख्याल असलेला जयजयवंती, गुणिदास संमेलनात झाकीर भाईंच्या साथीने ऐकलेला पुरियाकल्याण, रंगभवनमध्ये ऐकलेला जोग, हे राग विसरता येणं शक्यच नाही ... संध्याकाळच्या मैफिलीत आमच्या पार्ल्याच्या टिळक मंदिरात गायलेला 'दिनकी पुरिया' तर वेगळ्याच कारणासाठी मनावर कोरला गेलाय; कारण दमदार ख्याल भरण्यानंतर जसराजजींनी या रागाच्या द्रुत बंदिशीत कधी नाही एवढी झपाटल्यासारखी तानबाजी आणि आक्रमकता दाखवून दिली होती.
जसराजजींच्या आवाजावर त्यांचा उत्तमच ताबा असावा, कारण त्यांचा आवाज लागत नाहीये किंवा आवाजाची काही तक्रार आहे, असं सहसा कधीच घडलेलं आठवत नाहीये ... मात्र याला एक अपवाद आठवतोय ... गुणिदास संमेलनात रवींद्र नाट्यमंदिरात पहिला राग 'पुरिया' गात असतांना त्यांचा आवाज त्यांना साथच देत नव्हता ... आवाजामध्ये खूपच खर होती ... ख्यालाचा भरणा चालू असतांनाच पुष्कळ खाकरणं वगैरे प्रकार चालू होते ... हुकमी रंग भरणाऱ्या त्यांच्या ख्याल भरण्यातच आवाजाचा विक्षेप येत असल्यामुळे खुर्चीतल्या खुर्चीत मी क्षणोक्षणी नाउमेद होत होतो. त्यांनी ख्यालभरणा जरा लवकरच संपवला आणि द्रुत बंदिशीत सरगमबाजी आणि तानबाजी चालू असतांना मध्येच आवाज सुटला ... त्यानंतर जसराजजींनी 'कानडा के प्रकार सुनिये,' असं अनाऊन्स करून 'दरबारी कानडा,' 'नायकी कानडा,' 'सुहा कानडा' आणि कळस म्हणून 'नगध्वनी कानडा' या वेगवेगळ्या रागातल्या ज्या बेहेतरीन बंदिशी ऐकवल्या त्याला खरंच तोड नव्हती.
जरा नंतर नंतर मैफिलींमध्ये जसराजजींना मागे बसलेल्या शिष्यांच्या
मदतीची बऱ्यापैकी गरज भासू लागली ... हळूहळू ख्यालाचा भरणा करतांना संथ एकतालातल्या
पहिल्या नऊदहा मात्रांमध्ये अप्रतिम स्वर भरणा करून झाल्यानंतर ख्यालाचा मुखडा पकडून
समेवर येण्याचं काम पुष्कळ वेळा शिष्यांवर सोपवलं जाऊ लागलं ... द्रुत बंदिशीतही तानक्रिया
पूर्ण केल्यानंतर बंदिशीचा मुखडा पकडणं बहुदा शिष्यांवरच सोडलं जाऊ लागलं ... हुकमी
वातावरणनिर्मिती हे जसराजींचं वैशिष्ट्यच असल्यामुळे स्वरमंडळ तर ते कायम घेतच असत;
पण नंतर नंतर त्यांना साथीला कला रामनाथन यांच्या व्हायोलिनचीही गरज भासू लागली
... अर्थात जोवर गाणं आणि विशेषतः पहिला मुख्य राग रंगवण्याची त्यांची हातोटी कायम
होती तोवर काहीच अडचण नव्हती ... खरंतर त्यांच्या उमेदीच्या बहुतेक पूर्ण कारकिर्दीमध्ये
त्यांनी अभिजात शास्त्रीय संगीतालाच प्रधान महत्व दिलेलं होतं. पहिला पूर्ण लांबीचा
राग सादर झाल्यानंतर ते सहसा एखाददुसऱ्या रागातली मध्यलयीतली बंदिश सादर करायचे. अगदी
'रवींद्र नाट्यमंदिरातल्या' झाकीर भाईंच्या साथीतल्या मैफिलीत त्यांनी मोठा राग 'मारुबिहाग'
आणि त्यानंतर मग मध्यलय त्रितालातले 'केदार' आणि 'कौशिकध्वनी' हे दोन राग गाऊन मैफिल
संपवलेली चांगलीच आठवत्येय ...
असं असलं तरीही जसराजजी; मूलतः अध्यात्मिक पिंडाचे असल्यामुळे
असेल पण; भजनं सुद्धा फार सुंदर गात असत ... 'ओम नमो भगवते वासुदेवाय,' हे भजन आणि
'माई सावरे रंग राची,' हे भैरवी भजन त्यांनी खूप गाजवलंही होतं ... त्यांची 'चिदानंद
रूप शिवोहं शिवोहं,' ही 'दरबारी'तली शिवस्तुतीसुद्धा खूप लोकप्रिय होती ... मात्र नंतर
नंतर त्यांच्या उतारवयात काही वेळा पहिल्या मुख्य रागापेक्षाही जास्त महत्व नंतर सादर
केल्या जाणाऱ्या भजनांना दिलं जाऊ लागलं. परिणामी स्टेजवर मृदूंगवादक व झान्जवादक अथवा
टाळवादक हे कलाकारही वाढले. पहिल्या मुख्य रागाचं महत्व बरंच कमी होऊन भजनं वाढली.
भजनांच्या मुखड्यामध्ये सर्व कलाकार एकत्र सुरु होत असल्यामुळे हळूहळू मैफिलीला 'पंडित
जसराज आणि भजनमंडळी पार्टी'चं स्वरूप प्राप्त झालं होतं ... सर्वसाधारणपणे श्रोत्यांना
जसराजजींची भजनं पसंत पडत असली तरीही; मुख्य रागाच्या आणि अभिजात संगीताच्या अपेक्षेने
आलेला माझ्यासारखा श्रोता थोडा खट्टू होत असे. अशावेळी 'भीमण्णांनी त्यावेळी 'संतवाणी'
या नावाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे का केला असेल,' याचं महत्व लक्षात यायचं.
मात्र ही सर्व स्थित्यंतरं होईहोईपर्यन्त जसराजजींचं वयही
बरंच वाढलं होतं ... साहजिकच दमसासही बराच कमी होत होता ... स्वरलगावातली हुकमी जादूही
ओसरत चालली होती ... मैफिलींची संख्याही बरीच कमी होत होत थंडावली होती ... शेवटी अगदी
अलीकडे २०२० मध्ये पंडित जसराजजी पंचत्वात विलीन झाले.
जसराजजी जरी आज आपल्यामध्ये राहिलेले नसले तरी, रसिल्या आवाजाच्या
आणि प्रसन्न मुद्रेच्या या कलाकारानं, स्वरमोहरांनी भरलेले हंडेच्या हंडे रसिक संगीतप्रेमींना
बहाल केले; या बद्दलची कृतज्ञता माझ्यासारख्या असंख्य रसिक संगीतप्रेमींच्या मनामध्ये
कायम राहील, हे नक्कीच.
ता. क. -- फोटो गुगलच्या सौजन्याने.
@प्रसन्न सोमण.
२३/०१/२०२१.