Friday, 31 March 2017

#७)दत्ता डावजेकर

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#)दत्ता डावजेकर

मी गुढघ्याएवढा असतांना रेडियोवर खूप वेळा एक 'कंडा' गाणं लागायचं ('कंडा' हा छान किंवा मस्त या शब्दांना समानार्थी असलेला आणि माझ्या लहानपणी बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला शब्द.) गाण्याचे बोल होते - 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा' (गायिका - अपर्णा मयेकर आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट) ... छान छान प्राण्यांची गोष्ट असलेलं छान छान आवाजही असलेलं हे वेगळंच गाणं लहानपणी मला 'जालीम भयंकर' आवडायचं. आजही हे गाणं मला तितक्याच तीव्रतेनं आवडतं. या गाण्याबरोबरच अजूनही एक वेगळंच आणि छान गाणं आवडायचं अजूनही आवडतं. ते गाणं होतं 'सा..सागर उसळे कैसा' (गायिका - आशा भोसले कोरस / चित्रपट - काका मला वाचवा)... आमच्या संगीताचं वातावरण असलेल्या घरात 'सरगम'ची महती सांगणारं हे गाणं माझ्या आईने तिच्या अनेक विद्यार्थ्यांना शिकवलेलंही आहे... त्यावेळी या गाण्यांचे गीतकार कोण, संगीतकार कोण, असला विचार करण्याएवढा आणि असली माहिती मिळवण्याएवढा 'वेडा' मी झालेलो नव्हतो... मोठा झाल्यानंतर तसले 'वेड मजला लागले' आणि ही माहिती मिळाली. या दोन्ही गाण्यांचे गीतकार होते आधुनिक वाल्मिकी, .दि.उर्फ अण्णा माडगूळकर आणि हरहुन्नरी संगीतकार होते दत्ता डावजेकर उर्फ डी.डी.       

तसं पाहिलं तर डी.डी.हे एक अतिशय बुजुर्ग संगीतकार. त्यांच्या वैविध्यपूर्ण संगीतानी किमान तीन पिढ्या तरी नादावल्यायत. तरीही संगीतकार म्हणून डी.डीं.च्या नावाला फार मोठं वलय आहे असं जाणवत नाही. अगदी संगीतप्रेमींच्या मनातही प्रेमादराच्या पहिल्या उमाळ्यात डी.डीं.चं नाव येत नसावं, असं जाणवतं. त्यातही गम्मत ही की, बऱ्याच वेळेला गाणी माहित असतात, आवडतही असतात, पण त्या गाण्यांचे संगीतकार डी.डी.आहेत ही गोष्ट माहित नसते. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही, का कोण जाणे, डी.डीं.विषयी त्यामानाने कमी माहिती उपलब्ध आहे.

डी.डी.लहान वयात तबला हार्मोनियम वाजवायला शिकले हळूहळू त्यांचा संगीतामधला रस वाढू लागला. काही काळ त्यांनी सी.रामचंद्र चित्रगुप्त या प्रसिद्ध संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम केलं संगीत दिग्दर्शनातल्या आवश्यक खुब्या आत्मसात केल्या. स्वतंत्रपणे डी.डीं.नी संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट केला त्याचं नाव होतं 'म्युनिसिपालिटी' आणि साल होतं १९४१. पुढच्या वर्षी म्हणजे १९४२ साली संगीतकार दादा चांदेकर यांच्या 'पहिली मंगळागौर' या चित्रपटात स्नेहप्रभा प्रधान यांच्याबरोबर सहगायिका म्हणून लता प्रथम मराठी चित्रपटामध्ये गायली, हे खरं; पण ते सहगायिका म्हणून. त्या पाठोपाठ १९४३ साली डी.डीं.च्या 'माझे बाळ' या मराठी चित्रपटात लताला गायला मिळालं. तीन वर्षांनी म्हणजे १९४६ साली डी.डीं.च्याच 'आपकी सेवामें' या चित्रपटात लता प्रथमच हिंदीत गायली. गाण्याचे बोल होते 'पा लागू कर जोरी रे'... 'पिलू ठुमरी' असलेलं हे नितांत-सुंदर गाणं रसिकांनी जरूर ऐकावंच. (यु ट्यूबफक्त १७ वर्षांच्या लताने हे गाणं असं गायलंय की, मी तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय हे गाणं ऐकूच शकत नाही. अशीच परिस्थिती डी.डी.-लता याच कॉम्बिनेशनच्या 'तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला' या मराठी भावगीताचीही होते... बाय वे, लताबरोबरच डी.डीं.नी 'प्रिझनर ऑफ गुलकुंडा' या हिंदी चित्रपटात सुधा मल्होत्रा या गुणी गायिकेलाही प्रथम संधी दिलेली आहे. शिवाय; निश्चित असा तपशील उपलब्ध नसला तरी; आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल या गायिकांना सुद्धा प्रथम संधी देण्याचं श्रेय डी.डीं.च्या खाती जमा आहे, असं म्हटलं जातं. अर्थात हिंदी चित्रपटातली डी.डीं.ची कारकीर्द अत्यंत अल्पजीवीच ठरली. पण तरीही मराठी चित्रपटात मात्र त्यांनी राजा परांजपे, गजानन जहागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर, इत्यादी बड्या निर्माता दिग्दर्शकांबरोबर काम केलं.             

भावगीतांच्या जमान्यातील काही गाणी संगीतबद्ध करण्याबरोबरच डी.डीं.नी लिहीलीयत सुद्धा. उदाहरणार्थ - आली दिवाळी मंगलदायी, गेला कुठे बाई कान्हा, तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला (तिन्ही भावगीते, गायिका - लता मंगेशकर) झुलविले मला का सांग ना (भावगीत, गायिका - माणिक वर्मा), कुणी बाई गुणगुणले, थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी (दोन्ही भावगीते, गायिका - आशा भोसले), इत्यादी गाण्यांना डी.डीं.च्या स्वरसाजाबरोबरच डी.डीं.च्या लेखणीचाही स्पर्श झालेला आहे

गाण्याचे शब्द चित्रपटातला प्रसंग आणि वातावरण यानुसार अचूक मूड पकडून चाल देण्याची अत्यंत विलक्षण अशी हातोटी डी.डीं.कडे होती. याचा अनुभवच घ्यायचा असेल तर ही गाणी आठवून पहा - उठ शंकरा सोड समाधी (गायिका - कृष्णा कल्ले / चित्रपट - पडछाया), घुमला हृदयी नाद हा (गायिका - अनुराधा पौडवाल / चित्रपट - यशोदा), गंगा आली रे अंगणी (गायिका गायक - अपर्णा मयेकर, गोविंद पोवळे, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर एच.वसंत / चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई), शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा (गायिका - अपर्णा मयेकर आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट), संथ वाहते कृष्णामाई (गायक - सुधीर फडके / चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई), चांदण्यात ह्या धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी (गायिका - लता मंगेशकर / चित्रपट - घरची राणी), टकटक नजर पडतोय पदर (गायिका - आशा भोसले / चित्रपट - सून लाडकी या घरची), नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाठलाग), मज सुचले गं सुचले मंजुळ गाणे (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट), भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट), इत्यादी... 'या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभवती' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाठलाग) या गाण्याची मेलडी तर इतकी झपाटलेली आहे की चित्रपट बघितलेला नसला तरीही चित्रपटाची साधारण कथा चित्रपटातलं वातावरण नुसतं गाणं ऐकूनही इमॅजिन करता येतं.

मला स्वतःला असं वाटतं की, संगीतकार म्हणून डी.डी.नक्की कसे आहेत याचा थांगच लागत नाही. 'संथ वाहते कृष्णामाई' (गायक - सुधीर फडके / चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई), या गाण्यात ते शांतपणे वाहणारी नदी नजरेसमोर उभी करतात. 'मज सुचले मंजुळ गाणे' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट), या गाण्याला ते अभोगी रागातली मखमली चाल देतात. 'आसावल्या मनाला माझाच राग येतो' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाहू किती रे वाट), या गाण्याची चाल तोडी रागात करता-करता जोडकाम करतांना ते स्वरसमूहाला अशी काही कलाटणी देतात की स्तिमित व्हायला होतं. 'या डोळ्यांची दोन पाखरे' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाठलाग), या मूलतः चंद्रकंस रागामधल्या गाण्याच्या दुसऱ्या अंतऱ्यातही अगदी असाच प्रकार होतो. 'टकटक नजर पडतोय पदर' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - सून लाडकी या घरची), 'बाई माझी करंगळी मोडली' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पडछाया), 'साडी दिली शंभर रुपयांची' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - वैशाख वणवा), या गाण्यांमधून ते अस्सल लावणी पेश करतात. 'नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक' (गायिका - आशा भोसले / चित्रपट - पाठलाग), या गाण्यात 'करू नको पुन्हा हा गुन्हा' मधले 'हा गुन्हा' हे शब्द गद्यात टाकून गाण्याला वेगळीच उंची देतात. मधूनच 'गोमू माहेरला जाते हो नाखवा' (गायक - पं.जितेंद्र अभिषेकी / चित्रपट - वैशाख वणवा), या गाण्यातून ते गायक अभिषेकीबुवांना संपूर्णपणे वेगळ्याच कोळीगीताच्या ढंगात सुनावतात. 'घुमला हृदयी नाद हा' (गायिका - अनुराधा पौडवाल / चित्रपट - यशोदा), या गाण्यात तर ते संगीतातली अक्षरशः वेड लावणारी व्हरायटी सादर करतात. त्यातल्या शेवटच्या 'पडसाद हा, पडसाद हा, पडसाद हा' या शब्दांचा इम्पॅक्ट निव्वळ शब्दांपलीकडचा.

माझी भावना तरी अशी आहे की, संगीतकार म्हणून डी.डीं.नी जी प्रतिभा दाखवली तिचं व्हायला हवं तेवढं कौतुक, तेवढं चीज झालेलं नाही आणि तुम्ही-आम्ही सर्वच संगीतप्रेमी डी.डीं.चं फार मोठं देणं लागतो.                 

माझ्या पसंतीची दहा गाणी --

) आसावल्या मनाला माझाच राग येतो - आशा / चित्रपट - पाहू किती रे वाट
) कुणी बाई गुणगुणले - आशा / भावगीत
) चांदण्यात ह्या धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी - लता/चित्रपट-घरची राणी
) टकटक नजर पडतोय पदर - आशा / चित्रपट - सून लाडकी या घरची
) तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा - लता / भावगीत
) थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी - आशा / भावगीत
) प्रीत माझी पाण्याला जाते - आशा / चित्रपट - सून लाडकी या घरची
) बाई माझी करंगळी मोडली - आशा / चित्रपट - पडछाया
) मज सुचले गं सुचले मंजुळ गाणे - आशा / चित्रपट - पाहू किती रे वाट
१०) संथ वाहते कृष्णामाई - सुधीर / चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई

--- भाग . दत्ता डावजेकर - मा प्त
क्रमशः - - #भाग८)यशवंतदेव


ता  -  प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           माहिती मुख्यतः गुगलविकिपीडिया  इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेलीवाचलेली आहे.
           लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेतअर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहाआहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.

@प्रसन्न सोमण –

प्रसिद्धी - अभूतपूर्व (जुलै २०२०)


दत्ता डावजेकर