#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री
--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री ---
[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी व मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]
#३)पं.रवीशंकर
३) पं.रवीशंकर
माझ्या लहानपणी; गायिका व पेटीवादक
असलेली माझी आई एका संगीत मैफिलीबद्दल खूपच उसासून बोलत असे ... आमच्या 'विलेपार्ले
म्युझिक सर्कल'ने ठेवलेली पं.रविशंकर व उ.अली अकबर खां यांच्या सतार व सरोद वादनाच्या
जुगलबंदीची व उ अल्लारखां यांच्या तबला साथीची मैफिल ... दुसऱ्या दिवशी सकाळी या तिन्ही
कलाकारांना म्हणे विमान पकडायचं असल्यामुळे ही रात्री ९.३०/१०.०० ला पार्ल्याला सुरु
झालेली मैफिल म्हणे पहाटे साडेतीन/चार पर्यंत चालूच होती ... साहजिकच रसिकांना उच्च
दर्जाचं वादन अगदी पोटभर ऐकायला मिळालं ... माझे बाबा तर, विशेषतः रवीशंकरजींवर इतके फिदा झाले होते की त्यांनी त्यानंतर मला सतार
शिकायचा थोडाफार आग्रह चालवला होता ... अर्थात त्यावेळी (आणि खरंतर आजही) माझी बुद्धी
जेमतेमच असल्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि खूप जास्त वेळ मी सिनेसंगीतातच रमत
असे ... याच मैफिलीनंतर रवीशंकर हे उच्च दर्जाचे संगीतकार असल्याची माहिती सुद्धा मला
रेडियोच्या अनाउन्समेंटद्वारे मिळाली कारण त्यावेळी रेडियोवर अधूनमधून गोदान किंवा
अनुराधा सिनेमातली गाणी लागत असत ... आणि विशेषतः विविधभारती जाहिराती आणि अनाउन्समेंट
सकट भरपूर ऐकलं जात असे ...
एकूण रवीशंकरजींचं सतारवादन
आणि त्याच्या देशभर आणि जगभर असंख्य मेहेफीली करण्याबरोबरच; संगीतकार म्हणून सुद्धा
त्यांचं खरंतर ग्लोबल म्हणावं असं काम आहे ... या सगळ्याची माहिती इंटरनेटवर मिळू शकतेच
... विख्यात निर्माता दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 'पथेर पांचाली' या बंगाली सिनेमासोबतच
जेव्हाजेव्हा संधी मिळाली आणि शक्य झालं तेव्हा त्यांनी मोजक्या हिंदी चित्रपटांनाही
दर्जेदार संगीत दिलंय ... मला वाटतं १९६० सालचा ‘अनुराधा,’ १९६३ सालचा ‘गोदान’ आणि
एकदम १९७९ सालचा ‘मीरा’ ... बहुदा फक्त तीनच चित्रपट ... पण तीनही चित्रपटात जी मोजकी
गाणी आहेत ती गाणी रवीशंकरजींचा संगीतकार म्हणून काय दर्जा होता याची झलक सहजच दाखवून
देतात ...
या तीन चित्रपटांपैकी ‘अनुराधा’मध्ये
गायला लता होती ... त्यामुळे कितीही तानांसह कितीही कठीण आणि रागदारीवर आधारित गाणी
कंपोझ केली, तरीही काही प्रॉब्लेम नव्हताच ... त्यामुळे कोणती लँडमार्क गाणी जन्माला
आली पहा ...
१) जाने कैसे सपनोमे खो गयी
अखिया (लता/राग तिलकशाम) ... विशेषतः या गाण्याच्या सुरुवातीला इंट्रोमध्ये तालाच्या
बीट्सचा आणि बीट्स नंतरच्या पिसेसचा जो अनाघात पद्धतीचा वापर केलाय तो लाजवाबच ...
२) कैसे दिन बिते (लता/राग
मांजखमाज) ...
३) हाये रे वो दिन क्यो ना
आये (लता/राग जनसंमोहिनी) ... ताल दीपचंदीच्या वजनातलं अप्रतिम गाणं ...
४) समा अलबेला दिन है मिलनके
(लता/लोकगीतावर आधारित) ... हे गाणं तुलनेनं खूप कमी प्रसिद्ध असलं तरीही हे देखील
एक अफलातून ऑर्केस्ट्रेशनने नटलेलं उडत्या चालीतलं सुंदर गाणं आहे ...
५) सावरे सावरे (लता/राग भैरवी)
ही भरपूर तानांनी युक्त अशी जलद लयीतल्या त्रितालातली नितांत सुंदर भैरवी आहे ... हे
सिनेमाचं टायटल सॉन्ग आहे ... मला वाटतं सिनेसंगीतातली सर्वोत्कृष्ट भैरवी म्हणून मी
हिंदीतल्या या गाण्याला नक्कीच पसंती देईन (आणि मला मराठीतली सर्वोत्कृष्ट भैरवी वाटते
'कुलवधू' नाटकातली ज्योत्स्ना भोळे यांनी गायिलेली आणि मास्तर कृष्णराव यांनी संगीतबद्ध
केलेली 'बोला अमृत बोला' ही भैरवी ...)
दुसरा चित्रपट 'गोदान'मध्ये
लताला फक्त एक बिदाईचं शांत संथ गाणं व एक उडत्या लयीतलं गाणं आहे ... बाकी गायक गायिका
म्हणाल तर; गीतादत्त, आशा, रफी, महेंद्र कपूर आणि मुकेश यांना घेऊन रवी शंकर यांनी
दर्जेदार गाणी दिली ... तसं पाहिलं तर ही गाणी तुलनेनं कमी प्रसिद्ध आहेत पण तरीही
त्यात उत्तर भारतातल्या लोकसंगीताचा इतका सुंदर वापर केला गेलाय की क्या केहेने !
... 'गोदान'मधली गाणी आहेत ...
१) ओ बेदर्दी क्यो तडपाये
(गीतादत्त, महेंद्र कपूर आणि कोरस) ... अप्रतिम ऑर्केस्ट्रेशनसाठी आणि वैविध्यासाठी
जरूर ऐकण्याजोगं गाणं ...
२) पिपरा के पतवासरिखें बोले
मनवा (रफी)
३) जनम लियो ललना के चांद मोरे
अंगना उतर आयो (आशा व कोरस) ... बाळाच्या जन्मानंतरचा हळुवार पाळणा ...
४) होरी खेलत नंदलाल बिरजमें
(रफी व कोरस) ... होळीवरचं बेहेतरीन लोकगीत ...
५) चली आज गोरी पियाकी नगरीया
(लता) ... लग्नानंतरच्या बिदाईचं अप्रतिम स्वर लगावाचं शांत संथ दीपचंदी तालातलं गाणं
...
६) हिया जरत रहत दिन रैन (मुकेश)
७) जाने काहे जिया मोरा डोले
रे (लता व कोरस) उडत्या लयीतलं व दोन तालांच्या वजनातलं सुंदर गाणं ...
तिसरा चित्रपट आहे गुलजार/हेमामालिनीचा 'मीरा' ... या चित्रपटाबद्दल एक किस्सा वाचनात आलाय ... मीरा चित्रपटाचं संगीत आधी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे सोपवलेलं होतं ... नंतर कळलं की मीराबाईंची गैरफिल्मी भजनं अगोदरच गायलेली असल्यामुळे लतानी म्हणे या सिनेमासाठी गायला नकार दिला ... झालं ... त्याकाळी लताकडून नकार आल्यामुळे बहुदा लक्ष्मी-प्यारे यांची पांचावर धारण बसली आणि त्यांनी लगेच चित्रपट सोडून दिला ... या गोष्टीवरून संगीतकार अण्णा सी.रामचंद्र यांनी म्हणे लक्ष्मी-प्यारे यांची खिल्लीही उडवली ... (संदर्भ-शिरीष कणेकर लिखित 'गाये चला जा' या पुस्तकातली सी.रामचंद्र यांची मुलाखत) ... पुढे कुठेतरी असंही वाचनात आलं की, लतानी म्हणे मीराबाईंच्या गैरफिल्मी भजनांच्या कर्तृत्वाच्या जोरावर संगीत हृदयनाथकडे सोपवावं तरच मी गाईन, अशी अट घातली होती ... पण हृदयनाथजींच्या बेताच्या मार्केट व्हॅल्यूचा विचार करता निर्माता यासाठी तयार नव्हता ... शेवटी कसा कोण जाणे पण; चित्रपट संगीतासाठी रवीशंकरजींकडे आला ... लता गाणार नव्हतीच ... मात्र रवीशंकरजींना त्याची फिकीर नव्हती ... त्यांनी फक्त 'गुड्डी'नंतर प्रसिद्धीला आलेल्या सुरेल वाणी जयरामला गायला घेतलं ... आणि काहीही गाजावाजा न करता आपल्या अफलातून संगीत दिग्दर्शनाच्या जोरावर हे आव्हान सहज पेलून दाखवलं ... रवीशंकरजींची ही ‘मीरा’मधील सर्व गाणी तुलनेनं कदाचित थोडी अप्रसिद्ध असतीलही पण जाणकार रसिकांच्या मात्र नक्कीच पसंतीला उतरली ... तुलनेचा विचार न करता बोलायचं झालं तर वाणी जयराम खरंच अत्यंत सुरेख गायलीय ... 'मीरा'मधली भजनं आणि गीतं आहेत ...
१) मेरे तो गिरीधर गोपाल - दोन व्हर्जन्स (दोन्ही व्हर्जन्स वाणी जयराम) (दुसऱ्या व्हर्जनच्या शेवटच्या दोन ओळींसाठी पं. दिनकर कैकिणीजींचा आवाज आहे)
२) जो तुम तोडो पिया (वाणी जयराम) ... राग यमन
३) मै सावरेकी रंग राची (वाणी जयराम)
४) शाम मने चाकर राखो जी (वाणी जयराम)
५) एरी मैं तो प्रेमदिवानी (वाणी जयराम) ... राग गुजरी तोडी ताल रूपक ...
६) करना फकिरी फिर क्या (वाणी जयराम)
७) राणाजी मै तो गोविंदके गुण (वाणी जयराम) ... तालविरहित छोटं गीत ... राग किरवाणी ...
८) करुणा सुनो शाम मोरी (वाणी जयराम)
९) प्यारे दर्शन दिजो आज (वाणी जयराम) ... तालविरहित छोटं गीत ...
१०) जागो बंसीवाले ललना (वाणी जयराम) ... तालविरहित छोटं गीत ... राग ललत
११) बादल देख डरी मैं (वाणी जयराम) ... राग मियामल्हार
१२) बाला मैं बैरागन हुंगी (वाणी जयराम)
हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीतकार म्हणून रवीशंकरजींची उल्लेखनीय कारकीर्द या तीन चित्रपटांत संपली आणि या कलाकाराने अजून भरपूर काही द्यायला हवं होतं, ही चुटपुट लागून राहिली ...
शास्त्रीय पद्धतीच्या सतार वादनापासून ते बंगाली-हिंदी चित्रपटसंगीतामध्ये चमक दाखवणाऱ्या ; एवढंच नव्हे तर पाश्च्यात्य देशांत जाऊन तिथे भारतीय संगीत लोकप्रिय करून दाखवण्यापर्यंतची अफाट सांगितिक मजल मारणाऱ्या रवी शंकरजींच्या संगीत कर्तृत्वाला माझे लक्ष लक्ष नमस्कार ...
@प्रसन्न सोमण / १७-०६-२०२४.
No comments:
Post a Comment