#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#७)माणदेशी माणसं
माणदेशी
माणसं / लेखक - व्यंकटेश माडगूळकर (जन्म - ६ जुलै १९२७ / मृत्यू - २८ ऑगस्ट २००१.)
@@ व्यंकटेश माडगूळकर यांचा अल्पपरिचय
@@
व्यंकटेश माडगूळकर – मराठीतील एक प्रख्यात लेखक. लेखक म्हणून व्यंकटेश माडगूळकरांनी कथा, कादंबऱ्या, नाटकं, प्रवास वर्णनं, असे साहित्याचे विविध प्रकार यशस्वीपणे हाताळले. त्यांना जंगल भ्रमंती आणि शिकारीचाही छंद होता. या छंदाच्या निमित्तानी त्यांनी जंगल भ्रमंती आणि शिकारीच्या अनुभवांवरही काही उल्लेखनीय पुस्तकं लिहिली. नावापुरतं शालेय शिक्षण घेतलेल्या व्यंकटेश माडगूळकरांनी जीवन मात्र कमालीच्या उत्कटतेनं न्याहाळलं. साहित्याचा व्यासंग करून, भाषेवर प्रभुत्व मिळवून, त्यांनी शिक्षणाची कमतरता भरून काढली. याच पद्धतीनं इंग्रजी सुद्धा शिकून त्यांनी पाश्चात्य साहित्याचाही परिचय करून घेतला आणि 'शिक्षण हे फक्त शाळा-कॉलेजातच घडतं,' या समजाला छेद दिला.
सुरुवातीच्या काळात त्यांनी लिहिलेलं 'माणदेशी माणसं' हे छोटेखानी शब्दचित्रं असलेलं पुस्तक १९४९ मध्ये प्रकाशित झालं आणि ते खूपच नावाजलं गेलं. त्यानंतर 'गावाकडच्या गोष्टी,' 'हस्ताचा पाऊस,' 'काळी आई,' असे त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध झाले. कादंबऱ्यांमध्ये 'बनगरवाडी' या गाजलेल्या कादंबरीनंतर 'वावटळ.' 'पुढचं पाऊल,' 'कोवळे दिवस,' अशा काही कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. या दरम्यान ते आकाशवाणी मध्ये नोकरीही करत असत; तसंच याच काळात ते मराठी चित्रपटांच्या पटकथांचं लिखाणही करत असत.
नाटककार म्हणून व्यंकटेश माडगूळकरांनी काही नाटकंही लिहिलेली आहेत. 'सती,' 'तू वेडा कुंभार,' 'पती गेले गं काठेवाडी,' ही त्यापैकी काही उल्लेखनीय नाटकं. 'कुणाचा कुणाला मेळ नाही' आणि 'बिनबियांचं झाड' ही खूप रसिकप्रिय झालेली लोकनाट्य सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत.
व्यंकटेश माडगूळकर स्वतः १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले होते. त्या अनुभवांवरून त्यांनी 'कोवळे दिवस' ही कादंबरीही लिहिली आहे त्याचबरोबर त्यांनी 'प्रवास एका लेखकाचा' या नावाचं आत्मचरित्रही लिहिलेलं आहे.
@@ @@
माझ्या आईनं कोणे एके काळी बी.ए.विथ मराठी केलं होतं. तिला बी.ए.च्या अभ्यासासाठी जी काही मराठी पुस्तकं होती, त्यामध्ये एक व्यंकटेश माडगूळकरांचं 'बनगरवाडी' हे पुस्तक होतं. त्यामुळे बनगरवाडी हे पुस्तक तर घरात होतंच. शिवाय लेखकाच्या माहितीच्या दृष्टीने जास्तीचा रेफरन्स म्हणून की काय कोण जाणे पण, व्यंकटेश माडगूळकरांचं 'माणदेशी माणसं' हे पुस्तकही घरात होतं. सुरुवातीला काही काळ आई-बाबांच्या संसारात साठवणुकीच्या वस्तुंच्या ट्रन्करुपी इस्टेटीमध्ये पुस्तके ठेवलेली असल्यामुळे ती माझ्या नजरेस पडली नव्हती; पण नंतर - बहुदा आवरा-आवरीच्या निमित्ताने ही पुस्तके बाहेर आली (मला आठवतंय त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'उत्तरक्रिया' या नाटकाचं पुस्तक आणि अत्र्यांच्या 'साष्टांग नमस्कार' या सदाबहार नाटकाचं पुस्तकही या इस्टेटीमध्ये होतं). अर्थातच ही पुस्तकं मी पटापट वाचून काढली.
मला आठवतंय, 'माणदेशी माणसं'च्या वाचनानंतर पूर्णतः निराळं जग, पूर्णतः निराळ्या व्यक्ती अचानकच सामोऱ्या आल्यासारखं वाटलं होतं. 'माणदेशी माणसं'च्या १६८ पानांमध्ये १६ माणदेशी व्यक्तिरेखा व्यंकटेश माडगूळकरांनी रंगवल्यायत. 'माणदेशी माणसं'ची पहिली आवृत्ती १९४९ ची आहे. मराठी साहित्यातील 'क्लासिक्स'मध्ये 'माणदेशी माणसं'चा अंतर्भाव केला जातो. वास्तविक या व्यक्तिरेखांच्या लेखनामध्ये साहित्यिक स्पर्श लाभावा असा कुठलाच उद्देश किंवा अट्टाहास जरासुद्धा जाणवत नाही. मात्र अस्सल अनुभवाच्या जोडीने आलेला उत्कट कल्पनाविलास सर्व व्यक्तिरेखांना जिवंत करतो. हृदय पिळवटून टाकणाऱ्या गरिबीत आला दिवस ढकलणारी, दुष्काळात म्हातारी कोतारी माणसं, घर-दार, जनावरं हे सगळं सोडून देऊन अंगावरच्या लक्तरांनिशी 'जगायला' बाहेर पडणारी ही माणसं आहेत.
माणदेशातच वाढलेले व्यंकटेश माडगूळकर या व्यक्तिरेखा रंगवता रंगवता सभोवतालाची, वातावरणाची वर्णनेसुद्धा अशा पद्धतीने करतात की न पाहिलेल्या उजाड, वैराण माणदेशचा नकाशाच डोळ्यांसमोर येऊ लागतो. इतकंच काय वर्णनात आलेले घरट्यांचे, जोंधळ्याच्या पिकांचे, मेंढरांचे वासही आपल्याला येऊ लागतात... मला वाटतं वाचनाच्या छंदाचं हे एक वैशिष्ट्यच आहे की वाचकाला काहीही तोशीस न पडता जागच्या जागेवरून मनाने संपूर्णपणे वेगळ्या वातावरणाचे, वेगळ्या माणसांचे अनुभव घेता येतात... वेगळ्या काळामध्ये फिरूनही यायला मिळतं आणि या अनुभूतीची धुंदी बराच काळ तशीच राहू शकते.
बहुतेक सगळ्याच व्यक्तिरेखा लेखकाच्या निवेदनाच्या स्वरूपात पुढे सरकतात. या निवेदनाची भाषा साधी सरळ सोपी आहे; पण व्यक्तिरेखांच्या संवादांना मात्र अस्सल माणदेशी ग्रामीण, रसरशीत बोलीचा सुगंध आहे.
व्यंकटेश माडगूळकरांची ही सगळी माणदेशी माणसं गरिबीत जगत असली तरी गावगाड्याच्या सामान्य वहिवाटीनुसार जगतात. मात्र ही माणसं एकाच छापाची नाहीयेत. स्वभावाने, मनोवृत्तीने प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. यामध्ये बकरीवानी पालापाचोळा खाऊन जगणारा धर्मा रामोशी आहे. "जलमभर असंच दळिद्री राहून आमी मसणवटंला जायचं ... देवा चांडाळा का रं असं ?," असं विचारणारा रामा मैलकुली आहे. "देवा यापरीस पटकीसारक्या एकाद्या रोगानं मारून का टाकत न्हाईस गरिबाला ?," असले उद्गार काढणारी येसा महारीण आहे. गरीब सोशिक माणसं आहेतच पण बेधडक अंगावर डाफरणारा उद्दाम कोंडीबा गायकवाड आहे. दारिद्र्यानंच बेरकी आणि उद्दाम बनलेला शिवा चांभार आहे. आगीत सर्व जळून गेल्यावर वनात जाऊन राहणारा बन्याबापू नामक खानदानी ब्राह्मणसुद्धा आहे. बहादूर होऊन अस्वलाचे पंजे पकडणारी लक्ष्मी आहे तसाच मूकपणे काकीच्या छळाला बळी पडणारा मुसलमानाचा निरागस बकसही आहे.
म्हाताऱ्या धर्मा रामोश्याची मुलगी बजा खोपटामध्ये दळणाचं काम करते पण लाज झाकण्यापुरेसं वस्त्रसुद्धा तिच्या अंगावर पांघरायला नसल्यामुळे ती खोपटाबाहेर पडू शकत नाही... बन्याबापू हा ओबडधोबड वाड्याच्या रूपाने जुनं माणदेशी वैभव जपणारा खानदानी थाटाचा ब्राह्मण आहे. शिवाशिव, गावगाडा तो पाळून असतो; पण गावकऱ्यांना मदतही करत असतो. मात्र गांधीवधानंतरच्या दंगलीमध्ये वाडा जळून सर्वस्व गमावल्यानंतरही तो निःसंगपणे कुठलाही खेद-खंत न बाळगता गावाबाहेर झोपडी बांधून राहतो... रामा मैलकुली पिढीजाद व्हरलकी सोडून सडकेच्या कामाची सरकारी नोकरी पत्करतो. त्यातही त्याला पुरेसं मिळत नाहीच. चारचौघात उठून दिसणारी त्याची बायको नांदत नाही. पण तरीही, "आपल्याजवळ ऱ्हान्याची तिची जर विच्छा न्हाई तर कशाला जोरा करायचा ? कुटंबी सुकात असली म्हंजे झालं," असले शांतपणाचे उद्गार रामा काढू शकतो... शिवा माळी तसा साधा सरळ माणूस पण चिलमीच्या व्यसनापायी आणि वाईट संगतीपायी चोऱ्या करू लागतो, पकडला जातो, तुरुंगातही जाऊन येतो. एका छोट्या व्यसनापायी तो आयुष्यातून बरबाद होतो; मात्र त्याची खंतही त्याला आहे... याउलट शिदा चांभार. एकदम बेरकी आणि आगाऊ इसम. बेरकी तर एवढा की गांधीवधानंतर ब्राह्मणांची घरं जाळतात तेव्हा हा हात मारून आपलं घर भरून घेतो पण तरीही सगळ्या भानगडींतून नामानिराळाही राहतो... पोरका मुलाण्याचा बकस चुलत्याकडे राब राब राबतो पण त्याला पोटभर अन्नच काय, प्रेमाचे चार शब्दही मिळत नाहीत उलट हेटाळणीच नशिबी येते.
असली ही एकाच माणदेशातली पण वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या स्वभावाची ही सोळा व्यक्तिचित्रे व्यंकटेश माडगूळकरांनी अत्यंत नैसर्गिक साध्या पण परिणामकारक शैलीत रंगवली आहेत.
आजही मध्येच कधीतरी माझ्या संग्रहातलं हे छोटंसं पुस्तक मी वाचायला घेतो आणि हटकून या माणदेशी माणसांच्या मनातला सल मला बोचत राहतो आणि काही काळ उदासी दाटून येते, हे खरं आहे.
-- भाग ७) माणदेशी माणसं -- स मा प्त --
क्रमशः
- - भाग #८)हद्दपार
ऋणनिर्देश -- माहिती
व फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.
ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
@प्रसन्न सोमण –
१५/१२/२०१७.![]() |
व्यंकटेश माडगूळकर |
No comments:
Post a Comment