#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
-- म नो ग त --
येत्या गुरुवार पासून #माझीआवडतीदहामराठीपुस्तके या हॅशटॅगखाली, आवडत्या दहा मराठी पुस्तकांविषयी आणि त्यांच्या लेखकांविषयीही; दहा छोटेखानी लेखांची एक लेखमाला लिहावी, असा विचार आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून, दर गुरुवारी एक, याप्रमाणे दहा लेख पोस्टण्याचा मानस आहे. लेखमालेबद्दलचं माझं मनोगत कळवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
माझ्या लहानपणापासूनच मला अवांतर वाचनाचं बऱ्यापैकी वेड होतं... अर्थात हे तर खरंच आहे की, लहानपणी असं गोष्टीच्या पुस्तकांच्या वाचनाचं किंवा अवांतर वाचनाचं अप्रूप बहुतांश लोकांना असतंच. मात्र एकीकडे वय वाढत असतांना हे अवांतर वाचन वाढेल की नाही, बहरेल की नाही; बहरलंच तर ते किती, कसं, कोणत्या अंगानी, कोणकोणत्या विषयांच्या बाबतीत बहरेल; हे नक्कीच त्या त्या व्यक्तिच्या पिंडावर, त्या त्या व्यक्तिच्या आवडीनिवडीवर ठरतं.
वैचारिक, अभ्यासपूर्ण, माहितीपर, सर्व विषयांमध्ये रस घेणारं, आध्यात्मिक, असं नाना प्रकारचं 'चिक्कार' वाचन करणारी खूप ज्ञानी माणसं आपल्याला भेटतात. हिंदी, इंग्रजी, उर्दू, बंगालीच काय अनेकविध परकीय भाषांमधील वाचन सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन करणारी सुद्धा काही माणसं आपल्या माहितीची असतात. ज्ञान प्राप्त करण्याच्या जिद्दीनी, तळमळीनी, असोशीनी वाचन करणारेही अनेक असतात. शेवटी ज्ञानाला अंत नाही आणि म्हणून हुशारीलाही अंत नाही, हे तर निश्चितच... अशा व्यक्तिमत्वांविषयी आपल्या मनात कधीही न हलणारा आदर असतोच.
मात्र ज्या गोष्टींमध्ये, ज्या विषयांमध्ये मला काडीचंही गम्य नाही, रुची नाही, आवड नाही अशा विषयांबद्दल मी कधी काही वाचू शकलेलो नाही... मीच कशाला, बहुदा कुणीच 'असं' अवांतर वाचन करत नसावं. कारण ज्या विषयामध्ये काडीचीही रुची नाही अशा विषयाबद्दल वाचन जबरदस्तीनं करावंच लागलं तर त्याला 'अवांतर वाचन' म्हणता येत नाही; 'अभ्यास' म्हणावं लागतं आणि तो करण्याबद्दल माझी कधीही कुठल्याही वयात ख्याती नव्हतीच.
माझं स्वतःचं, जे काही थोडंसं वाचन घडलंय ते फक्त मराठीच आहे आणि ते बहुतांशी 'करमणूकपर,' 'रंजक' किंवा 'ललित' या शब्दांमध्ये सामावेल एवढंच आहे... मात्र असं असलं तरीही; अनेक मराठी पुस्तकं मला बेफाट आवडलेली आहेत. ती मला माझ्या संग्रहात ठेवावी असं वाटलेलं आहे; जमेल-झेपेल त्याप्रमाणे मी ती ठेवलेलीही आहेत... अनेकवेळा; हे लेखकाला कसं सुचलं असेल; हे असले सहज सुंदर शब्द, सहज सुंदर वाक्य, असली अफलातून कल्पना कुठून, कशी डोक्यात येते, असलं काही आपल्याला का सुचू शकत नाही ? अशाप्रकारच्या विचारांनी मी हैराणही झालेलो आहे; होतच असतो...
मला भावलेल्या; उत्तम, कलात्मक अशा गोष्टी, कलाकृती इतरांपर्यंतही पोहोचवाव्यात, आप्तेष्ट, मित्रमंडळींनाही त्या बाबत सांगावं, अशीही एक ओढ मला वाटत राहते... जे काही थोडंबहुत मी खरडलंय त्यापैकी बहुतांश याच भावनेनी खरडलंय; आणि आजही फक्त त्याच भावनेनी हे लेख मी आपल्यापुढे सादर करतोय.
कदाचित माझं वेड तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कदाचित पोहोचणारही नाही. कदाचित माझी मतं, माझी आवडनिवड तुम्हाला पटेल तर कदाचित पटणारही नाही... कदाचित माझ्या लिखाणात काही चुकाही आढळतील. असं झाल्यास किंवा माझी मतं, माझी निवड, माझे विचार तुम्हाला न पटणारे असल्यास कृपया मला सहन करावं, सांभाळून घ्यावं.
या लेखमालेअंतर्गत जे लेख मी तुमच्यासमोर घेऊन येतोय ते आहेत -
#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
०१) सारे प्रवासी घडीचे - लेखक जयवंत दळवी
०२) गाये चला जा - लेखक शिरीष कणेकर
०३) दास डोंगरी राहतो - लेखक गो.नी.दाण्डेकर
०४) पराजित अपराजित - लेखक वि.स.वाळिंबे
०५) मिरासदारी - लेखक द.मा.मिरासदार
०६) दिवसेंदिवस - लेखक शं.ना.नवरे
०७) माणदेशी माणसं - लेखक व्यंकटेश माडगूळकर
०८) हद्दपार - लेखक श्री.ना.पेंडसे
०९) अभोगी - लेखक रणजित देसाई व
१०) हिमालयाची सावली - नाटक - लेखक वसंत कानेटकर
इंटरनेटवरून मिळवलेल्या, 'मराठी विकिपीडिया' या साईटवरच्या माहितीच्या आधारावर, इंटरनेटवरूनच मिळवलेल्या फोटोंच्या आधारावर आणि अर्थातच माझी स्वतःची मतं आणि माझी स्वतःची आवड यांच्या आधारावर हे लेख लिहिलेत...
सातत्य टिकवून दर गुरुवारी लेख पोस्टु शकेन, अशी आशा आहे... असो. बाकी सर्व तुमच्या प्रतिसादावर सोपवतो.
आता अनुमती असावी --
-- स मा प्त --
@प्रसन्न सोमण –
०६/११/२०१७.
No comments:
Post a Comment