#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री
--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री ---
[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी व मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]
#४)उस्तादअल्लारखांवछोटागंधर्व
४) उस्ताद अल्लारखां व छोटा
गंधर्व
आज मुख्यतः फक्त एकाच चित्रपटाविषयी,
म्हणजेच त्यातल्या संगीताविषयी, लिहायचे आहे ... चित्रपटाविषयी म्हणजेच त्यातल्या संगीताविषयी;
असं लिहायचं कारण इतकंच की पडद्यावर दिसणारे सगळे कलाकार उच्च दर्जाचे असले तरीही या
चित्रपटात संगीतच सर्वकाही आहे ... हा चित्रपट मराठी आहे आणि त्याचं नांव आहे 'रंगल्या
रात्री अशा' ... मान्य आहे की उ.अल्लारखां साहेबांनी वाजवलेला अत्युच्च दर्जाचा तबला
हे या चित्रपटाचे माझ्यासाठी एक प्रमुख आकर्षण आहे ... मात्र ते एकमेव आकर्षण नव्हे
... संगीतकार वसंत पवार गायिका सुलोचना चव्हाण या कॉम्बिनेशनच्या 'धनी तुमचा नि माझा
एक काढा फोटू' आणि 'मला हो म्हणतात लवंगी मिरची,' या दोन बेहद्द सुंदर लावण्या या चित्रपटात
आहेत ... शिवाय संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीतात आशाची दोन अत्यंत सुंदर हिंदी
मुजरा गाणी व एक विरहगीत सुद्धा या चित्रपटात आहे ... 'तेरे वादे भी सपने दिखाते रहे'
व 'तुझे बेकरार करके तेरी निंद तक उडा दू' ही ती दोन मुजरा गाणी (पैकी 'तुझे बेकरार
करके' या मुजरा गीताची चाल; 'दिलीपकुमार'च्या 'देवदास' मधल्या मुबारक बेगम यांच्या
आवाजातल्या आणि एस.डी.बर्मन यांच्या संगीतातल्या 'वो न आयेंगे पलटकर' या गाण्यावरून
उचललीय,हा मुद्दा थोडा बाजुला ठेऊया) आणि 'सजन बैरी नही आये' हे विरहगीत ... याच्या
भरीला छोटा गंधर्व यांच्या सुरेल स्वरातली तीन लाजवाब नाट्यगीतंही या चित्रपटात आहेत
... ती आहेत १) शूरा मी वंदिले २) रजनीनाथ हा नभी उगवला ३) दे हाता शरणागता शिवाय त्यांच्याच
आवाजात ४) पतित पावन नाम ऐकुनी हा अभंगही आहे.
दोनचार वाक्यांमध्ये स्टोरी
सांगायची तर चित्रपटाचा ग्रामीण नायक आहे तो तमाशाच्या बारीत सुंदर ढोलकी वाजवणारा
रंगेल गडी ... याच्या तमाशाला रसिक म्हणून आलेला आलेला प्रसिद्ध गायक नट हिरोची ढोलकी
ऐकून त्याला कंपनीच्या बिऱ्हाडी बोलावतो व नाट्यसंगीत ऐकल्यानंतर ढोलकीमध्ये रमलेल्या
त्याच्या हातांना तबल्याचं वेड लागतं व तो
तबल्याची अफाट मेहेनत सुरु करतो ... यथावकाश त्या प्रसिद्ध गायक नटाच्या तबल्याच्या
साथीला बसून असंख्य नाटकं गाजवतो ... फावल्या वेळात सारंगीवादक वृद्ध दादूमियांबरोबर
कोठीवालीच्या मैफिलीत शरिक होतो ... त्या नर्तकीबरोबर तबल्याची अफलातून जुगलबंदीही
करतो ... थोडाबहुत तिच्या प्रेमपाशातही अडकतो व सरतेशेवटी उपरती होऊन परत गावच्या घराकडे
येतो ...
या सर्व स्टोरीवरून ढोलकीवादन,
तबलावादन, दिमाखदार मराठी नाट्यसंगीत, कोठीवरचे मुजरे अशा सर्व स्वरूपात संगीताला केवढा
वाव असू शकतो याची कल्पना येतेच ...
मी स्वतः तबलावादक व तबल्याचा
चाहता असल्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट मुख्यतः उ.अल्लारखां यांचाच आहे; मात्र छोटा
गंधर्व यांचं गायनही तितकंच गोड आणि बेहेतरीन आहे, हेही खरंच ...
चित्रपटाची सुरुवातच होते ती
टायटल म्युझिक म्हणून वाजवलेल्या अल्लारखां साहेबांच्या बहारदार सोलो रूपक तालाने
... या शिवाय हिरोला तबल्याचा ध्यास लागलेला दाखवलाय तेव्हा हिरो तबल्यावर अथकपणे करत
असलेली मेहेनत दाखवण्यासाठी जो काही तबला वाजलाय तोही अफलातूनच आहे ... खरंच अल्लारखां
साहेबांनी स्वतः उमेदीच्या काळात घेतलेली मेहेनत म्हणे अशी होती की, उत्तरेतल्या थंडीमध्ये
'पहाटे चारला जे वाजवायला बसायचं ते अंगावर घातलेली बंडी घामाने पूर्ण भिजल्याशिवाय
उठायचं नाही,' असा दंडक होता ... या प्रसंगानंतर चित्रपटात अल्लारखां साहेबांचा तबला
वाजलाय तो कोठीवालीबरोबरच्या जुगलबंदीच्या स्वरूपात ... हाही तबला भान विसरून जाण्याएवढ्या
बेफाट लयीला वाजलाय ... तिरकिट ही अक्षर आणि त्या तिरकिटचे वेगवेगळे पॅटर्न्स साहेबांनी
इतक्या वैविध्यानी, भन्नाट जलद लयीत आणि तरीही कमालीच्या स्पष्टपणे वाजवलेत की क्या
केहेने ! ...
भरीला चित्रपटात छोटा गंधर्व
यांची जी गाणी आहेत ती सुद्धा त्यांनी इतक्या बेमिसाल पद्धतीने गायली आहेत की समोर
चित्रपट चालू असूनही जुन्या संगीत नाटकांच्या जमान्यात गेल्याचा भास होतो ... आणि खरोखरच
छोटा गंधर्व यांचा संगीत नाटकांतील गायक नट म्हणून जो दबदबा होता, त्याकाळची छोटीशी
झलक आपल्याला पाहायला मिळते. या सर्व गाण्यांना तबलासाथ उ.अल्लारखां साहेबांचीच आहे
की नाही, याबद्दल व्यक्तिशः मला तरी थोडी शंका वाटते; (अल्लारखां साहेबांच्या तबलावादनाची
जी सिग्नेचर स्टाईल आहे ती त्या साथीमध्ये मला तेवढी दिसत नाही म्हणूनच निव्वळ ही शंका;
अन्यथा चित्रपटाच्या श्रेयनामावलीत तबला - उस्ताद अल्लारखां एवढाच उल्लेख दिसतो) पण
नसेलच तर ज्या कुणी ही साथ केली असेल ती साथही खूप अप्रतिम झालेली आहे यात शंकाच नाही.
मला असं वाटलं होतं की या
'रंगल्या रात्री अशा'या सिनेमाबद्दल लिहिलं की लेख संपवता येईल; पण नाही हो ! फिल्म
इंडस्ट्री आणि अल्लारखां साहेबांचं कर्तृत्व यांची सांगड घातली तर अजून एक अफाट कर्तृत्व
अल्लारखांच्या खाती जमा आहे; याची कल्पना मला आत्ता लेखाच्या निमित्ताने जुन्या 'बेवफा'
सिनेमातली सर्व गाणी ऐकली तेव्हाच आली; हे दुर्दैव ... दुर्दैव अर्थात माझं, अल्लारखां
साहेबांचं नव्हे ...
गुगल आणि व्हिकीपिडिया सांगतात की १९४३ नंतर अल्लारखां साहेबांनी जवळपास दोन डझन हिंदी, उर्दू व पंजाबी सिनेमांचं संगीत दिग्दर्शन केलं ... आणि मग १९५८ नंतर त्यांनी इंडस्ट्री सोडून तबलावादनाकडे व मैफिलींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ... इंटरनेट यातल्या कुठल्याही सिनेमांची नावं देत नाही; मात्र १९५२ साली आलेल्या राजकपूर नर्गिस जोडीच्या 'बेवफा' सिनेमाचं संगीत दिग्दर्शन अल्लारखां साहेबांनी ए.आर.कुरेशी या नावानं केलेलं आहे, ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती ... तलत मेहमूदच्या आवाजाचा चाहता असलेल्या मला या सिनेमातली तलतची तिन्ही गाणी माहीत होती व अर्थातच आवडीचीही होती ... मात्र या लेखाच्या निमित्ताने मी ‘बेवफा’मधली आठही गाणी ऐकली आणि यापूर्वी माहीत सुद्धा नसलेल्या आणि अर्थातच न ऐकलेल्या गाण्यांनी मी खरोखर बेहोष झालो; इतकी ती गाणी मला आवडली ... विशेषतः 'दिल मतवाला लाख संम्हाला'चं लताचं व्हर्जन, 'इसीका नाम दुनिया है' हे लताचं अप्रतिम चालीतलं सॅड सॉन्ग व 'काम हाथोंका है मिलनेकी दुवाए करना' (तलत) - उडत्या चालीतला तलतचं हळुवार सिल्की व्हॉइस मधलं गाणं; या गाण्यांनी मला वेड लावलं ... ही गाणी बऱ्याच वाचकांनाही अपरिचित असतीलही; पण तरीही अपरिचित असलेली सुद्धा जुनी हिंदी गाणी आवर्जून ऐकणारे व परिचित करून घेऊ पाहणारे माझ्यासारखे कोणी वेडे पीर असतील तर त्यांच्यासाठी मी या गाण्यांची जंत्री खाली देतो ... ही गाणी जरूर ऐकावी ... Bewafa 1952 songs असा सर्च यु ट्युबवर टाकल्यास ही गाणी मिळतील.
१) दिल मतवाला लाख संम्हाला (तलत)
२) दिल मतवाला लाख संम्हाला (लता) - ही जरी एकाच गाण्याची मेल व फिमेल व्हर्जन्स असली तरीही लताच्या 'दिल मतवाला'ची चाल पूर्णतः वेगळी, तालाच्या वेगळ्या उडत्या वजनातली आणि मनमोहक आहे ...
३) तुमको फुरसद हो मेरी जान तो इधर देख तो लो (तलत)
४) तू आये न आये तेरी ख़ुशी हम आंस लगाये बैठे है (तलत)
५) इसीका नाम दुनिया है (लता) - अप्रतिम चालीतलं सॅड सॉन्ग
६) काम हाथोंका है मिलनेकी दुवाए करना (तलत) - उडत्या चाळीतला हळुवार सिल्की व्हॉइस
७) आ जाओ मेरे दिलरुबा (गीतादत्त) - क्लब सॉन्ग हे नृत्याचं फारच छोटं सव्वा मिनिटाचं उडतं गाणं आहे. याचं संगीत संयोजन थेट ओ.पी.ची आठवण करून देतं.
८) ओ ताना देरेना ताना (शमशाद व कोरस) - हे सुद्धा उडत्या चालीतलं नृत्यावरचं क्लब सॉन्ग आहे.
अल्लारखां साहेब व छोटा गंधर्व यांचं हे इंडस्ट्रीतलं कर्तृत्व आजही आपल्याला इंटरनेटच्या कृपेने अनुभवता येतं; या बद्दल त्या दयाघनाचे अनेक आभार मानून इथे थांबतो ...
@प्रसन्न सोमण/२२-०६-२०२४.
No comments:
Post a Comment