Thursday, 13 December 2018

#थोडी गाणी आणि थोडा माझा फापटपसारा - १) तराणा आणि इतरही काही ...

#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा
#तराणा_आणि_इतरही_काही...

१)  तराणा आणि इतरही काही ...

'तदानी दिम तन दिर दिर तन दिम तन देरेना,' असल्या काहीतरी चित्रविचित्र अक्षरांचं गाणं आई स्वयंपाकघरात गात होती ... "हे कुठले विचित्र शब्द आहेत ?," मी राहवून आईला विचारलं ... त्यावर तिनी मला सांगितलं की याला तराणा म्हणतात ... तराणा हा खास शास्त्रीय संगीतातला प्रकार आहे; तो शक्यतो वेगवान असतो; त्यात तदानी, नोमतोम, दिर दिर, तनन, देरेना, वगैरे असे काही अर्थहीन पण खास शब्द असतात; वगैरे कायकाय माहिती तिनी सांगितली ... ती माहिती बालवयातल्या माझ्या डोक्यात कितपत शिरली कोण जाणे ... पण लवकरच 'कामगारसभा' की 'आपली आवड' कशात तरी मी 'दिर दिर तनुम तनन देरेना' असं एक गाणं ऐकलं ... हा 'तराणा' आहे असं वाटे वाटे पर्यंत पुढे लगेच 'असा नेसून शालू हिरवा' असे शब्द आले. त्यामुळे हा तराणा आहे की गाणं हा निर्णय बालवयातल्या मला त्यावेळी काही घेता आला नाही; पण त्याचवेळी ते गाणं मात्र मला भारी आवडलं ... पुढे मोठेपणी 'अलुरकर म्युझिक हाऊस'च्या कृपेने मला ते गाणं कॅसेटवर मिळालं ... 'कीचकवध' सिनेमातल्या 'सुधीर-लता'च्या थोड्याशा अनोख्या ड्युएटच्या स्वरूपातल्या या गाण्याच्या मी प्रेमातच पडलो ... संगीतकार 'मास्तर कृष्णराव' यांनी कोरसच्या स्वरूपात या गाण्याला जो तराण्याचा फील दिलाय तो एकदमच बेहेतरीन ....

असंच एक अनोख्या बोलांचं गाणं ऐकलं होतं ... ते म्हणजे 'जशास तसं' सिनेमातलं 'पक पक पक पक पकाक पक आज काही नाही कामात उरक' (गायक संगीतकार सुधीर फडके) ... खरंतर 'जशास तसं' मधल्या सगळ्याच गाण्यांचा मी 'दिवाना' आहे ... 'रानपाखरा ... आज इथं तर उद्या तिथं,' चिंचा आल्यात पाडाला,' 'रानी लिंबास आला बहार गं,' 'हरी तुझी कळली चतुराई,' 'हुकुमाची राणी माझी गं राया मी डाव जिंकला,' आणि बहर उडाला आज पडली तुमची आमची गाठ' (हे शेवटचं गाणं 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर अनुपलब्ध) या सगळ्या गाण्यांतला आशाचा जो पातळ, कोवळा आवाज दिल लुभावून टाकतो त्याला जवाब नही ... 'मोठं मोठं डोळं तुझं' मध्ये गायिका ललिता फडके (म्हणजे सौ सुधीर फडके) निराळीच मजा घेऊन येते ...

'चिंचा आल्यात पाडाला' या गाण्यावरून अगदी अपरिहार्यपणे 'जाळीमंदी पिकली करवंद' [गायिका माणिक वर्मा / संगीतकार सुधीर फडके / चित्रपट (जुना) पुढचं पाऊल] ही फर्मास लावणी आठवली ... आणि त्याच्या जोडीनंच 'गोकुळातला चोर आला नंदाचा पोर आला आडवा कुणी मला सोडवा' [गायिका माणिक वर्मा / संगीतकार सुधीर फडके / चित्रपट (जुना) पुढचं पाऊल] हेही आठवलं (गोकुळातला चोर आला हे गाणं 'आठवणीतली गाणी' या साईटवर नाहीये; मात्र जुना 'पुढचं पाऊल' हा पूर्ण सिनेमाच 'यु ट्यूब'वर उपलब्ध आहे} या दोन्ही गाण्यातला माणिकचा आवाज इतका कोवळा, पातळ आणि फिरक असलेला आलाय की गायिका माणिक आहे हे खास सांगावंच लागेल ... मला नेहमी 'तुज स्वप्नी पाहिले गोपाळा' (गायिका लता / संगीतकार डी डी, अर्थात दत्ता डावजेकर) या गाण्याबद्दल अगदी हेच वाटतं ... या गाण्यात लताचा आवाजही अत्यंत कोवळा, पातळ आणि फिरक असलेला आलाय ...

ज्या गाण्यांच्या मी आठवणी काढतोय ती गाणी बऱ्याच मंडळींना कदाचित, 'एक्सट्रीमली ओल्ड या SS र ... सो आय ऍम नॉट दॅट मच इंटरेस्टेड' ... अशा स्वरूपाची वाटतीलही ... पण खरंतर मी जरी प्रौढ असलो तरीही ही गाणी माझ्या काळातली सुद्धा नाहीच्चेत ... माझ्या आई-वडिलांच्या पिढीच्या काळातली म्हणजे आज साधारण ६५/७० वर्षांपूर्वीची ही गाणी असतील; पण तरीही मला या गाण्यांचं वेड लागलं बुवा ... कसं ? .... फक्त ऐकून ऐकून (अर्थात तेही मनापासून ... 'मनापासून' हे महत्वाचं ...) .... 'पुणे' या शहराबद्दल अनेक दशकं (कदाचित शतकं सुद्धा असेल) कित्येक मोठमोठ्या साहित्यिकांनी खूप काहीकाही लिहिलंय ... विनोदी लेखकांनी आणि विशेषतः आजकालच्या सोशल साईट्स वरील लेखकांनी तर कित्येकदा; चेष्टा-मस्करीच्या मूडमध्ये असेल कदाचित पण; 'काहीतरीच' सुद्धा लिहिलंय; पण मला पुण्यातली एक गोष्ट कमालीची प्रिय आहे .... दुर्दैवाने आज 'होती' असं म्हणावं लागतंय ... ती गोष्ट म्हणजे कर्वे रोडवरील 'अलुरकर म्युझिक हाऊस' हे अफलातून दुकान ... पुण्याच्या माझ्या फेऱ्यांमध्ये मी कित्येक तास या दुकानात विंडो शॉपिंग करत आणि अलुरकरांच्या संग्रहाचे इंडेक्स वाचत काढले असतील ... कोंड्याचा मांडा करून (म्हणजे इतर कुठलीही 'इंटरेस्टिंग एन्जॉयमेंट' टाळून) जमेल तितकी रक्कम मी इथल्या कॅसेट खरेदीसाठी वेगळी ठेवत असे (आणि ती कधीही पुरी पडत नसे.) ... मुंबईत तेव्हा अशा प्रकारच्या दुकानांना तोटा नसला तरीही मराठी माणसासाठी अलुरकरांकडच्या संग्रहाला खरंच तोड नव्हती ... माझ्या संगीतप्रेमाला 'अलुरकर म्युझिक हाऊस'चा एक मोठा टेकू आहेच ... कारण जगभरच्या करोडो लोकांनी अपलोड केलेला त्यांचा संग्रह काही क्लिक्स वर सहजी ऐका-बघायला मिळण्याचा तो जमाना नव्हताच ...

'दिर दिर तनुम तनन देरेना' च्या पाठोपाठ मी आज सकाळीच माझ्या संग्रहातलं एक लई लई जुनं गाणं ऐकलं ... ते गाणं आहे 'हांस रे मधू हांस ना' (गायिका प्रमोदिनी देसाई / संगीतकार दशरथ पुजारी) ... याच्याच जोडीला याच कॉम्बिनेशनचं (गायिका प्रमोदिनी देसाई / संगीतकार दशरथ पुजारी) 'श्रीरामा घनश्यामा आलास कधी परतून' हेही एक अप्रतिम गाणं आहे ... [दोन्ही गाणी यु ट्यूबवर माझ्या चॅनलवर (prasannasoman) उपलब्ध आहेत] ... तर सकाळी 'हांस रे मधू हांस ना' ऐकता ऐकताच मी झपाटला गेलो आणि खरंतर तेव्हाच काहीतरी लिहावं अशी उर्मी दाटून आली .... दोन्ही गाण्यातल्या 'प्रमोदिनी देसाई'च्या आवाजावर मी वेडं म्हणावं असं प्रेम केलंय ... ही तशी अप्रसिद्ध गायिका; पण खूपच भन्नाट गायलीय ... खरंतर 'प्रमोदिनी देसाई' हे नांव सुद्धा मला 'अजून त्या झुडुपांच्या मागे' (संगीतकार 'दशरथ पुजारी' यांचं आत्मकथन) या पुस्तकातूनच समजलं .... पण (विशेषतः मराठीत) कित्येक वेळा असं घडतं ... गायक गायिकांच्या आवाजासहित गाणी आपली खूप आवडती असतात, पण गायक गायिका कोण, हे माहीत नसतं ... तर 'हांस रे मधू हांस ना' ऐकता ऐकता एक छोटासा वैयक्तिक किस्सा आठवला ... माझ्या बाबांचं नांव मधुसूदन ... खूप शिस्तीचे आणि बऱ्यापैकी रागीट होते ते ... माझी आई गाण्याची प्रेमी आणि गायिका सुद्धा ... त्यांचा त्या काळात म्हणजे १९४९ साली प्रेमविवाह झाला होता ... माझ्या मोठेपणी हे 'हांस रे मधू हांस ना' गाणं टेपरेकॉर्डर वर चालू असतांना एकदा चेष्टेत मी बाबांच्या देखतच आईला विचारलं होतं .... "त्या काळात बाबांसाठी तुला हे गाणं पन्नास वेळा म्हणावं लागत असेल नाही ?" ... माझ्या या प्रश्नावर आई म्हातारपणात सुद्धा मनापासून हसली होती ...                                      

वाटलं आणि सुचलं म्हणून आज तर इतकं खरडलंय ... अशाच स्वरूपाचं आणखी काही लिहावं, असं आपलं म्हणतोय ... कधी ? कसं ? .... सुचेल तेव्हा आणि तसं .... नो नियमितपणा ... फक्त या लेखाला ) असा आकडा टाकून ठेवलाय एवढंच ... बाकी काय ? ... भेटूच ... असंच 'थोडी गाणी आणि थोडा माझा फापटपसारा' मध्ये ...

ताजा कलाम) मी फक्त रेकॉर्ड्सच्या आधारे आणि 'आठवणीतली गाणी' या साईटच्या आधारे लिहिलंय आणि )उल्लेखलेली गाणी 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर ऐकायला मिळतील ...


@प्रसन्न सोमण.
०४/१२/२०१८.

No comments:

Post a Comment