Monday, 18 June 2018

लकवा –- ७. शीर्षक - इथे ओशाळले दुर्दैव

n लकवा –- ७.

शीर्षक - इथे ओशाळले दुर्दैव

          "माझं एक काम करशील ? ... माझे पुरुकाका तुझ्याजवळच एक गल्ली सोडून राहतात. त्यांना प्लिज मी देतो ती महत्वाची डॉक्युमेंट्स उद्या नेऊन दे ना ! ....."
            "पुरुकाका ?"
          "हो ! ...... पुरुषोत्तम धारप ..... माझ्या आत्त्याचे मिस्टर ...... ही इज एटीफोर ...... बट स्टील गोईंग स्ट्रॉंग ...... त्यांनी खूप काही भोगलंय ...... त्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल ते रोज थोडं थोडं लिहीतायत सुद्धा ......  त्यांची इन्व्हेस्टमेन्टची डॉक्युमेंट्स आहेत ....... मी त्यांना फोन करून ठेवतो......"
          "ओके ....."

--------

          "या ..... बसा ..... बसा ....... अलभ्य लाभ ....." काकांनी प्रसन्न चेहऱ्यानी स्वागत केलं ..... हा माणूस चौऱ्याऐंशी वर्षांचा आहे यावर विश्वास बसणं अशक्य होतं…… "आमच्या रघुनी मला डॉक्युमेंट्स पाठवतो म्हणून फोन करून ठेवला होता ........ तुम्हाला उगाच त्रास ......"
          "नाही नाही काका ! प्लिज डोन्ट मेन्शन ........ ही तुमची डॉक्युमेंट्स ........ बरंय ! ..... निघू ?"
          "नो नो ...... बसा ना ! चहा तरी करतो ..... रविवार सकाळ आहे ...... थोडा वेळ आम्हा म्हाताऱ्यांना द्यायला हरकत नाही ...." काका हसतच म्हणाले. इतका हसतमुख आग्रह मला टाळावासा वाटला नाही ...... मी बसलो.
           दहा मिनिटात काका चहा घेऊन आले.
          "काका चहा तुम्हीच केलात ? घरी दुसरं कुणी नाही का ? ..."
          "नाही हो ! ....... तसं माझं घर म्हणजे भरलेलं गोकुळ होतं ....... पण सगळी पिल्लं उडून गेली हो !" ...... हे सांगतांना सुद्धा काकांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तशीच होती ........ मात्र आवाज थोडा घोगरा झाल्याचं मला जाणवलं.
          "काका सॉरी ! ....... तुम्हाला त्रास होत असेल ....... मीही निघतो आता."
          "नो नो ! त्रास मुळीच नाही ! ..... बसा हो ! एरव्ही आमचं ऐकून तरी कोण घेतंय ?"
          "काका मला रघुनी तुमच्याबद्दल थोडंसं सांगितलंय ...."
          "अस्सं ? ..... पण तो तसा दूर राहणारा भाचा आहे हो .... त्यालाही सगळ्या गोष्टी माहित नाहीयेत ... तशी माझ्या आयुष्यानं खूपच वळणं घेतलीयत .... आज मात्र सगळीच मजा वाटत्येय .....".
          "ओके ..... सांगा काका ...... तेवढंच मलाही मनानं त्या काळात जाता येईल."
          "डोन्ट वरी ! ......" काका हसत हसत म्हणाले ..... "तुम्हाला जास्त बोअर करणार नाही ..... थोडक्यातच फक्त आयुष्यातली वेगवेगळी वळणं सांगतो ...."
          "........."
          "मी दूर कोकणात फक्त वडिलांबरोबर राहणारा आईवेगळा मुलगा होतो ..... जेमतेम थोडीशी शेती आणि थोडीशी भिक्षुकी करणारे माझे वडील माझ्या वयाच्या दहाव्याच वर्षी अचानक गेले ..... पोरका झालो ..... गावच्या अगदी दूरच्या मावशींनी मला मुंबईत माझ्या मावसमामांकडे पाठवलं ....... मामांनीही गिरगावात मला शाळेत घातलं; पण कायम शिष्यवृत्ती मिळवूनच शिकावं लागेल हे बजावलं ........ पडतील ती कामं केली ........ गॅलरीत झोपलो ..... वार लावून जेवलो - सोफेस्टीकेटेड भीकच ती - ...... पण पहिला नंबर, शिष्यवृत्ती कायम टिकवली ...... त्याकाळात ६८ टक्क्यांनी मॅट्रिक झालो ..... लगेच सचिवालयात नोकरीला लागलो .... लग्नही केलं ..... सुमती - माझी सुमा - तिनी आमचा संसार कमालीच्या निगुतीनं केला...... आमची सुयश, सुरेश आणि सुनील अशी तीन मुलं आणि सुमा ...... सगळ्यांच्या रूपानी मी आयुष्यात पहिल्यांदा सुखाचा वारा अंगावर घेतला."
          "मग काका, कुठे असतात आता काकू आणि मुलं ? ..."
         "सगळेच वारले हो !" हे सांगतांना सुद्धा काकांचा चेहरा प्रसन्नच होता, एवढंच नव्हे त्यांच्या आवाजातला सहजपणा सुद्धा तसाच होता.
          "माय गॉड ! काय सांगताय काय काका ? ...... खूपच हॉरिबल आहे हे ........ तुम्ही एवढ्या शांतपणे कसं सांगताय ?"
          "काय करायचं हो ? .... सगळेच दैवाचे खेळ ..... आता शांत राहून आपली कर्तव्य करत राहतो झालं ! ...... सुयश मिलिट्रीत होता ....... अतिरेक्यांच्या चकमकीत मारला गेला ...... सुरेश हुशार होता ...... टोरँटोला गेला ..... तिकडेच अचानक हार्टफेलनी गेला ..... धाकटा सुनील सुनबाईबरोबर आमच्याकडे राहत होता .... तोही चार वर्षांपूर्वी कॅन्सरनी गेला ....... पाठोपाठ सुनबाईही आमच्या आयुषला जन्म देऊन बाळंतपणात गेली .... आणि जवळ जवळ ४५ वर्ष साथ देणारी सुमाही गेल्या वर्षी गेली."
          माझ्याच्यानी ऐकणंसुद्धा मुश्किल झालं; पण काका खरंच शांत होते ...... कदाचित मुखवटाही असेल, पण तरी तेही सोपं नाही ....
          "बापरे ! सो सॅड !! ... पण काका या सगळ्यात तुमची तब्येत ?"
        "पहिल्यापासून योगासनं, व्यायाम यामुळे असेल, पण तब्येत ठीकठाक राहिली खरी ! ..." मग हसतहसत म्हणाले, "अहो दैवाला सुद्धा एवढं कळतंय, की या म्हाताऱ्याला आडवा पाडून चालणारच नाही ..... मला फक्त एकच गम्मत वाटते .... सुमा आणि मी दोघंच, खूप वर्ष आवडीनं रमी खेळायचो ..... मनाजोगती पानं नाही आली की मी हमखास पॅक व्हायचो .... सुमा मात्र फतरी पानं घेऊनही खेळत राहायची .... आज मला मात्र आयुष्य तसं खेळावं लागतंय ... नॉन-पॅक  .... ठीक आहे ..... चलता है ..."
        माणसाच्या आयुष्यात आपत्ती तरी किती असाव्यात ? ... तेवढ्यात आतून आया काकांच्या नातवाला घेऊन आली ..... नातवाचा पाय तोकडा ? ..... पोलियो ? ? ......                   

@प्रसन्न सोमण.
१६/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ---------- 

No comments:

Post a Comment