Monday, 19 August 2024

--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री --- ५) उ.अमीर खान, पं.डी.व्ही.पलुस्कर व उ.बडे गुलाम अली खान

 


#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री

 

--- शास्त्रीय संगीत कलाकार फिल्म इंडस्ट्री ---

 

[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]

 

#५)उ.अमीरखान,पं.डी.व्ही.पलुस्करवउ.बडेगुलामअलीखान

 

५) उ.अमीर खान, पं.डी.व्ही.पलुस्कर उ.बडे गुलाम अली खान 

 

माझ्या लहानपणी चाळीच्या वातावरणामध्ये बऱ्याच वेळा शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर रात्रीच्या जेवणानंतर माझ्या आई-बाबांच्या  गप्पा रंगत असत ... काही शेजारी खूप संगीतप्रेमी होते; अर्थात सिनेसंगीत प्रेमी ... मात्र शास्त्रीय संगीताबद्दल दुरून आदर असणारे ... त्यामुळे खूप वेळा या गप्पा जुन्या गाण्यांविषयीच असत ... या गप्पा ऐकून ऐकून बालवयातल्या मला चारपाच संगीतप्रधान सिनेमे माहीत झाले पैकी एकझनक झनक पायल बाजे’ ज्यामध्ये गोपीकृष्णजींचं भरपूर नेत्रदीपक कथ्थक नृत्य .अमीर खान साहेबांचंझनक झनक पायल बाजे’ हे ‘अडाणा’ रागातलं टायटल सॉन्ग होतं ... वारंवार ऐकून माहीती झालेला आणखी एक सिनेमा म्हणजेबैजू बावरा’ ... यामध्येही इतर लाजवाब गाण्यांबरोबरच उ.अमीर खान साहेब पं.डी.व्ही.पलुस्कर यांचीदेसी’ रागातली जुगलबंदी होतीतिसऱ्याही एका सिनेमाबद्दल गप्पा व्हायच्या ... तो सिनेमा होतागुंज उठी शहनाई’ ज्यामध्ये उ.बिस्मिल्ला खान साहेबांची पोटभर शहनाई ऐकवली गेली होती त्याचबरोबर उ.अमीर खान साहेब उ.बिस्मिल्ला खान साहेब यांची अनुक्रमे गाण्याची शहनाईची सुंदर जुगलबंदीही होती ... बिस्मिल्ला खान साहेबांची शहनाई कधीमधी रेडियोवर ऐकली होती पण उ.अमीर खान साहेब यांचं गाणं मात्र तोवर कधी ऐकायला मिळालेलं नव्हतं … गप्पांच्या हिटलिस्टवर आणखीही एक सिनेमा होता ... तो होता ‘मुघले आझम’ ... या सिनेमातल्या गाण्यांची आठवण काढली जायचीच पण उ.बडे गुलाम अली खान यांच्या या सिनेमातल्या ‘सोहोनी’ ठुमरीची जरूर आठवण निघायची ... अर्थात ठुमरीच्या रागाचं नांव माझी शास्त्रीय संगीतप्रेमी आईच सांगायची ... माझ्या बालवयात या गप्पांचा श्रोता मी असलो तरीही त्यात ज्यांचा उल्लेख यायचा ती बहुसंख्य गाणी मी ऐकलेलीच नव्हती ... त्यावेळी फक्त रेडियो हे एकच साधन असल्यामुळे मला ती गाणी ऐकायला मिळालेली नव्हती ... पुढे यथावकाश विविधभारतीच्या माध्यमातून कधीतरी ही गाणी ऐकायला मिळाली ... 

 

माझ्या लहानपणी घरात सतत रेडियो लागायचा; पण तरीही हे गप्पांमध्ये येणारे सिनेमे, त्यातली गाणी; हा तोवर इतिहास झालेला असल्यामुळे ही गाणी रेडियोवर कमी वेळा लागायची ... कारण मी मोठा होत होतो तो काळ म्हणजे साधारण किशोरकुमारचा उछलकूदवाला म्हणजे 'देखा ना हाय रे सोचा ना ... अरे ओडु कुकडू कुकू' (संगीतकार आर.डी.बर्मन / चित्रपट 'बॉम्बे टु गोवा') वाला काळ ... त्यामुळे आरडी, एलपी, कल्याणजी-आनंदजी आणि सोबतीला किशोर-आशा यांची चांगलीच तेजी होती ... मात्र तरीही यथावकाश ही शास्त्रीय संगीतवाली वर उल्लेख केलेली गाणी ऐकायला मिळालीच ... तोवर माझे शास्त्रीय संगीत ऐकण्याचे कान सुद्धा थोडेथोडे तयार होत होतेच ...

 

उ.आमिरखान साहेब व पं.डी.व्ही.पलुस्कर -

 

उ.आमिरखान साहेबांचं पहिलं गाणं माझ्या कानांवर पडलं तेझनक झनक पायल बाजे’ हेझनक झनक पायल बाजे’ सिनेमातलं टायटल सॉन्ग ... या गाण्यातला तो आमिरखान साहेबांचा धीरगंभीर ढाला वजनदार आवाज अडाणा रागासाठी अतिशय आवडून गेला … विशेषतः या गाण्याच्या शेवटी घेतल्या गेलेल्या तीनचार स्पष्ट आणि दाणेदार ताना अत्यंत लुभावन्या होत्या ... दुर्दैवाने मी ही गाणी ऐकत होतो त्याच सुमारास म्हणजे १९७४ मध्ये आमिरखान साहेबांचा अपघाती मृत्यू झाला ... त्यानंतर त्यांच्या संबंधात आलेले लेखही वर्तमानपत्रात वाचले, एकूणच त्यांचं शास्त्रीय संगीतातलं भरीव योगदान समजलं खूप वाईट वाटलं ... काही काळानंतर हे उल्लेख झालेले तीनचार सिनेमे शेजाऱ्यांच्या टीव्हीवर सुद्धा पाहायला मिळाले ... त्यातही मोठ्या भावाबरोबर पहिला पाहायला मिळाला तो कुठेतरी मॅटिनीला लागलेलागुंज उठी शहनाई’ ... यातली ऐन भरातल्या बिस्मिल्ला खानसाहेबांची शहनाई ऐकून कान तृप्त झाले ... यात छोट्या गोपीला शहनाई शिकवायला गुरु म्हणून उ.आमिरखान साहेबांचा आवाजही घेतला गेला होता ... त्यामुळे या सिनेमात अमीरखांसाहेब बिस्मिल्ला खांसाहेब यांची अविस्मरणीय जुगलबंदीही ऐकली ... या जुगलबंदीत रागभटियार,’ ‘रामकली,’ ‘देसी,’ ‘शुद्धसारंग,’ ‘मुलतानी,’ ‘यमन,’ ‘बागेश्रीचंद्रकौंसरागातला तराणा; या क्रमाने बेहेतरीन संगीताची मेजवानी आहे ... ही जुगलबंदी ऐकूनअश्रूनीर वाहे डोळा’ अशी अवस्था झाली ... - बाय वे; ‘झनक झनक पायल बाजे’ टीव्हीवर बघतांना त्यामध्ये उ.आमिरखान यांच्याबरोबरच नृत्यसम्राट गोपीकृष्णजी यांचे नेत्रदीपक कथ्थक नृत्यही अनुभवायला मिळालं त्यांच्या नृत्याबरोबर पं.सामताप्रसादजी यांची तबलासाथही मोहवून गेली - यानंतर टीव्हीवरच बघितला गेलाबैजू बावरा’ ... यात संगीतसम्राट तानसेनांना उ.आमिरखान साहेबांचा प्लेबॅक आहे ... या सिनेमाचे टायटल सॉन्ग म्हणूनतोरी जय जय करतार’ ही उ.आमिरखान साहेबांचीपुरियाधनाश्री’ रागातली नितांत सुंदर चीज आहे या चीजेत पहिल्या तीनेक मिनिटांमध्ये भरणा शेवटच्या दीडेक मिनिटात मोत्यांच्या लडीसारख्या स्वच्छ दाणेदार ताना ... जीव तृप्त झाला; पण तरीही एवढ्याने भागलं नाही ... साधारण सिनेमा सुरु झाल्यानंतर सव्वातासाने बैजू;मै गाऊंगा, मै गाऊंगा,” असं बेभान होऊन ओरडतो त्यावेळेस एक मिनिटभर सिनेमात तानसेन म्हणून आमिरखान साहेबांची आणि बैजू म्हणून डी.व्ही.पलुस्कर यांची जुगलबंदी वाजते त्यात तोडी रागातलीलंगर का करिया जी मारो’ ही प्रसिद्ध चीज ऐकवली जाते ... आणि चित्रपट शेवटाकडे आल्यानंतर काय ! … तानसेन आणि बैजूची जुगलबंदी ...’ देसी’ रागातल्या या जुगलबंदीततुम रे गुन गाये’ हा दोन आवर्तनांचा विलंबित त्रितालातला ख्याल आणि मगआज गावत मन मेरो झुमके’ ही द्रुत त्रितालातली चीज ... या जुगलबंदीत आमिरखान साहेब आणि डी.व्ही.पलुस्कर एवढे रमलेत की जुगलबंदी टिपेला गेल्यानंतर तानपुऱ्याची तार तुटून जुगलबंदी थांबते आणि बैजू विजेता ठरतो ...

 

उ.बडे गुलाम अली खान साहेब -

 

१९६० साली करायचं ते काहीतरी अचाटच ही पक्की खात्री डोक्यात बाळगूनके.असिफ’ नावाच्या एका वेड्या निर्मात्यानेमुघले आझम’ नावाचा त्याच्या स्वप्नातला एक भव्य सिनेमा अट्टाहासाने बनवला ...’ नो बजेट’ ही म्हणे त्याची पहिली अट असायची ... संगीताला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे संगीत दिग्दर्शक म्हणून त्याने नौशाद मियाँ सारख्या बड्या संगीतकाराला घेतलंच, पण चित्रपटात तानसेनची व्यक्तिरेखा असल्यामुळे त्याने तानसेनला प्लेबॅक देण्यासाठी त्या काळचे अतिप्रसिद्ध गायक उ.बडे गुलाम अली खांसाहेब यांना विनंती करायची ठरवली ... बडे गुलाम साहेब तोवर सिनेमात कधीच गायलेले नसल्यामुळे त्यांना ही सिनेमात गाण्याची ब्याद टाळायचीच होती ... पण डोक्यात आलेली गोष्ट घडलीच पाहिजे हा खाक्या असलेला के.असिफ; नौशाद साहेबांच्या करवी खासाहेबांच्या खनपटीलाच बसला ... तेव्हा अपमान करून नकार देण्यापेक्षा काहीतरी कमाल, अव्वाच्या सव्वा मानधन मागुया म्हणजे ही पीडा टळेल; असा विचार करून खानसाहेबांनीएका गाण्यासाठी पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील,’ असं सांगितलं ... हा रेट त्यावेळच्या टॉपच्या कुठल्याही गायक-गायिकेच्या मानधनाच्या कैक पट जास्त होता ... पणअशक्य’ हा शब्दच माहीत नसलेल्या के.असिफ साहेबांनी बिनधास्तपणे हिरवा कंदील दाखवला त्यामुळे उ.बडे गुलाम अली खांसाहेबांचा नाईलाज झाला ... प्रॅक्टिसच्या वेळेस असं लक्षात आलं की खांसाहेब थोडे लाऊड गातायत आणि चित्रपटातली सिच्युएशन हळुवार आहे ... खांसाहेबांना सॉफ्ट गायला सांगितल्यावर त्यांनी सांगितलं कीमला चित्रीकरण दाखवा त्या समोर मी योग्य प्रकारे गाईन’ ... मग तशी व्यवस्था केली गेल्यावर खांसाहेबांच्या गाण्याचा टेक ओके झाला ...

 

यामुघले आझम’ मध्ये बडे गुलाम अली खानसाहेबांनी दोन अप्रतिम गाणी आहेत ... एक आहेशुभ दिन आयो राजदुलारा’ ही रागेश्री रागातली द्रुत त्रितालातली चीज आणि दुसरी अतिप्रसिद्धसोहोनी ठुमरी’ आहेप्रेम जोबन बनके’ ... पार्श्वभूमीवर अनारकली मधुबालाला वारा घालत बसलेला हळुवार प्रेमवीर सलीम, अर्थात दिलीप कुमार लडिवाळ सुरांनी आपल्या कानांशी रुंजी घालत असलेलीप्रेम जोबन बनके’ ही बडे गुलाम अली खांसाहेबांच्या सुरातली रम्य ठुमरी ... आठवण काढल्यावर आजही ही ठुमरी कानांपाशी गुंजारव करत राहते ...

 

उ.अमीर खांसाहेब, पं.डी.व्ही.पलुस्करजी उ.बडे गुलाम अली खांसाहेब या तिघांनी मिळून फारतर दोन हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या कमी रचना आपल्याला चित्रपट संगीताच्या माध्यमातून ऐकवल्यायत ... पण रचना जरी थोड्याच असल्या तरीही त्या रचना अशा आहेत की त्यांना तोड नाही ... या रचना चित्रपट संगीतात नसत्या तर चित्रपट संगीतात काहीतरी कमी राहून गेली असती असं वाटल्यावाचून राहत नाही.

 

@प्रसन्न सोमण / १०-०७-२०२४.

No comments:

Post a Comment