Thursday, 27 December 2018

#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा - ३) काही अल्पप्रसिद्ध कलाकार

#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा
#काही_अल्पप्रसिद्ध_कलाकार

) काही अल्पप्रसिद्ध कलाकार

मध्येच कधीतरी असं होतं की कधीच्या काळी त्रेतायुगात ऐकलेलं गाणं एकदम आठवतं ... असंच एक भावगीत सकाळपासून हॉन्ट करत होतं ... ‘आठवणी दाटतात धुके जसे पसरावे, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे’ ... पण गायलंय कुणी हे काही आठवत नव्हतं ... आधीच प्रौढ वयात स्मरणशक्ती कमकुवत व्हायला लागते .... त्यातही आज मोबाईल, कॉम्प्युटरच्या काळात स्मरणशक्तीला ताण देत न बसता इंटरनेटवर इन्स्टंट उत्तर मिळवायची सोय झाल्यामुळे, असं काहीतरी झालंय की सहजासहजी काही आठवत म्हणून नाही ... शेवटीआठवणीतली गाणी’ या साईटरुपी राजवाड्याची बेल वाजवली ... दरवाजा उघडला; आणि नाव कळलं .... गायिका सुमती टिकेकर ... या राजवाड्यात कामापुरतं गेलो आणि लगेच परत आलो असं कधी घडूच शकत नाही, त्यामुळे याच गाण्याचे संगीतकार शोधले ... ते आहेत एम.जी.गोखले ... त्यांच्या इतर काही गाण्यांवरून नजर टाकतांना अजून एका गाण्यानं कुतूहल चाळवलं ... ‘मी बोलू कुणा प्रभू सांगू कुणा’ आणि या गाण्याच्या गायिका आहेत निर्मला गोगटे ... असंच चालू असतं माझं बऱ्याचदा .... तर आज माझ्या मनाला भुरळ घालणाऱ्या काही अल्पपरिचित कलाकारांबद्दल ...

सुमतीबाई टिकेकर मुख्यतः संगीत नाटकांच्या प्रेमी या नाटकांमध्ये कामं करणाऱ्या गायिका ... त्या शास्त्रीहॉल मध्ये राहत होत्या ... शास्त्रीहॉल माझं आजोळ ... माझ्या लहानपणी सुमतीबाईंनी शास्त्रीहॉल मध्ये त्यांचे पती बाळासाहेब टिकेकरांसोबतसंगीत स्वयंवर’ नाटक केल्याचं मला आठवतंय ... या नाटकात नटी-सूत्रधाराच्या प्रवेशात नटीच्या भूमिकेत माझ्या आईनी काम केलं होतं ... आईला दोन पदंही होती ... सुमतीबाई आणि बाळासाहेब अर्थात रुक्मिणी आणि कृष्णाच्या भूमिकेत होते ... ही झाली माझी वैयक्तिक आठवण; पण इंटरनेटवर सुमतीबाईंची माहिती ? ... जवळजवळ काहीच नाही ... नाही म्हणायला सुमतीबाई म्हणजे अभिनेता उदय टिकेकर याची आई गायिका आरती अंकलीकर-टिकेकर हिच्या सासूबाई; ही माहिती आहे, पण गायिका म्हणून माहिती ? ... अगदीच त्रोटक ... ‘आठवणी दाटतात’ हे त्यांचं खरंच भलतंच गोड आणि लाजवाब गाणं आहे ... त्यांची अजून दोन गाणी आहेत ... ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ (संगीतकार एम.जी.गोखले / भक्तीगीत) आणिअनामिक नाद उठे गगनी’ (संगीतकार वसंतराव देशपांडे / नाटक - वरदान) ही दोन्ही गाणी सुद्धा गाजली ... विशेषतः 'बसंत' रागावर आधारित असलेलंश्रीरामाचे दर्शन घडले’ अनेकदा रेडियोवर लागत असे ...

संगीतकार एम.जी.गोखले याची फक्त तीन गाणी आठवणीतली गाणी या साईटवर आहेत ... पैकी दोन गाण्यांचा उल्लेख मी केलाच ती म्हणजे ‘आठवणी दाटतात’ आणि ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ (दोन्ही गाण्याच्या गायिका सुमती टिकेकर) ... तिसरं गाणं आहे 'मी बोलू कुणा प्रभू सांगू कुणा ही व्यथा मनाची तुझ्याविना' (गायिका निर्मला गोगटे) ... अगदी खरं सांगायचं तर हे तिसरं गाणं बालपणी रेडियोवर ऐकल्याचं मला काही आठवत नाहीये ... हे गाणं मी ऐकलं ‘आठवणीतली गाणी’ वरूनच ... पण या गाण्याच्या चालीनी मात्र खरंच माझा होश उडाला ... विलक्षण फिरक असलेलं हे अत्यंत सुंदर कंपोझिशन आहे आणि तितक्याच ताकदीने आणि अप्रतिमपणे ते निर्मला गोगटे यांनी गायलंय ... एम.जी.गोखले यांची ही तिन्ही गाणी ऐकल्यानंतर असं वाटलं की या गुणी संगीतकारानी आणखी खूप म्हणजे खूपच काही जास्त द्यायला हवं होतं, पण ... ते नाही घडलं, याची रुखरुख वाटते.

निर्मला गोगटे - गायिका निर्मलाताई गोगटे यांची पाचच गाणी ... ती आहेत ... ‘ओठांवरती रोज प्रभाती घ्यावे मंगल नाम रघुपति राघव राजाराम’ व ‘पंढरीच्या त्या देवमंदिरी गजर एक होई जय जय विठ्ठल रखुमाई’ (दोन्ही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘गोड तुझी बासरी श्रीहरी’ (संगीतकार दशरथ पुजारी), 'मी बोलू कुणा प्रभू सांगू कुणा ही व्यथा मनाची तुझ्याविना' (संगीतकार एम.जी.गोखले) व शेवटचं नाट्यगीत आहे ‘सवतचि भासे मला’ (संगीतकार गोविंदराव टेंबे / नाटक मानापमान) ... सुमती टिकेकर यांच्याप्रमाणेच निर्मलाताई गोगटे या सुद्धा संगीत नाटकांमध्ये रमणाऱ्या आणि काम करणाऱ्या गायिका .... त्यांच्या सुरांना सच्चेपणा आणि आवाजात अप्रतिम फिरक होती ... त्यांच्या आवाजातल्या ‘रघुपति राघव राजाराम’ आणि ‘जय जय विठ्ठल रखुमाई’ या खळेकाकांच्या सुंदर भक्तिगीतांमुळे बालपणीची सकाळ अनेकदा मंगलमय होत असे ... 
            
खरं म्हणजे कुमुद भागवत ही काही मला फार आवडलेली गायिका आहे, असं नव्हे .... पण ती एक अशी गायिका आहे जिची फक्त दोनच गाणी चांगल्यापैकी प्रसिद्ध झालीयत ... ‘सायंकाळी निवांत वेळी रातराणी उमलली जिवलगा प्रीती अबोल झाली’ आणिमुरलीधर घनश्याम सुलोचन मी मीरा तू माझे जीवन’ ... ही दोन्ही भावगीतं संगीतकार दशरथ पुजारींनी दिलीयत ... दोन्ही गाणी आजही कानांना खूप गोड लागतात आणि माझ्या रेडियो श्रवणाच्या आठवणी उजळवून टाकतात हे नक्कीच ...

‘निळा सावळा नाथ अशी ही निळी सावळी रात’ हे नितांत सुंदर आणि चिक्कार लोकप्रिय गाणं गायिका कुंदा बोकील यांनीं गायलंय हे तर खरंच; पण हा भाग्ययोग कुंदाताईंच्या नशिबात तसा थोडा उशिराच आला ... कुंदाताई या खळेकाकांप्रमाणे बडोद्याच्याच होत्या आणि खूप गोड गळ्याची गायिका म्हणून खळेकाकांना त्या माहीतही होत्या ... ‘निळा सावळापूर्वी त्या बडोद्यात आणि पुढे कॉलेजशिक्षणासाठी मुंबईत आल्यावर गातही होत्या ... रेडियोवरील लाईव्ह भावसरगम मध्येही खळेकाका, यशवंत देव काका यांच्या रचना त्या गात असत ... पण तरीही रेकॉर्डस् काढतांना म्हणे एच.एम.व्ही.वाल्यांना त्यांचा पातळ आवाज शाळकरी वाटला आणि म्हणून रेकॉर्ड म्हणून पहिली दोन गाणी कुंदाताईंच्या पदरात पडली ती म्हणजे बालगीतं – ‘शाळा सुटली पाटी फुटली’ आणिगमाडी गम्मत जमाडी जम्मत’ ... खळेकाकांची ही दोन्ही बालगीतं तुफान गाजली ... त्यानंतर लगेच संगीतकार अनिल मोहिलेंनी कुंदाताईंना माझं अत्यंत आवडतं असलेलंप्रीतीचा पारिजात फुलला’ हे गाणं आणि दुसरंअभिमानाने मीरा वदते हरिचरणाशी माझे नाते’ हे गाणं दिलं ... ही दोन्ही भावगीतं सुद्धा खूपच गाजली ... त्यानंतर खळेकाकांची दोन गाणी त्यांच्या वाट्याला आली ... पहिलंवैकुंठीचा राणा तूचि नारायणा’ (भक्तीगीत) आणि दुसरंनिळा सावळा नाथ अशी ही निळी सावळी रात’ (भावगीत) ... रेडियोवरील लाईव्ह भावसरगम मध्येश्रावणात घननीळा बरसला’ कुंदाताई गायल्यायत असं वाचलंय तसंचजिव्हाळा’मधलंया चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गाणंही कुंदाताई गायल्यायत असंही वाचायला मिळालंय; मात्र ही दोन्ही गाणी लताच्याच आवाजात ऐकायला मिळतायत एवढं खरं ... खळेकाकांनी आपल्या 'अंतर्यामी सूर गवसला' या आत्मचरित्रात कुंदाताईंबद्दल खूपच गौरवोद्गार काढलेत; पण तरीही ... पाच-सहा गाण्याच्या रेकॉर्डस् एवढ्या उदंड गाजूनही पुढे का कोणास ठाऊक पण कुंदाताईंच्या फारशा  रेकॉर्डस् आल्याच नाहीत ... कुंदाताई जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर राहिल्या असं कुठेतरी वाचनात आलंय; पण एवढी उत्तम गायिका उपेक्षेच्या अंधारात लुप्त झाली हे सत्य उरतंच ...                 
  
ताजा कलम) मी फक्त रेकॉर्ड्सच्या आधारे आणि 'आठवणीतली गाणी' या साईटच्या आधारे लिहिलंय आणि )उल्लेखलेली गाणी 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर ऐकायला मिळतील ...

@प्रसन्न सोमण
२५/१२/२०१८.