Friday, 21 April 2017

#१०)आनंदघन

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#१०)आनंदघन

रणजित देसाई यांच्या शिवचरित्रावर आधारित असलेल्या 'श्रीमान योगी' या अप्रतिम ऐतिहासिक कादंबरीमध्ये जीवा महालाच्या पट्टे फिरवण्याच्या कसबासाठी रणजित देसायांनी एक - बहुदा कल्पित - प्रसंग लिहिलाय. जीवा महाला पुण्यामध्ये लग्नाच्या मिरवणुकीमध्ये, एक खेळ म्हणून, नऊ हातांवरून पट्टा फिरवून पट्ट्याच्या एकाच आघाताने नारळ फोडून दाखवीत असे. एका लग्नप्रसंगी महाराजांनी जीवाचं हे पट्टा फिरवण्याचे कसब स्वतः पाहिल्यावर त्या जवाहिऱ्याने ह्या हिऱ्याची बहुमोल किंमत क्षणात जाणली जीवाच्या कसबाचं खूप कौतुक केलं; तेव्हा जीवा लाजून म्हणाला "महाराज ! फक्त येवढंच येतंय मला." त्यावर महाराज म्हणाले, "माणसाला थोडंच यावं पण त्याला तोड नसावी." पुढे अफझलखान भेटीच्या प्रसंगी याच जीवानं त्याच्या पट्टा फिरवण्याच्या कसबानं महाराजांचे प्राण वाचवले... आनंदघन यांची संगीतकार म्हणून कारकीर्द पाहिली की मला हटकून या महाराजांच्या, 'माणसाला थोडंच यावं पण त्याला तोड नसावी,' या उद्गारांची आठवण येते. तीही एवढ्यासाठीच की 'संख्या' म्हणून जर पाहिलं तर संगीतकार आनंदघन यांचं काम खरंच थोडंच आहे... पण त्या कामाला तोड नाहीये.
         
अगदी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईटवरून उपलब्ध होणारी आकडेवारी सांगायची तर मराठीतील संगीतकार आनंदघन यांनी फक्त मराठी चित्रपट केले आणि फक्त २४ गाणी दिली. मला वाटतं संगीतप्रेमींना तरी हे सांगायला नकोच, पण तरीही इथेच सांगतो की संगीतकार आनंदघन म्हणजे लता मंगेशकर... तर, संगीतकार आनंदघन यांचा पहिला चित्रपट आहे, 'राम राम पाव्हणं' (१९५० की १९५५ ? ... कारण आठवणीतली गाणी या साईट वर या चित्रपटाचं साल १९५० दिलंय तर विकिपीडिया वर १९५५ दिलंय). या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. माझा स्वतःचा तरी असा तर्क आहे की हिंदीमध्ये लता सी.रामचंद्र यांनी जे एकत्र काम केलंय त्याचा थोडा प्रभाव - म्हणजे संगीतकार सी.रामचंद्र यांच्या संगीताचा थोडासा प्रभाव - 'राम राम पाव्हणं' मधल्या गाण्यांमध्ये जाणवतो. त्यातलं एक गाणं सी.रामचंद्रांनी गायलेलं सुद्धा आहे. 'राम राम पाव्हणं' मधील आनंदघन यांची फक्त ही पाच गाणी बऱ्यापैकी अप्रसिद्ध आहेत. संगीतकार आनंदघन यांचे उरलेले चार चित्रपट आहेत मराठा तितुका मेळवावा (१९६३), मोहित्यांची मंजुळा (१९६३), साधी माणसं (१९६५) तांबडी माती (१९६९) - या चार चित्रपटांमध्ये आहेत १९ गाणी ती सर्वच अत्यंत सुप्रसिद्ध अप्रतिम आहेत. माझ्या वाचनात आलंय की फक्त आणि फक्त लताला आदरणीय असलेल्या भालजी पेंढारकरांच्या शब्दाखातर, लतानी 'आनंदघन' हे टोपण नाव घेऊन या मराठी चित्रपटांना संगीत दिलंय.

शाळेमध्ये मराठी शिकत असतांना आपण सारांश लेखन करतो - रादर प्रश्नपत्रिकेत 'सारांश लेखन करा' अशी आज्ञा असल्यामुळे आपल्याला आपल्या मगदुरानुसार ते करावंच लागतं - पण मला असं वाटतं की आनंदघन यांचं संगीत दिग्दर्शन म्हणजे, समस्त मराठी भावगीते, भक्ती गीते, सुगम संगीत, लोकगीते, चित्रपट गीते अशा विशाल संगीताचं एक 'सारांश संगीत' आहे... हे सगळे संगीत प्रकार आनंदघनांच्या संगीतात सारांशानं येतात. ही गाणी आठवून बघितलीत तर तुम्हालाही हे पटेल - अपर्णा तप करिते काननी (लता / चित्रपट - तांबडी माती), अखेरचा हा तुला दंडवत [लता (प्रतिध्वनी उषा मंगेशकर मीना खडीकर) / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा], निळ्या अभाळी कातरवेळी (लता / चित्रपट - मोहित्यांची मंजुळा), मराठी पाऊल पडते पुढे (गायक - हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार / गायिका - लता मंगेशकर, उषा मंगेशकर मीना खडीकर / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा), मागते मन एक काही (लता / चित्रपट - तांबडी माती), राजाच्या रंगम्हाली (लता उषा मंगेशकर / चित्रपट - साधी माणसं), शूर अम्ही सरदार (हृदयनाथ / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा), डौल मोराच्या मानचा (हृदयनाथ / चित्रपट - तांबडी माती), इत्यादी.

विशेषतः आनंदघन यांच्या गाण्यांचा जो वाद्यमेळ योजला जातो, जी डौलदार लय 'मुकर्रर' केली जाते (ठरवली जाते) आणि गाण्याची ज्या प्रकारे 'पेशकश' (प्रेझेन्टेशन-सादरीकरण) होते त्या 'अंदाजा'ने तर माझा तरी होश उडतो... मला खरंतर बऱ्याच गाण्यांची उदाहरणं द्यावीशी वाटतायत पण त्यातही दोन उदाहरणं दिल्याशिवाय मला राहावतच नाहीये - ) जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा (लता / चित्रपट - तांबडी माती) हे गाणं सुरु होतानाच इंट्रो आणि पहिल्या ओळीला जो ठेका सुरु होतो तो तुला घालिते चारा, या ओळीपर्यंत टिकतो आणि पुढे, द्यावा संदेस म्हायेरा तू जा रं भरारा या दुसऱ्या ओळीला लयीच्या वेगळ्या वजनात दिमडीवर आणि ढोलकीवर जो वेगळाच ठेका लागतो त्या ठेक्याला, त्या सादरीकरणाला एकदम बेभान होऊन 'दाद' जातेच. पुढे संपूर्ण गाण्यात दोन वजनाच्या दोन ठेक्यांमधली आगळी मजा आणि चालीतल्या स्वरसमूहांची अवघड पण झपाटणारी मेलडी यांचा एकत्रितपणे लुत्फ़ घेता घेता मेंदूला हव्याहव्याशा वाटणाऱ्या झिणझिण्या येत असतात. ) नाव सांग सांग सांग नाव सांग (आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा) हे सुद्धा एक झपाटूनच टाकणारं द्वंद्वगीत आहे. याही गाण्यात सुरुवातीचं झकास गद्य, मग ढोलकीचा छोटासा पण छप्परतोड तुकडा-तोडा आणि मग लावणीच्या परिचित ठेक्यात गाणं सुरु होतं. गाण्याचा सुंदरसा मुखडा झाल्यावर इंटरल्यूड त्याच ठेक्यात सुरु होतं; पण इंटरल्यूड संपता संपता कडव्यासाठी ढोलकीवर एक पूर्णपणे वेगळा आणि अनपेक्षित सौंदर्याची भन्नाट अनुभूती देणारा ठेका अशा काही डौलदारपणे चालतो की ... छे !! माझ्याकडे तरी 'त्या' अफाट ठेक्याला देण्यासाठी कुठलीही उपमा नाहीये ... तो फक्त बेभानपणे अनुभवायचा. कडवं पूर्ण झाल्यावर क्षणभरच गाण्यामध्ये अप्रतिम ठेहेराव (पॉज) येतो परत मूळ ठेक्यात मुखडा सुरु होतो. या दोन ठेक्यांच्या प्रवासात आशा आणि हृदयनाथचं भन्नाटपणे गायलेलं गाणं खरंच वेड लावतं.

ही असली अनुभूती घेतल्यानंतर मला स्वतःला तरी नक्की असंच वाटतं की संगीतकार म्हणून आनंदघन यांच्या कामगिरीचा आढावा घेतांना, त्यांच्या गाण्यांची कमी असलेली संख्या हा मायनस पॉईंट मानता फक्त आणि फक्त त्या गाण्यांचा अचाट दर्जा बघावा. हो sss आपल्याला असलेली दर्जेदार संगीताची ओढ लक्षात घेतली तर ही गाण्यांची संख्या बरीच जास्त असायला हवी होती, अशी चुटपुट लागते खरी; पण कितीही 'थोडं' काम असलं तरीही संगीतकार आनंदघन यांच्या सुरेल, अद्भुत संगीत कारकिर्दीला माझा प्रेमादरपूर्वक सलाम

माझ्या पसंतीची दहा गाणी --

१) अखेरचा हा तुला दंडवत - लता (प्रतिध्वनी उषा मंगेशकर व मीना खडीकर) / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा
२) ऐरणिच्या देवा तुला - लता / चित्रपट - साधी माणसं
३) जा जा रानीच्या पाखरा - लता / चित्रपट - तांबडी माती
४) झाला साखरपुडा गं बाई थाटाचा - लता व उषा मंगेशकर / चित्रपट - मोहित्यांची मंजुळा
५) नको देवराया अंत आता - हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट - साधी माणसं
६) माझ्या कपाळीचं कुकु - लता / चित्रपट - तांबडी माती
७) राघुमैना रानपाखरं - लता / चित्रपट - मोहित्यांची मंजुळा
८) रेशमाच्या रेघांनी - आशा / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा
९) वाट पाहुनी जीव शिणला - लता / चित्रपट - साधी माणसं
१०) सांग सांग नाव सांग - आशा व हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा

--- भाग १०. आनंदघन - मा प्त
--- #दहादिवसदहामराठीसंगीतकार ही लेखमाला - मा प्त


ता  -  प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           माहिती मुख्यतः गुगलविकिपीडिया  इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेलीवाचलेली आहे.
           लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेतअर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहाआहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
               लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.



@प्रसन्न सोमण –

प्रसिद्धी - अभूतपूर्व (ऑक्टोबर २०२०)


आनंदघन