Friday, 14 April 2017

#९)राम कदम

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#)राम कदम

'लावणीसम्राट' संगीतकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला एक काळ संगीतकार वसंत पवारांनी गाजवला. दुर्दैवाने पवार ४६ व्या वर्षी, म्हणजे खूपच लवकर गेले. पण त्यांच्या निधनाने पोकळी वगैरे निर्माण झाली नाही... हल्ली कॉम्प्युटरच्या जमान्यात बघा एखाद्या सॉफ्टवेअरची सुधारित आवृत्ती म्हणजे अपडेटेड व्हर्जन असतं; तसं त्या सर्वसाक्षी परमेश्वराने लावणीसम्राट मराठी संगीतकाराचं एक अपडेटेड व्हर्जन लगेच तयार केलं. त्याचं नाव संगीतकार राम कदम.

माझ्या संगीतवेड्या मोठ्या भावाच्या आठवणीनुसार स्वतः रामभाऊंनी टी.व्ही.वरील (आज अनुपलब्ध असलेल्या) मुलाखतीत सांगितलं होतं की ते वसंत पवारांकडे सहाय्यक म्हणून काम करत होते त्याच काळात पवारांच्या काही अडचणीमुळे 'बुगडी माझी सांडली गं' (आशा / चित्रपट - सांगत्ये ऐका) या प्रसिद्ध लावणीची चाल राम कदम यांनी लावली. अनौपचारिकपणे संगीतप्रेमींकडून 'बुगडी'चं श्रेय रामभाऊंना दिलंही गेलंय. (चित्रपटाच्या श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून वसंत पवार यांचंच नाव आहे.) .. रामभाऊंच्या कारकिर्दीबद्दल इंटरनेटवर फार त्रोटक माहिती आहे. (त्यात रामभाऊ हे वसंत पवार यांचे सहाय्यक असल्याचा कुठेही उल्लेख नाहीये ते बाबूजी सुधीर फडके यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असल्याचा उल्लेख आहे.) उत्तम क्लॅरियोनेट  वादक असलेल्या रामभाऊंनी मिरजेत काही काळ .अब्दुल करीम खानांच्याकडे संगीत-शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी काही काळ दस्तुरखुद्द पठ्ठे बापूरावांकडून लावणीचा अस्सल गावरान संगीताचा बाज शिकून घेतला. त्यानंतर बराच काळ रामभाऊंनी व्ही.शांतारामांच्या 'प्रभात' मध्ये उमेदवारी केली. करत करत त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित 'मीठभाकर' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला संगीत दिलं. उत्कृष्ट ग्रामीण बाजाचं संगीत आणि निरनिराळ्या बाजाच्या लावण्या देत देत लवकरच ते अघोषित 'लावणीसम्राट' झाले... खरंच रामभाऊंचं निरनिराळ्या प्रकारच्या लावण्यांवरचं निर्विवाद प्रभुत्व थक्क करणारं आहे. त्यातही विशेषतः लावणीचा जो झील (कोरस) असतो तो वेगवेगळ्या प्रकारांनी अफलातून स्वरूपात स्वरबद्ध करण्यात रामभाऊ माहीर होते. उदाहरण म्हणून एकच लावणी सांगतो ... 'अहो  अदबीनं  सांगते मी जवळ जरा या ना' (उषा मंगेशकर / चित्रपट - वारणेचा वाघ) ही लावणी कष्ट घेऊन मिळवून जरूर ऐका. (गुगल मध्ये वारणेचा वाघ टाईप केल्यास ही लावणी ऐकायला मिळू शकेल.) झीलांनी ही लावणी कुठच्याकुठे गेल्येय.

विविध लावण्यांबरोबरच रामभाऊंनी गणराजाला करू मुजरा (छोटा गंधर्व / चित्रपट - पुढारी), गेला सोडूनि मजसी कान्हा (सुमन / चित्रपट - सोंगाड्या), आल्या नाचत नाचत मेनका रंभा (गायक - बाळकराम / चित्रपट - केला इशारा जाता जाता), गुणगान लेकरू गाई आई उदे गं अंबाबाई (गायक - राम कदम / चित्रपट - आई उदे गं अंबाबाई), हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा (गायक चंद्रशेखर गाडगीळ / चित्रपट - झुंज) अशी ग्रामीण बाजातली सर्व प्रकारची गाणी  अफलातून संगीतबद्ध केलीयत.

शांतारामबापूंचा पिंजरा हा रामभाऊंचा एक लँडमार्क चित्रपट. त्यातल्या उषाच्या लावण्यांबद्दल नव्याने काही लिहायला नकोय. या सगळ्याच लावण्या उषाने सुंदर गायिल्यायत आणि त्या गाजल्याही आहेत हे खरंच. पण 'पिंजरा'तलीच एक मास्टरपीस आध्यात्मिक लावणी, 'दे रे कान्हा दे रे चोळी अन लुगडी' रामभाऊंनी इतकी नितांत सुंदर रितीने संगीतबद्ध केलीय की पुछो मत. (कृष्ण आणि गोपींचं वर्णन असल्यामुळे कदाचित ही गवळण असेल, पण टी.व्ही.वरील केदार शिंदेंच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात चारुशीला साबळेंनी या गाण्याचा आध्यात्मिक लावणी असा उल्लेख केला होता, आणि तो मी ग्राह्य धरलाय.) आध्यात्मिक लावणी म्हटल्यावर ते गाणं लताकडे जाणं आणि अर्थातच लताने त्या गाण्याचं सोनं करणं, हे ओघाने आलंच. यातलाही झील (कोरस) अत्यंत श्रवणीय असाच आहे.                

मराठी चित्रपटसृष्टी एक बराच मोठ्ठा काळ ग्रामीण, तमाशा प्रधान, लावणी प्रधान चित्रपटांमध्ये अडकली होती. त्यातून एकूणच मराठी मनाला लोकसंगीताचं, लावणीचं प्रचंड वेड होतंच नव्हे आजही आहेच, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे कुठलाही मराठी संगीतकार असो, त्याला लावणी देता आलीच पाहिजे अशी - प्रश्न पहिला अत्यावश्यक, या छापाची - अटच होती. थोड्याफार प्रमाणात अगदी आजही ही परिस्थिती लागू होते. अगदी संगीतकार अजय अतुल (आठवा - चित्रपट नटरंग), अवधूत गुप्ते पर्यंत. पण लावणी ग्रामीण संगीत वगळलं तरी रामभाऊंची झेप काय आहे ते बघा - टाळ बोले चिपळीला (भीमसेन वसंतराव / चित्रपट - भोळी भाबडी), थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा (आशा / चित्रपट - एक धागा सुखाचा), दे दे कंठ कोकिळे मला (आशा / चित्रपट - छंद प्रीतीचा), मी लता तू कल्पतरू (आशा / चित्रपट - एक धागा सुखाचा), इत्यादी. 'कुणीतरी सांगा श्री हरीला एकदा भेट राधिकेला' (आशा / चित्रपट - प्रेम आंधळं असतं), (यु ट्यूबवर उपलब्ध) 'चांद किरणांनो जा रे माझ्या माहेरा' (आशा / चित्रपट - वैभव) ही गाणी तर रामभाऊंनी इतकी अफाट केलीयत की मी मी म्हणणारे संगीत-आचार्य सुद्धा दिग्मूढ व्हावेत. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या नाणावलेल्या शास्त्रीय गायकांनीही रामभाऊंकडे गाणी उगाच नाही गायलीयत.

जोवर मराठी चित्रपटात लावणी, लोकसंगीत आहे तोवर रामभाऊ आपल्यात आहेतच.                 

माझ्या पसंतीची दहा गाणी --

) गुणगान लेकरू गाई आई उदे गं अंबाबाई - गायक राम कदम / चित्रपट - आई उदे गं अंबाबाई
) कुणीतरी सांगा श्री हरीला एकदा भेट राधिकेला (यु ट्यूबवर उपलब्ध) - आशा / चित्रपट - प्रेम आंधळं असतं
) गणराजाला करू मुजरा - छोटा गंधर्व / चित्रपट - पुढारी
) गं बाई बाई झोंबतो गारवा - आशा / चित्रपट - गणानं घुंगरू हरवलं
) चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा - आशा / चित्रपट - वैभव
) छुन छुन बोलतिया हातामध्ये घांट - आशा / चित्रपट - सुंदरा मनामध्ये भरली
) दे रे कान्हा दे रे चोळी अन लुगडी - लता / चित्रपट - पिंजरा
) नाकात वाकडा नथीचा आकडा - उषा मंगेशकर जयवंत कुलकर्णी / चित्रपट - वैभव
) मी लता तू कल्पतरू - आशा / चित्रपट - एक धागा सुखाचा
१०) रंग फेका रंग रे रंग फेका - आशा विठ्ठल शिंदे / चित्रपट - रंगपंचमी

--- भाग . राम कदम - मा प्त
क्रमशः - - #भाग१०)आनंदघन

ता -  ) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           ) माहिती मुख्यतः गुगल, विकिपीडिया इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली आहे.
           ) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेत, अर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           ) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           ) निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहा' आहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           ) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.


@प्रसन्न सोमण

प्रसिद्धी - अभूतपूर्व (सप्टेंबर २०२०)


राम कदम

No comments:

Post a Comment