Wednesday, 18 July 2018

लकवा –- ९ शीर्षक - परिस्थितीची प्रश्नचिन्हं .....


 n लकवा –- ९.

शीर्षक - परिस्थितीची प्रश्नचिन्हं .....

     कुणी चांगल्या सायकॅट्रिस्टचा रेफरन्स द्याल का ? ... मला खरंच सायकॅट्रिस्ट हवाय ...

----- 

     जयुवर माझं खूप प्रेम आहे ... पण तरीही हल्ली आमच्या कुरबुरी, आमची भांडणं नक्कीच व्हायला लागलीयत ... शेवटी प्रेम प्रेम म्हटलं तरी त्या व्यक्तीशी अगदी एकरूप होणं शक्यच नसतं ना ! ... तशी फक्त कृष्णाशी राधा एकरूप झालीवती म्हणे ... जस्ट पुराणातली वांगी ... त्यातही राधा - म्हणे - कृष्णाशी एकरूप झालीवती; पण कृष्ण नव्हे ... कृष्णाच्या बाबतीत सोयीस्कर मौनच आहे ... बहुदा म्हणूनच 'राधाकृष्ण' म्हणतात, 'कृष्णराधा' नव्हे ... ते असो ... जयु आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती आहोत ... दोन व्यक्ती म्हटल्यावर दोन मनं आली, अनेकविध मतं आली आणि पर्यायाने मतभेद आलेच ... त्याला काय करणार ? मतभेदांचं मुख्य, किंवा कदाचित एकमेव, कारण आमचा आमोद ...

     सगळं सुरुवातीपासूनच सांगू का ? ..... सांगायला तर हवंच ... सांगण्यासाठीच तर लिहितोय ना ! ...

     शिक्षण आटोपल्यानंतर, अर्निंग सुरु झाल्यानंतर; धर्म, जात-पात, स्टेटस अँड ऑल, यांचा ठोकताळा मनात बांधूनच आमचं प्रेम, लग्नाच्या आणाभाका असं सगळं साग्रसंगीत पार पडलं ... पण वेगळा संसार मांडायचाय हे ठरलंच होतं ... त्यामुळे मनासारख्या जागेची तजवीज होईस्तोवर लग्न लांबलं ... लग्नानंतर 'एन्जॉय' करायचं असल्यामुळे पाळणा थोडा अधिकच लांबला ... आणि पहिल्या पाळण्याची चाहूल लागेस्तोवर जयुनी तिशी पार केली ... अर्थात दोघांनीही आधीच्या पिढीच्या ओढगस्तीच्या संसाराबद्दल बरंचसं ऐकलं-वाचलं होतं; थोडंफार अनुभवलंही होतं ... ती ओढगस्त आपल्या संसारात नको नको म्हणता म्हणता 'हवं हवं' ते सारं जमवेस्तोवर जरा जास्तच उशीर झाला खरा ... जयुच्या वयाच्या बत्तिशीला बाळाची चाहूल लागली ... प्रेग्नन्सीच्या काळात सारं काही आलबेल होतं ... योग्य वेळी, थोडीफार कॉम्प्लिकेशन्स होऊन का होईना, आमची गोंडस छोकरी जन्माला आली ... कॉम्प्लिकेशन्स फक्त जयुच्या तब्येतीबाबत होती ... त्यामुळे जयु पुढे कधीही गरोदर राहता कामा नये, असा मेडिकल इशारा आम्हाला दिला गेला ... अर्थात गोंडस छोकरीच्या जन्माच्या आनंदात आम्ही ही वस्तुस्थिती सहजच मान्य केली .... जयु बाळासह सुखरूप घरी आली .... सुखानी भरलेला महिना हा हा म्हणता संपला आणि ... सुखी संसाराच्या दुधात दुर्दैवाचं विरजण पडलं ... बाळाला कावीळ झाल्याचं निमित्त झालं आणि इतर गुंतागुंत वाढत जाऊन आमच्या बाळाचा मृत्यू झाला ... दोघंही हताश झालो .... सुरुवातीला लाइटली घेतलेल्या 'त्या' मेडिकल इशाऱ्यातली तीव्रता जयुला तर खूपच जाणवायला लागली .... 'काळ हेच दुःखावरचं एकमेव औषध असतं' हे वाक्य खूपदा वाचलंवतं; काही वेळा आम्ही ते दुसऱ्या दुःखी जीवाला ऐकवलंही होतं; पण याच वाक्याचा प्रत्यय आम्हालाही घ्यावा लागेल, हे मनीस्वप्नीही नव्हतं ... पण हे वाक्य खरं आहे हे नक्कीच ! .... दीडदोन वर्षात दोघं सावरलो .... पण अपत्यसुख ? ... त्याची आंस असतेच ना ? ....

     ऍडॉप्शनचा निर्णय घेऊन आम्ही दोघंही अनाथाश्रमात .... सहा महिन्यांचा गुटगुटीत, मस्त, खेळकर मुलगा ... नांव आमोद .... अनाथाश्रमानंच ठेवलेलं ... धर्म, जात, पोटजात, बीज, सर्व माहिती अर्थातच गोपनीय ... नाहीतरी आम्हालाही त्या माहितीची गरज नव्हतीच ... वाढतांना तो जीव आपोआपच आमच्या लाइफस्टाइल नुसार वाढणार होता ... वाढत होता .... आयुष्यात सुखं रिझ्युम होत होती ... होता होता आमोद साताठ वर्षाच्या वयात आला ... जयुनी आणि मी त्याला त्याच्या भाषेत, गोडीगुलाबीत वस्तुस्थिती सांगून टाकली ...

     इथूनच परिस्थिती, मुंगीच्या पावलांनी पण निश्चितपणे, बिनसायला लागली असावी ... त्याही नंतर तीनचार वर्ष गेली ... आम्ही पंचेचाळीशीच्या आतबाहेर आलो ... तब्येतींच्या काही तक्रारी, काही ऑफिसच्या जबाबदाऱ्यांची टेन्शन्स, असं सगळं चालूच होतं ... त्यातच चौथी-पाचवी पर्यंत तशी चांगली असलेली आमोदची शैक्षणिक प्रगती सातवी-आठवीच्या दरम्यान ऍव्हरेज व्हायला लागली ... अडनिड्या वयात हळूहळू येणाऱ्या उद्दामपणाबरोबरच; 'नाहीतरी तुम्ही थोडेच माझे सख्खे आईबाबा आहात ?' ... असा एक प्रश्न मला त्याच्या नजरेत दिसायला लागला, माझ्याशी त्याच्या तुटक वागण्यातून थोडा जाणवायलाही लागला ... मात्र ही सगळी अनुभूती माझी होती ... जयुच्या प्रेमळ, सहज वागण्यात कसलाच फरक पडला नव्हता आणि बहुदा आमोदच्या जयुवरच्या प्रेमातही .... मात्र आड वयातल्या आमोदच्या अंतर्मनात काय विचार चालू असतील देव जाणे ! ... तसं वरकरणी सगळं ठीक होतं, त्यामुळे की काय पण, परिस्थिती हळू हळू बदलायला लागलीय, विपरीत वळण घ्यायला लागलीय, असं जयुला अजिबातच जाणवत नव्हतं ... त्यामुळे तिचं आमोदशी प्रेमानं वागणं, लाड करणं तसंच होतं ... कुठेतरी मला तिचा अतिप्रेमळपणा खटकतही होता .... अर्थात माझ्या मनातल्या शंका खरंच खऱ्या आहेत का ? ... की त्या माझ्या मनाच्या कोतेपणामुळे मला जाणवतायत, हे मला निश्चित ठरवता येईना ... त्यामुळे या विषयावर जयुशी स्पष्टपणे संवाद साधणंही मी टाळत होतो ...  त्यामुळेच की काय, हळूहळू जयुच्या आणि माझ्या नात्यातही दुरावा यायला लागला ...

     बस्स ! … गोष्ट इथेच थांबवायला हवी ! ... कारण ती इथे येऊन थांबलेली आहेच ....

     पण गोष्ट खरंच थांबलीय का ? .... मनाला असंख्य प्रश्नांचे भुंगे पोखरत चाललेत त्याचं काय ? ... परमेश्वरा ! ... मी नक्की काय करू ?, कसा वागू ? .... कुटुंबातला कर्ता पुरुष, हेड ऑफ फॅमिली म्हणून तिघांच्याही भल्याचा विचार मी करतो आहेच, म्हणून तर ही अस्वस्थता ... पण जुन्या कथा-कादंबऱ्यांत हमखास आढळणारी … 'आणि सर्वजण सुखाने नांदायला लागले,' … अशी परिस्थिती मला कशी आणता येईल ? ... की 'जे जे होईल ते ते पाहावे' अशा वृत्तीने एकेक दिवस ढकलत राहावा ? .... नक्की काय करू तरी काय ? .... अरे 'कर्ता पुरुष' अशी पदवी दिली म्हणजे तो पुरुष 'सर्वसाक्षी परमेश्वर' थोडाच होतो ? ... खरंच मला कळेनासं झालंय ... मी भ्रांतचित्त झालोय .... सोप्या भाषेत भैसाटलोय ...

     कुणी सायकॅट्रिस्ट देता का सायकॅट्रिस्ट ? ...

@प्रसन्न सोमण.
०९/०७/२०१८.

स्पष्टीकरण --
) लकवा म्हणजे --- = लघुत्तम, = कथा आणि वा = वाङ्मय
) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------

Thursday, 5 July 2018

लकवा –- ८ शीर्षक - विकासाचे अपरिहार्य दुष्परिणाम ?

n लकवा –- ८.

शीर्षक - विकासाचे अपरिहार्य दुष्परिणाम ?

          गाडी राजापूर जवळ आलीच होती ...... वळणं घेत घेत गाडी राजापूरजवळच्या डोंगराळ आंग्ले गावात शिरली..... वास्तविक हे माझं गाव नव्हे, ..... माझ्या अगदी लंगोटीयाराचं हे गाव ..... दिनक्याचं ..... दिनकर गोखले ..... मुंबईत चाळवजा इमारतीत अगदी माझ्या शेजारची दोन घरं सोडून राहणारा .... माझ्यापेक्षा फक्त सहा महिन्यांनी मोठा .... अगदी मनमिळावू आणि सरळ होता तो .... होता ? ...... हो, चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाला आणि गेल्याच महिन्यात वारला ...... प्राक्तन ..... तर सांगायची गोष्ट म्हणजे, अगदी शाळेत असल्यापासून दिनक्याबरोबर दर सहा महिन्यांनी सुट्टीत माझा मुक्काम आंग्ल्याला ..... नाहीतरी मला स्वतःला गाव नव्हतंच ..... दिनक्याचे, मुलबाळ नसलेले काका-काकू, म्हणजे गोखले काका-काकू सुद्धा विलक्षण प्रेमळ .... अगदी सुट्ट्या संपेपर्यंत आम्ही आंग्ल्यात उंडारत असायचो .... कोकणी मेवा हादडत असायचो .... शेजारच्याच घरातल्या साने काका-काकूंच्या दोन मुलांबरोबरही आमचं मस्त जमत असे ..... त्यामुळे साने काकांचं घरही गावातलं आमचं दुसरं घरच होतं....
          शाळेतल्या इयत्ता वाढल्या, अभ्यास वाढला, दिनक्या दोनच गल्ल्या पलीकडे पण ब्लॉकमध्ये गेला .... मैत्री तशीच होती, पण हळूहळू नाही म्हटलं तरी आंग्ल्याच्या फेऱ्या आक्रसल्या आणि मग थांबल्याच...... मधूनच काका-काकूंना दिनक्याची पत्रं जात होती एवढंच ......दोघेही शिकलो ..... चांगल्या नोकऱ्या धरल्या ..... काही काळात गोखले काका-काकू दोघंही वारले आणि आंग्ल्याच्या घराचा, इस्टेटीचा वाटा दिनक्याच्या बाबांच्या आणि यथावकाश दिनक्याच्या ताब्यात आला ..... अर्थात मुंबईच्या ससेहोलपटीमुळे आंग्ल्याचं बंद घर ओसाड, बेजानच राहिलं .....
-----
          "भावजी ! प्लिज माझं एक काम कराल का ?" ...... नेहानी - दिनक्याच्या बायकोनी - विचारलं .... "असं आहे .... आमच्या सुयशला गावाबिवाबद्दल अजिबातच ओढ नाहीये; तेव्हा माझ्यासाठी प्लिज आंग्ल्याला जाल का ? तिथे यांच्या नावावरच्या घराची, जमिनीची आत्ताची परिस्थिती पाहून या .... मला आता ते सगळं विकून मोकळं व्हायचंय ....."
-----
          आंग्ल्यात शिरतानांच गावानी चांगलीच कात टाकली असल्याचं लक्षात आलं ..... मुंबई स्टाईलची बरीच नवीन घरं झालीवती..... नवीन दुकानं सुद्धा कितीतरी झालीवती ..... ऐन बाजारपेठेत तर नवीन घरांची आणि दुकानांची थोडीशी गर्दीच झालीवती ...... गाव मॉडर्न झालंवतं ..... अगदी एक सायबर कॅफे सुद्धा दिसलं ..... गोखले काका-काकू वगळता माझं असं दुसरं घर एकच ..... मी सानेकाकांकडे गेलो ..... काकू अलीकडेच गेल्या होत्या ..... सानेकाकाही थकले होते .... मात्र शरीर अजूनही शेतात राबणारं होतं हे लक्षात येत होतं .... त्यांना मी येण्याचं प्रयोजन सांगितलं ....
          "नेहाला म्हणावं काळ बराच बदललाय, बदलतोय .... घर जमिनींना कधीही नव्हत्या एवढ्या मोठ्यामोठ्या किमती येतायत ...... जमिनी, घर अजिबात विकू नकोस; आपली ब्राह्मण घरं अजिबात कमी होता कामा नयेत" काका गंभीर चेहऱ्यानं सांगायला लागले ..... "फक्त व्यवस्थितपणे कागदपत्र करून मुलाच्या नावावर करून घे ....... आमच्यासारखी गत होऊ देऊ नकोस .....  "
          "म्हणजे ? ...... काका, तुमचा काही प्रॉब्लेम झालाय ? "
        "काय सांगू ? जेमतेम अडतीस गुंठे जमीन माझी ...... एकराला सुद्धा थोडी कमीच ...... आज पन्नासेक वर्ष कष्ट करून ओसाड जमीन कलमं, माड-पोफळी, काजू, रातांबे लावून थोडीशी नावारूपाला आणलीय मी ..... माझ्या दूरच्या पुतण्याच्या डोळ्यांवर आलीय ती !"
          "म्हणजे ?"
          "अरे वडिलार्जित जमीनच माझ्या वडिलांना मिळाली होती ना ? ...... वास्तविक गावच्या मिळकतीत काहीही रस नसल्याचा कागद माझ्या चुलत चुलत चुलत्यांनी माझ्या वडिलांना करूनही दिला होता ..... पण आता तो सापडतच नाहीये ...... सापडला तरी काय म्हणा ? त्या काळचा रजिस्टर्ड नसलेला कागद तो .... एका हयात नसलेल्या साक्षीदाराची सही त्यावर ... नैतिकता नाही मानली तर कायदेशीर किंमत कितीशी असणार त्या कागदाला ?"
          "पण मग आता प्रॉब्लेम काय आहे काका ?"
          "अरे दूरचा पुतण्या हिस्सा मागतोय आता ...... त्यानं स्पष्ट सांगितलंनीत मला की, ‘काका आधीच्या काळात आम्हाला इंटरेस्ट नव्हता, हे खरंच आहे, तेव्हा तर वीजही नव्हती .... पण आता कोकणात झपाट्यानं विकास होतोय ..... ट्रेन आलीय, जवळच राजापूर स्टेशन आहे ..... जमिनींना सोन्याचे भाव आलेत ..... मग आता या चांगल्या दिवसात आम्हालाही वाटा मिळू द्या ! .....’ सरळपणे हिस्सा नाही मिळाला तर केस करायची इन्डायरेक्ट हिंट दिलीय त्यानं "
          "काय सांगताय काका ? ... मग ठीक आहे ! ..... तोवर तुम्हालाही तो हरवलेला कागद सापडेलच .... तुम्ही कोकणातले लोक केसची चिंता कधीपासून करायला लागलात ?"
          "केस होऊन काय होणार ? अरे झालेला विकास नष्ट करून, काळ मागे नेऊन मी जुना काळ तर परत आणू शकत नाही ना ? .... चालायचंच ! …. हिस्सा तर द्यावाच लागणार ! ... असे हिस्से तोडून देण्यापेक्षा कधीकधी असं वाटतं की जुनं मागासलेलं कोकण काय वाईट होतं ?" .                                    

@प्रसन्न सोमण.
१७/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
) लकवा म्हणजे --- = लघुत्तम, = कथा आणि वा = वाङ्मय
) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------

Monday, 18 June 2018

लकवा –- ७. शीर्षक - इथे ओशाळले दुर्दैव

n लकवा –- ७.

शीर्षक - इथे ओशाळले दुर्दैव

          "माझं एक काम करशील ? ... माझे पुरुकाका तुझ्याजवळच एक गल्ली सोडून राहतात. त्यांना प्लिज मी देतो ती महत्वाची डॉक्युमेंट्स उद्या नेऊन दे ना ! ....."
            "पुरुकाका ?"
          "हो ! ...... पुरुषोत्तम धारप ..... माझ्या आत्त्याचे मिस्टर ...... ही इज एटीफोर ...... बट स्टील गोईंग स्ट्रॉंग ...... त्यांनी खूप काही भोगलंय ...... त्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल ते रोज थोडं थोडं लिहीतायत सुद्धा ......  त्यांची इन्व्हेस्टमेन्टची डॉक्युमेंट्स आहेत ....... मी त्यांना फोन करून ठेवतो......"
          "ओके ....."

--------

          "या ..... बसा ..... बसा ....... अलभ्य लाभ ....." काकांनी प्रसन्न चेहऱ्यानी स्वागत केलं ..... हा माणूस चौऱ्याऐंशी वर्षांचा आहे यावर विश्वास बसणं अशक्य होतं…… "आमच्या रघुनी मला डॉक्युमेंट्स पाठवतो म्हणून फोन करून ठेवला होता ........ तुम्हाला उगाच त्रास ......"
          "नाही नाही काका ! प्लिज डोन्ट मेन्शन ........ ही तुमची डॉक्युमेंट्स ........ बरंय ! ..... निघू ?"
          "नो नो ...... बसा ना ! चहा तरी करतो ..... रविवार सकाळ आहे ...... थोडा वेळ आम्हा म्हाताऱ्यांना द्यायला हरकत नाही ...." काका हसतच म्हणाले. इतका हसतमुख आग्रह मला टाळावासा वाटला नाही ...... मी बसलो.
           दहा मिनिटात काका चहा घेऊन आले.
          "काका चहा तुम्हीच केलात ? घरी दुसरं कुणी नाही का ? ..."
          "नाही हो ! ....... तसं माझं घर म्हणजे भरलेलं गोकुळ होतं ....... पण सगळी पिल्लं उडून गेली हो !" ...... हे सांगतांना सुद्धा काकांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तशीच होती ........ मात्र आवाज थोडा घोगरा झाल्याचं मला जाणवलं.
          "काका सॉरी ! ....... तुम्हाला त्रास होत असेल ....... मीही निघतो आता."
          "नो नो ! त्रास मुळीच नाही ! ..... बसा हो ! एरव्ही आमचं ऐकून तरी कोण घेतंय ?"
          "काका मला रघुनी तुमच्याबद्दल थोडंसं सांगितलंय ...."
          "अस्सं ? ..... पण तो तसा दूर राहणारा भाचा आहे हो .... त्यालाही सगळ्या गोष्टी माहित नाहीयेत ... तशी माझ्या आयुष्यानं खूपच वळणं घेतलीयत .... आज मात्र सगळीच मजा वाटत्येय .....".
          "ओके ..... सांगा काका ...... तेवढंच मलाही मनानं त्या काळात जाता येईल."
          "डोन्ट वरी ! ......" काका हसत हसत म्हणाले ..... "तुम्हाला जास्त बोअर करणार नाही ..... थोडक्यातच फक्त आयुष्यातली वेगवेगळी वळणं सांगतो ...."
          "........."
          "मी दूर कोकणात फक्त वडिलांबरोबर राहणारा आईवेगळा मुलगा होतो ..... जेमतेम थोडीशी शेती आणि थोडीशी भिक्षुकी करणारे माझे वडील माझ्या वयाच्या दहाव्याच वर्षी अचानक गेले ..... पोरका झालो ..... गावच्या अगदी दूरच्या मावशींनी मला मुंबईत माझ्या मावसमामांकडे पाठवलं ....... मामांनीही गिरगावात मला शाळेत घातलं; पण कायम शिष्यवृत्ती मिळवूनच शिकावं लागेल हे बजावलं ........ पडतील ती कामं केली ........ गॅलरीत झोपलो ..... वार लावून जेवलो - सोफेस्टीकेटेड भीकच ती - ...... पण पहिला नंबर, शिष्यवृत्ती कायम टिकवली ...... त्याकाळात ६८ टक्क्यांनी मॅट्रिक झालो ..... लगेच सचिवालयात नोकरीला लागलो .... लग्नही केलं ..... सुमती - माझी सुमा - तिनी आमचा संसार कमालीच्या निगुतीनं केला...... आमची सुयश, सुरेश आणि सुनील अशी तीन मुलं आणि सुमा ...... सगळ्यांच्या रूपानी मी आयुष्यात पहिल्यांदा सुखाचा वारा अंगावर घेतला."
          "मग काका, कुठे असतात आता काकू आणि मुलं ? ..."
         "सगळेच वारले हो !" हे सांगतांना सुद्धा काकांचा चेहरा प्रसन्नच होता, एवढंच नव्हे त्यांच्या आवाजातला सहजपणा सुद्धा तसाच होता.
          "माय गॉड ! काय सांगताय काय काका ? ...... खूपच हॉरिबल आहे हे ........ तुम्ही एवढ्या शांतपणे कसं सांगताय ?"
          "काय करायचं हो ? .... सगळेच दैवाचे खेळ ..... आता शांत राहून आपली कर्तव्य करत राहतो झालं ! ...... सुयश मिलिट्रीत होता ....... अतिरेक्यांच्या चकमकीत मारला गेला ...... सुरेश हुशार होता ...... टोरँटोला गेला ..... तिकडेच अचानक हार्टफेलनी गेला ..... धाकटा सुनील सुनबाईबरोबर आमच्याकडे राहत होता .... तोही चार वर्षांपूर्वी कॅन्सरनी गेला ....... पाठोपाठ सुनबाईही आमच्या आयुषला जन्म देऊन बाळंतपणात गेली .... आणि जवळ जवळ ४५ वर्ष साथ देणारी सुमाही गेल्या वर्षी गेली."
          माझ्याच्यानी ऐकणंसुद्धा मुश्किल झालं; पण काका खरंच शांत होते ...... कदाचित मुखवटाही असेल, पण तरी तेही सोपं नाही ....
          "बापरे ! सो सॅड !! ... पण काका या सगळ्यात तुमची तब्येत ?"
        "पहिल्यापासून योगासनं, व्यायाम यामुळे असेल, पण तब्येत ठीकठाक राहिली खरी ! ..." मग हसतहसत म्हणाले, "अहो दैवाला सुद्धा एवढं कळतंय, की या म्हाताऱ्याला आडवा पाडून चालणारच नाही ..... मला फक्त एकच गम्मत वाटते .... सुमा आणि मी दोघंच, खूप वर्ष आवडीनं रमी खेळायचो ..... मनाजोगती पानं नाही आली की मी हमखास पॅक व्हायचो .... सुमा मात्र फतरी पानं घेऊनही खेळत राहायची .... आज मला मात्र आयुष्य तसं खेळावं लागतंय ... नॉन-पॅक  .... ठीक आहे ..... चलता है ..."
        माणसाच्या आयुष्यात आपत्ती तरी किती असाव्यात ? ... तेवढ्यात आतून आया काकांच्या नातवाला घेऊन आली ..... नातवाचा पाय तोकडा ? ..... पोलियो ? ? ......                   

@प्रसन्न सोमण.
१६/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ---------- 

Tuesday, 5 June 2018

लकवा –- ६. शीर्षक - काहीही हं सुलू !

n लकवा –- ६.

शीर्षक - काहीही हं सुलू !

          "हॅलो"
          "हॅलो .... हं ..... मिस्टर सुनील देसाई बोलतायत का ?"
         "सुलेखा ? ..... अगं तू बरी आहेस ना ? ….. तू मला मोबाईलवर फोन केलायस, लँड लाईनवर नव्हे !"
          "इश्श्य ! विसरलेच मी ! अहो, आज संध्याकाळी लवकर येताय ना?"
          "का गं ? ..... लवकर कशासाठी ? ....."
         "अय्या, विसरलात तुम्ही ? अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ! ..... बाहेर शॉपिंग करून डिनर घेऊन सेलिब्रेट नाही का करायचा? ....."
          "ओह ! ..... सॉरी सुलू ! खरंच साफ विसरलो गं !"
          "मग संध्याकाळी लवकर या .... मी वाट बघते."
          "नाही सुलू...... प्लिज ..... हे बघ, खरंच आय ऍम सॉरी; पण आज संध्याकाळी लवकर यायला नाही जमणारे मला."
          "ते नाही चालायचं हं ....."
          "अगं सुलू आज दुपारनंतर मला मिटिंग आहे, ती उशिरापर्यंत चालेल...... मला खरंच नाही जमणार गं आज ! ....."
          "अहो तुम्ही बॉस म्हणून जाणार आहात ना त्या मीटिंगला, की कारकून म्हणून ? ..... ते मला काही माहित नाही ..... मिटिंग लवकर गुंडाळा, पुढे ढकला, काय वाट्टेल ते करा ...... मला तुम्ही आज संध्याकाळी लवकर घरी हवे आहात म्हणजे हवे आहात ......"
          "सुलू प्लिज ट्राय अँड अंडरस्टॅंड ! ..... ही मिटिंग खूप महत्वाची आहे !! ....."
          "मी तुम्हाला काय ते सांगितलंय ! ...... मला का SS ही आर्ग्युमेंट्स नकोयत !! ..... "
        "हे बघ सुलू, आज आपल्या लग्नाचा काही पहिला वाढदिवस नाहीये ..... चौदावा आहे ..... आपण प्लिज नंतर कधीतरी जाऊया......"
       "हे बघा .... तुमचा, माझा, आपला मुलगा म्हणून आपल्या सतीशचा आणि आपल्या लग्नाचा; असे चार वाढदिवस आपण चुकता सेलिब्रेट करतो...... करतो ना ? ..... मग त्यात नो कॉम्प्रोमाइज......"
        "अगं एवढी वर्ष आपण सेलिब्रेट केलेच ना ? ..... नंतरही करूच ...... पण आज खरंच शक्यच नाहीये गं सुलू ...... हे बघ, माझ्यावर ऑफिसच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. तेव्हा प्लिज मला हार्श बोलायला लावू नकोस ..... आज ? ..... शुअरली नॉट पॉसिबल....."
          " ........... "
          " ........... "
          " ........... "
          "चल बाय सुलू ! ..... मला आता बोलत बसायलाही वेळ नाहीये ...... ठेवतो ........"
          "एक मिनिट .........."
          "काय आता ?"
       "हे बघा, चार दिवसांपूर्वी आपल्या भीमाबाई रजा घेऊन पंधरा दिवसांसाठी गावाला गेल्या."
         "मग ठीक आहे ना ! ..... दॅट इज युवर फ्रंट !! ..... मला का सांगत्येयस हे ? ....."
        "एकच मिनिट ऐका तर खरं ! ..... भीमाबाई धुणं-भांड्यांसाठी आणि झाडू-पोछासाठी बदली बाई देऊन गेल्यायत ......"
           "बरं मग ? ......"
          "मग तसंच तुम्हीही तुमच्या ऍबसेन्समध्ये तुमच्याऐवजी कुणीतरी बदली द्या ना माझ्यासाठी ......."  
              
@प्रसन्न सोमण.
१५/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------