Thursday, 13 December 2018

#थोडी गाणी आणि थोडा माझा फापटपसारा - २) लावण्या आणि ज्योत्स्नाबाई ? ...

#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा
#लावण्या_आणि_ज्योत्स्नाबाई?...

२) लावण्या आणि ज्योत्स्नाबाई ? ...

जन्मजात मुंबईकर असल्यामुळे शेतीशी किंवा पिकांशी वगैरे माझा तरी कधीच काही संबंध नव्हता; पण तरीही मराठी चित्रपटगीतांमध्ये लावण्यांचं पीक मात्र सदैव सोळा आणेच असल्याचं पूर्वी सहजच लक्षात येत असे ... वास्तविक अस्सल तमाशातल्या आणि बोर्डावर सादर होणाऱ्या ठसकेबाज लाईव्ह लावण्या बघण्याचा योग मला कधी आला नाही, याची थोडीशी हळहळ वाटते ... कारण काळू-बाळू यांचा तमाशा आणि इतरही काही तमाशे आणि बाऱ्या मुंबईत अधूनमधून 'रंगभवन'ला होत असत, पण जायला कधी जमलं नाही एवढं खरं ... जरा आधीच्या काळातल्या पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, यमुनाबाई वाईकर, इत्यादींच्या लोककलेवर आणि खानदानी लावण्यांवर तर तज्ञ् जाणकारांनी अभ्यासच केलाय ... तरीही लावण्या म्हटलं की झटक्यात आठवतात त्या चित्रपटांमधल्या लावण्याच ... खरं म्हणजे आजकाल नवनवीन निर्माण होणाऱ्या मराठी सिनेमांची संख्या चांगलीच जोरदार आहे, पण का कुणास ठाऊक लावण्यांची वाढ जरा खुंटल्यासारखीच वाटत्येय ... 'नटरंग'चं संगीत उत्तमच आहे आणि गाजलंय ... इतर काही लावण्यांमध्येझपाटलेला २’ मधील लावणी, ‘आयडियाची कल्पना’ मधील लावणी; अशा काही लावण्या आहेत. तसंच मला माहीत नसलेल्या आणखीही काही असतीलच; पण तरीही फार संख्येनं चांगल्या लावण्या दिल्या जातायत असं जाणवत नाहीये ... कदाचित नृत्यांगनांऐवजी 'आयटम गर्ल्स'ना डिमांड असल्यामुळे की काय कोण जाणे, पण लावणी बाजाशी काहीही संबंध नसलेली आयटम सॉंग्ज आणि नृत्य कानांवर आणि डोळ्यांवर वार करतायत ... यामध्ये 'ऐका दाजीबा' (गायिका वैशाली सामंत / संगीतकार अवधूत गुप्ते) मधले 'किती आयले किती गयले सबको लगता है हम्मीच पयले' असलेभारी’ हिम्राठी (हिंदी मराठी मिक्स) शब्द असू शकतात (हे चित्रपटगीत नाहीये हे खरं, पण आयटम सॉंग आहे ...) किंवा 'चमचम करता है ये नशीला बदन' (हे मात्र चित्रपटगीत आहे ... गायिका वैशाली सामंत / संगीतकार अजय-अतुल / चित्रपट अगंबाई अरेच्चा) असं पूर्णतः हिंदी गाणं सुद्धा असू शकतं ...

लावणी म्हटलं की सुलोचना चव्हाण आणि उषा मंगेशकर या दोन गायिकांची नावं प्रामुख्याने घेतली जातात, हे खरं ... वास्तविक आशानी कितीतरी लोकप्रिय आणि उत्कृष्ट लावण्या गायलेल्या आहेत; काही अप्रतिम लावण्या लतानीही गायलेल्या आहेत आणि अगदी माणिकनंहीजाळीमंदी पिकली करवंद’ [संगीतकार सुधीर फडके / चित्रपट (जुना) पुढचं पाऊल] सारखी बेहेतरीन लावणी गायलेली आहे ... खरंतर माझ्या वैयक्तिक आवडी-निवडीनुसार सुलोचनाबाईंच्या आणि उषाच्या लावण्या मला जरा कमीच आवडतात ... अर्थात त्यातही सुलोचनाबाईंच्याकरी दिवसाची रात माझी सोडंना वाट’ व ‘रोग पिरतीचा जडला मशी गं बाई चार चौघात सांगू कशी’ (दोन्ही गाणी - संगीतकार वसंत पवार / गैरफिल्मी लावण्या / पैकी दुसरी लावणी बहुदा नेटवर अनुपलब्ध))धनी तुमचा नि माझा एक काढा फोटू,मला गं म्हणतात लवंगी मिरची,’ (दोन्ही लावण्या - संगीतकार वसंत पवार / चित्रपट रंगल्या रात्री अशा)  ‘कसं काय पाटील बरं हाय का,’ (संगीतकार वसंत पवार / चित्रपट सवाल माझा ऐका) अशा काही लावण्या आवडतातच ... उषाच्या लावण्यांमध्येराया चला घोड्यावरती बसून’ (संगीतकार राम कदम / चित्रपट सोंगाड्या),मला आणा कोल्हापुरी साज’ (संगीतकार राम कदम / चित्रपट सोनाराने टोचले कान),मला इश्काची इंगळी डसली’ व ‘नका तोडू पाव्हणं जरा थांबा’ (दोन्ही लावण्या - संगीतकार राम कदम / चित्रपट पिंजरा),अदबीनं सांगते मी जवळ जरा या ना’ (संगीतकार राम कदम / चित्रपट वारणेचा वाघ / गुगल मध्ये ‘वारणेचा वाघ’ असा सर्च दिल्यास ऐकता येईल.) या माझ्या आवडीच्या लावण्या .... लताच्या लावण्यांमध्ये एक नंबर आवडती म्हणजेमला आणा एक हिऱ्याची मोरणी’ (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट पवनाकाठचा धोंडी) ... त्या खालोखाल लताच्या आवडत्या लावण्या म्हणजे,तुझी माझी प्रीत एकदा कधी’ तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे’ (दोन्ही लावण्या - संगीतकार वसंत देसाई / चित्रपट अमर भूपाळी),कुणीतरी सांगा हो सजणा’ (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट पवनाकाठचा धोंडी) आणिबोल बोल ना साजणा का अबोला’ (संगीतकार उषा मंगेशकर / चित्रपट आई मी कुठे जाऊ) ... आणि आशाच्या लावण्या ? .... आवडत्या म्हणून किती लावण्यांचा उल्लेख करावा ? ... माझ्या मते आशाच खरी लावण्यांची महाराणी आहे (खरं म्हणजे ती सगळ्याच प्रकारच्या गाण्यांची महाराणी आहे ...) लतानीआनंदघन’ म्हणून संगीत देतांना बाकी बरीचशी गाणी स्वतःच म्हटली असली तरीहीरेशमाच्या रेघांनी’ (चित्रपट मराठा तेतुका मिळवावा) ही लावणी म्हणण्याचा मान तिनीही आशालाच दिलाय, हे लक्षात घेण्याजोगं आहे ... याहीपेक्षा एक लक्षणीय गोष्ट आहे ... उषा मंगेशकर स्वतः लावण्यांची गाजलेली गायिका असली तरीही तिनी संगीत दिलेल्या लावण्यांपैकी एक लावणी तिनी लताला दिलीय – ‘बोल बोल ना साजणा का अबोला’ (चित्रपट आई मी कुठे जाऊ) आणि दुसरी आशाला दिलीय –हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा’ (चित्रपट आई मी कुठे जाऊ) ...

आशाच्या आवडत्या लावण्या ? ... चिक्कारच आहेत ... पण तरी, पटकन आठवतायत त्या म्हणजे ... ‘टकटक नजर’ (संगीतकार डी डी उर्फ दत्ता डावजेकर / चित्रपट सून लाडकी या घरची),पतंग उडवीत होते,’पडते पाया’ व ‘येणे जाणे का हो सोडले’ (तिन्ही लावण्या - संगीतकार सुधीर फडके / चित्रपट लाखात अशी देखणी),झोंबतो गारवा’ (संगीतकार राम कदम / चित्रपट गणानं घुंगरू हरवलं),धक्का लागला गं’ (संगीतकार सुधीर फडके / चित्रपट जगाच्या पाठीवर),मुक्कामाला ऱ्हावा अहो पाव्हणं’ (संगीतकार सुधीर फडके / चित्रपट झाला महार पंढरीनाथ),थंडीची झोप मला लागंना’ (संगीतकार सुधीर फडके / चित्रपट नरवीर तानाजी), आणि अशा आणखीही कितीतरी ....

अशीच एक माझ्या मनी मानसी वसलेली, प्रेमळ आजीसारखी, गायिका म्हणजे ज्योत्स्नाबाई भोळे ... आता अगदी तसंच पाहिलं तर 'नाट्यसंगीत' हा काही माझ्या फार प्रेमातला विषय आहे असं नाही ... कोकणात राहिलेलो नसलो तरीही जन्मजात असलेल्या कोकण-प्रेमामुळे माझ्याही रक्तात काही नाट्यसंगीत प्रेमाचे संस्कार आलेत, नाही असं नाही ... पण तरीही मला नाट्यसंगीत हा ना धड सुगम संगीत ना धड शास्त्रीय संगीत असा मधला प्रकार वाटतो ... त्यातही संगीत नाटकांच्या बहराचा काळ हा माझ्या पिढीच्या बऱ्याच पूर्वीचा असल्यामुळे लाईव्ह संगीत नाटक काही मी पाहिलेलं नाही ... नाही म्हणायला अपवाद म्हणूनस्वरसम्रादनी,’ ‘बावनखणी’ आणि रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर आणि माया जाधवचंहोनाजी बाळा’ हीच काय ती खाती जमा असलेली दोनतीन संगीत नाटकं ... तसं तरमोरूची मावशी’ सुद्धा (म्हणे) संगीत नाटक आहे ... प्रशांत दामले हा संगीत नाटकांत गाणारा उत्तम गायक नट असल्याचा उल्लेखही मी हल्लीच्या कार्यक्रमाच्या निवेदकांकडून ऐकलेला आहे; ते असो ... पण हे असले सगळे विचार ज्योत्स्ना बाईंची गाणी ऐकतांना पूर्ण विसरले जातात ...  ज्योत्स्नाबाईंची गाणी म्हणजे नाट्यगीतं असोत, कोळीगीतं असोत की भावगीतं असोत ... माझ्यासाठी ती फक्त ज्योत्स्नाबाईंची गाणी असतात ... (अगदी अशीच भावना तलतची गाणी ऐकतांना मला जाणवत राहते ...  तसं पाहिलं तर व्यक्तिमत्वातली संस्कृती, गाण्यांची भाषा, गाण्यांचा प्रकार, गाण्यांचा ढंग, यात कसलंही काडीचंही साम्य नसतांनाही मला ज्योत्स्नाबाई आणि तलत या दोघांच्यात एक चांगलंच साम्य जाणवतं आणि याचं एकच कारण म्हणजे दोंघांच्याही आवाजात असलेला उपजत नैसर्गिक कंप ... अर्थातच दोघंही मला अत्यंत आवडतात ...) ... गीतकार-संगीतकारांचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं हे खरं असलं तरी ज्योत्स्नाबाईंचं गाणं हे पूर्णपणे त्यांचं व्यक्तिमत्वच होतं, अशीच माझी भावना आहे .... त्यांची लाडकी गाणी सांगू तरी किती ? .... तरीही ही गाणी आठवून बघाच ... ‘किती वयाचे धराल भय हे,’ ‘सुखद या सौख्याहुनी वनवास,’ ‘मानसी राजहंस’ वमी पुन्हा वनांतरी’ (चारही गाणी - संगीतकार स्नेहल भाटकर / नाटक भूमीकन्या सीता), ‘का रे ऐसी माया’ व ‘दे मज देवा जन्म हा’ (दोन्ही गाणी - संगीतकार मास्तर कृष्णराव / नाटक कोणे एके काळी)खेळेल का देव,’ ‘सखी मी धाले आनंदाने’ व ‘मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले’ (तिन्ही गाणी - संगीतकार स्नेहल भाटकर / नाटक राधामाई),नाच हृदया आनंदे’ व ‘ये झणी ये रे माघारी’ (दोन्ही गाणी - संगीतकार मास्तर कृष्णराव / नाटक एक होता म्हातारा),मराठी असे आमुची मायबोली’ (संगीतकार मास्तर कृष्णराव / स्फूर्तिगीत),माझिया माहेरा जा’ (संगीतकार पु.ल.देशपांडे  / भावगीत),क्षण आला भाग्याचा’ (संगीतकार मास्तर कृष्णराव / नाटक कुलवधू) आणि लास्ट बट नॉट लिस्टबोला अमृत बोला’ (संगीतकार मास्तर कृष्णराव / नाटक कुलवधू) ... ‘बोला अमृत बोला’ ही तर अगदी मास्टरपीस भैरवी आहे (जशी हिंदीतली अनुराधा मधली रवीशंकर-लता कॉम्बिनेशनचीसावरे सावरे’ ही मास्टरपीस भैरवी आहे) ... ‘बोला अमृत बोला’ ही रेकॉर्ड मी कधीही डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय ऐकूच शकत नाही ...

चित्रपटातल्या लावण्या आणि ज्योत्स्नाबाई भोळे यांची गाणी असे दोन; दोन ध्रुवांवरचे मुद्दे घेऊन; जमलं आणि वाटलं ते लिहिलंय ... पुन्हा भेटूच ...

ताजा कलम) मी फक्त रेकॉर्ड्सच्या आधारे आणि 'आठवणीतली गाणी' या साईटच्या आधारे लिहिलंय आणि )उल्लेखलेली गाणी 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर ऐकायला मिळतील ...

@प्रसन्न सोमण
१०/१२/२०१८.

No comments:

Post a Comment