Thursday, 28 December 2017

#८) माझे आवडते पुस्तक - हद्दपार

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके

#) हद्दपार

हद्दपार / लेखक - श्री.ना.पेंडसे (जन्म - जानेवारी १९१३ / मृत्यू - २४ मार्च २००७.)

@@  श्री.ना.पेंडसे यांचा अल्पपरिचय  @@ 
 
     श्री.ना.पेंडसेमराठीतील एक जेष्ठ, ख्यातनाम लेखक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी गावचा. पेंडसे फक्त वयाच्या ११/१२ व्या वर्षापर्यंतच कोकणात होते. पण तरीही मुर्डी, दापोली, आंजर्ले, हर्णै, आसूद, केशवराज, व्याघ्रेश्वर हा कोकणातला परिसर अक्षरशः त्यांच्या जीवीच्या जिवलग मित्रासारखा होता. त्यांची बव्हंश साहित्य निर्मिती याच परिसराच्या, त्यातल्या व्यक्तींच्या पार्श्वभूमीवरच झाली. साहित्यविश्वात ते 'प्रादेशिक कादंबरीकार' म्हणूनच मान्यता पावले. पेंडशांचा उल्लेख सामान्यतः शिरूभाऊ असाच होत असे.

     वयाच्या ११/१२ व्या वर्षी कोकण सोडून शिरूभाऊ मुंबईतच स्थायिक झाले. सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी बेस्ट उपक्रमामध्ये अत्यंत इमाने इतबारे नोकरीही केली. मुंबईतील वास्तव्याचे अनुभव घेत घेत त्यांनी महानगराच्या पार्श्वभूमीवरील लिखाण सुद्धा केले आहे. मुंबईतील जुन्या काळच्या चाळ संस्कृतीवर आधारित 'संभूसांच्या चाळीत' हे सुंदर नाटकही त्यांनी लिहिले. याशिवाय बेस्टमधील नोकरीच्या अनुभवांवरून त्यांनी 'बेस्ट उपक्रमाची कथा' नावाचे पुस्तकही लिहिलेले आहे. त्यांनी 'खडकावरील हिरवळ' या नावाचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकही लिहिले आहे. अपवादात्मक एक 'जुम्मन' नावाचा कथासंग्रहही त्यांच्या नावे जमा आहे... मात्र हे सगळं खरं असलं तरीही शिरुभाऊंचा खरा परिचय मुख्यतः 'कोकणी पार्श्वभूमीवरील कादंबरीकार' असाच आहे, हेही खरं.

     'एल्गार' (१९४९) ही त्यांची पहिली कादंबरी. पाठोपाठ त्यांच्या 'हद्दपार' (१९५०) आणि 'गारंबीचा बापू' (१९५२) या कादंबऱ्या आल्या आणि या कादंबऱ्यांनी आपल्या मोहवणाऱ्या अंगभूत वेगळेपणानी साहित्यरसिकांची भरभरून दाद मिळवली. 'गारंबीचा बापूतर अक्षरशः भूतो भविष्यती गाजली. यानंतर सातत्याने त्यांच्या कादंबऱ्या येतच राहिल्या. त्याचवेळेस त्यांच्याच कादंबऱ्यांवरून बेतलेली 'राजे मास्तर,' 'गारंबीचा बापू,' यासारखी नाटके त्यांनी लिहिली तर काही पूर्णतः वेगळी स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली. त्यांच्या नवनवीन कादंबऱ्या आणि नाटकंही लोकप्रियही होत होती. १९६३ सालची 'रथचक्र' उत्तरकाळात १९८८ सालची द्विखंडात्मक 'तुंबाडचे खोत' या दोन कादंबऱ्या तर विशेष उल्लेखनीयच. शं.ना.नवरे यांच्या 'दिवसेंदिवस' या कादंबरीप्रमाणेच शिरुभाऊंची 'लव्हाळी' ही कादंबरीसुद्धा 'दैनंदिनी'च्या फॉरमॅट मध्ये आहे.                           
      
@@ @@

     माझं मूळ गाव कोकणात असलं तरीही कोकणामध्ये आमचं कुणीच नसल्यामुळे बराच मोठा होईपर्यंत मी कोकण मुळी पाहिलंच नव्हतं. तसा शालेय वयात मी आई-बाबांबरोबर दापोली, पालगड परिसरात ट्रीपच्या निमित्ताने गेलो होतो आणि कौटुंबिक ट्रीप म्हणून आनंदातसुद्धा होतो; पण त्यावेळी मी लहानच होतो आणि कोकणातील निसर्गरम्य परिसर म्हणून, काही वेगळं गारुड माझ्यावर झाल्याचं आठवत नाही. पुढे कॉलेजात जायला लागल्यानंतर या कोकणातील रम्य परिसराचं गारुड माझ्यावर झालं, पण ते हा परिसर प्रत्यक्ष पाहून नव्हे; तर श्री.ना.पेंडशांच्या 'हद्दपार' आणि 'गारंबीचा बापू' या दोन कादंबऱ्या वाचून.

     मुळात भरपूर वाचनवेड असलेल्या माझ्या मोठ्या भावानी कुठुनश्या या दोन कादंबऱ्या मिळवल्या होत्या (नंतर त्यानी त्या विकतही घेतल्या) आणि या दोन्ही कादंबऱ्या त्याला खूपच आवडल्या होत्या. प्रथम दोन्हीमधली 'हद्दपार' ही कादंबरी मला वाचायला मिळाली.

     बंडो आबाजी कोरड्यांच्या घराण्यातले 'राजे मास्तर' हे या कादंबरीचे नायक. बंडो आबाजींनी दुर्गेश्वरामध्ये एका कोयतीने वाघाशी लढत देऊन वाघाचे तुकडे केले आणि म्हणून पेशव्यांनी त्यांना दुर्गेश्वरला वाडा बांधून दिला तुम्ही राजे शोभता असं म्हणून राजे हे उपनावही दिलं. मात्र क्षत्रिय वृत्तीचा पूर्ण अभाव असलेली या घराण्यातली पहिली व्यक्ती म्हणजे कथानायक राजेमास्तर... मास्तरांचे वडील म्हणजे भाई हे वाड्यामध्ये आणि पूर्वजांच्या गतवैभवामध्ये रममाण होते. त्यामुळे साहजिकच त्यांना मास्तरांनी मास्तर होणं, नोकरीची क्षुद्र वृत्ती स्वीकारणं, हेच मुळात मान्य नव्हतं. मात्र तरीही मास्तरांनी आयुष्यभर स्वतःला जे योग्य वाटलं, बरोबर वाटलं तेच केलं. शाळेत नोकरी तर धरलीच पण परजातीच्या, वाड्यावर वरकाम करणाऱ्या मुलीच्या रुपाला भाळून; वडिलांना 'केलं तर याच मुलीशी मी लग्न करीन,' असं ठणठणीतपणे सांगून लग्नही केलं. अगदी नाईलाजानी, निरुपायानी भाईंनी शेवटी हे लग्न लावूनही दिलंच. शेवटी एकूणच निराशेमध्ये भाईंनी पूजेत असलेल्या बंडो आबाजींच्या कोयतीसहित विहिरीमध्ये उडी मारून जीवनयात्राही संपवली. हळुहळू मुळातच दिखाऊ, बेगडी असलेलं राजांचं वैभव एकेका वस्तूच्या बाजारात येण्यासरशी नष्ट होत होतंच... एकूण या सगळ्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर शिरुभाऊंनी मास्तरांची व्यक्तिरेखा अधिकाधिक उंचावत नेलेली आहे.

     मास्तरांची पत्नी लक्ष्मी ही प्रेमळ असते हे खरंच आहे पण तिला राजांच्या गतवैभवाची आंस असते आणि त्यापायी ती मास्तरांना त्या वैभवाची निशाणी असलेली पूजेतली कोयती विहिरीतून वर काढण्यास सांगत असते. मात्र मास्तर या अंधश्रद्धेला सपशेल विरोध करतात आणि आपलं नियत कर्तव्य चालू ठेवतात. मास्तर निपुत्रिक राहणार असं भविष्य असतं; पण कालांतराने का होईना; ते खोटं ठरतं आणि मास्तरांच्या 'नन्नू'चा जन्म होतो... पण पुढे वेगानी वेगवेगळ्या घटना घडत राहतात आणि मास्तरांचं सत्व आणि स्वत्वसुद्धा सर्वार्थानी पणाला लागतं आणि त्यातून, जळून शुद्ध झालेल्या सोन्याप्रमाणे मास्तरांचं उदात्त रूप वाचकांच्या समोर येत राहतं.
 
     मास्तरांचा उच्चशिक्षित विद्यार्थी दिगू शिंत्रे याच्या निवेदनाच्या स्वरूपात कादंबरी आकार घेते. कथेतलं ओघाओघानी येणारं सगळं निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण शिरुभाऊंनी अतिशय समर्थपणे आणि वाचकाला गुंगवून, रंगवून पुढे नेलेलं आहे.

     नन्नूच्या जन्मापूर्वी इतर सर्व मुलांशी, मास्तरांच्या विद्यार्थ्यांशी अतिशय प्रेमळपणे वागणारी मास्तरांची पत्नी नन्नूच्या जन्मानंतर नन्नूची इतर मुलांबरोबर तुलना करत राहते प्रसंगी तुटक तुटक वागू लागते; परवडू शकणारी सुखं नन्नूला मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहते. ही परिस्थिती सांगतांना शिरूभाऊ अतिशय अप्रतिम वर्णन करतात --

     "शहाणा गरीब आपल्या पोरांना सवयी लावतांना आपलं पोरगं गरिबीला वरघटेल याची काळजी सतत घेत असतो. ही काळजी घेण्यात तो मोठा शहाणपणा दाखवतो असं थोडंच आहे ? ... त्याची ती प्राथमिक जबाबदारीच असते ... राजेवाडा इथंच घसरला ..."

     गावचा शेरण्याचा मान गरीब म्हांबऱ्याच्या घराण्याकडे की सोन्याबापूंकडे, असा एक प्रादेशिक पण गावच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहतो. त्या संदर्भातल्या कोर्टकेसमध्ये मास्तरांनी आपल्याला अनुकूल साक्ष द्यावी या इराद्याने सोन्याबापू पैसे देऊ करतात. ते नाकारताना शिरुभाऊंनी केलेलं वर्णनही असंच लक्षणीय आहे --

     "सोन्याबापूंनी प्रोमिसरी नोट लिहून दिली तरीही मी त्यांना अनुकूल साक्ष देणार नाही... पैसा हा माणसाला मस्तवाल बनवीत असतो. परमेश्वरालासुद्धा विकत घ्यायला पैसा डरत नाही. पण लक्षात ठेव नुसतं माणसं विकत घेण्यानी पैशाचं कधीच समाधान होत नाही, ते जगजाहीर झालं म्हणजेच हा समंध शांत होतो. पैशाकरिता स्त्रीनं शरीर विक्रय करणं आणि मी खोटी साक्ष देणं यात तात्विक फरक काडीचाही नाही..."

     मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये मास्तरांच्या ज्या व्यक्तिरेखा आल्यायत त्यामध्ये पु.लं.चे चितळे मास्तर, व्यंकटेश माडगूळकरांच्या 'बनगरवाडी'तला पोरसवदा मास्तर आणि 'हद्दपार' मध्ये श्री.ना.पेंडसेंनी रंगवलेले राजे मास्तर हे खरोखरच अजरामर ठरायला हरकत नसावी.                    
   
-- भाग ) हद्दपार -- मा प्त -- 
क्रमशः - - भाग #)अभोगी 

ऋणनिर्देश -- माहिती फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
          
@प्रसन्न सोमण
२३/१२/२०१७.




श्री.ना.पेंडसे