n लकवा –- ६.
शीर्षक - काहीही हं सुलू !
"हॅलो"
"हॅलो .... हं ..... मिस्टर सुनील देसाई बोलतायत का ?"
"सुलेखा ? ..... अगं तू बरी आहेस ना ? ….. तू मला मोबाईलवर फोन केलायस, लँड लाईनवर नव्हे !"
"इश्श्य ! विसरलेच मी ! अहो, आज संध्याकाळी लवकर येताय ना?"
"का गं ? ..... लवकर कशासाठी ? ....."
"अय्या, विसरलात तुम्ही ? अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ! ..... बाहेर शॉपिंग करून डिनर घेऊन सेलिब्रेट नाही का करायचा? ....."
"ओह ! ..... सॉरी सुलू ! खरंच साफ विसरलो गं !"
"मग संध्याकाळी लवकर या .... मी वाट बघते."
"नाही सुलू...... प्लिज ..... हे बघ, खरंच आय ऍम सॉरी; पण आज संध्याकाळी लवकर यायला नाही जमणारे मला."
"ते नाही चालायचं हं ....."
"अगं सुलू आज दुपारनंतर मला मिटिंग आहे, ती उशिरापर्यंत चालेल...... मला खरंच नाही जमणार गं आज ! ....."
"अहो तुम्ही बॉस म्हणून जाणार आहात ना त्या मीटिंगला, की कारकून म्हणून ? ..... ते मला काही माहित नाही ..... मिटिंग लवकर गुंडाळा, पुढे ढकला, काय वाट्टेल ते करा ...... मला तुम्ही आज संध्याकाळी लवकर घरी हवे आहात म्हणजे हवे आहात ......"
"सुलू प्लिज ट्राय अँड अंडरस्टॅंड ! ..... ही मिटिंग खूप महत्वाची आहे !! ....."
"मी तुम्हाला काय ते सांगितलंय ! ...... मला का SS ही आर्ग्युमेंट्स नकोयत !! ..... "
"हे बघ सुलू, आज आपल्या लग्नाचा काही पहिला वाढदिवस नाहीये ..... चौदावा आहे ..... आपण प्लिज नंतर कधीतरी जाऊया......"
"हे बघा .... तुमचा, माझा, आपला मुलगा म्हणून आपल्या सतीशचा आणि आपल्या लग्नाचा; असे चार वाढदिवस आपण न चुकता सेलिब्रेट करतो...... करतो ना ? ..... मग त्यात नो कॉम्प्रोमाइज......"
"अगं एवढी वर्ष आपण सेलिब्रेट केलेच ना ? ..... नंतरही करूच ...... पण आज खरंच शक्यच नाहीये गं सुलू ...... हे बघ, माझ्यावर ऑफिसच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. तेव्हा प्लिज मला हार्श बोलायला लावू नकोस ..... आज ? ..... शुअरली नॉट पॉसिबल....."
"
........... "
"
........... "
"
........... "
"चल बाय सुलू ! ..... मला आता बोलत बसायलाही वेळ नाहीये ...... ठेवतो ........"
"एक मिनिट .........."
"काय आता ?"
"हे बघा, चार दिवसांपूर्वी आपल्या भीमाबाई रजा घेऊन पंधरा दिवसांसाठी गावाला गेल्या."
"मग ठीक आहे ना ! ..... दॅट इज युवर फ्रंट !! ..... मला का सांगत्येयस हे ? ....."
"एकच मिनिट ऐका तर खरं ! ..... भीमाबाई धुणं-भांड्यांसाठी आणि झाडू-पोछासाठी बदली बाई देऊन गेल्यायत ......"
"बरं मग ? ......"
"मग तसंच तुम्हीही तुमच्या ऍबसेन्समध्ये तुमच्याऐवजी कुणीतरी बदली द्या ना माझ्यासाठी ......."
@प्रसन्न सोमण.
१५/०४/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम,
क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने
लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही
आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण
जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी
असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ...
(क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट
... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत;
म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच
शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)
No comments:
Post a Comment