#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#५)हृदयनाथ मंगेशकर
काही माणसं
अगदी बालबृहस्पती असतात. मला वाटतं, भारतीय संगीतात गायक म्हणून तीन बालबृहस्पती झालेले आहेत - १) कुमार गंधर्व, २) लता मंगेशकर व ३) आनंद गंधर्व अर्थात आनंद भाटे. माझ्या मते एक वेगळ्या क्षेत्रातले आणखी एक बालबृहस्पती आहेत - पं हृदयनाथ मंगेशकर. थोडासा फरक एवढाच आहे की गायक असलेल्या पहिल्या तीन बालबृहस्पतींनी अगदी
पोरवयात
(८ व्या/९ व्या वर्षी) आपल्या गळ्यातला चमत्कार रसिकांपुढे पेश केला तर हृदयनाथांनी वेगळ्या क्षेत्रात, म्हणजे संगीतकार म्हणून, आपली पहिली पेशकश
वयाच्या १७ व्या
वर्षी (म्हणजे टीन एजमध्ये) रेकॉर्डच्या स्वरूपात रसिकांसमोर आणली. ती अविस्मरणीय रेकॉर्ड आहे 'चांदणे शिंपीत जासी' {भावगीत (१९५४) / गायिका आशा भोसले}.
दोन तालातले, दोन वजनातले असे हे अत्यंत अवघड गाणे
हृदयनाथांनी १७ व्या
वर्षी देणे, म्हणजे ही गौरीशंकराची उंची आहे. संगीतकार म्हणून आपल्या बुद्धीची झेप केवढी आकाशगामी आहे याची झलकच हृदयनाथांनी उर्फ बाळासाहेबांनी आपल्या पहिल्याच गाण्यात दाखवली. त्या
क्षणापासून संगीतकार म्हणून बाळासाहेबांची गाडी सुटलीच. पाठोपाठ त्यांनी 'आकाशगंगा,' या त्यांच्या पहिल्या मराठी
चित्रपटाला संगीत दिलं.
बाळासाहेबांचा काव्याचा अभ्यास आणि काव्याचं प्रेम अगदी लक्षणीय असंच
असल्यामुळे त्यांनी अत्यंत नामवंत कवींच्या आशयघन कविता निवडून आणि त्या आशयानुरूप संगीतबद्ध करून
अनेक भावगीतं केली.
तिन्ही सांजा सखे मिळाल्या, कशी काळनागीणी, घनतमी शुक्र बघ राज्य करी, मावळत्या दिनकरा (भा रा तांबे), दे मला दे चंद्रिके (राजा बढे) ही त्यातली काही सुरुवातीची भावगीतं. त्यानंतर अशा अफलातून भावगीतांचा दौर चालूच राहिला.
बाळासाहेबांची व सर्वच मंगेशकर कुटुंबीयांची स्वातंत्र्यवीर सावरकर व शिवाजी महाराज या दोन दैवतांवर अलोट भक्ती. त्या योगे 'ने मजसी ने परत मातृभूमीला' (गायक - सर्व मंगेशकर) हे स्वातंत्र्यवीरांचे एक अलौकिक गाणे बाळासाहेबांनी केले. (स्वातंत्र्यवीरांच्या दुसऱ्या 'जयोस्तुते श्री महन्मंगले' या स्फूर्तिगीताचे संगीतकार 'मधुकर गोळवलकर' हे आहेत.) १९७४ साली शिव राज्याभिषेकाच्या त्रिशतकपूर्तीच्या निमित्ताने बाळासाहेबांनी 'शिवकल्याण राजा' हा असा एक अल्बम केला की त्यातल्या गाण्यांची धुंदी आज ४२ च्या वर वर्ष होऊन गेली तरी कमी होत नाही, होणारही नाही. ज्ञानेश्वरांचे अभंग, ओव्या, विराण्या त्यांनी 'ज्ञानेश्वर माऊली' या अल्बमच्या स्वरूपात १९८२ साली केल्या.
कमालीच्या अवघड चाली करूनही त्या
बाळासाहेबांनी इतक्या सौंदर्यपूर्ण, कलात्मक केल्या की त्यांच्या रचनांचा मेस्मरायझिंग इम्पॅक्ट रसिकांवर आहे. लता आणि आशा या दिग्गज बहिणींना सुद्धा या रचना गायच्या म्हणजे 'येऱ्या गबाळ्याचे हे काम नोहे' असंच
वाटतं. पण अर्थात निव्वळ कठीणपणाचा सोस म्हणून या रचना
नाहीयेत तर त्यात
कमालीची प्रयोगशीलता आहे. ज्ञानेश्वरांच्या रचनांमधल्या भक्तिभावापासून ते कोळीगीतांचा बाज, 'जैत रे जैत' मधल्या आदिवासींच्या संगीताचा बाज, 'वेडात मराठे वीर दौडले'
मधली वीरश्री, 'उषःकाल होता होता' मधला
विमनस्कपणा, 'संधीकाली या अशा'
आणि 'असा बेभान
हा वारा' मधला
झपाटलेपणा, 'मला आणा एक हिऱ्याची मोरणी' या लावणीतला नखरेलपणा, इतकी
सगळी डोळे दिपवणारी रेंज बाळासाहेबांनी सहजगत्या दाखवलीय. या सगळ्या रचना करतांना कुठलंही वाद्य न वापरता फक्त डोक्यातील बुद्धीच्या आधारे त्या
केल्यायत असं स्वतः
बाळासाहेबांनी टी.व्ही.वरील 'सारेगम' कार्यक्रमात सांगितलं तेव्हा सह-परीक्षक अवधूत गुप्ते आश्चर्याने थक्क झाला
होता, हे आठवतंय.
मराठी संगीतकार मंडळी गायक गायिकेची निवड कोणत्या निकषावर करत असतील ? अर्थात गीताच्या प्रकृतीनुसार आणि गायकाच्या गळ्याच्या कुवतीनुसार हा संगीताशी संबंधित निकष
तर असणारच; पण तरीही प्रॅक्टिकली असंही होतच असणार की गाणं लताला द्यायचंय पण हिंदीत तुफान
बिझी असल्यामुळे लता उपलब्ध नाहीये. अशावेळी काय करायचं ? आशा
? की आणखी कोणी
? असा प्रश्न मला सगळ्या संगीतकारांबद्दल पडतोच पण तरीही ... दोघीही हक्काच्या ताया असल्यामुळे, घरचा मामला
असल्यामुळे, बाळासाहेबांना हा अनुपलब्धतेचा प्रश्न फारसा नसणार असा माझा समज आहे.
असं असेल तर मग .... बाकीच्या सर्व ज्ञानेश्वरांच्या रचनांसाठी लता आणि 'पांडुरंग कांती' व 'दिन तैसी रजनी' साठी
आशा, असं का ?
'मालवून टाक दीप'
साठी लता आणि
'तरुण आहे रात्र
अजुनी' साठी आशा,
असं का ? जनरली
जलद लयीतल्या फडकत्या लावण्या आशा उत्कृष्टपणे गात असूनही, 'मला आणा एक हिऱ्याची मोरणी' साठी लता, असं का ? 'जाईन विचारीत रानफुला' साठी एकदम किशोरी ?, असं का ? अतिशय अप्रतिम अशा
'पूर्तता माझ्या व्यथेची' साठी महेंद्र कपूर,
असं का ? ... हे आणि असेच इतर काही प्रश्न शक्य
झालं तर मला बाळासाहेबांना प्रत्यक्ष विचारायला आवडतील. असो.
आज ८० व्या वर्षीही बाळासाहेब स्वतःच्या भावसरगम कार्यक्रमात त्याच उत्साहाने गातात. हाच त्यांचा उत्साह हीच त्यांची कल्पनाशक्ती त्यांच्या शताब्दी वर्षातही कायम राहो, हीच त्या दयाघनाच्या पायाशी प्रार्थना.
माझ्या पसंतीची दहा गाणी --
१) काजळ रातीनं ओढून नेला
- आशा / चित्रपट - हा खेळ सावल्यांचा
२) चांदण्यात फिरतांना माझा - आशा / भावगीत
३) जाईन
विचारीत रानफुला - किशोरी आमोणकर / भावगीत
४) तू तेव्हा तशी - हृदयनाथ / चित्रपट - निवडुंग
५) नभं उतरू आलं - आशा व कोरस / चित्रपट - जैत रे जैत
६) पूर्तता माझ्या व्यथेची - महेंद्र कपूर - भावगीत
७) मला आणा एक हिऱ्याची मोरणी
- लता / चित्रपट - पवनाकाठचा धोंडी
८) असा बेभान हा वारा
- लता / भावगीत
९) विश्वाचे आर्त माझ्या मनी - लता / ज्ञानेश्वरांचा अभंग
१०) सावर
रे सावर रे - लता / भावगीत
--- भाग ५. हृदयनाथ मंगेशकर - स मा प्त -
क्रमशः - - #भाग६)श्रीनिवासखळे
ता क - १) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती
मिळवून
लेख
लिहिलेत.
२) माहिती मुख्यतः गुगल,
विकिपीडिया
व
इतर
काही
इंटरनेट
साईट्स
वरून
साभार
घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली
आहे.
३) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक
आहेत,
अर्थात
मी
सोडून
इतर
कोणीही
त्यासाठी जबाबदार
नाही.
४) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी
उल्लेख
केलेले
आहेत
ते
त्या
कलाकारांवरील अतीव
प्रेमापोटीच.
५) निवडलेली दहा
गाणी
ही
संगीतकाराच्या
'अनेक
सर्वोत्कृष्ट
गाण्यांपैकी
दहा'
आहेत.
'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे
गाणीही
दहा
घेतलीयत
एवढंच.
६) मी उल्लेखिलेली गाणी
आठवणीतली
गाणी
डॉट
कॉम
या
साईट
वर
माहिती
व
लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (मे २०२०)
![]() |
हृदयनाथ मंगेशकर |
No comments:
Post a Comment