Thursday, 14 December 2017

#६) माझे आवडते पुस्तक - दिवसेंदिवस

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके

#) दिवसेंदिवस

दिवसेंदिवस / लेखक - शं.ना.नवरे (जन्म - २१ नोव्हेंबर १९२७ / मृत्यू - २५ सप्टेंबर २०१३.)

@@  शं.ना.नवरे यांचा अल्पपरिचय  @@ 

     शं.ना.नवरेमराठीतील नामवंत लेखक, नाटककार पटकथाकार ... शन्ना या नावानी प्रसिद्धमुख्यतः मराठी मध्यमवर्गीय माणूस, त्याचा दिनक्रम त्याचं भावविश्व यांची सांगड घालून शन्नांनी अतिशय लाजवाब कथा लिहिल्या. या कथा खूपच रसिकप्रिय ठरल्या. त्यांनी 'शन्नाडे' या नावानी वृत्तपत्रीय स्तंभलेखनही केले. तेही खूपच गाजले. शन्नांनी जयवंत दळवींच्या 'महानंदा' कादंबरीवरून 'गुंतत हृदय हे' हे नाटक लिहिले ते सुद्धा खूपच लोकप्रिय झाले. या व्यतिरिक्त त्यांनी 'वर्षाव,' 'सूर राहू दे,' 'हसत हसत फसवुनी,' 'मला भेट हवी हो,' 'रंगसावल्या,' इत्यादी दर्जेदार स्वतंत्र नाटकेही लिहिली.

     शन्नांचे वास्तव्य डोंबिवलीत होते. शन्ना नुसतेच डोंबिवलीकर होते असं नव्हे; तर डोंबिवलीवर त्यांचे खूप मनापासून प्रेमही होते. त्यांच्या लेखनातूनही हे प्रेम चांगलंच जाणवतं. जुन्या 'डोंबिवली'वर त्यांचा एक खूप सुंदर लेखही आहे. डोंबिवलीत झालेल्या २००३ च्या नाट्यसंमेलनाचे शन्ना अध्यक्षही होते.

     मुंबईकर मध्यमवर्गीय माणसाला केंद्रस्थानी ठेवून शन्नांनी अत्यंत सुंदर हृदयस्पर्शी कथानकं लिहिली आहेत. शन्नांच्या कथांमध्ये बेस्ट बसेस असतात, 'छुट्टा निकालो' म्हणणारे कंडक्टर्स असतात, 'आठ-बावन्न' किंवा 'नऊ-सात'च्या लोकल ट्रेन्स असतात, पण याशिवाय या सगळ्याच्या पलीकडे; या मध्यमवर्गीय माणसाची तत्वे आणि स्वप्ने; भावविश्व आणि प्रत्यक्षातली घुसमट; यातली रस्सीखेच शन्नांच्या लिखाणातून प्रकट होत असते. मध्यमवर्गीय माणसाचा तत्वांवरचा आणि आदर्शांवरचा विश्वास सुद्धा त्यांच्या लिखाणातून प्रतीत होत असतो.            

     शन्नांच्या खात्यावर २७ कथासंग्रह तसेच काही लेखसंग्रह, काही कादंबऱ्या, काही उल्लेखनीय नाटके अशी वैविध्यपूर्ण साहित्य संपत्ती आहे. 'तू तिथं मी,' 'आनंदाचे झाड,' 'एक उनाड दिवस,'  यासारख्या काही मोजक्या गाजलेल्या चित्रपटकथाही शन्नांनी लिहिलेल्या आहेत.

@@ @@

     माझ्या लहानपणी टी.व्ही.म्हणजे - रविवार वगळता - फक्त संध्याकाळी चार-पाच तास चालणारे, काळ्या-पांढऱ्या रंगात दाखवले जाणारे, मुंबई दूरदर्शनचे बऱ्यापैकी दर्जेदार कार्यक्रम एवढाच प्रकार होता. त्याकाळात आम्ही स्वतःच्या घरी टी.व्ही.ची प्राणप्रतिष्ठा करू शकण्याएवढे 'उच्च' मध्यमवर्गीय नसल्यामुळे हा टी.व्ही.अर्थात शेजाऱ्यांच्या सौजन्यानेच पाहिला जात असे. माझ्या त्या शालेय वयात या टी.व्ही.वर शं.ना.नवरे लिखित खूप सुंदर गजरे सादर केले गेले होते. नवीन पिढीसाठी एवढीच माहिती देतो की तेव्हा आठवड्यातून एकदा एक तास 'गजरा' नावाचा मराठी करमणूकपर 'रंगारंग कार्यक्रम' सादर होत असे. या काही दर्जेदार गजऱ्यांच्या लिखाणामुळे शं.ना.नवरे हे नाव माझ्या प्रथम कानांवर पडलं. मला आठवतंय त्याप्रमाणे शन्नांच्या 'शहाणी सकाळ' या अप्रतिम कथेवर आधारित एक छोटंसं नाटुकलंही टी.व्ही.वर सादर केलं गेलं होतं... त्यानंतर लायब्ररीतून शन्नांची पुस्तकं मिळवून वाचन सुरु झालं. मुख्यतः मध्यमवर्गीय माणसांवरचं शन्नांचं लेखन एकदम आवाक्यातलं वाटल्यामुळे खूपच आवडलं. मात्र वाचनात आलेल्या शन्नांच्या लिखाणात सगळे कथासंग्रहच होते.

     अचानकच एके दिवशी 'दिवसेंदिवस' ही शन्नांची कादंबरी लायब्ररीमध्ये आढळली. तिथेच चाळता चाळता असं लक्षात आलं की, ही छोटेखानी कादंबरी पूर्णतः 'डायरी (दैनंदिनी),' या फॉरमॅटमध्ये लिहिलेली आहे. शन्नांची कादंबरी म्हटल्यावर अटळपणे कादंबरी घरी घेऊन आलो आणि ही फक्त १४८ पानांची कादंबरी एका दमात वाचून काढलीया कादंबरीला जयवंत दळवी यांची अगदी छोटीशी - एकाच पानाची - पण तरीही अतिशय आशयसंपन्न अशी प्रस्तावना आहे.

     'दिवसेंदिवस' ही डायरी लिहिणारा शन्नांचा नायक हा १९७३-७४ च्या आगेमागे मुंबईच्या एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारा, अलिकडेच वयात आलेला, आणि लग्नाळू असा नायक आहे. (कादंबरीची पहिली आवृत्ती १९७५ ची आहे.) या सामान्य नायकाचे नाव आहे केशव देशपांडे. त्याचे आई-वडील कोल्हापूरला आहेत पण केशव वडिलांच्या मित्राच्या - श्री.टिकले आणि त्यांची टिकली - चाळीच्या बिऱ्हाडात भाडं देऊन राहतो आहे. 'दिवसेंदिवस' ही या केशवनी जेमतेम एका वर्षातल्या काही, त्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा, दिवसांची लिहिलेली डायरी आहे.

     कादंबरीतल्या काही गोष्टी किंवा निमित्ता-निमित्तानी केशवनी लिहिलेले - विशेषतः सुरुवातीचे - काही दिवस हे 'चावटपणा'कडे झुकणारे किंवा अश्लीलतेचा निर्देश करणारे निश्चितच आहेत; पण फक्त निर्देशच. त्या व्यतिरिक्त    एक निश्चित अशी मर्यादा शन्नांनी ओलांडलेली नाहीये... खरंतर मी स्वतः सुद्धा कादंबरी पहिल्यांदा वाचली तेव्हा 'टीन-एज' मध्येच असल्यामुळे हे लिखाण वाचतांना मला तेव्हा गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं, यात काहीच नवल नाही. मात्र तरीही, आजही मला असं वाटतं की, केशव हा 'टीन-एज'मधून  लग्नाळू वयाकडे आलेला नायक आहे, हे लक्षात घेतलं तर हे लिखाण खटकणारं वाटता उलट हसू फुलवणारं वाटतं.                                                 

     कादंबरीमध्ये प्रसंगा-प्रसंगानी येणाऱ्या व्यक्तिरेखा शन्नांनी ‘कमाल’ फुलवल्यायत. केशवच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये नोकरी करत असलेली J उर्फ ज्योती, टिकला आणि टिकली, केशवच्या ऑफिसमधला 'चावट' ब्रह्मचारी धारेश्वर, ऑफिसमधलीच, थोडीशी 'चालू' टाईपची धडफळे, केशवच्या चाळीतली बिनधास्त विमल टंकसाळी, चाळीतले उकिडवे आणि त्यांचा लहानपणी हरवून 'टीन-एज'मध्ये सापडलेला आणि फक्त शारीरिक गरजा लक्षात आलेला अर्धवट मुलगा अश्वत्थामा, अशा एक ना अनेक व्यक्तिरेखा केशवच्या नजरेतून आणि वर्णनातून सापडत जातात. वाचता वाचता आपणही नकळतपणे त्या वयात शिरतो आणि त्या वातावरणातलेच होऊन जातो.         

     या सर्व व्यक्तिरेखा मस्तच असल्या तरी माझ्या मनाला भुरळ घालणारी व्यक्तिरेखा आहे अनंताची. हा अनंता म्हणजे इंजिनियर झालेला आणि औरंगाबादला स्थायिक झालेला टिकला-टिकलीचा मुलगा. हा अनंतासुद्धा तरुणच आहे. मात्र त्याचे विचार; एकीकडे तारुण्यातली धुंदी, मजा अनुभवणारे रसिक, स्वच्छंदी आहेत तर दुसरीकडे प्रगल्भ आणि आयुष्याच्या सखोलतेची, गंभीरपणाची जाणीव करून देणारे सुद्धा आहेत.

     अनंताच्या विचारांमधलं व्हेरिएशन जाणवून देणारं शन्नांचं हे वर्णन --

     "अनंताची आणि माझी मैत्री जमलीय. आम्ही दोघं एकमेकांना अरे-तुरे करतो... त्यानं विचारलं - 'मुंबईत तुला खूप मोकळा वेळ मिळतो. तुला वाचनाची वगैरे आवड ?'
‘आहे थोडीशी
‘म्हणजे नाहीतच जमा. सध्या काय वाचतो आहेस ?’
‘सध्या म्हणजे ... परवा मी ‘हेरॉल्ड रॉबिन्स’चं 'बेटसी' ...’
‘वेळ घालवायला आणि मन चाळवायला बरा हा हेरॉल्ड रॉबिन्स ... तुला मी काही चांगल्या पुस्तकांची यादी करून देईन. ती मिळव आणि वाच. माझ्याजवळ स्वतःची अशी छोटीशी सुरेख लायब्ररी आहे औरंगाबादला. वेळ मिळाला की काढतो पुस्तक. बसतो वाचत. इंग्रजी, मराठी आणि हिंदी. आमच्या ऑफिसात खान म्हणून एक हेडक्लार्क आहे. उर्दू गझला म्हणजे त्याचा वीक पॉईंट. त्याच्याकडून उर्दू शिकतोय ... अरे, आयुष्यात वेळ पुरु नये इतके उद्योग, इतके छंद मागं लावून घ्यावेत. आपलं आजचं वय पुन्हा कध्धी यायचं नाही. मग म्हातारपणी वाटेल, चांगली पुस्तकं वाचायची राहिली. चांगले चित्रपट, नाटकं पाहायची राहिली. कुणाचं वादन कुणाचं गायन ऐकायचं राहिलं. हवं होतं ते शिकायचं राहिलं ... तसं खूपच राहून जातं. कितीतरी ठिकाणं बघायची राहतात ... कितीतरी माणसांची दर्शनं होत नाहीत. महाबळेश्वरच्या पावसात भिजणं राहतं. अकोल्याचा उन्हाळा सोसायचा राहतो ...'
मी अनंताचं बोलणं ऐकत होतो. या हरवल्या जाणाऱ्या गोष्टींचं अस्तित्व सुद्धा मी कल्पिलेलं नव्हतं.
'आपली खाणी किती राहतात ! पिणी किती राहतात ... आपण वेळ घालवतो त्याच त्याच गोष्टीत. मन रमवतो त्याच त्याच ठिकाणी ... औरंगाबादला मस्त थंडी पडली की मी उघडाबंब बसतो खुर्चीत. समोर व्हिस्कीचा ग्लास. टेपरेकॉर्डरवर 'प्यासा'मधली गाणी ... 'जाने वो कैसे लोग थे जिनके,' 'हम आपकी आँखोंमे इस दिलको बसा दे तो,' 'जाने क्या तूने कही,' 'जिन्हे नाज़ है हिन्दपर वो कहाँ है' ... अरे असे क्षण सुगंधी, सोन्याचे, संगीताचे होतात. शेवटचा श्वास घेतांना ही गाणी, ही थंडी, ही व्हिस्कीची धुंदी... सगळ्या आवडत्या गोष्टी गोळा होतात त्या श्वासाला निरोप द्यायला.'
'तू दारू पितोस ?'
'अंहं ! मी फक्त मद्यपानातली रसिकता पितो.'
'कुणी दुःख फार झाल्यावर पितात -'
'दोस्ता, सुख आणि दुःख यात फक्त एका अक्षराचा फरक. कधी एका क्षणीचं दुःख काही वर्षांनी सुखाचं वाटायला लागतं. इथं मुंबईत कॉलेजात होतो. एका मुलीवर खूप प्रेम केलं. तिच्या घरून विरोध झाला ... सगळं बिनसलं... इर्षेनं इंजिनियर झालो ... आता आठवतात त्या आठवणी फक्त ... आठवतांना किती सुख होतं ! एकदा पावसात आम्ही दोघं वरळी सी-फेसवर गेलो, भिजत राहिलो. ती गात होती : 'मुहब्बत ऐसी धडकन है' ... सी.रामचंद्र ... तिचा आवडता म्युझिक डायरेक्टर ... दोस्ता, अरे त्या क्षणी पाऊसच गात होता ... सुखाचं गाणं ... असेच सुखाचे क्षण आठवतात आता. कधी कविता वाचतांना एखाद्या शब्दाची ठेच लागते... कळ येते ती पुन्हा सुखाचे क्षण हातात ठेवायला.'
वाटतं, अनंताचं बोलणं टेप करून ठेवावं. -"

     'दिवसेंदिवस'मधील अशाच पुढच्या एका तारखेला, अनंताच्या औरंगाबादला परत जाण्याच्या प्रसंगी, शन्नांनी अनंताच्या विचारांचं असंच भन्नाट, उधळलेल्या शब्दांत वर्णन केलंय --

     "गाडी सुटायला दहा मिनिटं राहिली. स्टेशनात अनाउन्समेंट झाली. घशात आवंढा आला.
'अनंता तू गेलास की कसली तरी पोकळी -' पुढे बोलवेनाच.
'सगळ्या पोकळ्या भरतात. नवीन माणसं भेटतात. नवीन छंद सुचतात ... काहीच झालं नाही तर काळ आहेच पाट्या टाकायला ... अखेरीस निरोप घेणं म्हणजे ... कठीणच आहे ते शब्दात पकडणं. ते सोसूनच कळवून घ्यावं लागतं. तुला एक गंमत सांगतो. हातात कुठलीही डिक्शनरी पडली की मी त्यात एक शब्द बघतो, 'टु सफर' ... 'सोसणे' ... अंहं ! त्यातही ते शब्दात धरता आलेलं नसतं ... असा स्टेशनवरचा निरोप ... स्मशानभूमीतला निरोप ... -- तिचा मी अखेरचा निरोप घेतला तो कुठं माहित आहे ? नरिमन पॉईंट जवळ एक आलिशान हॉटेल बांधलं जात होतं, त्या कच्च्या बांधकामातल्या जिन्यावर ...'      
विषय बदलायला म्हटलं -- 'घरून निघतांना तुझी आई तुझ्या लग्नाबद्दल ...'
'हं, तिला वाटतं, मी अठ्ठावीसच्या पुढं गेलो, एव्हाना सुनबाई यायला हवी होती. पण माझं आता मनच उडालंय... आपल्या पिढीच्या डोक्यात एक असतं, म्हाताऱ्या पिढीला वेगळंच वाटत असतं... आमचा खान एक उर्दू शेर सांगतो : झाड वाऱ्याला विनंती करतंय, 'वाऱ्या रे इतक्या जोराने वाहू नकोस रे ! तू असा वाहायला लागलास की माझ्या अंगावरली पिकली पानं भराभरा गळायला लागतात. मग त्यांना वाटतं, 'ती म्हातारी झाली आहेत, मला नकोशी झाली आहेत, म्हणून मीच त्यांना मुद्दाम खाली टाकतोय !' --
गाडी सुटतांना म्हणाला, 'तुला कार्टूनिस्ट आर.के.लक्ष्मण माहीत आहे ना ? त्याची पहिलीच कादंबरी आहे 'सॉरी, नो रूम.' त्यात हॉटेलचा मॅनेजर आणि त्याचे वडील शेवटी टॅक्सीत बसून निघून जातात. अरे ! घशात हा मोठ्ठा आवंढा येतो ती कादंबरी मिटतांना. तू जरूर वाच ती. येऊ आता ? गाडी हललीय.'
गाडी सुरु झाली.
एक दुःखी आनंद दूर गेला."

     'दिवसेंदिवस' वाचतांना मला कुठेतरी असं वाटून जातं की, अनंताची व्यक्तिरेखा म्हणजे केशवच्या व्यक्तिरेखेचीच दुसरी बाजू, असं काहीसं शन्नांना सुचवायचं होतं की काय !

     'दिवसेंदिवस'चा शेवट काय आहे ? केशवला ज्योती मिळते का ? सुखांत होतो की दुःखांत ? -- अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं प्लिज तुम्ही कादंबरी वाचूनच मिळवा... मला मात्र आजही ही कादंबरी वाचल्यावर एक अनामिक हुरहूर जाणवत राहते.       

--- भाग ) दिवसेंदिवस -- मा प्त -- 
क्रमशः - - भाग #) माणदेशीमाणसं

ऋणनिर्देश -- माहिती फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील
          
@प्रसन्न सोमण
०१/११/२०१७.

शं.ना.नवरे

No comments:

Post a Comment