Friday, 17 February 2017

#१)वसंत प्रभू

#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#)वसंत प्रभू

खरोखरच काही माणसं गुणाढ्य असूनही उपजतच त्यांच्या कपाळावर 'फुटी किस्मत,' 'उपेक्षा' असले अदृश्य शब्द गोंदवलेले असावेत. एरवी, स्वरसाज चढवलेली गाणी रसिकांना कमालीची प्रिय, पण संगीतकाराच्या नावाची मात्र कल्पना नाही, अशी परिस्थिती संगीतकार वसंत प्रभूंच्या नशिबी का यावी ? मुळात हयातीतच अशी परिस्थिती - एकीकडे भावगीतं गाजतायत पण मराठी चित्रपटसृष्टीची कवाडं फारशी वेगानं उघडत नाहीयेत, हिंदी तर नाहीच नाही - आर्थिक स्थिती जेमतेम - अशा परिस्थतीत मनाच्या दुबळ्या अवस्थेत व्यसनाची अधीनता - अतिशय लाडक्या मुलीचा तिच्या आजारपणामुळे दुर्दैवी अंत झालेलाही पहावा लागला. शेवटी दैवाला पांढरं निशाण दाखवून स्वतःही अवघ्या ४५ / ४६ व्या वर्षी मृत्यूला सामोरे गेले. केवढा हा दैवदुर्विलास !!

वास्तविक वसंत प्रभूंच्या संगीत कारकिर्दीची सुरुवातच प्रचंड यशाने झाली. 'गंगा यमुना डोळ्यात उभ्या का' हे गीत पी सावळारामांनी लिहिलं, प्रभूंनी संगीत दिलं आणि दस्तूरखुद्द लताने गायलं. उपलब्ध माहितीनुसार हीच वसंत प्रभूंची पहिली रेकॉर्ड. हे गाणं अर्थात भन्नाट गाजलं आणि अगदी आजपर्यंतही सुप्रसिद्ध आहे. या नंतर; .दि.मा.आणि बाबूजी या जोडगोळीप्रमाणेच; पी.सावळाराम आणि वसंत प्रभू ही जोडगोळी सुद्धा सुसाट सुटली. बऱ्याच गाण्यांसाठी लता सुद्धा या जोडगोळी बरोबर होतीच. अर्थात त्याबरोबरच वसंत प्रभूंनी 'अनाम वीरा' आणि 'जीर्ण पाचोळा पडे तो उदास' (दोन्ही गाणी कुसुमाग्रज) 'तेथे कर माझे जुळती' (बा..बोरकर) 'जन पळभर' 'मधू मागसी' 'ते दूध तुझ्या त्या घटातले' 'कळा ज्या लागल्या जिवा' 'नववधू प्रिया मी बावरते' (सर्व गाणी भा.रा.तांबे), चाफा बोलेना (बी), प्रेमस्वरूप आई (माधव ज्युलियन), सखी शेजारिणी (वा.रा.कांत), हरी उच्चारणी (संत ज्ञानेश्वरांचा अभंग) अशा अनेक नामवंत कवींची अप्रतिम गाणी स्वरबद्ध केलेली आहेत. लताबरोबरच, 'हले हा नंदाघरीं पाळणा' 'पिवळी पिवळी हळद लागली' यासारख्या गाण्यांमध्ये सुमन कल्याणपूर नावाचा आश्वासक आवाज सुनावला. आशाच्या धारदार आवाजात 'रिमझिम पाऊस पडे सारखा' 'वेड लागले राधेला' 'पंढरीनाथा झडकरी आता' 'विठू माझा लेकुरवाळा' 'दळिता कांडिता' अशी अतिशय सुश्राव्य गाणी दिली. गायक म्हणून सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर आणि अगदी तलत मेहमूदलाही प्रभूंनी गाणी दिलीयत; मात्र त्यांच्या संगीतात पुरुष गायकांना अगदी थोडं स्थान आहे, हे खरं.                            

सांगीतिक दृष्ट्या प्रभू रूपक, झपताल सारख्या अवघड तालांच्या वाटेला फारसे गेले नाहीत, तर मुख्यत्वे दादरा, केहेरवा या तालांच्या मीटरमध्येच जरा जलद लयीत त्यांच्या चाली बांधलेल्या आहेत, असं दिसतं. मेलडीच्या बाबतीत, सुरावटीच्या बांधणीत मात्र कमालीचं लोभसवाणं वैविध्य जाणवतं. शास्त्रीय संगीतावर आधारित हमीर रागाची श्रीमंती त्यांनी 'कोकिळा गा' या गाण्यातून दाखवली तर 'राधा कृष्णावरी भाळली' या गायला अतिशय अवघड असलेल्या गाण्यातून 'हिंडोल' ऐकवला.  

एकंदरीत प्रभूंची अप्रतिम गाणी ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासारख्या संगीत वेड्याला त्यांनी अजून खूप - खूप - खूपच संगीत देऊन दिगंत कीर्ती मिळवायला पाहिजे होती आणि आपले कान अजून तृप्त करायला हवे होते असं फार फार वाटतं. पण - त्यांच्या आणि आपल्याही नशिबात पाहिजे ना !! 

माझ्या पसंतीची दहा गाणी --

) घट डोईवर घट कमरेवर - लता - भावगीत  
) कोकीळ कुहूकुहू बोले - लता / चित्रपट - कन्यादान 
) आली हासत पहिली रात - लता / चित्रपट - शिकलेली बायको 
) माझिया नयनांच्या कोंदणी - लता / चित्रपट - कन्यादान
) डाव टाका नजर माझी जिंका - लता / चित्रपट - पावनखिंड 
) तुझ्या गळा माझ्या गळा - सुधीर आशा - बालगीत
) राधा कृष्णावरी भाळली - आशा - भावगीत 
) चांद मोहरे चांदणे झरे - आशा - भावगीत
) जो तो सांगे ज्याला त्याला - आशा - भावगीत
१०) सूर जुळले शब्दही जुळले - अरुण दाते - भावगीत


--- भाग . वसंत प्रभू - मा प्त
क्रमशः - - #भाग२)वसंतपवार

ता -  ) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
           ) माहिती मुख्यतः गुगल, विकिपीडिया इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
                घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली आहे.
           ) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेत, अर्थात मी सोडून इतर कोणीही      
               त्यासाठी जबाबदार नाही.
           ) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
                कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
           ) निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहा' आहेत
                'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे गाणीही दहा घेतलीयत 
                 एवढंच.
           ) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती  
                    लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.

@प्रसन्न सोमण -


प्रसिद्धी - अभूतपूर्व (जानेवारी २०२०)
वसंत प्रभू


No comments:

Post a Comment