Tuesday, 14 February 2017

जस्ट एक ओपनिंग मनोगत प्लस कन्फेशन

#दहादिवसदहामराठीसंगीतकार

मंडळी नमस्कार --

-- जस्ट एक ओपनिंग मनोगत प्लस कन्फेशन --

#दहादिवसदहामराठीसंगीतकार अशी एक मध्यवर्ती संकल्पना ठेवून एक लेखमाला लिहावी, असा विचार आहे... लेखमालेबद्दलचं माझं मनोगत कळवण्यासाठी हे थोडंसं लिखाण.

मी जुन्या हिंदी मराठी गाण्यांवर, वेडं म्हणतात तसं, प्रेम करतो. हिंदी गाण्यांवर इसाक मुजावर, शिरीष कणेकर इतरही बऱ्याच लेखकांनी खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. पण त्यामानाने मराठी गाण्यांवरचं लिखाण खूपच कमी स्वरूपात आहे-असावं; असं माझं एक निरीक्षण आहे. यामुळे फक्त मराठी संगीतकारांबद्दल अनुषंगाने मराठी गाण्यांबद्दल लिहावं असं मला वाटत होतं, पण कितपत जमेल याची शंका फार होती. खरंतर संदर्भासाठी लिखाणाची तशी कमतरता असली तरीही सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव इत्यादींनी लिहिलेली किंवा त्यांच्या संदर्भात माहिती असलेली पुस्तकं आहेत-असणार; हे मला माहित होतं. पण मी स्वभावाने फार आळशी ... त्यामुळे कष्ट घेऊन हार्ड कॉपी स्वरूपातलं लिखाण मिळवणं किंवा लायब्ररीमध्ये फेऱ्या मारून या विषयावरची पुस्तकं शोधून काढून संदर्भ धुंडाळणं, अभ्यासणं, असे विचार डोक्यात असले तरी, असले कष्टाचे विचार अंमलात आणणं महा कर्मकठीण होतं. त्यासाठी आणि तेवढा माझा पेशन्स टिकणं अशक्य होतं.

मी सदस्य असलेल्या एका फेसबुक समूहावर, 'सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील लेखमाला लिहून समूहावर पोस्टाव्यात,' अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली वाचनात आली होती. त्यामुळे एक चालना मिळाली. माझ्याही मनात मराठी संगीतकारांबद्दल लिहायचा विचार होताच... शेवटी नेहमीच्या सवयीप्रमाणे, अभ्यासाचे फारसे कष्ट घ्यायचे नाहीत आणि छोटे तर छोटे; पण जमतील तसे चुकत-माकत लेख लिहायचेच असं ठरवून टाकलंय. नाहीतरी जेमतेम आणि थोड्याशा अभ्यासाच्या आधारावर जमेल तसं लिहीत सुटायचं हा शाळा-कॉलेजच्या जमान्यातला खाक्या होताच. तेव्हा ऐकली, वाचलेली आणि मनाच्या मेमरीत टिकलेली थोडीफार माहिती आणि बाकी इंटरनेट मधून मिळालेल्या (मुख्यतः विकिपीडिया आणि आठवणीतली गाणी या साईट्स वरच्या) माहितीच्या आधारावर; तसंच माझी स्वतःची मतं आणि माझी स्वतःची आवड यांच्या आधारावर; हे लेख लिहिलेत.

मी कानसेन, रसिक नक्कीच आहे. मात्र मी संगीताचा फार मोठा जाणकार वगैरे नाहीये. संगीतात थोडीफार लुडबुड करायचा प्रयत्न करत असतो, एवढंच. त्यामुळे कदाचित माझी मतं, माझी आवडनिवड तुम्हाला पटणारी असेल, कदाचित लिखाणात काही चुका असतील, तर कृपया मला सहन करावं, सांभाळून घ्यावं.  

असो. बाकी सर्व तुमच्या प्रतिसादावर सोपवतो.

@प्रसन्न सोमण.

('अभूतपूर्व' या मासिकातून पूर्व प्रकाशित - जानेवारी २०२०)

No comments:

Post a Comment