Friday, 24 March 2017

#६)श्रीनिवास खळे

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#६)श्रीनिवास खळे 

१९२६ साली जन्माला आलेल्या श्रीनिवास विनायक खळे यांच्या नावामागे संगीतकार हा शब्द प्रत्यक्षात भले खळेकाकांनी संगीतरचना करायला लागल्यानंतर लागला असेल; पण अगदी पोरवयातही स्वतः खळेकाकांना संगीतकार हा शब्द आपल्या नावामागे लागावा, हीच एकमेव आंस होती. वास्तविक घरामध्ये संगीताचं फारसं वातावरण नसतांना, एवढंच नव्हे तर वडिलांचा गाण्या-बजावण्याला विरोध असतांनाही खळेकाकांना संगीताचं वेड लागलं होतं... कोकणातील खळे कुटुंबाची मूळ चांगली सांपत्तिक स्थिती भाऊबंदकीमुळे व इस्टेटीच्या संबंधातल्या कोर्ट कचेऱ्यांमुळे पूर्णतः डबघाईला येऊन, खळेकाकांच्या वडिलांना बडोद्याला शिफ्ट होऊन बेताची नोकरी करावी लागली. बडोद्याला असतांना छोट्या खळेकाकांचं वय वाढत होतं, ते तारुण्यात प्रवेश करत होते, घरची गरिबी वाढत होती पण त्याचबरोबर खळेकाकांचं संगीताचं वेडही भरपूरच वाढत होतं. संगीतामध्ये त्यांना आग्रा घराण्याने आणि फैय्याज खान साहेबांच्या गाण्याने फारच प्रभावित केलं होतं. सुरुवातीचं संगीत शिक्षण त्यांनी पं.मधुकर जोशी यांच्याकडे घेतलं. थोड्याच काळात; संगीताने झपाटल्यावर अडनिड्या वयातल्या कलाकारांना जे करावं लागतं ते खळेकाकांनीही केलं आणि एका मित्राच्या भरवशावर घरातून पळून जाऊन मुंबई गाठली. अशी बरीच उदाहरणं ऐकून-वाचून; 'संगीत क्षेत्रात संगीताच्या वेडाने घरातून पळून जाणं,' हा म्हणजे एक, प्रश्न पहिला कंपल्सरी या धर्तीचा ऑप्शन होता की काय अशी खरंच शंका येते.      

पुढे मुंबईला काही काळ बुजुर्ग संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता ('दिया जलाकर आप बुझाया' / चित्रपट - बडी माँ / गायिका - नूरजहाँ; या गाण्याने प्रसिद्ध असलेले संगीतकार) यांच्याकडे खळेकाकांनी शागिर्दी केली व नंतर ते संगीताची संधी किंवा संगीताशी संबंधित नोकरीची संधी शोधत होते. दरम्यान प्रेम विवाह सुद्धा करून बसले आणि एका ऐवजी दोन पोटं भरण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. संधी काही दरवाजा ठोठावत नव्हती. एका क्षणी तर ते इतके निराश झाले होते की 'नको ते संगीत' असा विचार करून हाती असलेली हार्मोनियम विकून मुंबई सोडून हार मानून परत बडोदा गाठावं असा विचारही त्यांनी केला होता पण पत्नीने धीर देऊन त्यांना परावृत्त केलं. शेवटी आस्ते आस्ते त्यांना काही प्रमाणात आकाशवाणीमध्ये व एच.एम.व्ही.मध्येही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर संगीत रचना करण्याची संधी मिळू लागली व कालांतराने आकाशवाणी मध्ये कायमस्वरूपी नोकरीही मिळाली.

आकाशवाणीमध्ये व एच.एम.व्ही.मध्येही सुरुवातीच्या १९५६ ते १९६१ या काळात कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर खळेकाकांनी केलेल्या गाण्यांमधील काही उल्लेखनीय गाणी म्हणजे - कळीदार कपुरी पान (गायिका - सुलोचना चव्हाण), कशी रे तुला भेटू व कशी ही लाज गडे मुलखाची (दोन्ही गाणी गायिका - मालती पांडे-बर्वे)  , सहज सख्या एकटाच व काल पाहिले मी स्वप्न गडे (दोन्ही गाणी गायिका - आशा भोसले), निळा सावळा नाथ (गायिका - कुंदा बोकील), इत्यादी... ही गाणी चांगलीच गाजत होती. खळेकाकांनी प्रत्येक सूर हा अर्थानुरूप सुयोग्य पद्धतीने योजलेला आहे याचा प्रत्यय रसिकांना व मान्यवरांनाही येत होता. खळेकाकांनी एकही गाणं, चाल आधी व त्यावर फिट केलेले शब्द, या पद्धतीने केलं नाही. याच दरम्यान पाडगावकरांचं एक अप्रतिम गाणं खळेकाकांनी केलं. गायक-गायिकाही त्यामानाने नवीनच होते. अरुण दाते व सुद्धा मल्होत्रा. गाणं होतं 'शुक्रतारा मंद वारा.' कोणत्या शुभातिशुभ ग्रहांचं पाठबळ या गाण्याला लाभलं होतं ते 'मंगेश'च जाणे; पण या गाण्यावर तेव्हापासून अवघ्या महाराष्ट्राने जे वेड्यासारखं प्रेम केलं ते आजतागायत. गाणं अक्षरशः डोक्यावर कसं घेतलं जातं याचा हा खळेकाकाकांना आलेला हा पहिला अनुभव.

राजा बढे यांच्या 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' या स्फूर्तिगीताला सुद्धा अत्यंत समर्पक असं संगीत देऊन हे गाणं खळेकाकांनी शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात व ढंगात पेश केलं. हे स्फूर्तिगीत सुद्धा खूपच गाजलं व आजही ते विलक्षण लोकप्रिय आहे.

मला वाटतं प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा एक पिंड, एक स्वभाव असतो. स्वतः चांगली गीतं, चांगल्या कविता निवडून त्यांना पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या निर्णयाने, स्वतःचं पूर्ण समाधान होईपर्यंत चाली लावणे; हा खळेकाकांचा स्थायीभाव. उत्तमातला उत्तम मुखडा करणे व त्यानंतरच त्या अनुषंगाने उर्वरित अंतरे करणे, ही खळेकाकांची पद्धत. 'शुक्रतारा' हे गाणं प्रचंड गाजलं. याच गाण्याचे खळेकाकांनी दहा मुखडे तयार केले होते पण ते स्वतःच नापसंत केले. आज जो मुखडा आहे तो या गाण्याचा अकरावा मुखडा. खळेकाकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या या, एक प्रकारे स्वान्त सुखाय, पद्धतीमुळे की काय कोण जाणे पण, खळेकाकांना चित्रपट व्यवसायाचं व चित्रपट व्यवसायालाही खळेकाकांचं आकर्षण फारसं वाटलं नसावं. पूर्वीच्या जमान्यात भावगीते, भक्तिगीते व सुगम संगीत आणि जरा नंतरच्या जमान्यात अल्बम्स करणं हेच संगीतकार म्हणून त्यांच्या प्रकटीकरणाचे मार्ग होते.

खळेकाकांनी फक्त सहा मराठी चित्रपट केले - १) यंदा कर्तव्य आहे (जुना) (१९५६), २) बोलकी बाहुली (१९६१), ३) पळसाला पाने तीन ( साल अनुपलब्ध) ४) जिव्हाळा (१९६८), ५) पोरकी (१९७०) व ६) सोबती (१९७१)... लक्ष्मी पूजन (१९५२) हा त्यांचा रिलीज होऊ न शकलेला चित्रपट. या शिवाय त्यांनी १) पाणिग्रहण, २) विदूषक आणि ३) देवाचे पाय अशा तीन मराठी नाटकांनाही संगीत दिलं. वरील चित्रपटांपैकी बोलकी बाहुली (१९६१) या चित्रपटाला खळेकाकांव्यतिरिक्त अविनाश व्यास, यशवंत देव व दशरथ पुजारी असे आणखीही तीन संगीतकार होते. खळेकाकांनी या चित्रपटातली 'आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला' (गायिका - आशा भोसले व उषा मंगेशकर), 'गोरी बाहुली कुठून आली' (गायिका - आशा भोसले)  व 'देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला' (गायिका - सुमन कल्याणपूर) अशी तीन गाणी केली.  

लता व पाठोपाठ आशा या दोघी हिंदी-मराठीतल्या (खरंतर कुठल्याही भारतीय भाषेतल्या) सर्वोत्कृष्ट गायिका, हे अगदी सर्वमान्य; पण हिंदीतल्या अति व्यग्रतेमुळे दोघीही मराठी संगीतकारांसाठी अनुपलब्ध असण्याचा तो काळ. पण ही अडचण न मानता या परिस्थितीला आव्हान मानून खळेकाकांनी बऱ्याच वेगळ्या / नवोदित गायिकांकडून कितीतरी अप्रतिम गाणी गावून घेऊन ती गाणी प्रसिद्धही करून दाखवलीयत... कळीदार कपुरी पान (गायिका - सुलोचना चव्हाण), कशी रे तुला भेटू व कशी ही लाज गडे मुलखाची (दोन्ही गाणी गायिका - मालती पांडे-बर्वे), निळा सावळा नाथ व गमाडी गम्मत जमाडी जम्मत (दोन्ही गाणी गायिका - कुंदा बोकील), देवा दया तुझी की व बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद (दोन्ही गाणी गायिका - सुमन कल्याणपूर), माझ्या गालाला पडते खळी सख्या मी दूधखुळी भोळी (गायिका - मोहनतारा अजिंक्य), खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या व त्या तुझिया चिंतनात (दोन्ही गाणी गायिका - उषा मंगेशकर) रामप्रहरी रामगाथा रंगते ओठावरी (गायिका - कृष्णा कल्ले), इत्यादी अनेक.

अर्थातच लता व आशा या दोघींनीही खळेकाकांची अनेक गाणी अजरामर केलेलीच आहेत. पाडगावकरांच्या 'जाहल्या काही चुका' (गायिका - लता मंगेशकर) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खळेकाका काही आजारामुळे जे.जे.मध्ये ऍडमिट होते; पण रेकॉर्डिंगला हजर राहण्याच्या तळमळीमुळे ते अक्षरशः हॉस्पिटलमधून पळून रेकॉर्डिंगला हजर राहिले. पाडगावकरांचंच 'श्रावणात घननीळा बरसला' (गायिका - लता मंगेशकर) हे गाणं पाडगावकरांनी खळेकाकांना सलगपणे न देता भागाभागात दिलं व त्याला चालही भागाभागातच लावली गेली (प्रथम मुखडा, मग पहिला अंतरा मग दुसरा, अशा क्रमाने). जिव्हाळा चित्रपटातल्या ग.दि.मां.च्या 'या चिमण्यांनो परत फिरा रे' (गायिका - लता मंगेशकर) या गाण्याच्या स्वररचनेवर लता इतकी बेहद्द खुश झाली की या गाण्यासाठी तिने मानधन तर घेतलं नाहीच पण या चालीची तिने मान्यवरांजवळ भरपूर स्तुतीही केली. स्वतः गीतकार ग.दि.मां.नी खळेकाकांना गायला लावून हे गाणं (म्हणे) अकरा वेळा ऐकलं होतं आणि "कवि म्हणून मला काय म्हणायचंय हे तुला कसं बरोब्बर कळलं रे," असं खळेकाकांना विचारलं होतं.         

अत्यंत श्रवणीय बालगीते ही खळेकाकांची आणखी एक उल्लेखनीय स्पेशालिटी. त्यांची किती लाजवाब बालगीते सांगू ? - गोरी गोरी पान (गायिका - आशा भोसले), आई व्हावी मुलगी माझी (गायिका - उषा मंगेशकर), आई आणखी बाबा यातून (गायिका - आशा भोसले व उषा मंगेशकर), एका तळ्यात होती (गायिका - आशा भोसले), एक कोल्हा बहू भुकेला (गायिका - उषा मंगेशकर), किलबिल किलबिल पक्षी (गायिका - सुषमा श्रेष्ठ), गमाडी गम्मत जमाडी जम्मत (गायिका - कुंदा बोकील), गोरी बाहुली कुठून आली (गायिका - आशा भोसले), पाऊस आला वारा आला पान लागले नाचू (गायिका - सुषमा श्रेष्ठ), शाळा सुटली पाटी फुटली (गायिका - कुंदा बोकील), टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू (गायिका - आशा भोसले).

संत तुकारामांच्या निवडक अभंगांना संगीत देऊन आणि ते अभंग लताकडून गावून घेऊन 'अभंग तुकयाचे' हा जो अल्बम खळेकाकांनी केला त्या अल्बमविषयी स्तुतीपर आणि विस्तृत असं मी काही लिहावं ही कल्पनाच मला हास्यास्पद वाटत्येय. तेव्हा त्या अल्बम मधल्या अभंगांचा मी फक्त उल्लेख करतोय, बाकी काहीही लिहीत नाहीये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, आगा करुणाकरा, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, हाचि नेम आता, खेळ मांडीयेला वाळवंटी, भेटी लागी जीवा, जेथे जातो तेथे, कन्या सासुऱ्यासी जाये, आनंदाचे डोही आनंद तरंग, हेचि दान देगा देवा (सर्व गाणी - गायिका - लता मंगेशकर)... तसंच भारतरत्न पं भीमसेन जोशी व भारतरत्न लता मंगेशकर या गायक-गायिकांना घेऊन 'राम शाम गुणगान' हाही उल्लेखनीय अल्बम खळेकाकांनी केला. मात्र त्यात हिंदी भजनं आहेत म्हणून त्याचा फक्त उल्लेखच करतो.

संगीताच्या क्षेत्रात ऋषितुल्य असणाऱ्या संगीतकार खळेकाकांनी, माझ्यासारख्या संगीत-रसिकांना आठवणीत पुरून उरतील अशा असंख्य यादगार गाण्यांची सुरीली भेट दिलीय. या जादूगार संगीतकाराच्या स्मृतींना माझा आदरपूर्वक प्रणाम. 

माझ्या पसंतीची दहा गाणी --

१) खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या - उषा मंगेशकर / भावगीत
२) चुकचुकली पाल एक - लता / भावगीत
३) प्रेम हे वंचिता मोह ना मज जीवनाचा - रामदास कामत / नाटक - पाणिग्रहण
४) जाहल्या काही चुका - लता / भावगीत
५) निळासावळा नाथ तशी ही निळीसावळी रात - कुंदा बोकील / भावगीत
६) लळा जिव्हाळा शब्दच खोटे - सुधीर / चित्रपट - जिव्हाळा
७) लागती गे काळजाला तीर हे तेढे तुझे - रतिलाल भावसार / भावगीत
८) सहज सख्या एकटाच - आशा / भावगीत
९) श्रावणात घननीळा बरसला - लता / भावगीत
१०) कंठातच रुतल्या ताना - आशा / भावगीत

आधार व विशेष ऋणनिर्देश - पुस्तक 'अंतर्यामी सूर गवसला' / लेखक - दत्ता मारुलकर. 

--- भाग ६. श्रीनिवास खळे - स मा प्त - 
क्रमशः - - #भाग७)दत्ताडावजेकर

ता  -  प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           माहिती मुख्यतः गुगलविकिपीडिया  इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेलीवाचलेली आहे.
           लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेतअर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहाआहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.


@प्रसन्न सोमण.


प्रसिद्धी - अभूतपूर्व (जून २०२०)


श्रीनिवास खळे

No comments:

Post a Comment