Thursday, 9 November 2017

#१) माझे आवडते पुस्तक - सारे प्रवासी घडीचे

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#)सारेप्रवासीघडीचे

सारे प्रवासी घडीचे / लेखक - जयवंत दळवी (जन्म - १४ ऑगस्ट १९२५ / मृत्यू - १६ सप्टेंबर १९९४.)

@@  जयवंत दळवी यांचा अल्पपरिचय  @@ 

     जयवंत दळवीमराठीतील एक अत्यंत नामवंत लेखक, पत्रकार, कादंबरीकार, नाटककार. दळवींनी 'ठणठणपाळ' या टोपण नावाने अप्रतिम विनोदी वृत्तपत्रीय लेखन, स्तंभलेखन केले आहे. त्यांच्या 'महानंदा' या गाजलेल्या कादंबरीवरून 'शं.ना.नवरे' यांनी 'गुंतता हृदय हे' या नावानी नाटक लिहिले. ते अमाप गाजले. यानंतर दळवींच्या काही इतर कादंबऱ्यांवरून दळवींनीच काही नाटके लिहिली. नाटककार म्हणून दळवींना 'बॅरिस्टर,' 'पुरुष,' 'नातीगोती,' 'संध्याछाया,' 'सूर्यास्त,' 'महासागर,' 'सभ्य गृहस्थहो,' 'पर्याय,' इत्यादी नाटकांद्वारे उत्तम यश नावलौकिक मिळाला. त्यांची 'चक्र' ही कादंबरी त्या काळी विलक्षण गाजली. या कादंबरीवरूनच पुढे 'चक्र' याच नावाचा हिंदी सिनेमा (१९८१) सुद्धा काढला गेला. त्यानंतरही पुढे दळवींच्या कलाकृतींपैकी - 'बॅरिस्टर' या नाटकावरून हिंदीमध्ये 'रावसाहेब' (१९८५) नावाचा सिनेमा, 'दुर्गी' या कादंबरीवरून मराठीमध्ये 'उत्तरायण' (२००५) या नावाचा सिनेमा, 'कवडसे' या कादंबरीवरून मराठीमध्ये 'कवडसे' (२००५) याच नावाचा सिनेमा, असे सिनेमे निघालेले आहेत. तसंच 'नातीगोती' या नाटकावरून मराठीमध्ये 'कच्चा लिंबू' या नावाचा सिनेमाही येऊ घातला आहे. एकूणच दळवींचा साहित्यक्षेत्रामध्ये चतुरस्त्र संचार झालेला आहे.           

@@ @@

     मी शालेय वयाचा असतांनाच आमच्या शेजारच्यांनी हौसेनं विकत घेतलेलं जयवंत दळवी लिखित 'सारे प्रवासी घडीचे' हे पुस्तक हाताला लागलं. ऐशी-पंचाऐशी वर्षांपूर्वीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या (तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा) एका गावाचं आणि त्यातल्या माणसांचं अफलातून वर्णन या पुस्तकात दळवींनी केलंय. अगदी पहिलं प्रकरण हे थोडंसं नॉस्टॅल्जीक आणि भावनात्मक लिखाण असलेलं आहे. हे प्रकरण तेव्हा पोरवयातल्या मला फारसं भावलं नाही (कारण माझं पाठीला डोळे फुटण्याचं ते वय नव्हतं ... आजचं आहे.) पण दुसऱ्या, 'आपू'च्या (पुस्तकातल्या निवेदनकर्त्याचं नाव 'आपू') लहानपणाच्या प्रकरणापासून पुस्तक एकदम चढतच गेलं. गावकऱ्यांच्या तोंडचे मालवणी संवाद अगदी नीटसे कळले नाहीत तरी संदर्भाने अर्थ लागत होता. पुढे एकदा 'शास्त्रीहॉल'च्या गणेशोत्सवात श्री.बाळ कुडतरकरांनी एकपात्री कथाकथनासारख्या कार्यक्रमात या पुस्तकातलं दादू गुरवाचं, वस्त्रहरणाच्या संदर्भातलं तुफान विनोदी प्रकरण अप्रतिमरित्या सादर केलं होतं (आणि माझे मामा ‘शास्त्रीहॉल’निवासी असल्यामुळे मी बालवयात ते पाहिलं होतं). त्याही नंतर मच्छिन्द्र कांबळी यांचं 'वस्त्रहरण' नाटक (लेखक गंगाराम गवाणकर) भन्नाट गाजलं आणि आस्ते आस्ते अगदी मुंबैकरांनाही मालवणी बोली बऱ्यापैकी परिचित झाली.

     माझ्या लहानपणी 'तुझे गाव कोणते ?' असा मला कोणी प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचे ते माझ्या बाबांनी माझ्याकडून पाठ करून घेतले होते. 'मिठबांव, देवगडच्या जवळ' असे ते तीन शब्द पाठच करून घेतलेले असल्यामुळे पूर्ण मुंबईकर असलेल्या मला माझं गाव मिठबांव आहे एवढं माहित होतं; पण बाकी गाव कसं आहे, कुठे आहे, याबद्दल 'काडीयेची' सुद्धा माहिती नव्हती. प्रत्यक्ष गावाला जाणं आणि मिठबांवातल्या आमच्या जमिनीच्या तुकड्यावर घर बांधून गावाशी संबंध जोडणं, हे घडायला प्रौढावस्था यावी लागली. आता जयवंत दळवींच्या लहानपणचं म्हणजे ऐशी-पंचाऐशी वर्षांपूर्वीचं सिंधुदुर्गातलं आरवली गाव (दळवींचं गाव) आणि आत्ताचं सिंधुदुर्गातलं मिठबांव गाव यात अर्थातच काळामुळे, विजेपासून ते अगदी इंटरनेटपर्यंतच्या प्रगतीमुळे, जमीन अस्मानाचा फरक पडला असला तरीही कोंकणी माणसांची ती बोलण्यातली ढब, ती संबोधनं, ती इतरांना ठेवलेली 'विशेषनामं', फटकन पण शांतपणे काहीतरीजबराट’ कॉमेंट टाकण्याची ती पद्धत, अशी व्यवच्छेदक लक्षणं अजूनही लक्षात येतात.

     ‘सारे प्रवासी घडीचे’ हे म्हटलं तर 'आपू'चं आत्मचरित्र आहे, म्हटली तर कादंबरी आहे, म्हटली तर ही व्यक्तिचित्रे आहेत, म्हटलं तर विनोदी लिखाण आहे. मात्र या सगळ्याच्या बुडाशी आहेत त्या गावाच्या, गावातल्या माणसांच्या, पूर्वायुष्यातल्या आठवणी. हे पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटणारं विनोदी पद्धतीनं येणारं निवेदन असलं तरीही त्याचबरोबर या लिखाणात काळजाला हात घालण्याची शक्तीही आहे.

     आपूच्या शाळेतल्या बागाईतकर, अमृते, पावटे मास्तरांच्या व्यक्तिरेखा, शेजारचे वामनदाजी विठ्ठलबापू (डब्लू. डब्लू.) कुलकर्णी, नरु, न्हानू कांबळी यांच्या व्यक्तिरेखा, आबा-बाबुली यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचं पिढीजाद वैर, शांत्या न्हावी, डॉ.रामदास आणि त्यांचे सहभोजन, दशावतारी जिवा शिंगी, नाटकवेडा दादू गुरव, निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी असणाराहाफमॅड’ तात्या रेडकर, भुसारी दुकानदार नायक, ताडी-माडी विक्रेता अंतोन पेस्तव आणि त्याचा 'तसल्या' - छटाक, नवटाक मारणाऱ्या - गावकऱ्यांच्या लेखी 'फेमस' असलेला दारूचा गुत्ता, गुंडू खाटीक, या आणि अशा अनेक व्यक्तिरेखा निवेदन पद्धतीने आणि मधून मधून मालवणी संवादांच्या पेरणीने इतक्या अप्रतिम रंगवल्यायत की आस्वाद घेता घेता वाचन समाधी लागते.

     मुलांच्या सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमासाठीअंगविक्षेप करून’ म्हणायचे गीत बसवले जाते. त्या प्रसंगी परशाला कोयतीचा बारीक ओरखडा लागून रक्त येते. त्यानंतर परशाचा बाप कोयती हातात घेऊन बागाईतकर मास्तरांना जाब विचारत असतो त्या प्रसंगाचं वर्णन -

"परशाचा बाप बागाईतकर मास्तरांना बोलूच देत नव्हता. एका साध्या शब्दाआड एक शिवी अशारितीने तो शब्दमालिका गुंफत होता. तेवढ्यात नरु माझ्या कानात कुजबुजला, "मास्तरांचा धोतार बघ-"
"घामान रे ता !" मी त्याला आवरले.
छा ! इतको घाम खंयचो ?" नरूला शंका होतीच.
अखेर वार्षिक परीक्षेत परशाला वरच्या वर्गात ढकलण्याची हमी देऊन बागाईतकर मास्तरांनी ते प्रकरण कसेबसे मिटवून टाकले."

     लघवीच्या सुट्टीच्या वेळी कर्दनकाळ पावटे मास्तर मुलांना कानावर जानवे ठेवण्यास फर्मावतो. जानवे नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपू पुडीच्या दोऱ्याचे फेरे करून घालतो. पण आपू हा शत्रुपक्षातील आबांचा मुलगा असल्यामुळे पावटे त्याच्यावर दात ठेवून असतो. त्यावेळचं वर्णन -

"लघवीची सुट्टी संपवून मी आत येताच पावटे माझ्याजवळ आला (या कर्दनकाळ मास्तराच्या पाठीवर मी त्याला जन्मात कधी बहुवचनाने संबोधले नाही.) गळ्यातून त्याने माझ्या खमीसात हात घातला आणि माझे जानवे वर काढले, - "हे जानवे आहे ?"
"होय !" मी म्हटले खरे, पण परत लघवीला लागल्यासारखे वाटले.
"हा पुडीला बांधलेला दोरा आहे की नाही ?"
"होय !" म्हणून मी कबुली दिली. ताबडतोब छडी उचलून त्याने मला फोडून काढले. इतका मार मी जन्मात कधी खाल्ला नाही."

     हाफमॅड तात्याचा मुलगा दिनकर - नव्हे 'दिनक्या' - मुंबईतून शहाणा होऊन आला त्यावेळचं वर्णन -

"हाफमॅड तात्याचा मुलगा दिनक्या याने मुंबईतल्या २८ सालच्या संपात भाग घेतला होता. त्यामुळे तो इतका प्रभावित झाला की दोन-चार दिवसातच कामगारांची सत्ता येणार आणि स्वतःला कुठले तरी प्रमुख पद मिळणार अशा स्वप्नात तो होता. गावी येताच नायकाच्या दुकानात आसन ठोकून त्याने मार्क्सवादावर छोटेसे वक्तव्य केले. नायकाच्या दुकानावर रिकामटेकड्या बामणांचा अड्डा असायचाच. मार्क्सवादावर सर्वत्र वर्गविग्रह होऊन कामगार आपली सत्ता स्थापन करणार, असे दिनक्याने भविष्य वर्तवताच अंतू मठकर पंचाची कनवट आवळत "आमका वाटला तुज्या घराण्यात फक्त एकच हाफमॅड आसा म्हणून !" एवढंच बोलून बाहेर पडला. बाकीचे मुंड्या हलवीत खो खो हसले आणि जागच्याजागी दिनक्याच्या प्रतिपादनाचा विचका उडाला. मार्क्सवादाची इतकी रोखठोक वासलात अन्यत्र कुठे लागली नसेल."

     नायकाच्या अड्ड्याचे हे वर्णन

"गावातले नायकाचे भुसारी दुकान हा गावचा सार्वजनिक अड्डा. चरखा फिरवून स्वराज्य मिळणार असे गांधींनी म्हटल्याचे वाचताच "चरखो फिरवून स्वराज्य गावला असता तर नांगर फिरवून शेतात पीक आयला नसता ?" एवढीच कुत्सित टीका या अड्ड्यावर झाली होती. नेहरूंनी भेट म्हणून पाठवलेले हापूस आंबे इंग्लंडच्या राणीला फार आवडले हे कुणीतरी वाचताच "फुकट गावले तर वायट कित्याक ?" एवढे अर्थशास्त्रीय सत्य याच अड्ड्यावरून ध्वनित केले गेले होते."

     दादू गुरवाचं, वस्त्रहरणाच्या संदर्भातलं संपूर्ण प्रकरणच कमालीच्या विनोदी पद्धतीनं चितारलेलं आहे. अशी ही वर्णनं वाचता वाचता किती तास निघून जातात याचा खरंच पत्ताच लागत नाही.

     आजच्या या डिजिटल युगात 'स्नॉवेल'नी या बेहेतरीन पुस्तकाचं ऑडियो बुकही ऑडियो ट्रॅक्सच्या स्वरूपात विक्रीला आणलेलं आहे. ही निर्मिती सुद्धा छान वाटते कारण हे पुस्तकाचं नुसतं वाचन नसून पूर्वीच्या रेडीयोवरच्या श्रुतिकांप्रमाणे हे सुद्धा वेगवेगळ्या कलाकारांनी सादर केलेलं श्राव्य नाट्य आहे. मात्र त्याचबरोबर हेही नमूद केलंच पाहिजे की वेळेअभावी मूळ पुस्तकातील भरपूर मजकुरात आणि काही प्रकरणांमध्येही या ऑडियो बुकमध्ये काटछाट केल्यामुळे मूळ पुस्तकाला पर्याय नाही हेही खरंच.        

     एकूणचसारे प्रवासी घडीचे’ हे माझ्यासाठी केवळ पुस्तक राहिलेलं नाहीये तर आयुष्यातला एक 'अमोल ठेवा' झालेलं आहे.

--- भाग १) सारे प्रवासी घडीचे -- स मा प्त -- 
क्रमशः - - भाग #२)गायेचलाजा

ऋणनिर्देश -- माहिती व फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
          
prasannasoman.blogspot.in

@प्रसन्न सोमण –
१८/०९/२०१७.

जयवंत दळवी


2 comments:

  1. अगदी खरे आहे .हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही.संग्रही ठेवण्यालायक सुंदर पुस्तक!!त्याची pdf मिळाल्यास मोबाईलमध्ये नेहमी वाचता येईल!!

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ... खरंय ... माझ्या संग्रहात आहे ... पीडीएफ बद्दल काही कल्पना नाहीये ...

      Delete