#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री
--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री ---
[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी व मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]
#६)पंडितसामताप्रसाद
६) पंडित सामता प्रसाद
मी तबलजी असल्यामुळे बालपणापासून रेडियोवर जमेल तेवढा संगतीचा आणि सोलो तबला ऐकत आणि मनात साठवत मोठा झालो ... तसे तबलजी तर असंख्य होऊन गेलेत आणि आजही आहेतच ... मात्र माझ्या लहानपणी तीन नावं म्हणजे अगदी ‘बापमाणूस’ या विशेषणाला पात्र होती ... ती म्हणजे उस्ताद अहमदजान थिरकवा (जेष्ठतेचा आणि अग्रक्रमाचा मान यांचाच) यांचा दिल्ली अजराडा बाज, उस्ताद अल्ल्लारखा साहेबांचा पंजाबी, लाहोरी बाज आणि पंडित सामता प्रसाद यांचा बनारस बाज ... तिघांचंही सोलोवादन, शास्त्रीय गायक, वादक व नर्तकांबरोबर त्यांनी केलेली साथसंगत ही किती अविस्मरणीय असेल याची कल्पनाच करावी ... माझ्या सुदैवाने मला थिरकवा साहेबांचा अगदी थोडा काळ पण अल्लारखा साहेब व सामता प्रसादजी यांना तसं बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं ... अर्थात त्यांची शास्त्रीय संगीतातली कामगिरी वर्णन करण्याची तशी फारशी जरुरी नाही ... त्यासाठी इंटरनेट आहेच आणि मीही इंटरनेटची थोडीफार मदत घेतलेलीच आहे ... इथे मुद्दा आहे तो फिल्म इंडस्ट्रीतल्या कामगिरीचा ... पण तरीही पंडित सामता प्रसाद यांच्याबद्दल थोडीशी माहिती ...
पंडित सामता प्रसाद यांना गुदई महाराज असंही म्हणत असत ... सोलो व गायक वादकांबरोबर सुद्धा ते तबलासाथ करायचे पण विशेषतः नृत्याबरोबरची त्यांची साथ अत्यंत उल्लेखनीय असे ... एकदा ज्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी तबलावादन केलं त्यांची नावं तर डोळ्यांखालून घाला ... ‘झनक झनक पायल बाजे,’ ‘मेरी सुरत तेरी आंखे,’ ‘बसंत बहार,’ ‘किनारा,’ ‘शोले’ व ‘कुदरत ... कदाचित अजून काही नावं असतीलही पण इंटरनेटवर तरी मला एवढीच आढळली ...
तबल्यातल्या तिरकीट, धिरकीट, धीरधीर, धिनधिन आणि तकतक किंवा टकटक या फ्रेझेस त्यांच्या हातातून इतक्या सुश्राव्य आणि साफ वाजत की 'क्या कहने' अशी दाद गेलीच पाहिजे ...
त्यांनी वाजवलेली मोजकी गाणी जी चांगलीच परिचित आणि गाजलेली आहेत ती परत एकदा ऐकून बघा
नाचे मन मोरा मगन तिकता धिगीधिगी (मेरी सुरत तेरी आंखे/रफी/ एस.डी.बर्मन)
मीठे बोल बोले (किनारा/भूपेंद्र-लता/आर.डी.बर्मन)
झनक झनक पायल बाजे (झनक झनक पायल बाजे/उ.आमीरखां व कोरस/वसंत देसाई)
हमे तुमसे प्यार कितना (कुदरत/परवीन सुलताना/आर.डी.बर्मन)
अर्थात ही सगळी गाणी सिनेमामधली (म्हणजे व्हिडियो व्हर्जन्स) ऐका कारण ती वेगळी असू शकतात आणि रेकॉर्डस् पेक्षा जास्त काहीतरी हाती लागू शकतं ... विशेषतः ‘नाचे मन मोरा’ हे अखेरीला रेकॉर्डपेक्षा थोडं मोठं आहे व त्यात खास सामता प्रसाद खुबीयां आहेत ...
गाण्यांव्यतिरिक्त विशेष म्हणजे तिरकीट, धिरकीट, धीरधीर, धिनधिन आणि तकतक किंवा टकटक या फ्रेझेसच्या संदर्भात शोले मधला “चल धन्नो …” म्हणणाऱ्या हेमा मालिनीचा भरधाव धावत असलेला टांगा आठवून पहा ... खरोखरच बॅकग्राऊंड तबल्याचा
तो एक बेमिसाल नमुना आहे.
सामता प्रसादजींच्या अनेक शिष्यांपैकी ज्यांनी सर्व कर्तृत्व फिल्म इंडस्ट्रीतच गाजवलं असे बप्पी लाहिरी व आर.डी.बर्मन हे दोन नावाजलेले शिष्य होते.
इथेच, या निमित्ताने सामता प्रसादजींच्या स्मृतींना सादर वंदन ...
@प्रसन्न सोमण / ११-०७-२०२४.