#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#३)दास डोंगरी राहातो
दास डोंगरी राहातो / लेखक - गो.नी.दाण्डेकर (जन्म - ८ जुलै १९१६ / मृत्यू - १ जून १९९८.)
@@ गो.नी.दाण्डेकर यांचा अल्पपरिचय @@
गो.नी.दाण्डेकर – मराठीतील एक आदरणीय नाव. प्रख्यात लेखक, ललित लेखक, कादंबरीकार, चरित्रकार ... बहुदा शालेय शिक्षणही पूर्ण न केलेल्या गो.नी.उर्फ अप्पा दाण्डेकर या अद्वितीय लेखकाचं आयुष्याच्या शाळेत डोळे दिपवणारं शिक्षण घडलं. पौगंडावस्थेत घरातून पळून जाऊन त्यांनी महात्मा गांधीजींच्या चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिलं. पुढे गाडगेबाबांच्या तत्वज्ञानानी प्रेरित होऊन बाबांचा संदेश गावोगाव पोहोचवण्यासाठी ते हिंडले. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले व कार्यकर्तेही बनले त्याचबरोबर त्यांनी वेदांचा अभ्यासही केला. जे जे उत्तम, उदात्त, त्याचा त्याचा ध्यास घेऊन ते जगत गेले. पुढे चरितार्थासाठी त्यांनी लेखन करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या 'शितू,' 'पडघवली,' सारख्या कादंबऱ्यांतून रम्य कोकणाचे दर्शन आहे. 'कादंबरीमय शिवकाल,' या सारख्या लेखनातून मुलांना घडवण्याची प्रेरणा दिसते. 'दुर्ग दर्शन,' 'दुर्ग भ्रमणगाथा,' यासारख्या लेखनातून महाराष्ट्रातील दुर्ग संपदेचं साभिमान दर्शन आहे. त्यांच्या 'पवनाकाठचा धोंडी,' 'पूर्णामायची लेकरं,' यासारख्या अप्रतिम कादंबऱ्यांतून प्रादेशिक अस्मिता सहजगत्या दिसते.
त्यांनी 'आनंदवनभुवन,' 'गाडगे महाराज,' यासारख्या पुस्तकांतून लक्षणीय चरित्र लेखनही केलंय. शिवाय कादंबरी रूपाने संत चरित्रांच्या मालिकेत त्यांनी 'मोगरा फुलला (संत ज्ञानेश्वर),' 'तुका आकाशाएवढा (संत तुकाराम),' 'दास डोंगरी राहातो (समर्थ रामदास),' यासारख्या लक्षवेधी कादंबऱ्या लिहिल्यायत.
@@ @@
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मना मत्सरू दंभ भारू !!
असे एक एक श्लोक म्हणत खूप वर्षांपूर्वी रामदासी मंडळी आमच्या सोसायटीत यायची आणि लोकांनी दिलेले पैसे, धान्य-धुन्य घेऊन जायची. बाकी माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीत माकडवाले, गारुडी, डोंबारी, दरवेशी, 'बुगुबुगु' नंदीबैल वाले, खेळये, 'आग खाती आग पिती' म्हणणाऱ्या कडकलक्ष्म्या, भुत्ये, पेटी वाजवून गाणं म्हणणारे भिकारी, 'आवस वाडा गे माये' म्हणून बोंबलत फिरणाऱ्या भिकारणी; असे 'भिक्षेकरी' कॅटेगरीतले लोक नेहमी यायचे. कष्टकरी जमातीतल्या बोहारणी, कल्हईवाले, पाट्याला टाकी लावणाऱ्या टाकीवाल्या, कापूस पिंजणारे पिंजारी, कात्र्या सुऱ्यांना धार लावणारे धारकरी, विशेषतः शुक्रवारी, 'शुक्करवारे गरमे गर SS म' असे ओरडणारे चणे कुरमुरेवाले, अशीही माणसं खूप यायची… आमच्यासारख्या; शाळा, अभ्यास वगैरे तुच्छ गोष्टींची फिकीरच करायची नसल्यामुळे निरुद्योगी असणाऱ्या आणि उंडारत असणाऱ्या; लहान मुलांना हे असले टाईमपास मिळाले म्हणजे खूपच मजा येत असे. अलिकडे जवळजवळ सगळ्याच सोसायट्यांमधून सिक्युरिटी मेझर्समुळे असल्या लोकांना बंदीच घातली जात असल्यामुळे आजकाल हे लोक मुळी कुठेही दिसतच नाहीत. हे लोक गेले कुठे आणि करतात काय, याची मला बऱ्याच वेळा खूप वेडी उत्सुकता वाटते. मात्र इतर भिक्षेकऱ्यांच्या तुलनेत रामदासी लोक, मनाचे श्लोक म्हणत फिरत असल्यामुळे, वेगळे वाटायचे. या श्लोकांचा नीटसा अर्थ कळला नाही तरी काहीतरी चांगल्या गोष्टी आपण ऐकतो आहोत असं वाटून जायचं.
पुढे पुढे वाढत्या वयात गोष्टीरूप संतचरित्र वाचायला मिळाली. त्या छोट्या गोष्टीरूप चरित्रांमधून सुद्धा त्या नकळत्या वयातही समर्थ रामदास हे काहीतरी निराळेच संत आहेत असं नक्कीच मनात जाणवलं. पुढे माझ्या बाबांनी मला थोड्या जबरदस्तीनेच व्यायामशाळेत घातलं. तिथेही व्यायामाचं महत्व सांगतांना रामदास स्वामींचं उदाहरण दिलं गेलं. व्यायामशाळेची प्रार्थना म्हणून 'सत्राणें उड्डाणे' ही आरती म्हटली जायची. ही आरतीही रामदास स्वामींनीच रचलीय हेही आम्हाला तिथेच सांगितलं गेलं. सहजगत्या उपलब्ध झालेली शिवचरित्रावर आधारित 'श्रीमान योगी' ही 'रणजित देसाई' यांची कादंबरी सुद्धा शालेय वयातच वाचायला मिळण्याचा योग आला. या कादंबरीतून आणि मुख्यतः या कादंबरीच्या 'नरहर कुरुंदकर' लिखित प्रस्तावनेतून समर्थांचा करारीपणा, निश्चयीपणा आणि त्यांच्या विचारांमधील नेमकेपणा थोडाथोडा लक्षात येऊ लागला.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा प्रश्न विचारून एका प्रभू रामचंद्रांशिवाय मी कोणासमोरही मान तुकवणार नाही, असं ठणकावून सांगणारे समर्थ; अंधश्रद्धेचा, चमत्कार करणाऱ्या आणि लोकांना चकित करणाऱ्या बुवांचा, इत्यादींचा कठोर धिक्कार करणारे आणि एकही चमत्कार नावावर नसलेले समर्थ; शिवाजी महाराजांनी शिष्य म्हणून प्रार्थना, उपासना, जप-जाप्य, इत्यादी कर्मकांडांची अपेक्षा केल्यावर, 'हिंदवी स्वराज्य वर्धन आणि संरक्षण हेच तुमचं देवतुल्य नियत कर्तव्य आहे आणि तुम्हाला पूजा-उपासना, जप-जाप्य, कर्मकांड इत्यादींची काहीही आवश्यकता नाही,' असं महाराजांना सांगणारे समर्थ; ही समर्थांची रूपं खरोखर स्तिमित करणारीच वाटत होती.
पुढे लायब्ररीच्या माध्यमातून गो.नी.दाण्डेकर लिखित 'दास डोगरी राहातो' ही समर्थांवरील कादंबरी हाती लागली. माझ्या वाचनात आलेलं गो.नी.दां.चं हे पहिलं लिखाण. आधी माझ्या मनामध्ये समर्थांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण होतंच; त्यात गो.नी.दां.ची नादमयी भाषेतली लेखनशैली. अक्षरशः वाचता वाचता ‘इतुका आनंद परमाळला की सांगता पुरवत नाही.’ अनेक प्रसंगांतून खरंच 'अश्रूनीर वाहे डोळां' अशी अवस्था झाली.
स्वतःच्या लग्न समारंभातून 'सावधा SS न' ही आरोळी ऐकून नारायण नावाचा मुलगा पळून गेला, या प्रसंगापासून पुस्तकाची सुरुवात होऊन शिवराज्याभिषेक दिनी आनंदाने फुललेल्या समर्थांच्या मनोवस्थेतच पुस्तकाचा शेवट होतो.
नारायणाचे पलायन, नाशिक जवळच्या टाकळीस
येऊन स्थिर होणे, या टाकळी गावामध्ये बारा वर्ष गायत्री पुरश्चरण, त्यानंतरची बारा
वर्ष उत्तरेतल्या हिमालयापासून ते दक्षिणेतल्या रामेश्वर-तंजावर पर्यंत पायी भारत भ्रमण,
या काळामध्ये पाहिलेली, अभ्यासलेली जनतेची जीवनशैली व केविलवाणी परिस्थिती, त्यानंतर
'काही घडविण्यासाठी' महाराष्ट्रातच येऊन स्थायिक होणे, या काळात 'वन्ही तो चेतवावा
रे, चेतविताची चेततो,' या भावनेनी आणि 'उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत
!,' या मंत्रानी केलेली अखंड जनजागृती, असा गो.नी.दां.च्या लेखणीने रसमय झालेला सर्वच
भाग वाचत असतांना ठायीठायी अंगावर काटा येतो, अंतःकरणात कल्लोळ उठत असतात.
शहाजीराजांची आणि समर्थांची पहिली
भेट घडते त्यावेळी समर्थांनी शहाजीराजांना केलेल्या उपदेशाचे वर्णन --
शहाजीराजे बोलले, - "स्वामीजी
आपण जाणताच की स्वधर्म क्षीण झाला, त्यास कोठेच त्राय राहिली नाही --" एवढे बोलून
शहाजीराजे थांबले. उत्तेजक स्वरात रामदास बोलले, " हे तर कालचक्र आहे राजे ! उत्थानानंतर
पतन, पतनानंतर उत्थान हा तर सृष्टिक्रमच आहे. सूर्यनारायण माथ्यावर येतो तो अस्तास
जाण्यासाठी. आणि अस्तावते, ते चिरकाल टिकण्यासाठी थोडेच ? पूर्वेस तांबडफुटी होणारच
असते. उषा क्षितिजाआडून डोकावणारच असते. सूर्यबिंब पूर्वाचलावर उदेजणारच असते ! या
यावनी राजवटी काय अमृतपान करून आल्या आहेती ?"
उत्तरेतल्या भ्रमंतीचे विचार रामदासांच्या
मनात होते त्या वेळी समर्थांच्या मनामध्ये उठणाऱ्या कल्लोळाचे वर्णन --
अवघ्यांची एकेक दुःखे ऐकता ऐकता रामदासांचे
मन क्षुब्ध होई... एकेक व्यक्ती म्हणून हे सज्जन आहेत. सश्रद्ध आहेत. पापभीरू आहेत.
सुशील आहेत. धर्मज्ञ आहेत. पण समूह म्हणून हे काये म्हणून उभे राहू शकत नाहीत ? - हे
राजपुतान्यातील योद्धे ! सुरेख मुद्रांचे. दाढीमिशा वळलेले. हट्टेकट्टे. कुणी यांच्या
अंगाशी झटू गेला, तर पळाची दिरंग लागू न देता त्यास पालथा घालून त्याच्या छाताडावर
बसू शकतील असे.
हेही प्रतिकारासाठी काये म्हणून एक्या
जागी गाडून घेत नाहीत ?
यांस काय झाले आहे ? यांचे काय बिघडले
आहे ? यांस आधार देऊन उभे करील असा अर्तूबळी कोणीच नाही काय ?
नाना परीची माणसे येत. नाना गाऱ्हाणी
घेऊन. त्यांस वाटे की, या भागाचा धनी ज्याच्या दर्शनास आला आणि ज्याच्यापुढे नम्र झाला
त्या रामदास स्वामीपाशी रडगाणे गावे. म्हणजे मग तो काही गुरुमंत्र देईल.
रामनामापलिकडे कसलाच गुरुमंत्र आपणापाशी
नाही, हे यांस कसे समजवावे, ते रामदासांस कळेना.
भ्रमंतीच्या कालखंडात अंधश्रद्धेचा,
चमत्कारांचा धिक्कार करतांना, आणि 'दुबळ्यांच्या अहिंसेला कसलाही अर्थ नसतो,' हे विचार
मांडत असतांना समर्थांच्या तोंडच्या उपदेशाचे वर्णन --
लोक म्हणत - "स्वामी आम्हास उपाय
सांगा ! काय हवे ते करा ! चमत्कार करा ! ही दुःखे फुंक मारून दूर करा ! जडी द्या. बुटी
द्या. अंगारा द्या. उदी द्या. गंडा द्या. दोरा द्या. काहीतरी करा, पण आता ही दुःखे
सोसवत नाहीत !"
परम कारुणिक स्वरात समर्थ बोलू लागले
-
"छे छे बापांनो ! मी चमत्कार
करणार नाही. जडी देणार नाही. बुटी देणार नाही. गळ्यात गंडे बांधणार नाही, दोरे अडकवणार
नाही. मजपाशी ताईत नाही की जादू नाही. जे ताईत, जादूने दुःखे संपवितात, त्यांचे भले
होवो ! मजपाशी त्यातील काहीच नाही. मजपास आहे श्री रघुवीराचे स्मरण. चिंतन. मनन. -
ते केले की तो साहाय्यभूत होतो. तो धैर्य देतो. बळ देतो. उत्साह देतो. प्रेरणा देतो
!
अरे झाले तरी काय ? काय आकाश कोसळले
? धरती दुभंग झाली ? सप्तसागर उसळले ? नक्षत्रांचा सडा पडला ? ऐसे कोणते भ्यासूर संकट
आले म्हणून असा धीर सोडलात ? आणि हे दुःख काय तुम्हा एकट्या भवताले आहे काय ? ते तर
अवघ्यांस ग्रासायास आले. तर मग असा चुरगळा काये म्हणून करून घेतलात ? -- अरे गवताची
एकेक काडी. काय तिची शक्ती ? फुंक मारली तर उडून जाते. पण त्याच काड्या एकत्र करून
वळल्या तर दोर करिता येतो आणि त्याने मत्त गज सुद्धा आकिळतां येतो की रे ! व्यक्ती
भोतालेच ही व्यथा सांकळली आहे, असे मानो नका. हे सामूहिक दुःख आहे. अवघे उठा. एकत्र
व्हा. झुंज द्या. प्राण तर असेही गमावणार, तसेही ! मग वृथा स्वतःचा चिखल काये म्हणून
करून घेता ? काळ बघोनी वर्तावे, सांडावे भय पोटीचे ! काळाची पावले ओळखा. तो नाना भ्यासूर
मुखवटे लेवून अवघ्यांस ग्रासावयास आला आहे ! तो अंगावर कोसळू पाहतो आहे. पण त्याचे
मर्म ध्यानी घ्या ! त्याचा हा आवेश लटिका आहे. जे दात तो दाखवतो आहे ना, त्यात विष
नाही. ते नुसते पोकळ आहेत. या काळाशी झुंजायास सामोरे ठाका. दंड थोपटा. भुजांवर आघात
करा. यांस ललकारा. म्हणजे हे भ्यासूर स्वप्न विरघळून जाईल !
तेव्हा उठा ! जागे व्हा ! उत्तिष्ठत
! जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत !"
या पुस्तकातला, 'बापांनो, जो करंटा
आहे, त्याची आळसावर फार प्रीती. काम करण्याचा त्याला कदापिही उत्साह नसतो. तो सदानकदा
इथेतिथे लोळत पडलेला असतो. परंतु हे लक्षात ठेवा की, आळसे सर्वच बुडाले,' अशा प्रकारचा
समर्थांच्या तोंडी असलेला उपदेश वाचतांना माझ्यासारख्या मूर्तिमंत आळशी माणसाला थोडेसे
शरमायला होते खरे ! परंतु तरीही 'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' या समर्थांच्याच प्रश्नाच्या
शहाला, 'निर्लज्जम सदासुखी' असा एका संस्कृत सुभाषिताने उपरोधरूपी काटशह देऊन ठेवलेला
असल्यामुळे मला एक दिखाऊ दिलासाही मिळतो.
खरंतर समर्थांनी सांगितलेली मूर्खाची
अनेक लक्षणे माझ्यामध्ये असतील, नव्हे आहेतच याची मला 'नीट'पणे जाणीव आहे. माझ्यातच
कशाला, समाजातील बहुसंख्य लोकांच्यात ती असणारच, कारण समर्थांच्या कल्पनेतील आदर्श
व्यक्ती या कुठल्याही काळात फार म्हणजे फारच मायनॉरिटी मध्येच असणार.
पण तरीही ... कधीकधी खूप निराशा येते;
मनस्थिती फार म्हणजे फारच उदास होते तेव्हा मी माझ्या संग्रहातील 'दास डोंगरी राहातो' काढून त्यातला
समर्थबोध वाचतो. त्यानंतर मात्र मनाला नक्कीच उभारी येते असा माझा अनुभव आहे.
-- भाग ३) दास डोंगरी राहातो -- स मा प्त --
क्रमशः - - भाग #४)पराजितअपराजित
ऋणनिर्देश -- माहिती व फोटो 'इंटरनेट'च्या
सौजन्याने.
ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
@प्रसन्न सोमण –
२५/०९/२०१७.![]() |
गो.नी.दाण्डेकर |
No comments:
Post a Comment