#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#४)सुधीर फडके
संगीतकार राम फडके उर्फ सुधीर
फडके उर्फ बाबूजी ... बस्स नाम ही काफी
है ! बाबुजींवर 'लेख' कसला
लिहायचा ?. निदान महाराष्ट्राच्या तरी मातीत, हवेत, अंतःकरणात बाबूजी आहेतच ... पुढेही असणारच आहेत. मी लिहितोय म्हणजे काय
.... तर जस्ट मला बाबूजींच्या बाबतीत कृतज्ञतेची भावना व्यक्त करायचीय, एवढ्यासाठीच आणि एवढ्यापुरतंच... बाबूजींनी संगीतात काय करायचं शिल्लक ठेवलंय ? अशी एकही भावना नाही,
असा एकही गीतप्रकार नाही की ज्याला बाबूजींनी संगीतबद्ध करायचं राहिलंय. मराठीत तरी एवढा 'बहुप्रसवा' संगीतकार नाहीये. इतक्या प्रचंड संख्येने गाणी देऊनही 'पाट्या टाकणं' जवळ जवळ नाहीच. दर्जाबाबत तडजोड तर नाहीच पण प्रतिभेच्या आकाशात आणखी
आणखी उंच जाण्याचा ध्यास बघितला की आपल्या कानाच्या पाळ्या आपल्या हाताच्या बोटात पकडायच्या फक्त, दुसरं
काय ?
१९१९ मध्ये
कोल्हापुरात जन्म. पाध्येबुवांकडे रीतसर
शास्त्रीय संगीताचं कठोर शिक्षण. संगीत दिग्दर्शनाच्या कलेत
अगदी थोडा काळ उमेदवारी करून एच.एम.व्ही., प्रभात फिल्म कंपनी करत करत पूर्ण वेळ संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात. संघपरिवाराशी नुसती जवळीक नव्हे तर सक्रिय संबंध. गोवा
मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग.
ग.दि.मां.च्या गीतरामायणातील ५६ गीतांना चाली लावून ती गाणी गायक-गायिकांकडनं गाऊन घेऊन पुणे
आकाशवाणी (का नभोवाणी ?) वरून प्रसारित होण्यासाठी सातत्य टिकवणं. आयुष्यभर गावोगावी स्वतः
लाईव्ह गीतरामायणाचे शेकडो (की चार आकडी
झाले, कोण जाणे)
कार्यक्रम करणं. पु.ल., ग.दि.मा.व इतर समकालीन 'बाप' माणसांबरोबर दिलखुलास मैत्री ठेवणं.
प्रसंगी ग.दि.मां.बरोबर जोरदार वैरही करणं, वैरातही 'कलाकार' म्हणून तितकाच आदर ठेवून वैराच्या काळात 'कलानिर्मिती'वर काहीही परिणाम होऊ न देणं. अगदी
उतार वयातही निव्वळ रसिकांच्या देणग्यांवर विश्वास ठेवून
आणि वापर करून
'वीर सावरकर,' सारखा
बहुचर्चित आणि तेजस्वी चित्रपट निर्माण करण्याचा संकल्प सोडून तो प्रत्यक्षात आणणं. एका आयुष्यात माणसानं करावं
तरी किती आणि कायकाय ? ..... पण याशिवायही बाबूजींनी नाव घेण्याजोगी एक गोष्ट
केली ती म्हणजे ९० (अबब !) मराठी
आणि २१ हिंदी
चित्रपटांना संगीत दिलं.
चित्रपट संगीतकार म्हणून उण्यापुऱ्या पाच दशकांहूनही मोठी, अत्यंत धवल,
उज्वल अशी कारकीर्द केली. एवढा उत्साह, एवढी ऊर्जा येते
तरी कुठून ? कला तर शक्यच नाही,
पण आपण सामान्य माणसं यातला एखादा
छोटासा गुण सुद्धा का घेऊ शकत नाही ? .... असो. म्हणून तर ते 'ते' होतात
आणि आपण 'आपणच'
राहतो.
बाबूजींच्या संगीताची जातकुळी अगदी बालगंधर्वांच्या अंगाने जाणारी आहे. बाबूजींच्या काळात बालगंधर्वांची गायकी जरी ओसरत असली तरी त्यांच्या सखोल प्रभावाने पुढच्या पिढ्या अक्षरशः नादावलेल्या आहेत. उगाचच
आत्यंतिक आक्रमकता आणि गाण्यातली अकारण आलेली
चमत्कृती वगळून निखळ
साध्या, सोप्या, गोड सुरांनी ओथंबलेलं गाणं पेश करायचं; हे साधं तत्व. बाबूजींचं संगीत हेच तत्व
पाळणारं आहे. बाबूजींनी वेडेवाकडे अनवट राग न वापरता प्रसिद्ध आणि सामान्य रसिकांच्या आवाक्यातले राग वापरून चाली केल्यायत. अर्थात सोप्या चालीतली एक जीवघेणी गोम अशी आहे की, त्या
चाली सोप्या भासतात पण त्यातल्या बारीक बारीक जागा, हरकती,
मींड, मुरक्या व्यवस्थित घेऊन गायला गेलं
की नक्की काय होतं हे गायक-गायिकांना - विशेषतः अलीकडच्या ऑर्केस्ट्रा मधल्या - विचारावं. नाही विचारलं तरी,
ही बाबूजींची गाजलेली गाणी
ऑर्केस्ट्रामधल्या नवीन लोकांकडून ऐकतांना वेळोवेळी आपल्या अंगावर कसा शहारा
येतो (नव्हे काटे
उगवतात) ते आठवावं. नमुन्यादाखल जरा ही काही गाणी गुणगुणून तर बघा - धुंदी
कळ्यांना (आशा व सुधीर / चित्रपट - धाकटी बहीण), घननीळा लडिवाळा (माणिक वर्मा
/ चित्रपट - उमज पडेल तर), चंद्र आहे साक्षीला (आशा व सुधीर / चित्रपट - चंद्र होता साक्षीला), स्वप्नात रंगले मी (आशा व सुधीर
/ चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा), येणेजाणे का हो सोडले
(आशा / चित्रपट - लाखात अशी देखणी), उद्धवा अजब तुझे
सरकार (सुधीर / चित्रपट - जगाच्या पाठीवर), थकले रे नंदलाला, तुला पाहते
रे ( दोन्ही गाणी - आशा
/ चित्रपट - जगाच्या पाठीवर) निजरूप दाखवा हो (सुधीर
/ चित्रपट - झाला महार पंढरीनाथ), इत्यादी... ऋतुचक्रावर आधारित असलेलं आणि त्यानुसार अप्रतिम बांधणी करून आणि वेगवेगळे राग वापरून केलेलं 'जिवलगा कधी रे येशील तू (आशा
/ चित्रपट - सुवासिनी),' हे गाणं तर निव्वळ अविस्मरणीय आणि एव्हरग्रीन.
हिंदीतही बाबूजींनी अत्यंत दर्जेदार संगीत दिलं.
'पहली तारीख है,'
हे किशोर कुमारचं तर 'भाभीकी चुडिया' सिनेमातली लताची गाणी
आजही प्रसिद्ध आहेत. पण तरीही बाबूजींचं हिंदीत म्हणावं असं बस्तान बसलं नाही,
संगीतकार म्हणून त्यांच्या नावाची लाट हिंदीत कधी आली नाही.
असं का ? ..... बहुदा हिंदी मधली चमक-दमक त्यांना मानवली नसावी. शिवाय हिंदीत नाईलाजाने पावलोपावली कराव्या लागणाऱ्या तडजोडी तर त्यांच्या निष्ठावान स्वभावात बसणाऱ्या नव्हत्याच.
बाबूजींचं लताबरोबर मेतकूट फारसं का जमलं
नाही ? हिंदीत ओ पी नय्यरनी एकही गाणं
लताला न देता
निर्धाराने स्वतःची कारकीर्द फुलवली. पण बाबूजींचा असा काही अट्टाहास नव्हता. सुरुवातीला बाबूजींच्या गीतरामायणात लता गायली आहे.
तसंच हिंदीत बाबूजींच्या संगीतात लता गायलीही आहे व ती गाणी खूप गाजलेलीही आहेत. मात्र असं असूनही बाबूजींचं लताबरोबरचं काम अत्यल्प आहे, हे खरं. या बाबतीत मी असं ऐकलंय
की लता चिक्क्कार बिझी असल्यामुळे गाणी शिकायला, पूर्वतयारीला, तालमींना येत नसे व ती आयत्यावेळी मारून नेणारी गायिका झाली होती.
अर्थात या बाबतीत तडजोड बाबूजींना अजिबातच मान्य
नव्हती आणि म्हणूनच असं घडलं. असो...
गॉसिप हा आपला
हेतू नाही आणि आता तर त्याला काही महत्वच नाही.
आणि आशानी बाबूजींची गाणी खरोखरच अचाट
उंचीवर नेवून ठेवलीयत हेही नक्कीच खरं.
मला स्वतःला बाबूजी हे घरातलेच कर्तृत्ववान वडीलधारे वाटतात...
रूढार्थाने बाबूजी हे कालचे कलाकार असले आणि आज जरी बाबूजींचा मुलगा श्रीधर फडके संगीतकार होऊनही खूपच काळ लोटलेला असला तरीही बाबूजींचा तो 'काल' माझ्यासाठी 'आज' आहे आणि उद्याही 'आज'च असणार आहे.
माझ्या पसंतीची दहा गाणी --
१) घननीळा लडिवाळा - माणिक वर्मा / चित्रपट - उमज पडेल तर
२) एकाच
या जन्मी जणू
- आशा / चित्रपट - पुढचं पाऊल (नवीन) (१९८८)
३) का हो धरिला मजवरी
राग - आशा / चित्रपट - जगाच्या पाठीवर
४) स्वप्नात रंगले मी - आशा व सुधीर / चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा
५) सांग
तू माझाच ना -
आशा / चित्रपट - धाकटी सून
६) कोण तू कुठला राजकुमार - मूळ गायिका मालती पांडे
व नंतर सुधीर
/ 'गीत रामायण'
७) तुज सगुण म्हणू की निर्गुण रे - सुधीर
/ ज्ञानेश्वरांचा अभंग
८) जाळीमंदी पिकली करवंद - माणिक
वर्मा / चित्रपट - पुढचं पाऊल (जुना) (१९५०)
९) पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी - सुधीर
/ चित्रपट - प्रपंच
१०) पडते
पाया नका तोडू
माया अहो राया
- आशा / चित्रपट - लाखात अशी देखणी
--- भाग ४. सुधीर फडके
- स मा प्त
-
क्रमशः - - #भाग५)हृदयनाथ मंगेशकर
ता क - १) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती
मिळवून
लेख
लिहिलेत.
२) माहिती मुख्यतः गुगल,
विकिपीडिया
व
इतर
काही
इंटरनेट
साईट्स
वरून
साभार
घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली
आहे.
३) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक
आहेत,
अर्थात
मी
सोडून
इतर
कोणीही
त्यासाठी जबाबदार
नाही.
४) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी
उल्लेख
केलेले
आहेत
ते
त्या
कलाकारांवरील अतीव
प्रेमापोटीच.
५) निवडलेली दहा
गाणी
ही
संगीतकाराच्या
'अनेक
सर्वोत्कृष्ट
गाण्यांपैकी
दहा'
आहेत.
'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे
गाणीही
दहा
घेतलीयत
एवढंच.
६) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी
डॉट
कॉम
या
साईट
वर
माहिती
व
लिरिक्स सहित
ऐकायला
उपलब्ध
आहेत.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (एप्रिल २०२०)
![]() |
सुधीर फडके |
No comments:
Post a Comment