Wednesday, 29 November 2017

#४) माझे आवडते पुस्तक - पराजित अपराजित

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#)पराजित अपराजित

पराजित अपराजित / लेखक - वि..वाळिंबे (जन्म - ११ ऑगस्ट १९२८ / मृत्यू - २२ फेब्रुवारी २०००.)

@@  वि..वाळिंबे यांचा अल्पपरिचय  @@ 
 
     वि..वाळिंबेमराठीतील एक पत्रकार. मुख्यतः आधुनिक इतिहासावर तदनुषंगिक राजकारणातील पेच-प्रतिपेच यासारख्या विषयांवर अधिकारवाणीने आपल्या स्वतंत्र शैलीने लेखन करणारे प्रख्यात लेखक चरित्रकार. (दुर्दैवाने कै.वि..वाळिंबे यांची तपशीलवार माहिती इंटरनेटवर, विकिपीडियावर  उपलब्ध नाही.) 

     त्यांचं; अरब-इस्त्रायल संघर्षावरील 'इस्रायलचा वज्रप्रहार,' हे पुस्तक, रशियन राज्यक्रांती रशियन इतिहासावरील 'व्होल्गा जेव्हा लाल होते,' हे पुस्तक, दुसऱ्या महायुद्धावरील 'वॉर्सा ते हिरोशिमा' हे पुस्तक नंतर याच पुस्तकाचा संक्षेप करून प्रकाशित केलेले 'दुसरे महायुद्ध' हे पुस्तक, हिटलरच्या आयुष्यावरील 'हिटलर' हे पुस्तक, भारतीय इतिहासावरील '१९४७' हे पुस्तक, इंदिरा गांधींच्या कारकिर्दीवरील 'बंगलोर ते रायबरेली' 'रायबरेली आणि त्यानंतर,' ही पुस्तके, नेताजींच्या आयुष्यावरील 'नेताजी' हे पुस्तक, तसंच सावरकरांच्या आयुष्यावरील 'सावरकर' हे पुस्तक अशी इतिहास हा विषय केंद्रस्थानी ठेवून अनेकविध पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

@@ @@

     शाळेत शिकत असतांना मला निदान सुरुवातीला तरी इतिहास या विषयाबद्दल विशेष प्रेम वाटत नसे. क्रमिक पाठ्यपुस्तकांपेक्षा वेगळी अशी गोष्टींची पुस्तकं वाचतांना शिवाजी महाराजांचं चरित्र रोमहर्षक, सनसनाटी आणि स्फूर्तिदायक वगैरे जरूर वाटत असे; पण इतिहासाच्या क्रमिक पुस्तकातला शिवाजी महाराजांवरील इतिहास आला की त्यात सन-सनावळ्या आणि इतर नुसता माहितीपर असा निरस भाग आला की आपोआप गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, टिपा लिहा असे प्रश्न डोळ्यांसमोर तरळून जायचे. शिवाय हा इतिहास वाचतांना त्यात, लक्षात ठेवायलाच हवं आणि म्हणून पाठ करायलाच हवं अशी, एक प्रकारची जबरदस्ती येऊन दडपण येत असे.  

     आमच्या शेजारीखांडेकर आजोबा’  या नावाचे एक रिटायर्ड आजोबा होते. त्यांनी पूर्वी हौसेनं 'रणजित देसाई' लिखित 'श्रीमान योगी' 'स्वामी' ही पुस्तकं विकत घेऊन ठेवलेली होती, पण नंतर डायबिटीस आणि डोळ्यांच्या काही प्रॉब्लेममुळे त्यांना कमी दिसू लागले होते. म्हणून माझा मोठा भाऊ, त्याचा अभ्यास झाल्यावर, या आजोबांना रोज दुपारी  'श्रीमान योगी' ही शिवाजी महाराजांवरची कादंबरी वाचून दाखवायला एखाद-दोन तास जात असे. त्याच्याबरोबर जाऊन मीही हे वाचन ऐकत असे. लवकरच मोठ्या भावाचा अभ्यास वाढल्यानंतर त्याच्या ऐवजी मी हे काम करू लागलो. या निमित्ताने 'श्रीमान योगी' 'स्वामी' या शिवाजी महाराज आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यावरील कादंबऱ्या माझ्या शालेय वयातच वाचून झाल्या अर्थातच त्या खूप आवडल्याही.       

     पुढे पुढे इयत्ता वाढल्यानंतर शालेय इतिहासामध्ये मला अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटलीचे एकीकरण, जर्मनीचे एकीकरण, पहिलं महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध अशी प्रकरणंही वाचावी लागली आणि - थोड्याशा नाईलाजाने का होईना - जागतिक इतिहासाची तोंडओळख करून घ्यावी लागली. मात्र तरीही माझे अवांतर वाचन बऱ्याच अंशी टारझन, इटकू-पिटकू आणि त्यांच्या गमती, अरेबियन नाईट्स, चतुर बिरबल, फास्टर फेणे अशा पुस्तकांभोवतीच फिरत असे. अर्थात ही पुस्तके सुद्धा मला तेव्हाइतकीच आजही आवडतातच.

     नंतर मात्र एक दिवस असा आला की कपाटातल्या बाबांच्या खणामध्ये उचक-पाचक करतांना मला बाबांनीच विकत घेतलेलं, वि..वाळिंबे लिखित 'दुसरे महायुद्ध' हे पुस्तक सापडलं... बघूया तरी कसं वाटतंय, असा विचार करून हातामध्ये घेतलं. १० डाउनिंग स्ट्रीट वरील, प्राईम मिनिस्टर चेंबर्लेन यांच्या मिटिंग पासून सुरु झालेलं पुस्तक वाचू लागलो आणि रमलोच. एखाद्या कादंबरीसारखी सगळ्या गोष्टी नीटपणे समजावून सांगणारी वि.सं.ची रसाळ शैली खूपच आवडून गेली आणि ऐतिहासिक विषय आणि वि..वाळिंब्यांची मोहवणारी लेखणी हे कॉम्बिनेशन डोक्यात फिट्ट बसलंच... शिवाय बाबांच्या खणात ढवळाढवळ केल्यामुळे बाबा चिडतील, ही भीती तर साफ खोटी ठरलीच पण उलट, मी 'दुसरे महायुद्ध' वाचतोय म्हटल्यावर त्यांनी आपण होऊन त्यांचा ऍटलास माझ्या हवाली केला आणि सांगितलं - "थोडा थोडा भाग वाचल्यानंतर त्यात वर्णन केलेला देश कुठे आहे, शहरं कुठे आहेत, देशांच्या सीमारेषा कशा आहेत, भौगोलिक परिस्थिती कशी आहे हेही ऍटलासमध्ये शोधून काढून ध्यानात घेत जा."

     याच पद्धतीने वाचून मी लवकरचदुसरे महायुद्ध’ संपवलं. योगायोगाने नेमकं थोड्याच दिवसात लायब्ररीमध्ये मला वि..वाळिंबे लिखित 'पराजित अपराजित' हे पुस्तक आढळलं. अर्थातच ताबडतोब झडप घालून मी हे पुस्तक हस्तगत केलं. झपाझप वाचून संपवलं आणि कसल्यातरी अनामिक अनुभूतीनं खरंच थरारलो.

     'पराजित अपराजित' मध्ये राज्यक्रांतीनंतरच्या आधुनिक फ्रान्सच्या ..१८७० ते १९७० या शंभर वर्षांतील वाटचालीचा अद्भुत इतिहास आहे. हा 'इतिहास' असला तरी वि.सं.च्या अप्रतिम निवेदन कौशल्याने तो वर्तमानाइतका जिवंत झालेला आहे. या पुस्तकात फ्रान्समध्ये या शंभर वर्षांच्या कालखंडातील बहुतांश काळ अस्तित्वात असणाऱ्या  तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या कालखंडातील विषादाचे क्षण आहेत, अभिमानाचेही क्षण आहेत; अधःपाताचे क्षण आहेत तसेच उत्थानाचेही क्षण आहेत. या सर्वच क्षणांचे वर्णन करणाऱ्या वि.सं.च्या लेखणीमधून आपुलकीचा इतका प्रत्यय येतो की जणू काही फ्रान्स ही वि.सं.ची मायभूमी वाटावी.

     या पुस्तकामध्ये वि.सं.नी एकूण ३५ प्रकरणे ४०५ पानांमध्ये लिहिलेली आहेत. ..१८७० मध्ये अस्तित्वात आलेले फ्रान्सचे तिसरे प्रजासत्ताक दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा हिटलरनी पाडाव केल्यानंतर जुलै १९४० मध्ये संपुष्टात आले. यापुढच्या १९७० पर्यंतच्या ३० वर्षांतकर्नल चार्ल्स गॉल’नी संपूर्ण फ्रान्स स्वतंत्र होण्यासाठी, कधी अँग्लो-अमेरिकनांच्या मदतीनी तर कधी त्यांचा विरोध पत्करूनही, केलेली प्रचंड धडपड स्वतंत्र फ्रान्समधील गॉल च्या राजकीय कारकिर्दीचा आलेख येतो.

     सुरुवातीच्या काळामध्ये फ्रान्सच्या राजकीय परिस्थितीचे वर्णन करतांना वि..लिहितात -

     "फ्रान्समध्ये लहान लहान पक्षांचे पेव फुटले होते. त्यामुळे प्रतिनिधिसभेमध्ये कोणालाच बहुमत लाभेना. सहा सहा महिन्यांमध्ये मंत्रिमंडळे बरखास्त होऊ लागली. तात्पुरत्या स्वार्थासाठी काही पक्ष एकत्र यायचे, मंत्रिमंडळ बनवतांना संबंधितांमध्ये मंत्रिपदांचे वाटप व्हायचे, मात्र पुन्हा कुरबुरी सुरु झाल्या की पावसाळी छत्र्यांच्या प्रमाणे उगवलेल्या संयुक्त आघाड्या फुटायच्या आणि मंत्रिमंडळाचा चक्काचूर व्हायचा. हा जणू नियमच ठरला होता. काहीवेळा असेही घडले की प्रधानमंत्री बदलला जायचा, परंतु इतर मंत्री तेच कायम असायचे, कारण आपण आपल्या पक्षाला वा मतदारांना बांधलेले आहोत याचे लोकप्रतिनिधींना भानच उरलेले नव्हते. मंत्रिमंडळ बनवणे आणि मोडणे हा राजकारणी मंडळींचा एक नित्याचा खेळ झाला होता.

     एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जी औद्योगिक क्रांती झाली तिच्यामुळे युरोपातील आर्थिक सामाजिक परिस्थिती पार बदलून गेली होती. या बदलाचे स्वरूप इतके मूलगामी होते की त्याची दखल घेणे प्रत्येक देशातील राज्यकर्त्यांना भाग पडले. परंतु सत्ता-स्पर्धेच्या राजकारणात दंग झाल्यामुळे फ्रान्सच्या राज्यकर्त्यांचे तिकडे साफ दुर्लक्ष झाले.

     नव्या काळाचे आव्हान स्वीकारायला फ्रान्स त्यावेळी असमर्थ ठरला त्यामागे हे कारण आहे."

     यानंतर फ्रान्समधले खळबळजनक द्रेफ्यू प्रकरण, या प्रकरणात झालेली न्यायदानाची विटंबना, पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभीचे राजकारण, या महायुद्धातील फ्रेंच सैनिकांचे अदम्य मनोबल त्यांनी घडवलेलामार्न’च्या काठावरील चमत्कार त्यायोगे घडवून आणलेला फ्रान्सचा संस्मरणीय विजय या सर्व घटना वि..जिवंत करतात. ह्या फ्रेंच विजयाने भारलेली वि.सं.ची लेखणी लिहिते -

     "१९१८ हे वर्ष इतिहासामध्ये विरून गेले तेव्हा जर्मनीतील राजसत्ता देशोधडीला लागली होती, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि तुर्कस्तान यांची साम्राज्ये नकाशावरून पुसून गेली होती, रशियातील नवजात बोल्शेव्हिक सत्ता अंतर्गत शत्रूशी मुकाबला करण्यासाठी धडपडत होती आणि इटलीमध्ये यादवी उफाळून आली होती. विजेत्या फ्रान्सशी बरोबरी करू शकेल अशी एकही सत्ता युरोपच्या भूमीवर उरली नव्हती. -- फ्रान्सच्या इतिहासातील तो सुवर्णक्षण होता."

     यानंतरच्या व्हर्सायच्या तहामध्ये साशंक कचखाऊ फ्रेंच नेतृत्व आणि अँग्लो अमेरिकनांची उदासीन वृत्ती याच्या एकत्रित परिणामांमुळे फ्रान्सच्या हितसंबंधांची परवड फसगत झाली. या संबंधात फ्रेंच सेनानीफॉश’चे उद्गार वि.सं.नी उद्धृत केलेयत -

     "जर्मनीनं किती सैन्य ठेवावं, कुठे ठेवावं याचे बारीक सारीक तपशील ठरवण्यात तुम्ही गढला आहात. परंतु ऱ्हाईन हीच जर्मनीची सीमा राहील असं जर तुम्ही ठरवलं नाही, तर इतर निर्बंध लादणारे तुमचे कागदी ठराव योग्य वेळी जर्मनी लाथेने ठोकरून लावील आणि पुन्हा फ्रान्सच्या रोखाने झेप घेईल. त्यावेळी इच्छा असूनही फ्रान्सला संपूर्ण पराभवापासून वाचवणं ब्रिटन-अमेरिकेला जमणार नाही, हे ध्यानात ठेवा." - पुढे वि.स.लिहितात - "वीस वर्षांनंतर काय घडणार आहे हेच जणू फॉश यावेळी सांगत होता. परंतु त्यावेळेस फॉशच्या या इशाऱ्याकडे लक्ष द्यायची कोणालाही गरज वाटली नाही." -- जर्मनीवर लादायच्या आर्थिक खंडणीबाबतही वि..लिहितात - "जर्मनी आर्थिकदृष्टया समृद्ध झाला तर लगेच तो १९१८ मधल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी उद्युक्त होईल या भीतीपायी जर्मनीकडून जास्तीत जास्त खंडणी वसूल करण्याचा फ्रान्सने तगादा लावला होता.

     पण हा दुहेरी पेच होता -

     जर्मनी आर्थिक दृष्ट्या निरंतर दुबळा राहावा आणि तरीही त्याने आपण मागू तेवढी खंडणी दिली पाहिजे, अशी या प्रश्नासंबंधी फ्रान्सची अव्यवहार्य अपेक्षा होती. त्याचा परिणाम असा झाला की दोन्हीपैकी एकदेखील उद्दिष्ट साध्य झाले नाही."                          
             
     यापुढे जेव्हा फ्रान्समधील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारणांविषयी वि..लिहितात तेव्हा त्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा वाचतांना; युरोपीय देश, युरोपीय नागरिक आपल्या तुलनेत खूप हुशार, खूप पुढारलेले आहेत असा आपल्या मनामध्ये भ्रम असेलच तर कितीही नाही म्हटलं तरी त्या भ्रमाला शह बसतो.

     दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात फ्रान्स ब्रिटननी हिटलरच्या तुष्टीकरणाचे जे धोरण अवलंबले होते, त्याबद्दल मत प्रदर्शित करतांना वि..लिहितात -

     "ऱ्हाईनलँडचा ताबा घेणाऱ्या जर्मन पथकांना पिटाळण्याचा आपण प्रयत्न केला तर युद्ध भडकेल या भीतीने फ्रान्स गप्प बसला; पण ही भीती अनाठायी होती. फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारण्याची हिटलरची तेव्हा हिम्मतच झाली नसती. खुद्द हिटलरनीच एके ठिकाणी म्हटलं आहे की - जर फ्रेंच सैन्य ऱ्हाईनलँडमध्ये घुसले असते तर आम्हाला पायात शेपटी घालून पळून जावं लागलं असतं. ते अठ्ठेचाळीस तास मी जेवढा अस्वस्थ होतो तेवढी अस्वस्थता मी कधीही अनुभवली नव्हती. कारण मला माघार घ्यावी लागली तर कदाचित आपली राजवट कोसळेल, हा धोका मला माहित होता. -
     हिटलरला रोखण्याची ही पहिली संधी फ्रान्स आणि ब्रिटन यांनी गमावली आणि त्यामुळेच त्यांनी पुढची अनर्थ परंपरा ओढवून घेतली. एकदा सुरु झालेली घसरगुंडी पुढे त्यांना थोपविता आली नाही, तशी थोपविता येतही नसते."                  

     फ्रेंच नेते हिटलरच्या तुष्टीकरणात तर धन्यता मानत होतेच; पण मूलगामी निर्णयही आत्मनिर्भर राहून घेता हे नेते ब्रिटनच्या कलाने आणि तंत्राने वागत होते. या परिस्थितीबद्दल वि..म्हणतात -

     "१९३६ पासून फ्रान्सला स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणही राहिलेले नव्हते. ब्रिटनने सांगावे आणि फ्रान्सने ऐकावे असाच सगळा प्रकार होता. आपल्याला जर सन्मानाने जगायचे असेल तर आपल्याला आपल्याच सामर्थ्यावर निर्भर राहिले पाहिजे एवढे देखील फ्रान्सला भान उरलेले नव्हते.
     आत्मभ्रंशाची ही परिसीमा होती.
     लोकसत्ताक राजवटीमध्ये फक्त सरकारवरच सारा दोष येत नाही; लोकमानसही तितकेच जबाबदार असते. या काळातील फ्रान्सचे वर्णन करतांना एका फ्रेंच निरीक्षकाने 'सामुदायिक भ्याड वृत्तीचा आविष्कार,' असे म्हटले आहे. पहिलं महायुद्ध संपून पुरी वीस वर्ष देखील झाली नसल्यामुळे 'नको तो संघर्ष अन नको तो संहार,' असं फ्रेंच जनतेला वाटणं स्वाभाविक होते. परंतु शेजारच्या देशामध्ये आक्रमणखोर नेतृत्वाचा उदय झालेला असतांना, इच्छा असो वा नसो, आपले स्वातंत्र्य जतन करण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागते; हा इतिहासाचा धडादेखील फ्रान्सने विसरावा, हे मात्र समर्थनीय ठरत नाही.
     फ्रान्सच्या नैतिक अधःपतनाला सीमा उरली नव्हती."

     दुसऱ्या महायुद्धाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी रशियाचा स्टॅलीन फारच उत्सुक होता. रशियाच्या काही अडचणींच्या अटींमुळे हिटलर विरोधी आघाडीत रशियाला सामील करून घेणे हे अँग्लो-फ्रेंचांना मानवत नव्हते. या सगळ्या राजकारणांबद्दल वि..टिप्पणी करतात -  

     "अँग्लो फ्रेंचांना जर आपल्या मैत्रीचे मोल कळले नाही तर एकाकी पडण्यापेक्षा आपण हिटलरशी संगनमत करून आपले उद्दिष्ट साध्य करून घ्यावे, हा विचार डोळ्यांपुढे ठेवूनच स्टॅलीनच्या हालचाली होत होत्या.

     स्टॅलीन जर असा हा दुटप्पी खेळ खेळत असेल तर तोच खेळ खेळायला हिटलरलाही संकोच वाटायचे काहीच कारण नव्हते. शिवाय स्टॅलीनइतकाच तोही या खेळात निष्णात होता. फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यापासून रशियाला अलग पाडण्याने जर्मनीची पूर्व आघाडी निर्वेध होणार होती आणि म्हणून हिटलरलाही स्टॅलीनच्या मैत्रीची गरज होती.

     राष्ट्रीय स्वार्थाची भरभक्कम जाणीव असणाऱ्या नेत्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारण कसे आकार घेत असते हे जाणून घेण्याच्या दृष्टीने या काळातील स्टॅलीन आणि हिटलर यांचे डाव-प्रतिडाव ध्यानात घेण्याजोगेच आहेत."

     या शेवटच्या वाक्यामध्ये वि..जागतिक इतिहासाबाबत एक त्रिकालाबाधित सत्यच सांगून गेले आहेत, असं मला वाटतं.

     इथवर जेवढं लिहिलं ते 'पराजित अपराजित' या पुस्तकाची किंवावि..वाळिंबे’ यांची स्तुती करण्यासाठी नव्हे; तर या पुस्तकानी मला जे ज्ञान दिलं, जो आनंद दिला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. बस्स !

-- भाग ) पराजित अपराजित -- मा प्त -- 
क्रमशः - - भाग #)मिरासदारी 

ऋणनिर्देश -- माहिती व फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने. (लेखक 'कै.श्री.वि.स.वाळिंबे' यांचा फोटो अनुपलब्ध.)

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
          
@प्रसन्न सोमण

०६/१०/२०१७.