Monday, 1 March 2021

--- पाच--पंचम --- शिवजींची काश्मिरी करामत ---

#सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला

 

 

--- पाच--पंचम --- शिवजींची काश्मिरी करामत ---

 

 

शंभर तारा असलेलं तंतुवाद्य, ही एक गोष्ट; या वाद्याचं नांव संतूर, ही दुसरी गोष्ट, वाद्य आणि वादक दोन्ही काश्मिरी आहेत, ही तिसरी गोष्ट; वादकाचं नांव पंडित शिवकुमार शर्मा आहे ही चौथी गोष्ट आणि शिवकुमारजी संतूरवर अभिजात रागदारीचं शास्त्रीय संगीत वाजवतात, ही पाचवी गोष्ट; या सगळ्याच गोष्टींचं मला साधारण एकाचवेळी ज्ञान झालं ... असेल साधारण १९७५ च्या सुमारास ... त्याही आधी अर्थात हिंदी, मराठी गाण्यांतून वाजणारी संतूर ऐकली असणारच; पण हीच ती 'संतूर' हे माहित असण्याचं काही कारण नव्हतं. रेडियोवरून संतूरवर वाजणाऱ्या मधुवंती, कलावती, जोग, या रागांच्या शिवजींच्या रेकॉर्डस् सुद्धा साधारण याच आगेमागे सुरु झाल्या. पाठोपाठच शिवजींनी झाकीर भाईंना घेऊन वाजवलेले रागेश्री, सोहोनी हे राग आणि तिलंग धून या गाजलेल्या रेकॉर्डस् सुद्धा ऐकण्यात आल्या. त्यातल्या 'रागेश्री'च्या, १३ मात्रांच्या 'जय'तालाच्या गतीने चक्रावून आणि भारावून गेलो. बघता बघता शिवजींचं नांव आघाडीचे संतूर वादक म्हणून भरपूर गाजायला लागलं. तबला साथीला झाकीरभाई असतील, तर या जोडगोळीला आणखीनच मोठठं वलय प्राप्त झालं.

 

 

शिवकुमार शर्मा हे नांव मोठठं होण्याच्याही जरा आधीच, आमच्या 'विलेपार्ले म्युझिक सर्कल'ने त्यांची मैफिल आयोजित केली होती. तबला साथीला तेव्हा काशिनाथ मिश्रा होते. रिवाजाप्रमाणे अर्थात माझे आईबाबा ही मैफिल ऐकून आलेच. वास्तविक माझी आई गायिका, संगीतशिक्षिका होती आणि बहुदा त्यामुळेच तिचा वाद्यसंगीतापेक्षा कंठ संगीताकडे थोडा अधिक ओढा होता; आणि बाबा तर नुसते कानसेनच होते. पण असं असलं तरीही, शिवजींचं वादन त्यांना आवडलं, हे नक्कीच. नेहमीप्रमाणेच आईच्या तोंडून नंतर स्टोरीही समजली. लालबुंद गोरा काश्मिरी पोरगा आहे, मांडी घालून बसतो व मांडीवर ती शंभर तारांची संतूर घेऊन आणि हातात अक्रोडाच्या लाकडी काड्या घेऊन त्यांनी संतूर वाजवतो, याचं त्यांना आक्रीत होतंच; पण त्यासोबतच खूप गोड वाजवतो असं विशेषणही त्यांनी शिवजींना बहाल केलं.

 

 

मला मात्र पहिल्यांदा शिवजींची मैफिल ऐकायला मिळाली ती झाकीरभाईंबरोबरच, रंगभवनच्या सुखद संगीतमय वातावरणात. साल असेल १९८०. तोवर शिवकुमार-झाकीर ही जोडगोळी म्हणजे आनंदाची पर्वणी, हे समीकरण संगीतप्रेमींच्या मनामध्ये घट्ट बसलेलं होतं. साहजिकच शिवकुमार-झाकीर हे संमेलनात 'शेवटी स्टेजवर बसणारे स्टार कलाकार'ही झालेले होते. रविशंकर-अल्लारखां या जोडगोळीने गाजवलेला काळ बऱ्यापैकी जुना झाला होता आणि १९७९-८० च्या आगेमागे शिवकुमार-झाकीर ही नवी 'बेस्ट सेलर' जोडगोळी उदयाला येत होती; नव्हे आलीच होती. १९८० च्या या मैफिलीत मी शिवजींकडून प्रथम एक तासभर बेफाट रंगलेला 'राग किरवाणी,' नंतर मध्यलय रूपक मधला 'राग जोग' व त्यानंतर छोटीशी 'पिलू धून' ऐकली होती. नेमकी अगदी लगेच, बहुदा महिन्याच्या आतच मुद्रा नावाच्या संगीत संस्थेनी (संगीत संस्थाच असावी; कारण 'मुद्रा प्रेझेन्टस शिवकुमार-झाकीर हुसेन,' असं दर्शनी छापलेलं कलरफुल तिकीट आजही माझ्या डोळ्यासमोर आहे) 'रवींद्र नाट्यमंदिरा'त एकट्या शिवजींची, अर्थात झाकीरभाईंबरोबर, पूर्ण लांबीची सकाळची मैफिल आयोजित केली होती. अर्थातच मी हजेरी लावली होतीच. या मैफिलीत शिवजींनी पहिल्या सत्रात सव्वा तास अप्रतिम 'तोडी' वाजवून छोटीशी 'खमाज धून' वाजवून इंटरव्हल केला होता. त्यावेळेस अनाउन्समेंट करतांना शिवजींनी "अब दस मिनिटका इंटरव्हल होगा; जो करीब करीब आधे घंटेतक लंबा चलेगा," असा विनोद केलेलाही आठवतोय. इंटरव्हलनंतर 'बिलावल' रागातल्या दोन गती, 'शुद्ध सारंग' रागामधली मध्यलयीतली गत आणि शेवटी 'पहाडी धून' सादर करून शिवजींनी टाळ्यांच्या गजरात मैफिल संपवली. या मैफिलींपासून ते अगदी आजपर्यंत; मुंबईत शिवजींच्या कित्येक मैफिली ऐकायला मिळालेल्या आहेत.

 

 

शिवजी आदरपूर्वक नांव घेतांना 'गुरु' म्हणून भले त्यांच्या वडिलांचं, म्हणजे 'उमादत्त शर्मां'चं नांव घेत असले तरीही; वडिलांचं, "संतूर हे वाद्य हाती घेऊन मुंबईकडे निघ आणि संतूरच्या सहाय्यानेच काहीतरी चांगलं कर्तृत्व दाखव," हे उत्तेजनपर सांगणं सोडल्यास; बाकी शिवजींची कलाकार म्हणून प्रगती जवळजवळ 'स्वयंभू' दिसते. खूप वर्षांपूर्वी आमच्या विलेपार्ल्याच्या 'टिळक मंदिरात' 'मॅजेस्टिक गप्पां'च्या कार्यक्रमात शिवजींची खूप उत्तम मुलाखत ऐकायला मिळाली होती. त्या मुलाखतीत शिवजींनीच सांगितलं होतं की भाड्याच्या रूमवर ते एकटेच संतूर आणि टेपरेकॉर्डर घेऊन रियाझ करायचे. संतूरवर मींड, आंदोलनं, स्वराची आंस किंवा ठेहेराव, घसीट ताना, येऊ शकत नाहीत; या संतूरच्या मर्यादांची शिवजींना अर्थातच उत्तम जाणीव होतीच ... ही कमतरता हातातल्या काडीच्या बाऊन्सच्या आणि घसीटच्या साहाय्याने स्वरामधलं आणि स्वरसमूहातलं सातत्य टिकवून शिवजींनी दूर केली. या प्रकारे वादन डेव्हलप करून शिवजींनी वादनात जी रंजकता आणलीय त्याला तोड नाही. मी माझ्यापुरतं या बाउन्स आणि घसीटला 'थरथराहट' असं नांव दिलंय. या व्यतिरिक्त संतूरवरचे शिवजींचे आलाप, जोड, झाला व त्यांचे पॅटर्न्स; विलंबित गत सुरु केल्यानंतर त्यामधले गणिती अंदाजाचे लयींचें जीवघेणे पॅटर्न्स; मध्यलय आणि द्रुत बंदिशींची त्यांची स्वतःची अशी खास बांधणी; ही थक्क करून टाकणारी सर्व डेव्हलपमेंट ही त्यांची आणि संपूर्णपणे त्यांचीच आहे. छोटे छोटे स्वरसमूह उलट सुलट करणं, लयीचे खेळ करतांना अनाघात, अतीत पद्धतीने तेच तुकडे पेश करणं; हीही खास त्यांनीच डेव्हलप केलेली खासियत. या शिवाय, एखादा तुकडा, परण, तिय्या किंवा चक्रधार संपवतांना ती डायरेक्ट समेवर न येता; तो लयकारीचा प्रकार गतीच्या मुखड्यावर येतो आणि त्याला जोडूनच मुखडा वाजवला जातो; अशा प्रकारची चक्रावणारी लयकारी पेश करण्यात शिवजींनी हातखंडा डेव्हलप केलाय. माझ्या अल्प ज्ञानानुसार या प्रकाराला संगीतामध्ये 'आमद' असं नांव आहे … जोरदारपणे मैफिली चालू ठेवतानाच एकीकडे त्यांच्या वादनात होत जाणाऱ्या वेगवेगळ्या सुधारणा, त्याचवेळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतलं काम, त्याचवेळी साथीला झाकीरभाई असतील तर त्यांच्याबरोबरचा त्यांचा खास ताळमेळ, हे सगळंच अचंबित करणारं आहे. ठराविक सांगितिक जागेनंतर, झाकीरभाई कसं वाजवतील, हे शिवजींना झोपेतून उठवून विचारलं तरीही पाठ आहे आणि अर्थातच व्हाइसव्हर्सा ... त्यामुळेच 'संतूर' आणि 'शिवकुमार शर्मा' ही दोन नावंच; अर्धशतक उलटून गेलं तरीही, एकमेकांशी जोडली गेलीयत यांत काही नवल नाहीच ...                                       

 

 

कलाकार कितीही मोठ्ठा असला तरीही, प्रत्येक कलाकाराच्या काही अगदी मोजक्या मैफिली अशा होतातच की ज्या तितक्याशा जमल्या नाहीत, असं वाटतं. त्यामुळे त्यात अनैसर्गिक असं काहीच नाही पण तरीही कलाकार जेव्हा 'चूस' म्हणून एखादी गोष्ट वेगळी करतो त्यावेळेस मला तरी बऱ्याचवेळा खटकतं ... होय ... शिवजी कलाकार म्हणून माझे कितीही आवडते असले तरीही; सर्वात प्रथम त्यांनी जेव्हा तबल्यासोबतच पखवाज साथीला घेतला, त्यावेळेस मला असंच खटकलं होतं. मला कबूल आहे की भवानीशंकर हे एक चांगले पखवाजवादक आहेत; पण मग त्यासाठी मी त्यांची सोलो पखवाजाची मैफिल ऐकायला तयार आहे. पण शिवजींच्या साथीला तबल्यासोबतच पखवाजही आलेला पाहिला तेव्हा माझ्या तोंडाची चव गेलीच. त्याहीपेक्षा आलापीनंतर जोड व झाला सुरु झाल्यानंतर, त्यासोबत पखवाजावर ठोके; किंवा जोड-झाल्यासोबतचं पखवाजवादन; हे तर कमालीचं अनैसर्गिक वाटलं. भले जोड आणि झाल्यामध्ये नैसर्गिक बिट्स असले तरीही, ते तालवाद्यांसोबत करायचं वादन नव्हे; ही परंपरा शिवजींना का मोडावीशी वाटली न कळे. त्यातच द्रुत गतीमध्ये तबल्यासोबतच पखवाजही वाजवला गेला ... त्यावेळेस हळूहळू संगीत बाजूला होऊन गोंगाट सुरु झाल्यासारखा फील, मला तरी यायला लागला ... एक मैफिल तर मी शिवकुमार आणि त्यांचे चिरंजीव राहुल शर्मा यांच्या जुगलबंदीची अशी ऐकली होती की त्यातही साथीला तबला व पखवाज दोन्ही होते. या मैफिलीत तर दोन संतूरचा आवाज आणि त्यासोबत तबला आणि पखवाजाचा आवाज ऐकून रणवाद्य वाजल्याचा भास होण्याएवढा गोंगाट वाढला होता ... थोडक्यात काय, तर शिवजींबरोबर पखवाजसाथ व्यक्तिशः मला तरी अजिबात आवडत नाही ... अर्थात हे माझं मत झालं. पखवाजसाथ आवडत असलेले रसिकही असतीलच; नव्हे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया मी ऐकलेलीही आहे. मैफिलींमध्ये कलाकार काही 'गिमिक्स' करतात; त्यांना करावी लागतात, हे मला मान्य आहे ... मात्र - माझ्या सुदैवाने - साथीला पखवाज घेणं, ही गोष्ट शिवजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच उशिरा चालू केली. मला मात्र 'दिलो-जानसे प्यारे' आहेत ते त्यापूर्वीचे शिवकुमार शर्मा.

 

 

संगीत मैफिली ऐकतांना मी अनुभवलेल्या मोठ्ठ्या कलाकारांपैकी, शिवकुमार शर्माजी हे देवकृपेने आपल्यामध्ये आजही आहेत. त्यांनी उदारपणे आजवर दिलेल्या संगीतानंदासाठी त्यांना कितीही धन्यवाद दिले, तरी ते अपुरेच पडतील ... परमेश्वराकडे त्यांच्या, यापुढच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी माझी मनःपूर्वक प्रार्थना.

 

 

ता. क. -- फोटो गुगलच्या सौजन्याने.

 

 

@प्रसन्न सोमण.

०३/०२/२०२१.




No comments:

Post a Comment