#सप्तक_अर्थात_संगीत_लेखमाला
--- सात--निषाद --- पहिलवानी स्वरमाधुर्य ---
देवाची करणी आणि .... होय ! … खरंच देवाची करणी अजिबातच न उमगणारी ! कारण उंचावरच्या कठीण कवचाच्या नारळात गोड पाणी ठेवणं हे जितकं अद्भुत आहे तितकंच पहिलवानाच्या पोराच्या कंठात बासरीच्या सुमधुर स्वराची फुंक ठेवणंही ... अर्थात पंडित हरिप्रसाद चौरासियांच्या मधुर बासरीच्या मैफिलीचा मी प्रथम अनुभव घेतला त्यावेळेस त्यांचा जन्म कुस्तीगीर पेहेलवानांच्या घराण्यात झालाय, ही अधिक माहिती मी ऐकलेली नव्हतीच ... हरिजींचं नांव आणि त्यांची बासरी प्रथम कानांवर पडली ती नेहमीप्रमाणे अर्थात रेडियोद्वारेच ... आमच्या घरी गृहिणी असलेली माझी आई रेडियो जवळजवळ सतत ऐकतच स्वयंपाकघरातली कामं करत असे आणि ती शक्य तेवढं शास्त्रीय संगीत ऐकत असल्यामुळे; उत्कृष्ट, चांगल्या, बऱ्या, वाईट, कलाकारांची कला रेडियोद्वारे ऐकावीच लागत असे. त्यामुळे १९७५ वा त्यानंतरच्या काळात; त्यावेळी बऱ्याचदा लागत असलेले हरिजींचे नितांत सुंदर असलेले गुजरी तोडी, मारवा, चंद्रकौंस हे वीस मिनिटांच्या एल.पी.ज वरचे राग आणि काळजात कळ उमटवण्याइतक्या सुंदर असलेल्या मिश्र पिलू ठुमरी, खमाज ठुमरी, भैरवी ठुमरी, मिश्र पहाडी धून, या सर्व रेकॉर्डस् बऱ्याचदा कानांवर पडलेल्या होत्याच. या सर्व रेकॉर्डस् माझ्या आईलाही कमालीच्या आवडत होत्याच; पण विशेषतः तिने त्यावेळी तिच्या शब्दांत केलेलं वर्णन असं होतं की, 'या माणसाच्या फुंकेमधल्या स्वरांना एक विलक्षण मधुर गोलाई आहे' ... त्यानंतर आजवर पुढे जेवढ्या वेळा हरिजींची बासरी ऐकली त्या प्रत्येक वेळेला हे 'स्वरांची मधुर गोलाई,' हे वर्णन हटकून आठवत असे; आणि आजही त्या बासरीइतकंच हे वर्णनही मला प्रिय आहे.
हरिप्रसाद चौरासिया या माणसाची बासरीवादक म्हणून झालेली जडणघडण अतिशय नाट्यपूर्णच आहे. कॅसेट्च्या जमान्यात प्रिरेकॉर्डेड कॅसेट्च्या आतमध्ये एक इनले कार्ड असे ज्यावर कलाकाराची थोडीफार माहिती छापली जात असे; त्यावरूनच ही जडणघडण मला माहित झाली. उत्तरप्रदेशात मूळ कुस्तीगीर पहेलवान असलेल्या वडिलांच्या अत्याग्रहापोटी हरिजींनी थोडीफार कुस्ती खेळून आणि पेहेलवानकी करून पाहिलीही; पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे देवाची करणीच अशी काही होती की कुठून कसं, ते कळायला काही मार्ग नाही; पण हरिजींचं मन हे फक्त बासरीकडेच ओढ घेत राहिलं. शेवटी बहुदा वडिलांचा विरोध पत्कारूनच हरिजी बासरी घेऊन, कसे कोण जाणे पण, श्रीमती अन्नपूर्णादेवींपर्यंत पोहोचले. रिवाजानुसार काही कडक अटी घालूनच; संपूर्ण वाद्यसंगीताचेच महर्षी असलेल्या बाबा अल्लाउद्दीन खान यांची लेक असलेल्या आणि अर्थातच अत्यंत विद्वान असलेल्या श्रीमती अन्नपुर्णादेवींनी; हरिजींना शिकवण्याची तयारी दर्शवली. तंतुवाद्य नसून फुंकवाद्य असलेल्या बासरीमध्ये; हरिजींच्यावर सगळे तंतुवाद्य संस्कृतीचे संस्कार कसे झाले असावेत, याचं मूळ हे इथं आहे. त्यानुसार अर्थात हरिजींनीही या सर्व संस्कारांचं चीज करत आपल्या बासरीवादनामध्ये संपूर्णतः वेगळा असा वाद्यसंगीताचा अनोखा ढंग आणला आणि ख्यालवादन, चिजा या गायकी ढंगाऐवजी आलाप, जोड, झाला आणि त्यानंतर गती; या वाद्यसंगीताच्या ढंगाने आपल्या बासरीवादनाला चार चांद लावले. अर्थात हे लिहिता/वाचतांना सहज वाटलं तरीही हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाहीये तर यासाठी हरिजींना विचारपूर्वक आणि जाणिवेने अपार कष्ट करावे लागलेले आहेतच.
जिवंत मैफिलींमध्ये मला हरिजींच्या बासरीवादनाची गोलाई प्रथम अनुभवायला मिळाली होती ती 'रंगभवन'मध्ये, 'उस्ताद अमीर खान स्मृती संमेलना'त १९८० साली. सर्वात प्रथम हेच ते पूर्ण तीन दिवसांचं संगीत संमेलन, जे मी कॉलेजकुमार झाल्यानंतर अनुभवलं ते माझ्या शास्त्रीहॉलच्या मामासोबत व एका मामेभावासोबत ... या संमेलनानंतरच मला संगीत मैफिलींसाठी पूर्ण मुंबईभर भटकण्याचं वेड लागलं आणि या असल्या संमेलनांची मला जत्रेपेक्षाही जास्त चटक लागली (मी पूर्णतः मुंबईकर असल्यामुळे आणि गावच्या जत्रा मला वाचूनच माहित असल्यामुळे; असली संमेलनं ह्याच माझ्यासाठी जत्रा) या संमेलनामध्ये शिवकुमार शर्माजींच्या तबला साथीला झाकीरभाई असले तरीही हरिजींच्या तबला साथीला मात्र कोणी एक उस्ताद फैयाज खान होते; ज्यांची तबलासाथ अजिबात आकर्षक नव्हती. अर्थात याचा हरिजींच्या वादनावर मात्र अजिबातच विपरीत परिणाम झाला नव्हता. मधोमध स्वतः टिळा लावलेले दणकट प्रकृतीचे हरिजी, उजवीकडे तबलजी, डाव्या बाजूला बासरी साथीला पट्टशिष्य असलेला रूपक कुलकर्णी आणि मागे एक छोटा तंबोरा, बस्स ! याव्यतिरिक्त स्टेजवर भरून राहिले असतील तर ते फक्त हरिजींच्या अभोगी रागाचे विलक्षण गोलाई असलेले सूर. अभोगी रागातल्या धुंद करणाऱ्या आलाप जोड झाला नंतर रूपक तालातली व त्रितालातली अशा दोन गती उत्तमरीत्या सादर करून राग अभोगी हरिजींनी संपवला. यानंतर मध्यलय त्रितालातली राग जोग मधली गत झाल्यानंतर पहाडी धून वाजवून हरिजींनी रंगलेली मैफिल संपवली.
यानंतर लवकरच हरिजींची आणखी एक अप्रतिम मैफिल ऐकायला मिळाली ती 'बिर्ला मातुश्री सभागारात.' या मैफिलीत त्यांच्याबरोबर तबला साथीला आनिंदो चॅटर्जी होते. या मैफिलीतला राग बागेश्री कमालीचा रंगला. हरिजींच्या फुंकेमधल्या फोकसला आणि दमसासाला मिळालेल्या टाळ्या आजही माझ्या कानांत आहेत. बागेश्रीनंतर वाजवलेल्या पिलू धूनला सुद्धा खूप दाद मिळाली. विशेषतः शेवटच्या उठावणीला हरिजींनी जेव्हा दीड वित आकाराच्या छोट्या बासरीतली टिपेतली करामत सुनावली आणि मैफिल संपवली तेव्हा तर छप्परतोड टाळ्या वाजवत सर्व प्रेक्षक उत्स्फूर्तपणे उठून उभे राहिले.
मला आठवतंय त्यानुसार शिवकुमारजी आणि झाकीरभाई ही जोडगोळी जितक्या लवकर फेमस किंवा अलीकडच्या भाषेत क्लिक झाली, तितक्या लवकर हरिजींना झाकीरभाईंची तबलासाथ मिळाली नव्हती. नंतर मात्र थोड्याच काळात हरिजी व झाकीरभाई ही जोडगोळीही भरपूरच यशस्वी झाली. अशीच एक चिरस्मरणीय मैफिल 'गुणिदास संगीत संमेलना'त 'रवींद्र नाट्यमंदिरा'त ऐकली होती. या मैफिलीत राग कौशीकानडा मधल्या डोलायला लावणाऱ्या मधुर आलाप, जोड, झाल्यानंतर हरिजींनी ९ मात्रांच्या मत्त तालातली आडनिड मुखड्यातली गत सुरु केली आणि हरिजी व झाकीरभाई दोघांचीही मोहून टाकणारी लयकारी ऐकायला मिळाली. कौशी कानडा संपल्यानंतर राग मांजखमाज मधल्या मध्यलय आद्धा ताल व द्रुत त्रितालातल्या गती रंगल्या. शेवटी शेवटी द्रुत त्रितालची लय इतकी भन्नाट वाढली आणि त्या लयीतली हरिजी आणि झाकीरभाई दोघांचीही करामत इतकी टिपेला पोहोचली की टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला.
वेळेची बंधनं येण्यापूर्वीच्या काळात आमच्या पार्ल्यात, पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात, 'हृदयेश संगीत समारोहा'मध्ये हरिजींची अशीच एक धुंद मैफिल अनुभवलीय. या मैफिलीत खूप रंगलेल्या चंद्रकौंस नंतर आणि पहाडी धून नंतर; वन्स मोअरचा गजर झाला आणि त्याला मान देऊन मूडमध्ये आलेल्या हरिजींनी पहाटेचा पहिला प्रहर झालाय असं सांगून त्यानुसार ललत राग अनाऊन्स केला आणि पहाटेच्या सुंदर हवेत अर्धा पाऊण तास नितांत सुंदर ललत ऐकवून मैफिलीचा शेवट केला.
मी वर्णन करतोय ते मुख्यतः हरिजींच्या मैफिलींचं; पण असं असलं तरीही, एक वेगळा अनुभव म्हणून, हरिजींनी गायक पंडित जसराज, गायिका किशोरीताई आमोणकर यांच्याबरोबर जुगलबंदीही सादर केलीय. म्युझिक इंडस्ट्रीत कामं करतांना असंख्य हिंदी, मराठी व इतर प्रादेशिक गाण्यांमध्ये बासरी वाजवलीय. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत शिवकुमारजींच्या साथीनं 'शिवहरी,' या नावानं संगीतही दिलंय.
या अचाट कर्तृत्वाबरोबरच मुंबईमध्ये 'वृंदावन गुरुकुल'ची स्थापना करून त्यांनी असंख्य गुणी विद्यार्थ्यांना; फक्त बासरीच नव्हे तर, सर्व प्रकारचं शास्त्रीय संगीत शिकण्याची जी संधी उपलब्ध करून दिलीय, त्या पुण्यवान कर्तृत्वाला तर तोड नाही. हे त्यांचे देवतुल्य कार्य असंच चालू राहावं आणि त्यांच्या हातून, त्यांच्याहीपेक्षा सवाई असे, कर्तृत्ववान शिष्य घडावेत, हीच प्रार्थना.
ता. क. -- फोटो गुगलच्या सौजन्याने.
--- सप्तक पूर्ण झालंय ---
@प्रसन्न सोमण.
०८/०२/२०२१.