n लकवा –- ८.
शीर्षक - विकासाचे अपरिहार्य दुष्परिणाम
?
गाडी राजापूर जवळ आलीच होती ...... वळणं
घेत घेत गाडी राजापूरजवळच्या डोंगराळ आंग्ले गावात शिरली..... वास्तविक हे माझं गाव
नव्हे, ..... माझ्या अगदी लंगोटीयाराचं हे गाव ..... दिनक्याचं ..... दिनकर गोखले
..... मुंबईत चाळवजा इमारतीत अगदी माझ्या शेजारची दोन घरं सोडून राहणारा .... माझ्यापेक्षा
फक्त सहा महिन्यांनी मोठा .... अगदी मनमिळावू आणि सरळ होता तो .... होता ? ...... हो,
चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाला आणि गेल्याच महिन्यात वारला ...... प्राक्तन
..... तर सांगायची गोष्ट म्हणजे, अगदी शाळेत असल्यापासून दिनक्याबरोबर दर सहा महिन्यांनी
सुट्टीत माझा मुक्काम आंग्ल्याला ..... नाहीतरी मला स्वतःला गाव नव्हतंच ..... दिनक्याचे,
मुलबाळ नसलेले काका-काकू, म्हणजे गोखले काका-काकू सुद्धा विलक्षण प्रेमळ .... अगदी
सुट्ट्या संपेपर्यंत आम्ही आंग्ल्यात उंडारत असायचो .... कोकणी मेवा हादडत असायचो
.... शेजारच्याच घरातल्या साने काका-काकूंच्या दोन मुलांबरोबरही आमचं मस्त जमत असे
..... त्यामुळे साने काकांचं घरही गावातलं आमचं दुसरं घरच होतं....
शाळेतल्या इयत्ता वाढल्या, अभ्यास वाढला,
दिनक्या दोनच गल्ल्या पलीकडे पण ब्लॉकमध्ये गेला .... मैत्री तशीच होती, पण हळूहळू
नाही म्हटलं तरी आंग्ल्याच्या फेऱ्या आक्रसल्या आणि मग थांबल्याच...... मधूनच काका-काकूंना
दिनक्याची पत्रं जात होती एवढंच ......दोघेही शिकलो ..... चांगल्या नोकऱ्या धरल्या
..... काही काळात गोखले काका-काकू दोघंही वारले आणि आंग्ल्याच्या घराचा, इस्टेटीचा
वाटा दिनक्याच्या बाबांच्या आणि यथावकाश दिनक्याच्या ताब्यात आला ..... अर्थात मुंबईच्या
ससेहोलपटीमुळे आंग्ल्याचं बंद घर ओसाड, बेजानच राहिलं .....
-----
"भावजी ! प्लिज माझं एक काम कराल का
?" ...... नेहानी - दिनक्याच्या बायकोनी - विचारलं .... "असं आहे .... आमच्या
सुयशला गावाबिवाबद्दल अजिबातच ओढ नाहीये; तेव्हा माझ्यासाठी प्लिज आंग्ल्याला जाल का
? तिथे यांच्या नावावरच्या घराची, जमिनीची आत्ताची परिस्थिती पाहून या .... मला आता
ते सगळं विकून मोकळं व्हायचंय ....."
-----
आंग्ल्यात शिरतानांच गावानी चांगलीच कात
टाकली असल्याचं लक्षात आलं ..... मुंबई स्टाईलची बरीच नवीन घरं झालीवती..... नवीन दुकानं
सुद्धा कितीतरी झालीवती ..... ऐन बाजारपेठेत तर नवीन घरांची आणि दुकानांची थोडीशी गर्दीच
झालीवती ...... गाव मॉडर्न झालंवतं ..... अगदी एक सायबर कॅफे सुद्धा दिसलं ..... गोखले
काका-काकू वगळता माझं असं दुसरं घर एकच ..... मी सानेकाकांकडे गेलो ..... काकू अलीकडेच
गेल्या होत्या ..... सानेकाकाही थकले होते .... मात्र शरीर अजूनही शेतात राबणारं होतं
हे लक्षात येत होतं .... त्यांना मी येण्याचं प्रयोजन सांगितलं ....
"नेहाला म्हणावं काळ बराच बदललाय,
बदलतोय .... घर जमिनींना कधीही नव्हत्या एवढ्या मोठ्यामोठ्या किमती येतायत ...... जमिनी,
घर अजिबात विकू नकोस; आपली ब्राह्मण घरं अजिबात कमी होता कामा नयेत" काका गंभीर
चेहऱ्यानं सांगायला लागले ..... "फक्त व्यवस्थितपणे कागदपत्र करून मुलाच्या नावावर
करून घे ....... आमच्यासारखी गत होऊ देऊ नकोस ..... "
"म्हणजे ? ...... काका, तुमचा काही
प्रॉब्लेम झालाय ? "
"काय सांगू ? जेमतेम अडतीस गुंठे जमीन
माझी ...... एकराला सुद्धा थोडी कमीच ...... आज पन्नासेक वर्ष कष्ट करून ओसाड जमीन
कलमं, माड-पोफळी, काजू, रातांबे लावून थोडीशी नावारूपाला आणलीय मी ..... माझ्या दूरच्या
पुतण्याच्या डोळ्यांवर आलीय ती !"
"म्हणजे ?"
"अरे वडिलार्जित जमीनच माझ्या वडिलांना
मिळाली होती ना ? ...... वास्तविक गावच्या मिळकतीत काहीही रस नसल्याचा कागद माझ्या
चुलत चुलत चुलत्यांनी माझ्या वडिलांना करूनही दिला होता ..... पण आता तो सापडतच नाहीये
...... सापडला तरी काय म्हणा ? त्या काळचा रजिस्टर्ड नसलेला कागद तो .... एका हयात
नसलेल्या साक्षीदाराची सही त्यावर ... नैतिकता नाही मानली तर कायदेशीर किंमत कितीशी
असणार त्या कागदाला ?"
"पण मग आता प्रॉब्लेम काय आहे काका
?"
"अरे दूरचा पुतण्या हिस्सा मागतोय
आता ...... त्यानं स्पष्ट सांगितलंनीत मला की, ‘काका आधीच्या काळात आम्हाला इंटरेस्ट
नव्हता, हे खरंच आहे, तेव्हा तर वीजही नव्हती .... पण आता कोकणात झपाट्यानं विकास होतोय
..... ट्रेन आलीय, जवळच राजापूर स्टेशन आहे ..... जमिनींना सोन्याचे भाव आलेत
..... मग आता या चांगल्या दिवसात आम्हालाही वाटा मिळू द्या ! .....’ सरळपणे हिस्सा
नाही मिळाला तर केस करायची इन्डायरेक्ट हिंट दिलीय त्यानं "
"काय सांगताय काका ? ... मग ठीक आहे
! ..... तोवर तुम्हालाही तो हरवलेला कागद सापडेलच .... तुम्ही कोकणातले लोक केसची चिंता
कधीपासून करायला लागलात ?"
"केस होऊन काय होणार ? अरे झालेला
विकास नष्ट करून, काळ मागे नेऊन मी जुना काळ तर परत आणू शकत नाही ना ? .... चालायचंच
! …. हिस्सा तर द्यावाच लागणार ! ... असे हिस्से तोडून देण्यापेक्षा कधीकधी असं वाटतं
की जुनं मागासलेलं कोकण काय वाईट होतं ?" .
@प्रसन्न सोमण.
१७/०४/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)
No comments:
Post a Comment