Sunday, 7 March 2021

--- सहा--धैवत --- जयपूर-अत्रौलीची चांदणी ---

 #सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला

 

 

--- सहा--धैवत --- जयपूर-अत्रौलीची चांदणी ---

 

 

'सहेला री मिल गाये.' आद्धा त्रितालातली ही १९७० च्या दशकात रेकॉर्डवर सादर झालेली किशोरी ताईंची एक उच्च भाग्ययोगाची बंदिश म्हणायला हवी. ही एक आणि दुसरी 'जागू मै सारी रैना बलमा,' ही प्रभाताई अत्रे यांची तशीच बंदिश ... साधारण १९७६/७७ च्या सुमारास टेपरेकॉर्डर घरोघरी व्हायच्या काळात या दोन्ही रेकॉर्डस् किंवा कॅसेट्स इतक्या तुफानी लोकप्रिय झाल्या असाव्यात की ज्याचं नांव ते ... मुख्यतः रेडियोमार्फत माझ्याही कानांवर पडले ते ताईंचे हेच गाजलेले भूपाली, बागेश्री आणि जौनपुरी हे राग.

 

 

वास्तविक किशोरीताई आमोणकर यांचा पहिला परिचय, माझ्या आईच्या तोंडून ऐकला तो 'मोगुबाई कुर्डीकरांची लेक' असाच ... पुढे रिवाजाप्रमाणे 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'ला झालेल्या ताईंच्या मैफिलीला जाऊन आल्यानंतर आईचा अभिप्राय होता - "मोगूबाईंची लेक खरी; पण गाते एकदम स्वतंत्रपणे !" ... एकतर पहिल्यापासून ताईंची मूर्ती अगदीच लहानखुरी, आवाजाची बऱ्याचवेळा तक्रार, आवाज - घराण्याच्या तोवरच्या परंपरेप्रमाणे - ढाला नव्हे तर जरासा पातळच ... मात्र त्या स्वराची धार फार विलक्षण होती.

 

 

मला ताईंची पहिली मैफिल अनुभवण्याचा योग आला तो साधारण १९८० मध्ये ... आणि मग नंतर मुंबईभर होणाऱ्या जवळपास सर्वच संगीत संमेलनांमध्ये हा अनुभव येत राहिला. ताईंची मी ऐकलेली पहिली मैफिल होती 'रंगभवन'च्या ओपन एअरच्या सुखद थंडीत. पहिला मुख्य राग होता 'शुद्ध नट.' पहिली साताठ मिनिटं थोडा हटवादीपणा करून आवाज स्वच्छ लागू लागला आणि शुद्ध नटाला बेफाट रंग चढला. पन्नासेक मिनिटांनी शुद्ध नट संपवून भरपूर टाळ्या आणि दाद घेतल्यानंतर काहीसा जास्तच 'तानपुरा-ब्रेक' (तानपुरे लावण्यासाठी) झाला ... श्रोत्यांमध्ये अस्वस्थपणा सुरु होतोय होतोय तोच, 'नायकी कानड्या'चे स्वर्गीय सूर लागले. नायकी कानड्याने श्रोत्यांमध्ये तृप्तता निर्माण करून मैफिल संपली.

 

 

ताईंच्या अगदी पहिल्या मैफिलीपासून कायमच जाणवत राहिलेली गोष्ट एकच होती की जयपूर-अत्रौली घराण्याची वैशिष्ट्य गाण्यात कायम ठेवली तरी ही मळलेल्या वाटेने जाणारी गायिका अजिबातच नव्हे. मला चांगलंच आठवतंय की कृष्णधवल टीव्हीच्या आणि 'प्रतिभा आणि प्रतिमा' कार्यक्रमाच्या जमान्यात; एक उत्तम कार्यक्रम बघितला होता. ठामपणे आठवत नाहीये पण कार्यक्रम बहुदा मोगुबाई कुर्डीकरांच्या वरच असावा; पण अपरिहार्यपणे त्यात किशोरीताईंना मिळणारी तालीम आणि किशोरीताईंची मतंही येत होती. त्यात किशोरीताई गात असतांना मध्येच माई (मोगुबाई) ताईंना तोडून - "अगो नाय गो बाय ! कशाला तोडतेस गो बाय ? इथे असं नाय तोडायचंय," असं सांगायच्या; पण त्यावर किशोरीताई म्हणायच्या, "अगं पण माई इथे हा चीजेतला शब्द बदलतोय; त्याकडे सुद्धा बघ ना !" ... त्यावर माई चिडखोरपणे म्हणायच्या - "तू हे असं आपलं डोकं चालवू नकोस गं बायो ! आम्ही हे 'असं' शिकलो" ... पण हे असं आणि अशा पद्धतीने शिकवलेलं सगळंच किशोरीताईंना पटणं शक्यच नव्हतं, हे त्यांच्या मुद्रेवर तेव्हाही स्पष्ट दिसतच होतं ... त्यावेळेस किशोरीताई खूप नावाजलेल्या प्रथितयश गायिका झालेल्या नव्हत्या तरीही ...    

 

 

कितीही मोठ्या कलाकाराच्या पोटी जन्म घेतला आणि उपजत वारसा मिळाला तरीही, कलाकाराला आपला स्वतःचा वेगळा विचार करावाच लागतो; ठसा उमटवावाच लागतो ... अशाच पद्धतीने कला पुढे जात असते, हे ताईंनी खूपच पूर्वी ओळखलं असावं. ताईंचा वारसा माहित असूनही, मला कायमच ताई एक 'स्वयंभू' गायिका वाटत आलेल्या आहेत. त्यांचा रागाबद्दलच काय; पण एकाएका स्वराबद्दलचा विचार ठाम असतो आणि तो खास त्यांचाच असतो. म्हणूनच ताईंचा स्वरलगाव, ताईंचे स्वरसमूह, ताईंच्या ताना, ऐकणाऱ्याला अतर्क्य वाटतात. मिंडेमध्ये किंवा स्वरांच्या रमणीय आंदोलनांमध्ये ताई कुठून, कशा आणि कुठे पोहोचतात याचा आगाऊ तर्क अजिबातच करता येत नाही. त्यामुळे त्यांचं गाणं नुसतंच चमकदार, दिमाखदार नाही; तर ते 'कॉपी प्रोटेक्टेड' सुद्धा आहे. पुष्कळच नंतर त्यांनी 'स्वरार्थ रमणी,' या त्यांच्या संगीतविषयक पुस्तकात मांडलेल्या संगीत विचारांचा उगम हा त्यांच्या प्रथमपासूनच्या संगीत विचारांमध्ये आहे.

 

 

ताईंच्या मैफिलींमध्ये ऐकलेल्या रागांपैकी वेगवेगळ्या रागांचा वानगीदाखल उल्लेख करायचा  तर; 'रवींद्र नाट्यमंदिर'मधला केदार, 'बिर्ला मातुश्री सभागारा'तला बिहागडा, पार्ल्याच्या 'मंगेशकर'मध्ये झालेला बिहाग, 'मंगेशकर'मध्येच सकाळच्या मैफिलीत झालेला देवगिरी बिलावल, 'रंगभवन'ला रंगलेला कौशी कानडा, असे अनेक. मोगूबाईंकडून मिळालेल्या वारश्याबद्दल, तालमीबद्दल अर्थातच ताईंना यथार्थ आदर होता. २००१ मध्ये मोगूबाईंच्या (माईंच्या) निधनानंतर २००२ मध्ये किशोरीताईंनी 'षण्मुखानंद हॉल'मध्ये 'रिमेम्बरिंग माई' नावाचा अप्रतिम कार्यक्रम केला होता. त्यात ताईंनी मनापासून, कसून गातांना सावनी नट, सुहा कानडा आणि बिहागडा हे राग इतके नितांत सुंदर गायले होते की ते अजूनही स्मरणातून जात नाहीत. वास्तविक स्वतः ताई सुद्धा त्यावेळी सत्तरीकडे झुकलेल्या होत्या.

 

 

हे सर्व कितीही खरं असलं तरीही, श्रोत्यांच्या दृष्टीने ताईंचा मैफिलीतला वावर आणि बोलणं श्रोत्यांना थोडंफार फटकळपणाकडे झुकणारं वा खटकण्यासारखं वाटत असे, हेही तितकंच खरं. एकतर तानपुरे मनासारखे लावण्यात ताईंचा बऱ्यापैकी वेळ खर्च होत असे ... त्या काळात साहजिकच श्रोत्यांमध्ये चलबिचल चालू असे. अशावेळी श्रोत्यांना शांतता राखायला सांगतांना, ताईंचा 'पारा चढल्याचं' चांगलंच जाणवत असे. ध्वनियंत्रणा सांभाळणाऱ्या तंत्रज्ञ लोकांना सूचना देतानाही असाच प्रकार होत असे. ताईंच्या बोलण्याचा टोनच अशाप्रकारे असायचा की ते बोलणं फटकळ वाटावं. सुरुवातीच्या काळात ही वृत्ती बरीचशी कोषात होती त्यावेळेस ठीक होतं. पण तरीही काही वेळा घडलेले अप्रिय प्रसंग श्रोत्यांची चलबिचल चांगलीच आठवत्येय ... एका प्रसंगी तर आमच्या 'पार्ले टिळक विद्यालया'च्या पटांगणात ताईंच्यात आणि श्रोत्यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यावेळी मुळात कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि स्टेजवरही ताई बऱ्याच उशिरा आल्या. त्या परस्पर बाहेरून आल्या होत्या विमान लेट असल्यामुळे अधिकच उशीर झाला होता, हे नंतर त्यांनीच सांगितलं. मात्र अगोदर हे श्रोत्यांना माहित नसल्यामुळे आधीच श्रोते वैतागलेले होते. त्यात तानपुरे लावण्यातही बराच वेळ जात होता. श्रोत्यांच्या बोलण्याचा विक्षेप येत असल्यामुळे ताई चिडखोरपणे बोलल्या - "ज्यांना थांबायचं नसेल त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत" ... या वाक्याने ठिणगी पडली आणि श्रोत्यांच्यातूनही "आम्ही फुकटे नाही आहोत," "आम्ही गाणं ऐकायला आलोय, फुकटचं बसायला नव्हे," "तुम्ही असल्या मैफिलीची किती बिदागी घेता हेही आम्हाला माहित आहे," असली वाक्य ऐकू यायला लागली ... शेवटी कार्यक्रमाचे संयोजक असलेले अविनाशजी प्रभावळकर प्रभाताई अत्रे यांना समेट घडवावा लागला ... पण प्रसंग या पातळीवर येऊनसुद्धा त्यानंतर किशोरीताई जे गायल्या त्याला खरंच तोड नव्हती. एरव्ही श्रोत्यांबरोबर बोलण्याची, संवादाची वेळ आली की त्यांचा फटकळपणाकडे झुकणारा स्वर; पण त्याच बरोबर दुसरीकडे ताईंच्या कंठातून स्रवणारं स्वर्गीय संगीत या दोन गोष्टींची संगती कशी लावावी याचा श्रोत्यांना उलगडाच होऊ शकत नसे.

 

 

अभिजात शास्त्रीय संगीताच्या आकाशात आपल्या विलक्षण तेजाने चमचमणारी ही चांदणी २०१७ मध्ये काहीशा अचानकपणेच निखळून पडली ... किशोरीताईंच्या स्मृतीला माझे कोटी कोटी प्रणाम.

 

 

ता. . -- फोटो गुगलच्या सौजन्याने.

 

 

@प्रसन्न सोमण.

२९/०१/२०२१.




No comments:

Post a Comment