Friday, 7 April 2017

#८)यशवंत देव

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#)यशवंत देव

सामान्यतः १९४५/५० पासून १९७५/८० असा तीसेक वर्षांचा काळ मराठी भाव, भक्ती, सुगम चित्रपट संगीताच्या दृष्टीने सोनियाचा काळ मानला जातो... अर्थात त्या काळाच्या पूर्वीही सुंदर श्रवणीय मराठी गाणी होत होती त्या काळानंतरही अगदी आजपर्यंत उत्तम उत्तम मराठी गाणी जन्म घेतायत यावर माझा नक्कीच पूर्ण विश्वास आहे. - निदान मराठी गाण्यांच्या बाबतीत तरी आहेच आहे ... पण तरीही 'त्या' तीसेक वर्षांच्या काळात; पूर्वी राज्याभिषेकाच्या वेळी राजे महाराजांवर हिरे-मोती उधळत तशाप्रकारे, रसिकराजांवर संगीतकारांनी उत्तमोत्तम गाणी हिरे-मोत्यांसारखीच उधळलेली आहेत. ही उधळण करणाऱ्या अनेकानेक गुणी संगीतकारांपैकी एक उल्लेखनीय संगीतकार आहेत - यशवंत देव.

माझ्या संगीत प्रवासात (हे एखाद्या प्रथितयश कलाकाराने लिहिल्यासारखं वाटतंय ना ?) - सॉरी ... कानसेन किंवा संगीतप्रेमी म्हणून संगीत ऐकण्याच्या माझ्या प्रवासात कलाकारांइतकंच महत्वाचं स्थान 'आकाशवाणी'ला आहे. मी मुंबईचा, म्हणून फक्त मुंबई केंद्राबद्दल म्हणतोय असं नाही तर वेगवेगळ्या गावच्या, वेगवेगळ्या शहरांच्या आकाशवाणी केंद्रांचे जेवढे उपकार मानावेत तेवढे कमीच आहेत. कारण आपल्याला संगीत ऐकवून या केंद्रांनी वेड लावलंच पण कितीतरी कलाकारांना, मान्यवरांना या आकाशवाणी केंद्रांनी आपल्या सेवेत घेऊन या मान्यवरांना, या कलाकारांना कलेची उपासना करण्यासाठी बळ, आर्थिक स्थैर्य दिलं. त्या काळात पु.ल.देशपांडे, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, अशा कलेच्या क्षेत्रातील काही कलंदर रत्नांनी आकाशवाणीवर नोकरी केलेली आहे. (आकाशवाणी इतकंच एच.एम.व्ही.या रेकॉर्ड कंपनीचंही ऋण मानावंच लागेल. मूलतः या रेकॉर्ड कंपनीने काढलेल्या सर्व रेकॉर्डस् वरच तमाम संगीतप्रेमींच्या संगीत श्रवणाचा डोलारा उभा आहे.) देवकाका सुद्धा एक आकाशवाणी प्रॉडक्ट आहेत असंच म्हणावं लागेल. आपल्या उमलत्या वयात, उमेदवारीच्या काळात सतार वादनाची आवश्यक ती मेहनत करून देवकाका अगदी सुरुवातीला सतारवादक म्हणून ऑल इंडिया रेडियोच्या नागपूर आकाशवाणी केंद्रामध्ये नोकरीला लागले. लवकरच, समोर आलेल्या कविता या गेय आहेत की नाहीत, या कविता चाल लावून गाणी करण्यायोग्य आहेत की नाहीत, हे पाहण्याचे काम त्यांच्यावर सोपवले गेले. हे काम करतांना अर्थातच कवितांना नकार देण्याचे प्रसंग यायचेच. देवकाका या नकाराची कारणं तर द्यायचेच पण चाली लावण्यासाठी पर्यायी गीतं, पर्यायी कविताही सुचवायचे. या निमित्ताने देवकाका; शब्द, कविता, संगीत, संगीतामधला कवितांना संगीतबद्ध करण्याचा भाग, या सर्व गोष्टींकडे गांभीर्यानं पाहू लागले. स्वतः गीते लिहूही लागले स्वतःच्या दुसऱ्यांच्याही गीतांना संगीतबद्धही करू लागले. देवकाकांना अर्थातच शब्दांची, गीतातल्या अर्थाची आणि सुरांचीही उत्तमच जाण होती. त्या अनुषंगाने एकूणच गीतांच्या निर्मितीप्रक्रियेच्या बाबतीतलं त्यांचं स्वतःचं असं विचारमंथन सुरु झालं. त्यांच्या, नंतर प्रसिद्ध झालेल्या गाजलेल्या, 'शब्दप्रधान गायकी' या अप्रतिम पुस्तकाचं मूळ हे इथं आहे. रेडियोसाठी संगीत देऊन देवकाकांनी बरीच गाणी केली. किंबहुना त्यांचं सुरुवातीचं तरी बरंचसं काम रेडियोसाठी आहे नंतरचं काही काम एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डस् साठी कॅसेट्स-अल्बम्स साठी आहे

अगोदर नागपूर आणि नंतर मुंबई आकाशवाणी केंद्रावर देवकाकांनी नोकरी केली. त्यातही मध्येच काही काळ ते विविध भारती मध्ये सुद्धा काम सांभाळत होते. त्या निमित्ताने त्या काळात गाजत असलेल्या हिंदी चित्रपट गीतांचाही त्यांनी अभ्यास केला. मनोमन त्यांनी हिंदीतील प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांना गुरु मानलं. स्वतंत्र कामासाठी कोणाकडेही स्वतःहून काम मागायचा देवकाकांचा कधी स्वभावच नव्हता. या पाश्वभूमीवर त्यांनी एकूण ११ मराठी चित्रपटांना संगीत दिलं. यातील काही बऱ्यापैकी गाजलेही. पण तरीही सुगम संगीत, भावगीते हा त्यांच्या संगीताचा प्राण आहे. त्या काळात त्यांनी, उघडी नयन शंकरा (गायिका - आशा भोसले), अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे (गायिका - मधुबाला झवेरी), कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा (गायिका - कृष्णा कल्ले), कुणी जाल का सांगाल का (गायक - वसंतराव देशपांडे), केळीचे सुकले बाग (गायिका - उषा मंगेशकर), कृष्णा उडवू नको रंग थांब (गायिका - आशा भोसले), गणपती तू गुणपती तू (गायक - वसंतराव देशपांडे / चित्रपट - मंत्र्याची सून), चंद्र अर्धा राहिला रात्र अर्धी राहिली (गायिका - कृष्णा कल्ले), जन विजन झाले आम्हा (गायक - रामदास कामत), जरी या पुसून गेल्या (गायिका - शोभा जोशी), जीवनात ही घडी अशीच राहू दे (गायिका - लता मंगेशकर / चित्रपट - कामापुरता मामा), डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी (गायक - अरुण दाते), तुझ्याच साठी कितीदा (गायिका - कृष्णा कल्ले), त्या तरुतळी विसरले गीत (गायक - सुधीर फडके), देवा तुझा मी सोनार (गायक - रामदास कामत), पाऊस कधीचा पडतो (गायिका - पद्मजा फेणाणी-जोगळेकर), मधुवंतीच्या सुरासुरातून (गायिका - सुमन कल्याणपूर), माघाची थंडी माघाची (गायिका - रंजना जोगळेकर), हे आदिमा हे अंतिमा (गायक - रामदास कामत), इत्यादी अनेक अविस्मरणीय गाणी केली.

१९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरु झालं. त्यानंतर थोड्याच काळात दिग्दर्शक वसंतराव जोगळेकरांनी टी.व्ही.साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर लघुपट केला. त्याच्या संगीत दिग्दर्शनाचं काम देवकाकांनी पार पाडलं. या लघुपटात त्यांनी बहिणाबाईंची १५ गाणी केली. ही गाणी उत्तरा केळकरनी गायली. ही सर्व गाणी आणि भक्ती बर्वे अभिनित हा लघुपट त्याकाळी खूपच गाजला.  

पुणे आकाशवाणीवरील .दि.मा. सुधीर फडके या जोडीचं गीतरामायण प्रचंड यशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध बॅले नर्तक सचिन शंकर यांना रामायणावरच नृत्यनाट्य (बॅले) करायचं होतं. त्यासाठी त्यांनी .दि.मां.कडूनच गाण्यांसहित 'कथा ही रामजानकीची' या नावाचं नृत्यनाट्य लिहून घेतलं साहजिकच ते संगीताकरता बाबुजींकडे गेले. बाबूजींचे गीतरामायणाचे लाईव्ह कार्यक्रम प्रचंड जोरात असल्यामुळे काही काळ तरी 'राम' या विषयावर नवीन काहीही करायचं नाहीये असं बाबूजींनी सचिन शंकरांना सांगितलं; पण त्याचबरोबर बाबूजींनी सचिन शंकरांना देवकाकांकडे पाठवलं देवकाकांनाही तसा फोन केला. एक नवीन अनुभव म्हणून देवकाकांनीही हे संगीताचं काम केलं सचिन शंकरांचं एक देखणं नृत्यनाट्य सादर झालं. या नृत्यनाट्यात काही पूर्ण गाणी होती, काही अगदी चार-चार ओळींची गाणी होती इतर भाग पार्श्वसंगीताचा होता. कालांतराने एच.एम.व्ही.ने या नृत्यनाट्यातील दोन पूर्ण गाण्यांच्या रेकॉर्ड्स बाबुजींच्याच आवाजात काढल्या. एक गाणं होतं 'पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता' (गायक - सुधीर फडके) आणि दुसरं पूर्ण रामचरित्र सांगणारं गाणं होतं 'रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा' (गायक - सुधीर फडके).

याबरोबरच श्राव्य माध्यमामध्ये रेडियोवर मंगेश पाडगावकरांच्या 'राधा' नावाच्या संगीतिकेला उत्तम संगीत देण्याचं श्रेयही देवकाकांच्या खाती जमा आहे.

रेडियोवरील 'भावसरगम'ची जबाबदारी सांभाळत असतांना देवकाकांचा एक सांगण्यासारखा किस्सा घडलेला आहे. -- १५ मिनिटांच्या 'भावसरगम' कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी हृदयनाथ, लता आशा ही मंडळी आलेली होती त्या कार्यक्रमासाठी 'कशी काळ नागिणी' (गायिका - लता मंगेशकर), 'चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले' (गायिका - आशा भोसले) 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' (गायिका - लता मंगेशकर), ही तीन गाणी (तिन्ही गाण्यांचे संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर) रेकॉर्ड करून हे तीनही कलाकार निघून गेले. त्यानंतर असं लक्षात आलं की या तीन गाण्यांमध्ये वेळ पूर्ण होत नाहीये अजूनही एका गाण्याचा वेळ शिल्लक उरतोय. कार्यक्रम प्रसारित व्हायला फक्त दोन-तीन दिवसांचा काळ होता पण तेवढ्या काळात हृदयनाथांचं आणखी एक गाणं मिळून ते रेकॉर्ड होणं शक्य नव्हतं. या परिस्थितीला देवकाकांनी आव्हान मानलं दोन दिवसांत नवीन गाणं करून नवोदित गायिका सुधा मल्होत्राला घेऊन ते नवीन गाणं रेकॉर्डही केलं प्रसारितही केलं. देवकाकांचं ते अप्रतिम गाणं होतं - विसरशील खास मला दृष्टीआड होता... पुढे हे गाणं आशाला खूप आवडल्यामुळे एच.एम.व्ही.कडूनही या गाण्याला मागणी आल्यामुळे हे गाणं आशाच्या आवाजात रेकॉर्ड झालं आज फक्त आशाची रेकॉर्डच ऐकायला मिळते... अजून एक किस्सा असा आहे की देवकाकांनी 'माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची' अशी एक सुंदर लावणी स्वरबद्ध केली होती. मात्र ही लावणी रेकॉर्ड होता प्रथम लंडनला एका कार्यक्रमात या लावणीचं सादरीकरण झालं. ही लावणी लंडनच्या कार्यक्रमात खूप गाजली कालांतराने ही लावणी रंजना जोगळेकरच्या आवाजात रेकॉर्ड झाली. याच लावणीची 'अर्ध्या रातीला आता कुठं जाता' ही पंचलाईन अलिकडच्या 'नटरंग' सिनेमात 'मला जाउद्याना घरी आता वाजले की बारा' असं हुबेहूब स्वररूप घेऊन अवतरली.               

संगीतकार म्हणून गीताला स्वरबद्ध करतांना काय काय पथ्य पाळणं आवश्यक आहे, गीतकार म्हणून गीत रचतांना काय काय काळजी घेतली गेली पाहिजे, गायक म्हणून गाणं सादर करतांना योग्य तो भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचावा यासाठी गायकांनी कशी कशी मेहनत केली पाहिजे, अशाप्रकारे गीत विषयक सर्व बाबींचं विचारमंथन देवकाकांनी 'शब्दप्रधान गायकी' या पुस्तकात अप्रतिमरित्या केलेलं आहे.

) 'भातुकलीच्या खेळामधली' या गाण्याची चाल ठेका सुरुवातीला पाडगावकरांना आवडला नव्हता. हे सॅड सॉन्ग आहे आणि ठेका मात्र उडता वाटतो असं त्यांचं म्हणणं होतं. देवकाकांनी मात्र पाडगावकरांना 'रेकॉर्ड झाल्यानंतर ऐका आणि मग बोला,' असं सांगून आश्वस्त केलं. रेकॉर्ड ऐकल्यानंतर मधल्या सनईच्या करुण इंटरल्यूड्सनी पाडगावकर तर समाधानी झालेच, पण गाणंही अफाट लोकप्रिय झालं... ) 'येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील' या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत साखरचुंबन या शब्दानंतर देशील या शब्दापूर्वी देवकाकांनी एक भन्नाट पॉज टाकलेला आहे. हा पॉज म्हणजे त्या प्रेयसीला विचार करण्यासाठी दिलेला वेळ आहे. देवकाकांची याबाबत; 'प्रेयसीला हा वेळ देण्याची जबाबदारी संगीतकार म्हणून माझीच आहे,' अशी रसिली कॉमेंट आहे... ) 'मन पिसाट माझे अडले रे' या गाण्यामध्ये सुद्धा 'थांब जरासा' या शब्दांची परिणामकारकता वाढवण्यासाठी असाच बेहेतरीन पॉज आहे. ) 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे' या गाण्यात गायकाने 'तुझे' या शब्दावर स्ट्रेस देणं गरजेचं आहे; तसंच 'भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची' या गाण्यात 'त्या' या शब्दावर स्ट्रेस देणं अत्यावश्यक आहे असं देवकाकांचं सांगणं आहे.... ) संगीतकार वसंत प्रभूंच्या 'बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई' या गाण्यातील 'तुझ्यामुळे' हा शब्द खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे, गाणं जरी खूप सुंदर असलं तरी, 'तुझ्यामुळे' या शब्दाची स्वरयोजना वरच्या षड्जावर केली असती तर अधिक योग्य ठरलं असतं, असं मत देवकाकांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं... हे पाच मुद्दे अगदी क्रमांक घालून एवढ्यासाठी लिहिले की गाण्याच्या मूडचा, गाण्यातील प्रत्येक शब्दाचा त्यातून प्रतीत होणाऱ्या अर्थाचा सखोल विचार करणं हे देवकाकांचं वैशिष्ट्य आहे, हे पोहोचवण्यासाठी.

सुगम संगीत, भावगीते, भक्तिगीते या संदर्भातले आपले विचार, आपला अभ्यास आजच्या या क्षेत्रातल्या कलाकारांपर्यंत पोहोचावा या तळमळीने देवकाका आज एक्क्यांणवाव्या वर्षीही कार्यरत आहेत. ते आजच्या अनेक कलाकारांना शिकवतात... खरंच देवकाकांनी आमची छोटीसी आयुष्य खूप समृद्ध केलीयत, करतायत. ते खऱ्या अर्थाने आजचे 'लिव्हिंग लेजेंड' आहेत. देवकाकांना विनम्र प्रणिपात.                  

माझ्या पसंतीची दहा गाणी --

) आज राणी पूर्वीची ती - सुधीर / भावगीत 
) काही बोलायाचे आहे - श्रीधर फडके / भावगीत
) जिवाच्या जिवलगा नंदलाला रे - मधुबाला झवेरी / भावगीत 
) तू नजरेने हो म्हटले पण - आशा सुधीर / चित्रपट - झाले गेले विसरून जा 
) पक्षिणी प्रभाती चारियासी जाये - सुमन / भक्तीगीत
) माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची - रंजना जोगळेकर / लावणी (गैरफिल्मी)
) रात्रीच्या धुंद समयाला - आशा / चित्रपट - कामापुरता मामा
) विसरशील खास मला दृष्टीआड होता - आशा / भावगीत 
) कुणी जाल का सांगाल का - वसंतराव देशपांडे / भावगीत
१०) निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे - रामदास कामत / भक्तीगीत

आधार ऋणनिर्देश - यशवंत देव यांच्या मुलाखतीची डी.व्ही.डी. - शीर्षक - 'असेन मी नसेन मी

--- भाग . यशवंत देव - मा प्त
क्रमशः - - #भाग९)रामकदम

ता  -  प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           माहिती मुख्यतः गुगलविकिपीडिया  इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेलीवाचलेली आहे.
           लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेतअर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहाआहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.

@प्रसन्न सोमण

प्रसिद्धी - अभूतपूर्व (ऑगस्ट २०२०)


यशवंत देव





No comments:

Post a Comment