Friday, 3 March 2017

#३)वसंत देसाई

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#३)वसंत देसाई

डिसेंबर १९७५ मध्ये संगीतकार वसंत देसाईंचं लिफ्टच्या अपघातात हृदयद्रावक निधन झालं आणि त्याबरोबरच मराठी संगीतातला वसंत ऋतूचा अखेरचा बहर दुदैवाने संपला. सावंतवाडी संस्थानातल्या श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेल्या वसंत देसाई नावाच्या कोकण-सिंधुदुर्गच्या सुपुत्राने संगीतात काहीतरी नाव घेण्याजोगं करून दाखवण्याच्या इर्षेने प्रभात फिल्म कंपनीत अंगावर पडतील ते कष्ट केले. उमेदवारीच्या काळात वसंतरावांनी प्रभातच्या धर्मात्मा, संत ज्ञानेश्वर सारख्या चित्रपटांत फुटकळ अभिनयही केला, गायलेही आणि सहाय्यक संगीतकाराच्या भूमिकेतून काही गाणी स्वरबद्धही केली. हे करत करत त्यांनी चित्रपटाला संगीत देण्याच्या बाबतीतली आवश्यक ती सर्व कलाकुसर शिकून घेतली. चित्रमहर्षी व्ही शांतारामांच्या बरोबर राहून वसंतरावांनी त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिलं आणि ते खूप गाजलंही. कालांतराने मात्र काही मतभेद होऊन वसंतराव व्ही शांतारामांच्या पासून वेगळे झाले. पण संगीतकार म्हणून वसंतरावांनी हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला होता आणि त्यांचं वैविध्यपूर्ण संगीत खूप गाजतही होतं.

मात्र हिंदीत उत्तम जम बसलेला असूनही वसंतरावांचं वैशिष्ट्य हे आहे की, तुलनेनं पैसा कमी असला तरीही, त्यांची मराठी चित्रपटसृष्टीशी नाळ जोडलेलीच राहिली. शिवाय, कोकणचेच सुपुत्र असल्यामुळे की काय कोण जाणे पण, संगीत रंगभूमीबद्दलची त्यांची ओढही कायम राहिली. संगीतकार म्हणून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठी संगीत रंगभूमी साठी सुद्धा लक्षणीय काम केलं. देव दीनाघरी धावला, प्रीतिसंगम, जय जय गौरीशंकर, शाबास बिरबल शाबास, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, अशा वेगवेगळ्या ढंगाच्या नाटकांना त्यांनी अगदी अनुरूप असं संगीत दिलं. राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर या गायक नटांच्या गळ्याला अनुसरून त्यांनी सुंदर चाली तर दिल्याच; पण जयश्रीबाई शेजवाडकरांसारख्या नवख्या गायिकेच्या गळ्याला झेपेल असं 'सावज माझं गवसलं' (जय जय गौरीशंकर) सारखं सुंदर गाणं देऊन यशस्वी करून दाखवलं.

नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये संगीत देतांना निरनिराळ्या भावनांना आणि विविध प्रसंगांना अनुरूप असं संगीत देणं फार महत्वाचं असतं. याचा विचार करून संगीत देतांना वसंतरावांनी गाण्याचा नेमका मूड पकडलाय असं नेहमी जाणवत राहतं. पटतंय का तुम्हीच बघा --

कशी झोकात चालली कोळ्याची पोर (आशा / चित्रपट मोलकरीण) (समारंभातील नृत्यासाठी कोळीगीत), बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा (आशा / चित्रपट धन्य ते संताजी धनाजी)  (फडकती लावणी), धाव पाव सावळे विठाई (आशा / चित्रपट छोटा जवान) (धावा / भक्तीगीत), हसले आधी कुणी (आशा व तलत मेहमूद / चित्रपट मोलकरीण) (सफल प्रेमाचं द्वंद्वगीत), देश हा देव असे माझा (आशा / चित्रपट धन्य ते संताजी धनाजी) (देशभक्तीपर गीत), निराकार ओंकार (राम मराठे / नाटक जय जय गौरीशंकर) (नाट्यपद), पाहुनी प्यारभरी मुस्कान (शोभा गुर्टू / चित्रपट धन्य ते संताजी धनाजी) (मुजरा गीत), रम्य ही स्वर्गाहून लंका (भीमसेन जोशी / चित्रपट स्वयंवर झाले सीतेचे) (शास्त्रीय संगीतावर आधारित - राग हिंडोल)

'शाहीर राम जोशी' आणि 'अमर भूपाळी' या दोन्ही चित्रपटांचं संगीत म्हणजे एका अर्थी शिवधनुष्य होतं. हे शिवधनुष्य वसंतरावांनी अगदी सहज पेललं आणि नितांत सुंदर दर्जेदार संगीत दिलं. सुंदरा मनामध्ये भरली आणि हटातटानें पटा रंगवुनि जटा (दोन्ही गाणी - गायक जयराम शिलेदार / चित्रपट शाहीर राम जोशी) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. शाहीर राम जोशी आणि होनाजी या दोन्ही जुन्या गाजलेल्या शाहिरांच्या खानदानी भाषेचा लहेजा लक्षात घेऊन वसंतरावांनी अस्सल शाहिरी बाजाच्या चाली दिल्यायत. 'अमर भूपाळी'तल्या घडीघडी अरे मनमोहना (लता), तुझी माझी प्रीत एकदा (लता), तुझ्या प्रीतीचे दु:ख मला (लता व पंडितराव नगरकर), नको दूर देशी जाऊ (लता), लटपट लटपट तुझं चालणं (लता), या भिन्न भिन्न ढंगाच्या लावण्या तसंच, सांगा मुकुंद कुणि हा (आशा व पंडितराव नगरकर) ही गवळण आणि घनश्याम सुंदरा श्रीधरा (लता व पंडितराव नगरकर) या गाण्यांच्या खुमारीचं काय वर्णन करायचं ? शेवटपर्यंत अत्यंत दर्जेदार काम करणाऱ्या या गुणी संगीतकाराला मानाचा मुजरा.  

माझ्या पसंतीची दहा गाणी --

१) तुझिया बोटाला कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार - सुमन / चित्रपट - इये मराठीचिये नगरी  
२) देव जरी मज कधी भेटला - आशा / चित्रपट - मोलकरीण  
३) हसले आधी कुणी - आशा व तलत मेहमूद / चित्रपट - मोलकरीण  
४) निराकार ओंकार  - राम मराठे / नाटक - जय जय गौरीशंकर
५) पाहुनी प्यारभरी मुस्कान - शोभा गुर्टू / चित्रपट - धन्य ते संताजी धनाजी  
६) रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - भीमसेन जोशी - चित्रपट - राजा शिवछत्रपती 
७) विश्वनाट्य सूत्रधार (नांदी) - जयवंत कुलकर्णी, राम मराठे व रामदास कामत / नाटक - शाबास बिरबल शाबास  
८) सुंदरा मनामध्ये भरली - जयराम शिलेदार - / चित्रपट - शाहीर राम जोशी
९) तुझी माझी प्रीत एकदा कधी - लता / चित्रपट - अमर भूपाळी
१०) तुझ्या प्रीतीचे दु:ख मला - लता व पंडितराव नगरकर / चित्रपट - अमर भूपाळी

--- भाग . वसंत देसाई - मा प्त
क्रमशः - - #भाग४)सुधीरफडके

ता -  ) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           ) माहिती मुख्यतः गुगल, विकिपीडिया इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली आहे.
           ) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेत, अर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           ) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           ) निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहा' आहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           ) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.


@प्रसन्न सोमण


प्रसिद्धी - अभूतपूर्व (मार्च २०२०)

वसंत देसाई

No comments:

Post a Comment