#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#२)गायेचलाजा
गाये चला जा / लेखक - शिरीष कणेकर (जन्म - ६ जून १९४३.)
@@ शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय
@@
शिरीष कणेकर – मराठीतील एक अत्यंत नामवंत लेखक, पत्रकार व कथनकार... कणेकर हे मुख्यतः क्रिकेट व हिंदी सिनेमा या विषयांवर लिखाण करणारे लेखक व पत्रकार म्हणून मराठी माणसांना परिचित झाले. कालांतराने ते क्रिकेट व हिंदी सिनेमे या विषयांवर स्टॅन्ड अप टॉक शो च्या रूपाने कथन सुद्धा करू लागले. त्यांचे फटकेबाजी, कणेकरी व माझी फिल्मबाजी हे स्टॅन्ड अप टॉक शोज चिक्कार गाजलेले आहेत. कणेकर वृत्तपत्रांतून विपुल स्तंभ लेखनही करत असतात.
क्रिकेटवरील त्यांच्या निवडक लेखांच्या संकलनाच्या स्वरूपात त्यांचे 'क्रिकेटवेध' हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यापाठोपाठ हिंदी चित्रपटगीते या विषयावरील 'गाये चला जा' हे पुस्तक व त्यानंतर पुढे त्यांची 'यादोंकी बारात,' 'कणेकरी,' 'शिरीषासन,' 'पुन्हा शिरीषासन,' 'कट्टा,' 'चंची' यासारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आणि ती रसिकांच्या पसंतीला उतरली. त्यांनी 'ते साठ दिवस' आणि 'डॉलरच्या देशा' अशी दोन प्रवासवर्णनंही लिहिली आहेत. तसंच 'रहस्यवल्ली' हे रहस्य-कथांचं पुस्तकही त्यांच्या खाती जमा आहे. शिवाय त्यांनी भरपूर ललित लेखनही केलेलं आहे.
@@ @@
माझी आई ही गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे आमच्या घरात संगीताचं वातावरण होतंच. माझ्या बालपणी रेडियोवर शास्त्रीय संगीत व मराठी गाण्यांच्या बरोबरीने विविध भारतीवरील हिंदी चित्रपटगीतेही आवर्जून लावली जायची. संगीताबरोबरच बाबांच्या व दादाच्या प्रोत्साहनामुळे मला वाचनाचीही गोडी लागली आणि मी लायब्ररी जॉईन केली. एकूण माझ्या आजूबाजूच्या इतर मुलांच्या मानाने मला बरीच जुनी जुनी हिंदी गाणीही माहित होती. मात्र याबद्दल मला वाटणारा अभिमान फक्त मी लायब्ररीमध्ये 'गाये चला जा' हे पुस्तक चाळेपर्यंतच टिकला. शिरीष कणेकरांनी लिहिलेलं 'गाये चला जा' चाळतांना प्रथम हेच जाणवलं की चिक्कार म्हणजे चिक्कारच जुनी हिंदी गाणी आपल्याला माहीतच नाहीयेत; पण तरीही हे पुस्तक चाळतांना इंटरेस्ट आणखी आणखी वाढतोय. अर्थातच लायब्ररीतून हे पुस्तक मी घरी घेऊन आलो आणि अक्षरशः आधाशासारखं वाचून काढलं आणि अगदी खरं सांगतो 'प्रथमवाचनी'च मी या पुस्तकाच्या प्रेमात पडलो.
पु.लं.ची चारच ओळींची, प्रस्तावना नसलेली, प्रस्तावना वाचली आणि त्यानंतर लेखकाचं खेळीमेळीच्या स्वरूपात लिहिलेलं 'मनोगत'ही वाचलं आणि तिथूनच हे पुस्तक अगदी 'आपलं'च वाटायला लागलं.
पुस्तकामध्ये अकरा प्रदीर्घ लेख आहेत.
पहिलाच 'गाये लता गाये लता' हा लेख 'लता'वर आहे. त्या पाठोपाठ ओ.पी.नय्यर, सज्जाद हुसेन,
के.दत्ता, तलत, तलतच्या मुलाखतीच्या अनुषंगाने लेख, एस.डी.बर्मन, मदनमोहन, हुस्नलाल-भगतराम,
मुकेश आणि अखेर सी.रामचंद्र यांच्यावर लेख आहेत.
हे लेख साधारणतः १९७२ ते १९७६ या काळात लिहिलेले आहेत. पुस्तकाची पहिली आवृत्तीच मुळी एप्रिल १९७८ ची आहे. लेख लिहिले गेले त्या वेळेस ज्यांच्या ज्यांच्या वर लेख लिहिले गेले आहेत त्यापैकी ओ.पी.नय्यर, सज्जाद हुसेन, के.दत्ता, तलत व सी.रामचंद्र ही आभाळाएवढी मोठी माणसं हयात होती. फक्त एस.डी.बर्मन, मदनमोहन, हुस्नलाल-भगतराम आणि मुकेश यांच्यावरचे लेख निधनोत्तर आहेत. आजच्या घडीला एक लता वगळता इतर सर्वच गुणाढ्य मंडळी आपला अविस्मरणीय संगीत-चमत्कार दाखवून निजधामाला निघून गेलेली आहेत.
लेखांमधील ओ.पी.नय्यर, सज्जाद हुसेन, के.दत्ता, तलत व सी.रामचंद्र यांच्यावरील लेख काही अंशी मुलाखतीतल्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात व काही अंशी लेखकाच्या मतप्रदर्शनाच्या स्वरूपात आहेत.
या लेखांमधून गाण्यांसंबंधीची खूपच मौल्यवान आणि तपशीलवार माहिती साहजिकच दिली गेलेली आहे. विशेषतः त्या इंटरनेट-पूर्व जमान्यात एवढी माहिती मिळवण्यासाठी आणि संकलित करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण कणेकरांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी ही माहिती नुसत्या निवेदनाच्या रुक्ष स्वरूपात न देता खेळकरपणाने आणि त्यांच्या मतांच्या मल्लिनाथीसहित दिलीय.
हिंदी चित्रपट गीतांसारख्या 'टची' विषयावर हे लेख आणि त्या संदर्भातली मतप्रदर्शनं असल्यामुळे अर्थातच आपापल्या आवडी निवडी प्रमाणे कणेकरांशी मतभेद नक्कीच होऊ शकतात. पण या विषयाच्या बाबतीतली कणेकरांची निष्ठा, त्यांची इंटेन्सिटी, त्यांचं डिव्होशन हे वादातीतच आहे असं नक्कीच जाणवतं.
मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मला या पुस्तकात उल्लेखिलेली असंख्य गाणी माहीतच नव्हती. मी पुस्तक विकत घेऊन त्या नादिष्ट टीन एजमध्ये पुस्तकाची अक्षरशः पारायणं केली आणि माहीतच नसलेली गाणी फक्त वाचलेल्या शब्दांच्या आधारे जवळ जवळ पाठ झाली. त्यानंतर रेडियोची खरखर सहन करण्याचा पेशन्स दाखवून सकाळी ७.३० ते ८.०० या वेळात 'श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन'वर 'पुराने फिल्मोंके गीत' ऐकायला लागलो तेव्हा त्यातली काही गाणी ऐकायला मिळाली आणि त्या गाण्यांनी मी नादावलो. आणि पुष्कळच नंतर यु ट्यूबच्या सौजन्याने जवळ जवळ सगळी अपरिचित गाणी ऐकली, त्यातल्या असंख्य बेहेतरीन गाण्यांनी मी पूर्णपणे अस्वस्थ झालो आणि अगदी अल्पावधीतच ती पूर्वीची अपरिचित गाणी चिरपरिचित करून घेतली.
लतावरच्या लेखामध्ये अनिल विश्वास आणि सी.रामचंद्र यांच्या बाबतीतल्या लताच्या
भूमिकेबद्दल कणेकर लिहितात - "अनिल विश्वास आणि सी.रामचंद्र हे आज अस्ताचलाला
गेलेले दोन सूर्य लताच्या मर्जीतून पूर्णपणे उतरलेले दिसतात. त्या दोघांबाबत तिनं घेतलेली
भूमिका पाहतांना मला कुठेतरी वाचलेला दोन थोर गवयांचा किस्सा आठवतो... आपापल्या कलेत
पारंगत असणारे दोन थोर गवयी होते, पण दोघांमधून विस्तव जात नव्हता एवढं त्यांचं हाडवैर
! त्यातल्या एकाच्या शिष्यानं गुरुची खुशामत करण्यासाठी एकदा म्हटलं, "त्या फलाण्या
बुवाचं गाणं ऐकलं मी परवा. अगदीच फालतू गातो !" गुरूनं एकदा शिष्याकडे आपादमस्तक
पाहिलं आणि तो शांतपणे म्हणाला, "मूर्ख आहेस ! अरे, त्याच्या तोडीचा गायक आज पूर्ण
हिंदुस्तानात नाही... माझं भांडण आहे ते हलवायाशी; त्याच्या मिठाईशी नव्हे !"
… लतानं मात्र हलवाई सोडून मिठाईशी वैर मांडलंय ! तिनं खुशाल हलवायांशी भांडावं. व्यक्ती
म्हणून तिची त्यांच्याविषयी काहीही भलीबुरी मतं असोत. त्यांच्याकडे न गायला तिच्याजवळ
सबळ कारणं असतीलही किंवा नसतील देखील. तो सर्वस्वी तिचा खाजगी प्रश्न आहे. त्यात नाक
खुपसण्याचा आपल्याला काडीचाही अधिकार नाही. पण हलवाई आणि मिठाई ती एकाच तागडीनं तोलू
लागते तेव्हा प्रश्न उभा राहतो : मिठाईला गोड म्हणणं तिला जड का जावं ? आणि ती तशी
बनवण्याचं श्रेय हलवायाकडे जात असेल तर ते त्याला द्यायला नको ? हलवायावरचा राग मिठाईवर
काढला असतांना हलवायाला दुखावण्याचा हेतू असलाच तर तो साध्य होईलही, पण त्यामुळे गोड
मिठाई कडू ठरणार नाही. - तेव्हा मी त्या सूरसम्रादनीला कळवळून विचारणार आहे : बाई
! तुझ्याच अतुलनीय गळ्यातून साकार झालेल्या त्या अमर सुरावटींशी अशी फटकून का वागतेस
?" ---
"लताची नवीन गाणी कानात घुसली की मला नेहमी एक प्रश्न पडतो : 'अंगसे अंग लगा ले' किंवा 'मैने बिंदिया सजायी' म्हणण्यात लताला काय आनंद मिळत असेल ? हत्तीला लहानसा चेंडू उचलण्याचा व्यायाम सांगण्यासारखं किंवा एखाद्या रँग्लरला त्रैराशिक सोडवायला सांगण्यासारखं नाही का हे ? आजच्या इकडून तिकडून उचललेल्या फडतूस चाली गातांना लताला कडबा खायला भाग पाडलेल्या वाघासारखं तर वाटत नसेल ?"
ओ.पी.च्या मुलाखतीवरून लिहिलेल्या लेखात ओ.पी.कणेकरांना सांगतो - "सुरुवातीला गीता (दत्त) माझ्याकडे गायली हा योगायोगाचा भाग आहे. लता गायली नाही हाही योगायोगाचाच भाग आहे. 'आरपार' नंतर मात्र मी लताला कटाक्षाने टाळले. मी असा विचार केला की सगळेच तिचे गुलाम आहेत. लता शिवाय काही करून दाखवण्याची हिम्मत आणि जिद्द असलेला एकही माणूस असू नये ? आणि तो एक माणूस म्हणजे मी का असू नये ? मी लताला घेतली असती तर इतर संगीतकारांत माझे अस्तित्व हरवून बसलो असतो."
"लताच्या आवाजाविषयी काय मत आहे ?"
तिच्या गळ्याची थोरवी अमान्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ती महान गायिका आहे. ग्रेट ! सिम्पली ग्रेट ! 'मेलडी' तिनेच म्हणावी. मी दोनच उदाहरणे देतो. सी.रामचंद्रचे 'शिनशिनकी बूबलाबू' मधील 'तुम क्या जानो तुम्हारी यादमे हम कितना रोए' आणि अनिल विश्वासाचे 'गजरे' मधील 'बरस बरस बदली भी बिखर गयी.' हाय हाय हाय ! क्या बात है ! लताला घडवण्यात सी.रामचंद्र आणि अनिल विश्वास यांचा फार मोठा वाटा आहे. शंकर-जयकिशननी सुद्धा कितीतरी प्रकारची गाणी तिला दिली. मात्र संगीतकार सामान्य असेल तर लताची गाणीही सामान्य होतात."
ही असली वर्णनं, सज्जाद हुसेनचा ताठ कणा आणि ताठ बाणा, के.दत्तांचा विमनस्कपणा, तलतच्या गाण्यांच्या मखमली आठवणी पण माणूस तलतची तितकीच रोखठोक मते, एस.डी.च्या सदासतेज संगीताची मस्ती, मदनमोहनच्या मधाळ गझला आणि त्याची तनहाई, हुस्नलाल-भगतरामचं ऑर्केस्ट्रेशन आणि त्यांचं गाण्यांचा अचूक मूड पकडणं, गायक मुकेश आणि माणूस मुकेशची सादगी आणि सी.रामचंद्रची मनमोकळी मुलाखत हे सगळंच पुन्हा पुन्हा वाचण्याजोगंच.
अगदी आजही कुठलाही मूड असला तरीही हे पुस्तक काढून मी चाळायला लागलो की गाणी गुणगुणल्याशिवाय आणि पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय ते मला खाली ठेववतच नाही.
--- भाग २) गाये चला जा -- स मा प्त --
क्रमशः - - भाग #३)दासडोंगरीराहातो
ऋणनिर्देश -- माहिती व फोटो 'इंटरनेट'च्या
सौजन्याने.
ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
@प्रसन्न सोमण –
२०/०९/२०१७.![]() |
शिरीष कणेकर |
No comments:
Post a Comment