--- संगीतश्रवण ---
साधारण आजपासून ४७/४८ वर्षांपूर्वीचा, म्हणजे सहावी-सातवीतला, सतरंजीवर बसलेला मी; माझ्या शेजारीच माझा मोठा भाऊ ... आम्ही दोघं कॉलनीतली तबला वाजवणारी आणि म्हणून संगीतातली जाणकार (समजली जाणारी) पोरं म्हणून आपुलकीच्या निमंत्रणाने आणि काहीशा मानाने तिथे बसलेलो ... कॉलनीतली कॉर्नरची १८ बाय १० फुटांची खोली ... मात्र दोन कॉट्स आणि गोद्रेजचं कपाट (त्या काळच्या या सामानासाठी 'फर्निचर' हा शब्द वापरायला कससंच वाटतं) ... वगळून साधारण १४० फुटांची खोली खच्चून भरलेली ... कारण समोरच्या गादीवर बसलेला प्रथितयश गायक कोण होता, तर रामभाऊ मराठे ... बरोबर तबल्याला भाई गायतोंडे आणि पेटीला अर्थात गोविंदराव पटवर्धन ... बस्स ...
हे वर्णन आहे मी ऐकलेल्या एकमेव घरगुती मैफिलीचं ... बिदागीची कुठलीही अपेक्षा न ठेवता निव्वळ आमच्या कॉलनीतल्या तात्या गुरुजींच्या स्नेहाखातर आणि शब्दाखातर, तात्यांच्या साठीनिमित्त गायला रामभाऊ आले होते ... ऐकायला तात्यांच्या घरची सर्व मंडळी आणि कॉलनीतले संगीत श्रवणात रस असणारे श्रोते ... मी त्यामानाने खूप लहान असल्यामुळे आणि बराच काळ लोटल्यामुळे, एक राग सोहोनी सोडला तर बाकी, रामभाऊ कोणकोणते राग आणि कोणकोणती नाट्यगीतं गायले; हे आज माझ्या स्मरणात नाही. मात्र साधारण रात्री दहापासून पहाटे साडेचार-पाच पर्यंत पोटभर गाणं रामभाऊंनी ऐकवल्याचं मात्र स्पष्ट आठवतंय.
या प्रसंगाच्याही पूर्वी, म्हणजे अर्थातच मी अजूनही लहान असेन त्यावेळी, आमच्या कॉलनीच्या अगदी बाजूला असणाऱ्या मद्रासी राममंदिरात, सेवा म्हणून, उस्ताद थिरकवाँ साहेबांनी तबल्यावर सोलो त्रिताल वाजवलेला ऐकल्याचं थोडंसं आणि अंधुक आठवतंय ... ही तर फक्त जेमतेम म्हणावी अशीच आठवण आहे, कारण मी इतका लहान होतो की मला बाकी काहीही न आठवता, त्या तबलावादनामुळे बरोबर असणारे माझे आईबाबा भारावून गेले होते, इतकंच आठवतंय.
याही नंतर थोड्या काळानी - कदाचित काही वर्षांनी असेल - जवळच्या रमाबाई बालमंदिराच्या हॉलमध्ये कोणी एक नवीन तबलजी आल्याची बातमी आम्हाला तबलाप्रेमी पोरं म्हणून सांगितली गेली ... तिथे गेल्यावर झाकीर हुसेन नावाचा अल्लारखा साहेबांचा मुलगा तबला ऐकवणार आहे, असं कळलं ... अर्थात हा काही जाहीर कार्यक्रम नव्हता त्यामुळे आणि झाकीरभाई तेव्हा बऱ्याच अंशी अगदीच अपरिचित असल्यामुळे, रमाबाईचा छोटा हॉलसुद्धा फारसा भरलेला नव्हता ... पण तेव्हा ते वादन ऐकता ऐकताच डोळे इतके विस्फारले की, तेव्हापासूनच 'झाकीरभाई' ही काय जीवघेणी चीज आहे याची स्पष्ट कल्पना आली होती.
एक अजूनही अशीच संगीत विषयक आठवण आहे पण ती मात्र शास्त्रीय संगीताची नाहीये; तर ती आहे कीर्तनांची ... अर्थात याही आठवणीला खूपच वर्ष होऊन गेली आहेत ... यावेळी झालं होतं असं की, आमच्या पार्ल्याच्या पार्लेश्वर मंदिरामध्ये कुठल्याशा निमित्तानं नृसिंहवाडीचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्तदासबुवा घाग यांचा कीर्तन सप्ताह आयोजित केला गेला होता ... घागबुवा हे खूप नामवंत, नावाजलेले कीर्तनकार होते ... घागबुवांचं कीर्तन अतिशय रसाळ तर होतंच पण त्या कीर्तनात त्यांच्या सुरेल गायनाचा प्रभाव सुद्धा तितकाच लक्षणीय होता ... त्यामुळे त्या आठवड्यात संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली की पावलं आपोआप पार्लेश्वर मंदिराकडे वळायची आणि बुवांच्या तोंडून 'घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे' हा त्यांचा खास अभंग वेगवेगळ्या चालीमध्ये आणि वेगवेगळ्या रागांमध्ये ऐकतांना देहभान हरपायचं. 'ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या' ही सुद्धा त्यांची उडत्या लयीतली खास रचना, आठवडाभर रोज ऐकवली जायचीच ... बऱ्याच पार्लेकर रसिकांनी त्या आठवडाभरात या कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला ... बुवा बऱ्याच अंशी ही कीर्तनं अगदी घरगुती स्वरूपात केल्यासारखी करायचे व त्यामुळे या आठवडाभरात कितीतरी पार्लेकर तबलजी मंडळींनी त्यांच्या कीर्तनाला तबलासाथ केलेली आहे.
इतक्या वर्षांच्या संगीतश्रवणात माझ्या हृदयाच्या अगदी खोल कप्प्यात जपलेल्या ह्या काही मोजक्या आठवणी आहेत ... ह्यात अजूनही एका आठवणीची भर घालतो; पण ही आठवण सुद्धा थोड्या निराळ्या स्वरूपाची आहे; कारण हे जिवंत मैफिलीचं श्रवण नाही, तर टेपरेकॉर्डरनं सुनावलेल्या मैफिलीचं श्रवण आहे ... मी जेमतेम कॉलेजात गेलो असेन ... घरामध्ये बाबांनी घेतलेला पहिला छोटा टेपरेकॉर्डर आलेला होता आणि जाहीर मैफिलींना जाऊन जाऊन परिचित झालेल्या एका वरिष्ठ स्नेह्यांनी मला एक संगीतश्रवणाचं निमंत्रण दिलं ... आमच्या कॉलनीच्या जवळच्या एका बंगल्यात राहणाऱ्या कोणी एक ठक्कर नामक प्रौढ, अविवाहित आणि अर्थातच पैसेवाल्या गुजराथी महिला होत्या आणि त्यांच्या बंगल्यात हे निमंत्रण होतं. श्रोत्यांमध्ये त्या स्वतः आणि आम्ही दोघं अशी फक्त तीन माणसं होतो ... त्या आम्हाला त्यांच्या खास म्युझिक रूममध्ये घेऊन गेल्या आणि तिथलं दृश्य बघून माझे डोळेच विस्फारले ... त्या खोलीतल्या फरशीवर जाड रुजामे किंवा बिछायती ... समोरच्या भिंतीशी खास त्यांच्या पसंतीचा टेपडेक, ऍम्प्लिफायर, इक्विलायझर, इत्यादी - त्याकाळच्या चिक्कार बड्या माणसाकडे असू शकणारी मशीनरी ... चार कोपऱ्यात चार मोठाले स्पिकर्स म्हणजे क्वाड्रॅफोनिक साउंड ... आणि बाकी संगीत ऐकणाऱ्याला फक्त जाड गाद्या, आणि त्या सुद्धा लोड आणि तक्क्यांसहित सज्ज ... ती अर्थातच एसी रूम होती आणि छतावर होती मंद प्रकाश देणारी झुंबरं ... हे निमंत्रण फक्त रवीशंकर यांची सितार मैफिल ऐकण्यासाठी होतं ... संध्याकाळी पाचचा सुमार असेल ... यावेळी महाराजासारखं बसून कॅसेटवर ऐकलेले राग स्पष्ट आठवतात (फक्त आमच्या हातामध्ये हुंगायला गुलाबपुष्प मात्र नव्हतं.) ... प्रथम ऐकला राग श्री, आलाप जोड झाला व झपतालातली गत ... तबला साथीला अर्थातच अल्लारखा साहेब ... मग ऐकवले गेले कौशी कानड्याचे फक्त आलाप जोड झाला; मग इंटरव्हल म्हणजे आमचं तिघांचं चहापान (सोबत बिस्किटं सुद्धा) मग ऐकवल्या गेल्या तासाभराच्या तिलकश्याम रागातल्या दोन गती आणि मग शेवटी सिंधू भैरवी ... या सगळ्याच अनुभवाने तेव्हा जो काही भारावला गेलो ते भारावलेपण अजूनही तसंच आहे ... ह्या संगीतश्रवणाने, पु.लं.च्या लेखामुळे परिचित झालेल्या, रामूभय्या दाते यांच्या आठवणी इतक्या दाटून आल्या की तेव्हाच काय पण आजही आपोआप 'हाये' ... अशी दाद दिली जाते … खूपच महत्वाचा फरक एवढाच असेल की रामूभय्या दातेसाहेब; कुमारजी, वसंतराव, मल्लिकार्जुन अण्णा, अख्तरी बेगमसाहिबा, इत्यादी महनीय कलाकारांचं जिवंत गाणं समोर चाललेलं ऐकून 'हाये' अशी दाद देत असत पण आम्ही मात्र यंत्रातून आलेलं संगीत महाराजाच्या थाटात ऐकलं ...
त्यानंतर सुदैवाने आज माझी सांपत्तिक स्थिती बरीच बरी झालेली आहे हे खरं; पण ती उडी म्हणजे कनिष्ठ मध्यवर्गातून उच्च मध्यमवर्गापर्यंत एवढीच आहे ... त्यामुळे त्या बंगल्यातली ती म्युझिक रूम मला माझ्या स्वप्नांपुरतीच लखलाभ आहे ... अर्थात ज्या न्यायाने सिनेमा, छानपैकी थिएटरमध्ये जाऊन अनुभवण्यातली मजा घरात कितीही मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर बघण्यात नाही त्याच न्यायानं समोरच्या कलाकाराची जिवंत संगीत मैफिल ऐकण्यातली मजा, यंत्रातून आलेलं संगीत ऐकण्यात नाही ... मग भले तो व्हिडियो अनुभव असला तरीही ...
मात्र त्यातही; तिकिटं लावून होणारी, शेकडो, हजारो श्रोत्यांसाठी असणारी जाहीर संगीत मैफिल आणि इन्यागिन्या जाणकार श्रोत्यांसमोर होणारी घरगुती मैफिल असे सूक्ष्म भेद आहेतच ... अर्थात बदलत्या काळानुसार आणि कदाचित पैसा हे सर्वस्व झाल्यामुळेही; अशा घरगुती मैफिली आज जवळजवळ नगण्य प्रमाणात होत असाव्यात ... पूर्वी घरचे होतकरू कलाकार सहज भेटले तरी; "चल जरा बसुया रे," असं म्हणत पेटी, तबला काढून गायला-वाजवायला बसलं जायचं आणि मजा दिली-घेतली जायची; तेही आता बदलत्या काळात जवळपास बंदच झालंय ... ह्या कोविड महामारीमुळे तर परिस्थिती आणखीनच बिकट झालीय ... आज कालानुरूप "चल बसुया रे," चा अर्थ प्रचंड वेगळा झालाय - आता त्यातही मजा दिली-घेतली जातेच; हा भाग अलाहिदा ... पूर्वी स्नेहाखातर किंवा शब्दाखातर मोठ्या कलाकारांच्या सुद्धा, अगदी कमी बिदागीमध्ये, अशा मैफिली होत असत ... माझ्याकडे कुठूनतरी फिरत फिरत आलेलं एक कॅसेटवरचं अप्रतिम रेकॉर्डिंग आहे ... ते आहे आमच्या पार्ल्याच्याच एका सोसायटी मधल्या मल्लिकार्जुन मन्सूर अण्णांच्या घरगुती मैफिलीचं ... पण जाहीर आणि तिकिटं लावून केलेल्या संगीत मैफिलींमध्ये शेकडो किंवा हजारो श्रोते असतांना जो एक प्रकारचा कमर्शियल अप्रोच असतो आणि वेळेची बंधनं असतात; तसा प्रकार घरगुती स्वरूपांच्या मैफिलींमध्ये नसतो.
अगदी अलीकडेच मद्रासी राममंदिराच्या शेजारच्या छोट्याशा मैदानात असाच एक कार्यक्रम ठेवला गेला होता आणि त्यात गायला कलाकार होत्या पार्ल्याच्याच रहिवासी असलेल्या विदुषी गौरी पाठारे. हा सुद्धा एक जवळजवळ घरगुती स्वरूपासारखाच छोटेखानी कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमात गौरीताईंनी अतिशय सुरेल व तडफदार गाणं ऐकवलं ज्यात एक छोटा राग, एक ठुमरी व भैरवी ऐकवली गेली.
या व्यतिरिक्त अगदी आत्ता-आत्तापर्यंत आमच्या पार्ल्याच्या छोट्या सावरकर सभागृहामध्ये 'स्वरमाऊली' संस्थेतर्फे असे छोटेखानी कार्यक्रम सादर होत असत ... यामध्ये काही नवोदित तर क्वचित कधी थोड्या नावाजलेल्या कलाकारांना कला सादरीकरणासाठी आवर्जून बोलावलं जात होतं ... यांत विशेषतः तबला सोलो कार्यक्रमांचं प्रमाण सुद्धा लक्षणीय होतं ... या कार्यक्रमांचं स्वरूप सुद्धा खूप घरगुती स्वरूपासारखंच होतं ... हे सगळे कार्यक्रम विनामूल्य असत व ठराविक दर्दी पार्लेकर त्याचा अवश्य लाभ घेत असत ... मात्र सध्या सगळंच बंद आहे ... कारण परत तेच ... या कोविड महामारीनं हे सगळंच, सध्यातरी, भूतकाळात जमा करून टाकलेलं आहे.
आता तरी लवकरात लवकर ही महामारी मानगुटीवरून उतरो व सर्वच कलांच्या जिवंत सादरीकरणाचा लोभसवाणा काळ परत सुरु होवो, हीच त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना.
@प्रसन्न सोमण.
१०/०९/२०२१.
(गणेश चतुर्थी)
प्रसिद्धी - अभूतपूर्व (जुलै २०२४)
No comments:
Post a Comment