---
राम नावाचा राव ---
हल्लीच आमच्या कॉलनीच्या काही कामानिमित्त मुंबई म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये जाण्याची वेळ आली. तसा इथूनच मी रिटायर झालेलो असल्यामुळे हे ऑफिस मला परकं मुळीच नव्हतं ... अर्थात रिटायरमेंटनंतर एवढ्या सहासात वर्षांनी आल्यावर अगदी थोडे चेहरे ओळखीचे होते; बाकी स्टाफ मात्र अपरिचित होता ... माझं काम अगदी छोटं आणि क्लेरिकल लेव्हलचं होतं ... वास्तविक तसा म्युन्सिपाल्टीचा इनडोअर सेक्शन म्हणजे पारंपारिकदृष्ट्या बरंचसं स्त्रीराज्य असतं; पण इथे दोनतीन जेन्टस क्लार्क्स होते ... माझं काम सुद्धा नेमकं पोरसवदा जेन्टस क्लार्ककडे निघालं ... हा क्लार्क खूप चटपटीत होता ... काम तर झालंच; पण वर लगेच म्हणाला,
"साहेब इथे चहावाला पटकन येणं कठीण आहे ... त्यापेक्षा चला ना बाजूच्या कॅंटीनमध्ये चहा घेऊया."
"कोण पाजतोय ? … तू पाजतोयस ? ... मग मला पण यायलाच पाहिजे" ... डोळे मिचकावत हसत त्याच्या बाजूच्या टेबलावरचा क्लार्क म्हणाला.
एवढं तो क्लार्क म्हणाला मात्र; पटकन माझं मन पस्तीस एक वर्ष - ज्या वेळेस मी क्लार्क
होतो त्या काळापर्यंत - मागे गेलं. क्षणात मला "कोण पाजतोय ?" हा
प्रश्न, त्यातला तो विशिष्ट ‘एंक्झायटीवाला’ टोन आणि नेहमीच हा प्रश्न ह्याच टोननी हसतहसत विचारणारा रामराव आठवला.
रामराव म्हणजे रामराव फातर्फेकर ... आमच्या बांद्रा ऑफिसमधला सिनियर स्टेनोग्राफर कम टायपिस्ट ... या आमच्या बांद्रा ऑफिसमध्ये सुद्धा स्त्री राज्य होतंच; मात्र वेस्टर्न सबर्ब्सचं हेड ऑफिस असल्यामुळे स्टाफ जरा जास्त होता ... त्यात सहासात जण जेन्टस होते ... पैकी आम्ही तिघंचौघं गद्धे पंचविशीत होतो ... इथे वातावरण बरंच घरगुती आणि मोकळं ढाकळं होतं ... रामराव बऱ्यापैकी मोठा म्हणजे बत्तीस तेहेतीसच्या घरात होता; पण लग्न न जुळल्यामुळे अविवाहित आणि बोलायला मस्त मोकळा, मजेशीर होता ... त्यामुळे वयानी जरा मोठा असला तरीही थोड्याच दिवसांत आम्ही अहो वरून अरेतुरे वर आलो; पण संबोधन मात्र रामराव हेच राहिलं.
लहानपणीच वडील गेल्यामुळे वेंगुर्ल्याजवळच्या कुठल्याशा गावातून मुंबईत कुण्या नातेवाईकाकडे आलेला छोटा रामराव, कष्ट करून ग्रॅज्युएट झाला ... रामराव मूळचा हुशार होताच; मात्र परिस्थितीमुळे न झेपणारी भली मोठ्ठी स्वप्न पाहूच नयेत, हे समजण्याइतपत व्यवहारी सुद्धा होता ... त्यामुळे त्यानं शॉर्टहँड टायपिंगचा कोर्स केला ... आणि काळाची गरज म्हणून लगेच म्युन्सिपाल्टीत चिकटला ... सुरुवातीला विरारला भाड्याच्या घरात राहून पुढे पै पै जमवून त्यानं विरारलाच छोटा ब्लॉक सुद्धा घेतला होता ... तो अविवाहित होता तो सुद्धा मुख्यतः खडतर परिस्थितीमुळेच ... त्यामुळेच तो काहीसा चिक्कू मारवाडी झालेला होता. त्यामानाने वाकनीस, पाळंदे आणि मी; असे पंचविशीतले तिघंही, नवीन क्लार्क्स पण, घरचे जरा बरे होतो ... त्याकाळी तरी म्युन्सिपाल्टीत, अगदी केबिन मध्ये बोलावून डिक्टेशन देण्याइतकं इंग्रजीवर तगडं प्रभुत्व असणारे साहेबलोक, अगदी 'ना के बराबर' होते. त्यामुळे रामरावला स्टेनोग्राफर म्हणून काम फारच कमी असे. काय असतील ते फक्त टायपिंगसाठी आलेले ड्राफ्ट्स ... तेही दोन टायपीस्ट्स असल्यामुळे विभागले जायचे, त्यामुळे टायपिंगचा चांगलाच स्पीड असलेला रामराव कामं चुटकीसरशी उडवायचा ... ही कामंही बिनचूक असल्यामुळे सहसा दुरुस्तीसाठी कधी परत रामरावकडे येत नसत. मी रामरावला तो टायपिस्टचा विशिष्ट गोल खोडरबर आणि ती विशिष्ट व्हाईट इंक वापरतांना फारसं कधी पाहिलं नाही ... आजकाल या दोन्ही गोष्टी जवळजवळ इतिहासजमाच झाल्यायत ... त्याची कामं उडवल्यावर उरलेल्या वेळात तो अवांतर वाचनाचा टाईमपास आणि टिवल्याबावल्या करायला मोकळा असायचा ... एकूण त्याचं इंग्रजी आणि मराठीही अवांतर वाचन चांगलं होतं आणि तसाच खुसखुशीतपणा त्याच्या बोलण्यातही असायचा ... साहजिकच आम्हा तीन यंगस्टर्सचा म्होरक्या सुद्धा रामरावच असायचा आणि त्याच्या तालमीत खुसखुशीत टिवल्याबावल्यांमध्ये आम्हीही तरबेज होत होतो.
त्याकाळी मधल्या वारी आपापला
चहा प्यायचा आणि संध्याकाळी कलेक्शनला आलेल्या चहावाल्याकडे काय ते दिवसाचे सात-आठ
रुपये द्यायचे, असा शिरस्ता होता ... तेव्हा म्युन्सिपाल्टीत पगार तसे बेताचेच होते
आणि दुसऱ्या कोणी चहा पाजला तर तो म्हणजे काहीतरी खास निमित्ताने केलेली 'टी पार्टी'
असे ... ही 'टी पार्टी' किंवा पॉप्युलर शब्द म्हणजे 'केस फॉर टी' बहुदा कोणा कलिग्जच्या
वाढदिवसानिमित्त तरी असे किंवा वार्षिक इन्क्रिमेंटच्या निमित्ताने तरी असे. अर्थात
ही वार्षिक दोन वेळची टी पार्टी आपल्यालाही द्यावी लागायचीच आणि ती फारशी टाळता येत
नसे कारण 'केस फॉर टी' हा एक इव्हेंट असल्यामुळे या तारखा साधारणपणे कलिग्जकडून लक्षात
ठेवल्या जायच्या ... आता आपण लॉंग लीव्हवर असलो तर गोष्ट वेगळी; पण इन्क्रिमेंटच्या
दिवशी लॉंग लीव्हवर असलो तर तेवढे दिवस इन्क्रिमेंट मिळत नसे ... त्यामुळे द्यावी लागणारी
टी पार्टी टाळण्याची तीही शक्यता नसे, त्यामुळे आधी जागरूक राहून आपल्याला टी पार्टीच्या
पैशांची तजवीज करायला लागायची.
शनिवारचा दिवस म्हणजे अर्ध्या दिवसाचं ऑफिस ... त्यातही सबर्ब्समध्ये शनिवारची ऑफिसची वेळ ही सकाळी आठ ते साडेअकरा अशी असे ... एकतर आम्ही झोपेतून उठून कसंतरी आवरून जेमतेम मस्टर गाठणारे भिडू ... त्यातच तरुण वय ... त्यामुळे ‘काहीतरी चहानाश्ता हवाय,’ असं आमचं पोट आम्हाला ओरडून ओरडून सांगत असे ... साहजिकच आम्ही रामरावच्या टेबलाशी जात असू ... "रामराव कॅंटीनमध्ये जाऊन चहा घेऊया रे !"
"कोण पाजतंय ?" क्षणाचाही वेळ न घालवता रामरावकडून प्रश्न फेकला जायचा ... आता अशा परिस्थितीत त्याच्याकडे डायरेक्ट नाश्त्याची मागणी करणं ही तर अशक्यप्राय गोष्ट होती.
"तू आमचा सिनियर म्हणून खाली कॅंटीनमध्ये चल तर खरा ! बिलाचं नंतर बघू" ... आम्ही त्यातल्यात्यात चापलुसी करायचा प्रयत्न करायचो ... खरंतर ही चापलुसी रामराव नक्कीच ओळखून घ्यायचा, पण खरंच सिनियर असल्यामुळे हा राजा मधून मधून उदार व्हायचाही ... जेमतेम एखाददुसऱ्या वेळेला त्यानं आमचं चहा-वड्याचं किंवा चहा-भज्यांचं बिल भरलं असेल ... लगेच त्यानीच आयडिया काढली ... "शनिवारच्या चहानाश्त्यासाठी तुम्ही माझ्याकडे वीसवीस रुपये कॉन्ट्री देऊन ठेवत जा ... त्यानंतरच मी बिल भरीन."
अर्थात आम्हीही काही कमी नव्हतो
... "एवढं वीस रुपयांचं काही आम्ही खातपीत नाही हं ! आम्ही दहा दहा रुपये देऊ,"
अशी कॅसेट लावायचो.
त्यानंतर दर शनिवारी दहा दहा
रुपये त्याला देऊन आम्ही मस्तपैकी भरपेट म्हणण्यासारखा, चहानाश्ता करत असू आणि नित्यनियमानी
रामराव, "साल्यांनो, तुमच्यामुळे मी प्रचंड लॉसमध्ये जातोय," अशी साप्ताहिक
बोंब मारत असे ... ‘प्रचंड लॉसमध्ये’ हा
त्याचाच अतिलाडका शब्दसंग्रह होता ... शिवाय हे शब्द उच्चारतांना त्याचा अविर्भाव असा
असे की जणू काही टाटांचा किंवा बिर्लांचा बिझनेसच आम्ही रसातळाला नेलाय.
रामराव, मी, पाल्या म्हणजे
पाळंदे आणि वाकनीस अशी आमची चौकडी आम्ही; मला प्रमोशन मिळेपर्यंतच्या त्या सातेक वर्षांत;
आमच्या ऑफिसात बऱ्यापैकी गाजवलेली होती.
दरम्यानच्या काळात मध्येच रामरावानी
कुणालाही न बोलावता स्वतःचं रजिस्टर्ड लग्न उरकून घेतलं होतं आणि त्यानिमित्त ऑफिसला
'टी पार्टी' दिली. “आम्हाला लग्नाला का नाही बोलावलंस ?” असा गिल्ला केल्यावर लगेच
त्याची प्रतिक्रिया काय ? तर ... "रजिस्टर्ड तर लग्न केलं ... त्यात भरीसभर म्हणून
तुमचं सगळ्यांचं एवढं लटाम्बर कशासाठी बोलवायचं ? ... आणि हसून त्यानं विषय कट केला
... 'लटाम्बर' हा सुद्धा पुन्हा त्याचाच खास शब्द ... कुठून असले शब्द त्याच्या डोक्यात
यायचे कोण जाणे ? ... जरा नंतर आम्हा तिघांना मात्र अचानक थोडा फोर्स करून तो त्याच्या
विरारच्या घरी घेऊन गेला आणि वहिनींची ओळख करून देऊन त्यांच्या उपस्थितीतच चक्क आम्हाला
बियर पार्टी दिली.
माझी व रामरावची साथ सुटून
आता खूप म्हणजे खूपच वर्ष लोटली आहेत ... खरं म्हणजे सर्वप्रथम मला प्रमोशन मिळालं;
आणि माझी आणि त्या बांद्रा ऑफिसमधल्या सगळ्याच सहकाऱ्यांची साथ सुटली. बरं, तो काळच
असा होता की कोणाकडे मोबाईल तर सोडाच; पण कोणाच्या घरी लँडलाईन फोनही आलेला नव्हता
... त्यामुळे इतर सहकाऱ्यांबरोबरच रामरावशी सुद्धा संपर्क तुटला तो तुटलाच ... नवीन
आऊटडोअर ऑफिसमधली नवीन कामं, नवीन आव्हानं आणि नवे सहकारी; या चक्रव्युहामध्ये मी आपोआपच
गुरफटलो ,
गरगरलो आणि त्या जुन्या काळावर विस्मृतीच्या धुळीची पुटं चढली ... आज त्या कोण्या अपरिचिताच्या
"कोण पाजतोय ?" या एका साध्याशा प्रश्नामुळे ही पुटं चुटकीसरशी उडून गेली
आणि एकदमच रामरावसोबतचा काळ लख्ख आठवला.
जगता जगता, आपल्याही नकळत,
बराच मोठा काळ एखाद्या पाखरासारखा भुर्र्कन उडून जातो आणि रिकामपण आल्यानंतर मात्र
कुठल्याही छोट्याशा निमित्तानं तो काळ अचानक आठवतो. त्याचबरोबर तो काळ आपण मनाजोगता
आणि चवीनं जगूही शकलो नाही, म्हणून तोच काळ पुन्हा खेचून आणावा असं वाटत राहतं, पण
ते शक्य नसतं ... काय करणार ? ... लाईफ इस डिझाईन्ड लाईक दॅट ...
असंच काहीसं तुम्हा सर्वांचंही
होतं का हो ? ...
@प्रसन्न सोमण.
२०/०९/२०२१.
No comments:
Post a Comment